विक्रांत पाटील
कोविडकाळात चॅट-जीपीटी ची एन्ट्री झाली. गंमत म्हणून आपण सगळेच या नवीन खेळण्याशी खेळलो. त्या काळात मी जीपीटीसोबत केलेला पहिला संवाद मला नीट आठवतोय.
मी : तुझी मला कशाकशात मदत होऊ शकते?
जीपीटी : अशी सर्व कामं ज्यात विचार करायला लागतो, माहिती शोधून विश्लेषण करायला लागतं. उदा. लिखाण, प्रोग्रॅमिंग, गणित, माहितीचं विश्लेषण, टॅक्स, कायदे, नियम इत्यादीमध्ये मी खूप योगदान देऊ शकेन.
मी : अरे वाह! पण हे सगळं तू केलंस, तर मी काय करू?
जीपीटी : तुम्हाला जास्त अर्थपूर्ण वाटणाऱ्या उपक्रमांसाठी तुम्ही तुमचा वेळ द्या. जसं की कुटुंबासोबत वेळ घालवा, बागकाम करा, एखादा खेळ खेळा, छंद जोपासा!
त्या क्षणी मला वाटलं, की सर्व वैचारिक कामं आता हळूहळू माणसाच्या हातून जातील. ती भीती आज मला सत्यात उतरताना दिसते आहे. सध्या तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समस्त साधनांनी (समंधांनी) या साऱ्या कामांत उच्चांक गाठलाय!
हा झाला प्रौढ व्यक्तींच्या काम आणि रोजगारावरचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम. पण शालेय विद्यार्थ्यांवर याचा काय बरं परिणाम होईल? शिक्षक गणितं घालतात, निबंध लिहायला सांगतात, इतिहासाच्या धड्यांचं विश्लेषण करायला सांगतात, विविध उपक्रम घेतात.
त्यामागची त्यांची भूमिका काय असते?
त्यांना अवगत असलेली माहिती वापरून विद्यार्थ्यांनी तर्क करायला शिकणं, क्लिष्ट माहितीचं विश्लेषण करणं, कळलेली माहिती योग्य पद्धतीनं मांडायला शिकणं…
लिखाणाच्या प्रक्रियेत मेंदूची चांगली मशागत होते. आयतं उत्तर अपेक्षित नसतं. सुचवलेल्या क्रिया करण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल होत असतो. क्लिष्ट माहितीमधून काही समज निर्माण करण्याची प्रक्रिया विद्यार्थी शिकत असतात. विविध उपक्रमांमधून सर्वांगीण विचार, कलात्मक दृष्टिकोन, हस्तकौशल्य इत्यादींची तयारी होत असते. एकूणात शाळेच्या अभ्यासात खरं तर हे सगळं अपेक्षित आहे. पण होतं असं की निबंध, उपक्रमाचा अहवाल, आकृती, चित्र अशा रूपात विद्यार्थ्याचं काम शिक्षकांपर्यंत पोचतं. त्याच्या मोजमापावरूनच गुण दिले जातात. गृहपाठ करताना विद्यार्थ्यानं जी मेहनत घेतली त्याचं मोजमाप करायला काही वावच नसतो.
ज्याचं मोजमाप होतं ते कृत्रिम बुद्धिमत्ता-साधनांच्या मदतीनं तयार करणं सोपं आहे आणि ते सर्वांनाच उपलब्ध असू शकतं. म्हणजे मग भाषेची तयारी नसतानाही प्रत्येक विद्यार्थी छान निबंध ‘लिहून’ आणेल, इतिहासाचा धडा स्वतः न वाचता त्याचं संक्षिप्त मुद्देसूद विश्लेषण सर्वच विद्यार्थी सहज ‘लिहून’ आणतील. गणितं सर्वांना सहज सोडवता येत आहेत असं भासेल… म्हणजे असं होईल, की प्रचलित मोजमाप पद्धतीनुसार सर्वच मुलं उत्तम असतील; अर्थात, फक्त मोजमापात! म्हणजे गुण मिळतील पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसितच झालेल्या नसतील.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अभ्यास ह्या आघाडीवर एवढं नकारात्मक चित्र असूनसुद्धा काही आठवड्यांपूर्वी भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्थेनं (आयसर) संस्थेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कामात आणि अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायची मुभा दिली आहे. पुण्याच्या आयसर मध्ये प्राध्यापक असलेल्या सुतीर्थ डे यांचं मध्यंतरी एक व्याख्यान झालं. ते म्हणाले, की सक्ती करून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांपासून दूर ठेवणं शक्य नाही. आता आपण विचार हा करायचा आहे, की मुलांना हे तंत्रज्ञान वापरायची मुभा देऊनही त्यांना त्याच्या दुष्परिणामांपासून कसं वाचवता येईल. यासाठी मुलांना या तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांची कल्पना दिली पाहिजे. पालकांनासुद्धा या तंत्रज्ञानाच्या फायद्या-तोट्याविषयी जागरूक करायला हवं. आणि मुलांना अभ्यास देताना, त्यांचं मूल्यमापन करताना शिक्षकांनी हे लक्षात घ्यायचं, की प्रत्येक विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर नक्की करणारच आहे.
सर्वप्रथम हे समजून घेऊयात, की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिक्षणात कुठे आणि कसा करता येईल.
हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं ह्याची ज्यांना कल्पना नसेल, त्यांच्यासाठी इथे थोडक्यात सांगतो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची वेबसाईट किंवा मोबाईल ॲप असतं. या ॲपशी, वेबसाईटशी तुम्ही गप्पा मारू शकता. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधावा तसा संवाद साधू शकता. हे तंत्रज्ञान तुमच्याशी एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे संवाद करतं. एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, की हे तंत्रज्ञान म्हणजे एक यंत्र आहे. त्यामुळे प्रश्न विचारल्यावर ते रागावत नाही किंवा थकतही नाही. कितीही प्रश्न विचारा, उत्तर मिळेल. एखाद्या चौकस/उत्साही विद्यार्थ्यासाठी अगदी उत्तम. ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार उत्तर देऊ शकतं. म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान-साधनाला शिक्षकाची भूमिका द्यायची असं आपण ठरवलं, तर शिक्षक – विद्यार्थी हे गुणोत्तर १:१ होईल; अगदी आदर्श!
फक्त एक लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारताना संदर्भ नीट द्यायचा. संदर्भ जेवढा अचूक तेवढं उत्तर नेमकं. कसा द्यायचा अचूक संदर्भ? कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं जे साधन आपण वापरणार असू, त्याची भूमिका येऊ घातलेल्या संवादात काय असेल ते सांगून मग आपला प्रश्न मांडायचा. म्हणजे उदाहरणार्थ, मला इयत्ता आठवीच्या गणिताबद्दल समजून घ्यायचं असलं, तर “तू गणिताचा शिक्षक आहेस आणि मला इयत्ता आठवीच्या गणितातली ‘त्रिकोणांची एकरूपता’ ही संकल्पना उदाहरण देऊन समजावून सांग”. त्या साधनाची भूमिका काय असेल हे आपण सांगितलं नाही, तर संदिग्ध उत्तर मिळायची शक्यता जास्त. संकल्पना समजून घेणं, नवीन माहिती मिळवणं अशा गोष्टींसाठी कृत्रिम तंत्रज्ञान वापरलं, तर फायदाच आहे. मात्र निबंध लिहिणं, अहवाल तयार करणं, धड्याचं संक्षिप्त विश्लेषण करणं, एखाद्या उपक्रमातलं चित्र तयार करणं अशा गोष्टींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरल्यास विद्यार्थ्याची अपेक्षित प्रगती होणार नाही. मुळात यात निबंध, अहवाल, चित्र ह्याला कमी महत्त्व आहे; पण ते करत असताना ज्या क्रिया अंतर्भूत आहेत त्या विद्यार्थ्यांनी करणं जास्त महत्त्वाचं आहे. लागणारी माहिती गोळा करणं, वाचन करणं, क्लिष्ट माहिती समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
मग अशा कामांसाठी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कसं वापरायचं? मुळात ते काम आधी स्वतः करून मग वापरत असलेल्या साधनाला विचारणा करता येईल, “मी लिहिलेल्या ह्या निबंधात काय उणिवा आहेत? हा अहवाल अजून उत्तम कसा करता येईल?”
आधी म्हटल्याप्रमाणे अचूक माहिती मिळवण्यासाठीसुद्धा ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. पण माहिती ‘अचूक’ मिळेलच असं म्हणता येणार नाही. हे तंत्रज्ञान शक्यतेच्या गणितावर (प्रोबॅबिलिस्टिक अल्गोरिदम) काम करतं. एवढंच नव्हे तर आंतरजालावरील (इंटरनेट) असंख्य ठिकाणांहून ते माहिती संकलित करू शकतं; ती माहिती चूक आहे की बरोबर हे त्याला कळत नाही. त्यामुळे काही वेळेस चुकीची उत्तरंही मिळतात. म्हणूनच मिळालेली माहिती अजून इतर स्रोतांकरवी तपासून घेणं गरजेचं असतं. यात एक अशी मेख आहे, की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानानं उत्तर कुठून शोधून द्यायचं हे आपण ठरवून दिलं, तर उत्तरादाखल चुकीची माहिती मिळण्याची शक्यता कमी. म्हणजे आपण तंत्रज्ञानाला असं सांगू शकतो, की मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी बालभारती आठवीचं पुस्तक वापर. अर्थात, ही सुविधा सर्वच वेबसाईट आणि ॲप्सवर उपलब्ध नाही. गूगलच्या नोटबूक एलएम वर हे शक्य आहे.
मुलांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अजिबात वापरू नये अशी अजून एक खूप गंभीर बाब म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर भावनिक मदतीसाठी करणं. खास करून वयात येणाऱ्या मुलांसाठी हा धोका समजून घेणं आवश्यक आहे. ह्या तंत्रज्ञानातील आभासी व्यक्तीच्या प्रेमात पडून मुलांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे काही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान-साधनं ही कायद्यानं फक्त सज्ञान व्यक्तींसाठीच आहेत. उदा. claude. पण म्हणजे असं समजू नये, की इतर साधनं मुलांसाठी सुरक्षित आहेत. मुळात इथे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. पालकांचा मुलांशी संवाद असायला हवा. आपल्या मनातली दुःखं, नकारात्मक भावना त्यांना मोकळेपणानं व्यक्त करता येतील असं वातावरण घरात हवं. अंगमेहनतीचे खेळ मुलांच्या दिनक्रमात असल्यास त्यांना नकारात्मक भावना काही प्रमाणात हाताळता येतात, असं विज्ञान सांगतं.
स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल करण्यासाठी मदत मागणं, अवघड प्रसंगी भावनिक आधार मिळवणं हे तसं फार आक्षेपार्ह वाटत नसलं, तरी त्यात मोठे धोके आहेत. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान असं बनवलेलं आहे, की ज्याच्याशी ते संवाद साधतं त्या व्यक्तीला ‘छानच वाटलं पाहिजे’ असा संवाद ते करतं.
यात ढोबळमानानं चार गोष्टी होतात –
१. तंत्रज्ञान वापरणाऱ्याला आपण खूप हुशार आहोत आणि जलद विचार करू शकतो असा भ्रम होतो.
२. स्वतःच्या विचारांना पुष्टी मिळाल्यासारखं वाटतं. ‘मी बरोबर आहे’ हे समोरच्याकडून ऐकल्यावर प्रत्येकाला छानच वाटतं. हे तंत्रज्ञान वापरताना अगदी तसंच होतं.
३. हे तंत्रज्ञान आपल्यावर बरा-वाईट कुठलाही शिक्का न मारता आपलं म्हणणं शांतपणे ऐकून घेतं.
४. भावनिक पळवाट म्हणून हे तंत्रज्ञान अगदी सहज वापरलं जातं; विशेषत भावनांना सामोरं जायला ज्यांना आवडत नाही त्यांच्याकडून.
ह्या सर्व कारणांमुळे हे तंत्रज्ञान एका हव्याहव्याशा वाटणाऱ्या भावनिक जोडीदाराची जागा नकळत आणि सहज घेऊ शकतं. यामुळे होणार असं आहे, की हळूहळू ही साधनं माणसापेक्षा जास्त विश्वासार्ह वाटायला लागतील. याचा परिणाम सरळसरळ आपल्या नातेसंबंधांवर होणार आहे. यातून वयात येणारी मुलं सुटली तरच नवल! खास करून किशोरवयीन मुलं आणि पालकांमध्ये सुसंवाद नसल्यास!
कुठलंही नवीन तंत्रज्ञान फायद्यांसोबत तोटेही घेऊन येतंच. त्याचे फायदे-तोटे काहीही असले तरी, त्यांचं आपल्या आयुष्यात येणं अटळ आहे. हा सगळा विचार करून ते जबाबदारीनं हाताळूया आणि आपल्या मुलांनाही ते तेवढ्याच जाणिवेनं आणि जबाबदारीनं हाताळता यावं यासाठी त्यांच्यासोबतचा संवाद वाढवूया!
विक्रांत पाटील

vikrant.patil@gmail.com
