अतुल गायकवाड, मुक्ता नावरेकर आणि त्यांच्या काही समविचारी मित्रांनी २०१८ मध्ये ‘बिलिफ’ ही संस्था सुरू केली. अंगणवाड्यांमधील बालशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी संस्थेचा ‘शक्ती’ हा कार्यक्रम गेली ७ वर्षे सुरू आहे. तसेच ‘किताबघर’ हा उपक्रम गेल्या ३ वर्षांपासून राबवला जातो. आव्हानात्मक परिस्थितीत जगणाऱ्या मुलांना वाचनालय आणि पुस्तकांच्या माध्यमातून एक सुरक्षित अवकाश उपलब्ध करून देणे हा किताबघरचा उद्देश आहे. सध्या पुणे आणि नाशिक शहरात एकूण ६ ठिकाणी किताबघर चालते. अनाथालये, निरीक्षण-गृहे आणि रस्त्यावरील मुले या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात. या उपक्रमातून मुलांची पुस्तकांशी मैत्री तर होतेच, पण त्यांना बाहेरील जगाचा परिचय होतो. ती पुस्तकांना स्वानुभवाशी जोडायला लागतात, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते, त्याबरोबरच त्यांना विचार करण्याची आणि ते व्यक्त करण्याची संधीही मिळते.
नुकताच, २३ एप्रिलला ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा झाला. त्या निमित्तानं किताबघरविषयी हा लेख.
विष्णू ४ वर्षांचा असताना त्याची आई गेली. म्हणजे मारली गेलीच म्हणूया. दारूच्या नशेत असताना आईवडिलांचं भांडण झालं. त्यात वडिलांकडून आईला मार लागला. आई जागीच गतप्राण झाली. मग पोलीस आले आणि वडिलांना घेऊन गेले. हे सर्व लहानग्या विष्णूच्या डोळ्यासमोर घडलं. त्याची रवानगी बालगृहात झाली.
सीमा १६ वर्षांची असताना आपल्या मित्राच्या प्रेमात पडली. दोघं पळून गेली. काही दिवसांनी पोलिसांनी तिला निरीक्षण-गृहात आणलं. ‘त्या मित्रावर केस दाखल कर, तरच आम्ही तुला घरात घेऊ’ अशी अट आता तिच्या घरच्यांनी घातली आहे. तिला हे मान्य नाही त्यामुळे तिनं निरीक्षणगृहालाच आपलं घर मानलं आहे.
सलीम उत्तर भारतात राहणारा. एके दिवशी मावशीच्या गावाला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसला आणि त्याला झोप लागली. जागा झाला तर गाडी महाराष्ट्रात पोचलेली. त्याला त्याच्या घरचा पत्ता आठवत नाही; फोन नंबर तर दूरच. त्यामुळे तो आता बालगृहातच राहतो.
बालगृह आणि निरीक्षण-गृहातले सर्वजण या मुलांना आपलंसं करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. त्यांना हवं-नको ते बघतात. त्यांचं समुपदेशनदेखील करतात. पुस्तकांच्या मदतीनं या मुलांच्या जीवनात आणखी एक आपलेपणाचा किरण आणण्याचं काम बिलिफ संस्थेचं ‘किताबघर’ करतं.
कोणत्या ना कोणत्या कारणांनी घर आणि मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या मुलांसाठी आम्ही सक्रिय वाचनालयाचा हा उपक्रम ३ वर्षांपूर्वी सुरू केला. मुलांना आवडतील अशी गोष्टीची, छान चित्रं असलेली रंजक पुस्तकं आम्ही त्यांना देतो. पण नुसती पुस्तकं देणं एवढाच किताबघरचा मर्यादित उद्देश नाही. तणावपूर्ण बालपण असणाऱ्या, लहानपणी कोणाच्या वाट्याला येऊ नयेत अशा घटना अनुभवलेल्या या मुलांच्या हाताला धरून त्यांना पुस्तकांच्या विश्वात घेऊन जाण्याचं काम किताबघरमध्ये केलं जातं. मुलांना पुस्तकं वाचून दाखवणं, त्याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणं, चर्चा करणं, त्यातील आवडलेल्या एखाद्या व्यक्तिरेखेला पत्र लिहिणं, लेखकांविषयी जाणून घेणं… असं सारं या सक्रिय वाचनालयात घडतं. शिवाय पुस्तकाशी संबंधित थीमनुसार एखादा विषय घेऊन चित्र काढणं, कविता रचणं, कोलाज करणं, मनातले विचार लिहिणं, पुस्तकांची शब्दकोडी सोडवणं या गोष्टींचाही त्यात समावेश असतो.
मागच्या आठवड्यात आम्ही ‘असं का’ विचारणारा मुलगा हे सौम्या राजेंद्रन यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं. तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ‘संविधानाची निर्मिती’ आणि ‘बाबासाहेबांनी पावाचे तुकडे खाऊन खूप अभ्यास केला’ एवढंच मुलींना माहीत होतं. हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्याशी गहन चर्चा झाली. लहानपणी बाबासाहेबांना वेगळं का बसवत, त्यांना पाणी वरून ओंजळीत का देत, शिवजयंतीच्या मिरवणुकीत फक्त एकाच रंगाचे झेंडे असतात, पण बाबासाहेबांच्या मिरवणुकीत २-३ रंगांचे दिसतात… अशा मुद्यांनी सुरू झालेली चर्चा शेवटी जात, धर्म, आदिवासी, देशांच्या सीमा अशा सर्व मुद्यांवर बोलून थांबली. चर्चेत २ गट झाले. एकमेकांची मतं ऐकून गट पुन्हा बदलले गेले. आपल्या मतांमुळे कोणी दुखावलं गेलं आहे याची अचानक जाणीव होऊन सॉरीदेखील म्हटलं गेलं. आम्ही किताबघरला एक ‘नॉन-जजमेंटल’ जागा म्हणतो ते यासाठीच. ‘नॉन-जजमेंटल’ हा आमच्या टीमचा खूप आवडता शब्द आहे. किताबघर ही जागा कोणत्याही एका मतप्रवाहासाठी नाही. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची, आपल्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक असेल, व्यक्त होण्याची कोणाला भीती वाटणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असतो. सुरुवातीला आमच्यासाठीही हे अवघडच होतं. आपण पटकन काहीतरी आदर्शवत बोलून जातो, आपल्याला पटलेली बाजू लावून धरतो, त्यापेक्षा वेगळी बाजू मांडणाऱ्यांविषयी काहीतरी समज करून घेतो आणि मग त्या अत्यंत अरुंद चौकटीतूनच नेहमी त्या व्यक्तीकडे बघत राहतो. या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांशी नातं जोडायला आम्हाला किताबघरानं शिकवलं.
ऋतुजा घाटे यांच्या ‘बुब्बाआजीची उबदार शाल’ या पुस्तकाच्या सत्रात मुलांनी बुब्बाआजीला पत्रं लिहिली, आणि स्वतःसाठी हक्कानं काही ना काही मागितलं. ‘कुछ आता ना जाता’ या राजेश जोशी यांच्या पुस्तकातल्या कविता वाचल्यावर त्यांनी भरभरून कविता लिहिल्या. माधुरी पुरंदरे ह्या तर लहान गटातल्या मुलांच्या खूप लाडक्या आहेत. लहानगी शोभा तर कोणत्याही लेखकाला ‘पुलंदले’ म्हणूनच सुरुवात करते!
किताबघरचं एक केंद्र गोदा घाटावर चालतं. नदीकाठी, झोपड्यांमध्ये राहणारी ही मुलं, शाळेत जाण्याची भीती वाटते म्हणून किंवा तिथे चांगली वागणूक मिळत नाही म्हणून शाळेतच जात नाहीत. काहींचे पालक बिगारी काम करतात, तर काही मुलं अनाथ, कोणीतरी सांभाळून मोठी केलेली आहेत. कधी मासे पकडायचे, कधी भीक मागायची किंवा कधी रस्त्यावर काही वस्तू विकून पैसे मिळवायचे असा ह्या मुलांचा दिनक्रम. संध्याकाळी सर्वजण पुस्तक वाचायला येतात. कोणालाच नीट वाचता येत नाही. त्यामुळे इथे आम्ही त्यांना गोष्टींच्या पुस्तकांबरोबरच लेखन, वाचन, गणन देखील शिकवतो. जमिनीचं अंथरूण आणि आकाशाचं पांघरूण करून चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या मुलांसाठी किताबघर ही अगदी जिव्हाळ्याची जागा बनली आहे. एखाद्या दिवशी आम्ही सत्राला जाऊ शकलो नाही, तर पुढच्या वेळी मुलं हक्कानं आम्हाला रागावतात! एरवी ज्यांच्याकडे हमखास चोर म्हणून पाहिलं जातं ती मुलं सत्रासाठी वापरलेली स्टेशनरी, पुस्तकं असं सगळं सामान काळजीपूर्वक गोळा करून आम्हाला परत देतात. खरंच ती चोर आहेत का, त्यांच्या या अशा परिस्थितीला कुठेतरी आपणही कारणीभूत आहोत का, असे प्रश्न अशा वेळी मनात येतात.

हे काम करताना बऱ्याचदा अस्वस्थ व्हायला होतं. अजाणत्या वयात गुन्ह्यात अडकलेली ही मुलं खूप असाहाय्य वाटतात. त्यांच्या शाळेत जाण्यावर, बाहेर पडण्यावर खूप निर्बंध असतात. आपलं दुःख मनात कोंडून ठेवून ती आला दिवस पुढे ढकलत असतात. पुस्तकांमधून त्यांना बाहेरच्या जगाची ओळख होते. स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी मिळते. ‘ताई आज ५ वर्षांनी पुस्तक हातात घेतलं’ असं मनन म्हणाला. ते सांगताना त्याच्या डोळ्यात चमक आणि ऐकताना आमच्या डोळ्यात पाणी होतं. तुकाराम म्हणाला, “मी आयुष्यात पहिल्यांदाच चित्रं काढलं!” ऐकून वाटलं, एकाच शहरात राहून आपण किती कमालीची सामाजिक-आर्थिक दरी अनुभवतोय!

सध्या आमच्या वाचनालयात ७०० पुस्तकं आहेत. मुलांचं भावविश्व लक्षात घेऊन आम्ही अत्यंत काळजीपूर्वक पुस्तकांची निवड करतो. प्रत्येक पुस्तक मुलांबरोबर कसं घ्यायचं याचं नियोजन सत्राच्या आधीच तयार असतं. यासाठी आम्ही बुकवर्म, एकलव्य अशा संस्थांमधून प्रशिक्षणं घेतली आहेत. पुणे आणि नाशिकच्या एकूण १८० मुलांसाठी सध्या किताबघरचं काम चालतं. प्रत्येक वयोगटासाठी वेगळी सत्रं असतात. एका आठवड्यात एकूण ११ सत्रं होतात.
या कामाची गरज संपावी हे कितीही रोमांचक स्वप्नं असलं, तरी ते नजीकच्या भविष्यात शक्य नाही. त्यामुळे अधिकाधिक वंचित मुलांपर्यंत आपण आणि आपली पुस्तकं पोचावी ही इच्छा आम्ही मनाशी बाळगली आहे!
(लेखातील मुलांची नावे बदललेली आहेत.)
मनीषा गांगोडे

manisha.gangode@beliefforchange.org
रसिका सावळे

rasika.savale@beliefforchange.org
मनीषा आणि रसिका बिलिफ संस्थेत किताबघर कार्यक्रमात काम करतात. त्यांनी सामाजिक शास्त्र (सोशोलॉजी) विषयात शिक्षण घेतले असून आव्हानात्मक परिस्थितीतील मुलांसोबत काम करण्यासाठी लागणारी संवेदनशीलता आणि संयम हे त्यांचे स्वभाव-विशेष आहेत. मनीषा नाशिकमध्ये तर रसिका पुण्यात काम करते.
शब्दांकन : मुक्ता नावरेकर
संस्थापक-संचालक, बिलिफ संस्था
