नीलिमा सहस्रबुद्धे
फलटणची प्रगत शिक्षण संस्था (पीएसएस) आणि कमला निंबकर बालभवन वाचकांच्या परिचयाचं आहे. तिथल्या ‘अंकुरती साक्षरता’ या प्रकल्पाबद्दल पालकनीतीत वाचल्याचेसुद्धा आपल्याला आठवेल. प्रगत शिक्षण संस्थेला चाळीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने संस्थेचा इतिहास… ती कशी सुरू झाली, तेव्हाचा काळ, कामे कशी उभी राहिली, त्यामागची भूमिका, आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात आणि उभे राहिलेले काम या सगळ्याची कथा सांगणारे ‘मातीत रुजलेलं आभाळ’ हे छानसे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्या पुस्तकाबद्दल…
प्रगत शिक्षण संस्थेच्या एक संस्थापक – मॅक्सीनमावशी यांनी संस्थेची हिस्ट्री – हिज स्टोरी – त्याची कथा सांगायला सुरुवात केली आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे संस्थेचा जन्म हा काही एका विशिष्ट मुहूर्तावर एका क्षणी होत नसतो. त्याला काही व्यक्ती, घटना, परिस्थिती यांचा संदर्भ असतो. त्यांनी लिहिलेला हा भाग वाचताना, त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्याचा अनुवाद करताना मला सारखी संपादकीय कात्री चालवण्याचा मोह होई. फलटणची भाषा, तिथली महानुभावी परंपरा, पंढरपूरची वारी, ज्ञानोबा तुकोबांनी संस्कृतमधलं ज्ञान मराठीत आणून जनसामान्यांना उपलब्ध करणं, त्याला झालेला ब्राह्मणांचा विरोध… तरीही ज्ञानोबांनी सर्वजणांसाठी मागितलेलं पसायदान या सगळ्यांचा मावशींनी उल्लेख केलेला आहे. माझ्या सारखं मनात येई… प्रगत शिक्षण संस्थेचा इतिहास आहे ना? मग फलटणचा, महाराष्ट्राचा इतिहास कशाला सांगताहेत ह्या?
मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, मावशींचा सगळा जीवच त्या मराठी भाषेत, फलटणच्या मातीत रुजलेला आहे. ज्या समाजासाठी त्या बोलत आहेत, ज्या मुलांसाठी त्यांना अपार आपलेपणा वाटतो आहे त्या साऱ्यांचीच तर ही कथा आहे… हर स्टोरी! मग मला ते सगळे तपशील अर्थपूर्ण वाटायला लागले.
या मुलांनी लिहायला वाचायला शिकायला हवं हा त्यांचा ध्यास होता. आधी शाळेबाहेरच्या मुलांसाठी त्यांनी वर्ग सुरू केला; घरी, कुणाच्या अंगणात, धर्मशाळेत. त्या मुलांना असलेल्या अडचणी, त्यांच्या पालकांचे प्रश्न, त्यांच्याशी बाकी समाज कसा वागतो… सारं समजावून घेऊन त्या मुलांसाठी उभ्या राहिल्या. आसपासच्या सर्व सुहृदांची त्यासाठी मदत घेतली. मग पोलीस, तहसीलदार, रिमांड होम… लागेल तिथे चकरा मारल्या, मिळेल त्यांची मदत घेतली; पण थांबल्या नाहीत. मग हळूहळू मदत करणाऱ्यांची, शिक्षक कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली.
वंचित घरातल्याच नाही तर सधन घरातल्या मुलांनाही त्यांचं ‘मन न मोडणारी शाळा’ मिळायला हवी, ती नव्यानंच उभी करायला लागेल, हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी तीही सुरू केली. निंबकर कुटुंबीय साथ द्यायला होतेच आणि मंजिरी निंबकर तर जोडीनं काम करायलाच आल्या. ह्या पुस्तकात मॅक्सीनमावशींसह मंजिरी निंबकर आणि मधुरा राजवंशी (म्हणजे निंबकर घराची तिसरी पिढी), शिवाय शाळतले सगळे सहकारीही आहेत.
या सर्वांनी केलेले प्रयोग, उपक्रम, मुलांना काय आवडतं आणि त्यांना काय करता आलं पाहिजे याचा प्रत्येक टप्प्यावर विचार करत करत त्यांनी वाचकांनाही नवीन क्षितिजं दाखवली आहेत.
मुख्य म्हणजे हे सगळं या पुस्तकात अगदी नेटकेपणानं आणि तपशिलात वाचायला मिळतं; इतकं की ‘आपणही हे करून पाहायला हवं’ असा मोह पडतोच. मंजिरी निंबकरांनी क.निं.बा. (कमला निंबकर बालभवन) मध्ये राबवलेले उपक्रम त्या त्या शिक्षकांसह इथे मांडलेले आहेत. शाळेत मुलांसाठी राबवलेले आणि शिक्षकांनी स्वतःच्या शिकवण्यामध्ये करून पाहिलेले प्रयोगदेखील. उदा. वर्गात कविता व्याख्यान पद्धतीनं शिकवणं आणि मुलांना वाचनालयात जाऊन, नाट्यीकरण, सादरीकरण करून आपलं आपण शिकायला प्रवृत्त करणं. या दोन्ही पद्धतीतून मुलांच्या शिकण्यामध्ये घडणारा फरक व्यवस्थित चाचण्या घेऊन, नोंदी ठेवून मांडलेला आहे. असे उपक्रम जवळजवळ प्रत्येक विषयासाठी आहेत. भाषा, कला, गणित, इ. भू. ना., व्याकरणदेखील!
मुलांनी केलेले प्रकल्पही असंख्य! ते मुलांना आपले वाटावेत म्हणून विषय ठरवतानाच त्यांच्याशी केलेल्या चर्चा, शिक्षकांनी मुलांसोबत राहून घेतलेला सहभाग, मुलांसह स्वतःचं केलेलं मूल्यमापन… किती वैशिष्ट्यं सांगावीत!
मुलांना जसा अवकाश, प्रोत्साहन, मार्गदर्शन, स्वातंत्र्य मिळायला हवं, तसाच त्यांच्या भाषेला स्वीकार सन्मान मिळायला हवा असं त्या म्हणतात. शिक्षकांनी व्यावसायिक आणि दर्जेदार काम करण्यासाठी त्यांनाही शिक्षण-व्यवस्थेनं मार्गदर्शन, प्रोत्साहन, स्वातंत्र्य आणि आदर द्यायला हवा असा निष्कर्ष त्यांनी पुढे एके ठिकाणी काढला आहे. मला विशेष या गोष्टीचं वाटतं आहे, की शाळेचं काम बघणारी पुढची नवीन पिढी – ज्यात शाळेचे विद्यार्थीदेखील आहेत – त्यांनीही शाळेची ध्येय-संकल्पना अंगात मुरवून पुढची वाटचाल चालू ठेवलेली आहे.
शाळेच्या प्रकल्पांच्या सूत्रकल्पना ठरवताना त्यांनी आसपासचा, वर्तमानाचा संदर्भ घेत, मुलांच्या इच्छांना मार्ग देत माध्यमं ठरवली. अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनीही लेख लिहून या कथेला पूर्ण आकार दिला आहे.
नवी शाळा सुरू करतानाच संस्थापक गटानं ठरवलं होतं, की या प्रवासात हाती आलेलं नवनीत फक्त आपल्यापुरतं राखून ठेवायचं नाही. त्यामुळे शिक्षण परिणामकारक होण्यासाठी जे मार्ग, प्रक्रिया हाती आले, ते सारं जिल्हा परिषद, नगर परिषद व इतर शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीएसएसनं शिक्षक-प्रशिक्षणं घेतली आहेत, घेत आहेत; मग ती प्रगत वाचन पद्धती असेल, अंकुरती साक्षरता असेल, गावागावात वाचनालयं सुरू करण्याची आणि ती आनंदाची वाचनवाट चालवणारा प्रकल्प असेल किंवा महाराष्ट्रभरच्या मित्रमंडळींचं पुस्तकांशी मैत्र जुळावं म्हणून केलेली ‘पुस्तकमैत्री’ असेल. हा सगळा समृद्ध आणि उल्हासाचा पैस पाहण्यासाठी हे पुस्तक जरूर जरूर वाचा.
मुलांना मातीचा घडा किंवा वृक्षाचं रोप अशा उपमा आपण देत नाही. मुलांच्या क्षमतेला, असण्याला, वाढण्याला स्वातंत्र्याला त्यात जागा नसते. हे आपल्या मातीत रुजलेलं आभाळ तर मुलांचं संगोपन करण्याच्या अमर्याद शक्यता सामावणारं आहे!
मातीत रुजलेलं आभाळ: गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची
लेखन: मॅक्सीन बर्नसन, मंजिरी निंबकर व इतर
संपादन: संजीवनी कुलकर्णी, मधुरा राजवंशी
प्रकाशन: प्रगत शिक्षण संस्था, फलटण
देणगी मूल्य: ३०० रुपये
नीलिमा सहस्रबुद्धे

neelimasahasrabudhe@gmail.com
पालकनीती संपादक गटात सहभागी.
