बाबा त्याची शक्ती अजमावतो तेव्हा…
अलेक्झांडर रास्किन
लहान असताना बाबाला खूप मित्र होते. सगळे मिळून रोज एकत्र खेळायचे. कधीकधी भांडायचे, क्वचित त्यांच्या मारामार्याही होत. मग परत त्यांच्यात मांडवली व्हायची. पण त्यांच्यात एक मुलगा होता; तो कधीच भांडायचा नाही. त्याचं नाव होतं वोवा नाझारोव. छोटा आणि अगदी काटक. त्याचे बाबा घोडेस्वार सैनिक* होते. बाबांचा प्रसिद्ध कमांडर बुड्योनीबद्दल बोलायला वोवाला खूप आवडायचं. बुड्योनी कसा शूरवीर होता… कसा तो व्हाईट गार्ड्ससोबत लढला… हे तो सगळ्या मुलांना सांगायचा. बंदुका, तलवारी, सेनापती, सैन्य… त्याला कश्शाकश्शाची भीती वाटायची नाही. वोवाला बुड्योनीच्या घोड्याबद्दल आणि तलवारीबद्दलही सर्व काही ठाऊक होतं. तो नेहमी म्हणायचा, “मी मोठा झालो की बुड्योनीसारखा होणार!”
छोट्या बाबाला वोवाकडे जायला खूप आवडायचं. मजा यायची त्याच्याकडे. तो सतत काहीतरी करत असायचा. कधी दुकानात ब्रेड घ्यायला जायचा, कधी चुलीसाठी लाकडं फोडत असायचा, कधी फरशी पुसत असायचा, तर कधी भांडी घासत असायचा. वोवाच्या कुटुंबातल्या सगळ्यांना वोवा खूप आवडतो हे बाबाला दिसायचं. बर्याचदा त्याचे बाबा त्याच्याशी असे बोलायचे जणू तो अगदी मोठ्ठा माणूस आहे.
ते म्हणायचे, “वोवा, या रविवारी कोणाला बरं बोलवूया जेवायला?”
किंवा
“तुला काय वाटतं, हे एवढं लाकूड आपल्याला या वसंतापुरतं पुरेल का?”
आणि ह्यावर काय उत्तर द्यायचं ते वोवाला नेहमीच ठाऊक असायचं.
त्याचा एखादा मित्र घरी आला, तर घरातले सगळे येऊन बसायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे. छानसं काहीतरी खाऊ घालायचे. सगळे मिळून एखादा खेळ खेळायचे. वोवाच्या घरी येते तशी मजा आपल्या घरी कधीच येत नाही ह्याचं छोट्या बाबाला फार वाईट वाटायचं.
वोवा आणि तो अगदी चांगले मित्र होते. पण वोवा कधीच का भांडत नाही हे त्याला कधीच कळायचं नाही.
एकदा त्यानं विचारलंच वोवाला, “तू घाबरतोस का भांडायला?”
वोवा म्हणाला, “स्वतःच्याच बाजूशी भांडण्यात काय हशील आहे?”
***
एकदा सगळ्या मुलांमध्ये चुरस लागली – सगळ्यात शक्तिमान कोण?
एक मुलगा म्हणाला, “माझ्यापेक्षा मोठा असणार्या कुणालाच मी घाबरत नाही. तुम्हा सगळ्यांना मी चिंधीच्या बाहुलीसारखं भिरकावून देऊ शकतो. माझे स्नायू पाहिलेत का तुम्ही!”
“मी तर एवढा शक्तिशाली आहे, की माझा मलाच विश्वास वाटत नाही. खास करून माझा डावा हात! अगदी स्टीलसारखा आहे.” दुसरा मुलगा म्हणाला.
“मी किती शक्तिशाली आहे हे बघायचं असेल, तर मला राग येतो तेव्हा बघायचं. पण तेव्हा तुम्ही दूर राहिलेलंच बरंय, कारण रागाच्या भरात मी काय करीन काही सांगता येत नाही.” अजून एक जण म्हणाला.
“हा सगळा वाद घालण्याची गरजच काय आहे? मला माहीतच आहे, की तुम्हा सगळ्यांपेक्षा मीच शक्तिमान आहे.” आणखी कुणी म्हणाले.
सगळे बढाया मारत राहिले; मात्र वोवानं एक चकार शब्द उच्चारला नाही.
तेवढ्यात एकजण म्हणाला, “मला माहीत आहे काय करायला हवं ते. चला आपण कुस्ती खेळूया. जो जिंकेल तो सगळ्यात शक्तिमान!”
हे सगळ्यांना मान्य झालं. कुस्ती सुरू झाली. सगळ्यांनाच वोवाशी कुस्ती करायची होती. त्यानं कधीच त्यांच्यापैकी कुणाशी भांडण केलेलं नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं, की तो भित्रा आहे. सुरुवातीला वोवाला कुस्ती करायचीच नव्हती; पण डाव्या हातात स्टीलसारखी ताकद असलेल्या मुलानं त्याला पकडलं, तेव्हा मात्र वोवा रागावला. त्यानं त्या मुलाला जमिनीवर आपटलं. मग जो मुलगा म्हणत होता, की तो सगळ्यांना बाहुल्यांसारखं फेकून देऊ शकतो, त्यालाही वोवानं लोळवलं.
मग ‘रागाच्या भरात शक्तिशाली होणारा’ मुलगा पुढे आला. तो अजूनही ओरडत होता, की अजून त्याला पुरेसा राग आलेला नाही… पण तोपर्यंत वोवानं त्यालाही जमिनदोस्त केलं. शेवटी, वोवानं छोट्या बाबाला सपाट केलं. ते दोघं चांगले मित्र असल्यामुळे, वोवानं असं भासवलं, की छोट्या बाबाला पाडणं सगळ्यात कठीण होतं.
“वोवा, तू सगळ्यात ताकदवान आहेस. पण तू हे आधी का नाही सांगितलंस?” मुलांनी विचारलं.
वोवा हसला आणि म्हणाला, “फुशारक्या मारण्यात काय अर्थ आहे?”
त्यावर ते काहीच बोलू शकले नाहीत. पण त्या दिवसापासून त्यांनी आपापल्या ताकदीबद्दल फुशारक्या मारणं बंद केलं. आणि छोट्या बाबाला हे कळलं, की ताकदवान होण्यासाठी फक्त बढाया मारणं पुरेसं नसतं. त्याला वोवाबद्दल खूप आदर वाटू लागला. बरीच वर्षं लोटली. आता बाबा मोठा माणूस झाला आहे. तो दुसऱ्या शहरात राहायला गेला आहे. वोवा कुठे असतो हे त्याला माहीत नाही; पण त्याला खात्री आहे, की वोवाही एक चांगला मोठा माणूस झाला असणार.
Cavalryman : घोडेस्वार सैनिक*
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतात.
सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज
