गणित विकतच्या खाऊचं

बसवंत विठाबाई बाबाराव 

वर्षाच्या बॅगेतून अधूनमधून कुर्रकुर्र… कुर्रकुर्र… असा आवाज यायचा. आवाज अगदी हलकासा असायचा; पण शांत वर्गात तो कानाला लगेच जाणवायचा. आवाज आला की मन्या हळूच वर्षाकडे बघायचा… आणि वर्षा मन्याकडे. दोघांच्या नजरा जुळल्या, की ते पटकन दुसरीकडे बघायचे; जणू काहीच घडलं नाही.

मन्या म्हणजे वर्षाचा भाऊ, मन्मथ. पण सगळे त्याला ‘मन्या’ म्हणून हाक मारायचे. थोडा खट्याळ, थोडा लाजाळू; पण वर्गात सगळ्यांचा आवडता.

हा कुर्रकुर्र आवाजाचा प्रकार दोन-तीन वेळा झाल्यावर नेमकं काय चाललं आहे ते माझ्या लक्षात आलं. वर्षाच्या घरी किराणा-दुकान आहे. दुकानातले कुरकुरे, चिप्स असे खाऊ बॅगेतून शाळेत आणायचे आणि वेळ मिळेल तसं, कोणी पाहत नाही असं वाटलं, की हळूच खायचे. हा सगळा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून सुरू होता.

दुकानातला असा विकतचा खाऊ खायचा नाही हे काही दिवसांपूर्वीच मी सगळ्या मुलांना स्पष्ट सांगितलं होतं. आणि आनंदशाळेत तर अजिबात आणायचा नाही. अर्थात, सूचना दिली म्हणून ती पाळली जाईलच असं नाही. त्यामागचं कारण मुलांना नीट समजलं नव्हतं. विषयाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नव्हतं.

हे सगळं मुलांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या अनुभवातून कसं समजावून सांगायचं हा माझ्यासमोर प्रश्न होता.

वर्षा आणि मन्या यांच्या निमित्ताने ती संधी आज मिळाली होती.

मी ठरवलं, थेट ओरडण्यापेक्षा मुलांनाच विचार करायला लावूया. त्यांनीच त्यांचा खाऊ, त्याचा खर्च आणि त्याचा परिणाम समजून घ्यावा.

मी वर्गात विचारलं, “मुलांनो, आज आपण आपल्या खाऊचं गणित मांडायचं का?”

मुलं नेहमीप्रमाणे एकदम मोठ्याने म्हणाली, “हो… सर!”

मात्र त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. नेमकं काय करायचं आहे, हे अजून स्पष्ट नव्हतं.

वर्गात कुजबूज सुरू झाली.

महादूने हात वर करून विचारलं, “सर, आपण दुकानातून काय काय विकत घेतो, त्याचा हिशोब करायचा का?”

मी हसत म्हणालो, “बरोबर महादू! अगदी तेच करायचं आहे.”

मुलांची उत्सुकता वाढली.

मी पुढे सांगितलं, “तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे सांगायचं, गेल्या एका आठवड्यात… आणि आठवत असेल तर पूर्ण महिनाभरात… तुम्ही काय काय विकत घेऊन खाल्लं आहे.”

प्रथमेशनं लगेच उत्साहात सांगायला सुरुवात केली, “चिप्स, मुरकुल, लॉलीपॉप… आणि..”

मी त्याला मध्येच थांबवलं, “थांबा थोडं… घाई नको. आधी नीट समजून घेऊया.”

सगळ्यांनी मान हलवली.

बोर्ड साफ करून मी मार्करने मोठ्या अक्षरात लिहायला सुरुवात केली. मुलांनाही त्यांच्या वह्यांमध्ये मुद्दे लिहून घ्यायला सांगितलं.

बोर्डवर मी तक्ता काढला.

‘गेल्या एक महिन्यात विकत घेतलेला खाऊ’

खाली तीन रकाने काढले. एकात ‘खाऊचा प्रकार’, दुसऱ्यात ‘खाऊचे / पाकिटाचे नाव’, आणि तिसऱ्यात खाऊची किंमत.

मी मुलांना समजावून सांगितलं, “पहिल्यांदा तुम्ही काय काय खाल्लं आहे ते लिहा. म्हणजे खाऊची यादी करा. मग त्याचं वर्गीकरण करा. जसं, चिप्स एक गट, बिस्किटं एक गट, गोळ्या-चॉकलेटं एक गट. आणि नंतर ही सगळी माहिती या तक्त्यात लिहा.”

मुलं लक्ष देऊन ऐकत होती.

“तुमची यादी पूर्ण झाली, की सगळ्यांची बेरीज करायची. किती पैसे खर्च केले ते काढायचं.”

हे ऐकून काही मुलं एकमेकांकडे बघून हसू लागली. बहुतेक त्यांना अंदाज आला होता, की आकडे मोठे निघणार आहेत.

महादूने पुन्हा विचारलं, “सर, मग आता लिहायला सुरुवात करायची का?”

मी म्हणालो, “थोडं थांबा!”

मग मन्या आणि वर्षाला पुढे बोलावलं.

थोडं घाबरतच दोघं पुढे आले. आता बॅगेतलं कुरकुरे प्रकरण निघणार असं त्यांना वाटलं .

पण तो विषय मी मुद्दाम बाजूला ठेवला.

मी मुलांनाच विचारलं, “मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, वर्षा आणि मन्मथला मी पुढे का बोलावलं आहे?”

मन्मथला प्रार्थना पाठ नसते, हे सगळ्यांना माहीत होतं. 

कपिलने लगेच चिमटा काढला, “सर, आजची प्रार्थना हे दोघं म्हणणार आहेत का?”

वर्गात हलकंसं हसू पसरलं.

मीही हसत म्हणालो, “कपिल, मन्या एक दिवस प्रार्थना नक्की म्हणेल. पण आज त्यांना पुढे बोलावलं आहे कारण त्यांच्या घरी दुकान आहे. आणि आपण जो खाऊचा अभ्यास करणार आहोत, त्यात ही दोघं आपल्याला खूप मदत करू शकतात.”

आता मुलांच्या डोळ्यात कुतूहल दिसायला लागलं.

मी पुढे म्हणालो, “एकदा आपण त्यांच्या दुकानालाही भेट देणार आहोत.”

हे ऐकताच प्रथमेश आणि महादू दोघंही एकदम म्हणाले, “चला सर! आत्ताच जाऊ या!”

हसून मी त्यांना थांबवलं. “अरे, एवढी घाई कशाला? आधी तुम्ही सगळे तुमची खाऊची यादी तयार करा. मग तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते लिहून ठेवा. आणि मग आपण दुकानाला भेट देऊ.”

आता कामात गुंतायला मुलं पूर्णपणे तयार झाली होती. वह्या उघडल्या गेल्या. पेन्सिली हातात आल्या. आणि प्रत्येक जण स्वतःच्या खाऊच्या गोष्टी आठवू लागला. मुलांना आजच्या आज सर्व गोष्टी आठवणं अवघड होतं. म्हणून त्यांना हे उद्या घरून लिहून आणायला सांगितलं.

वर्ग सुटताना ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना घेतली. मुलं उत्साहात घरी गेली.

दुसऱ्या दिवशी वर्गात एक वेगळंच वातावरण होतं. सगळ्यांच्या वहीत खाऊच्या याद्या तयार झाल्या होत्या. काहींच्या वहीत दोन-तीन पदार्थ होते, तर काहींच्या वहीचं पूर्ण पान भरलं होतं.

मी वर्गात शिरताच महादूने उत्साहात वही पुढे केली, “सर, बघा… मी सगळं लिहिलंय!”

हसत मी त्याची वही घेतली. त्यात चिप्स, बिस्किटं, गोळ्या, चॉकलेट… अशी भलीमोठी यादी होती.

इतर उपक्रमांप्रमाणे आपली यादी मोठी म्हणजे आपला अभ्यास चांगला झाला, असा अनेकांचा समज झाला होता.

प्रथमेश म्हणाला, “माझीच यादी सगळ्यात मोठी झाली, सर!”

मी स्पष्ट केलं, “या उपक्रमात यादी मोठी असणं ही चांगली गोष्ट नाही. उलट आपल्या यादीत जितक्या कमी गोष्टी असतील, तितकं चांगलं आहे.”

मुलांनी खाऊची यादी, त्यावरील खर्च आणि महिन्याचा एकूण खर्च, अशी बरीच आकडेमोड करून आणली होती.

मी मुलांना आपापली यादी वाचून दाखवायला सांगितलं. नंतर प्रत्येकाचं नाव लिहून त्यासमोर त्याचे महिन्याभरातील खर्च मांडले. हळूहळू मुलांना या आकड्यांचा अर्थ उमजू लागला.

कपिल – १२० रुपये
महादू – १३५ रुपये
गणेश – १४० रुपये

अमृता – १४० रुपये
अनुज – १४५ रुपये
प्रथमेश– १५८ रुपये

असे अनेक आकडे समोर आले.

त्यांचा चढता क्रम, उतरता क्रम, सगळ्यात जास्त खर्च कोणी केला, कोणत्या घटकावर खर्च झाला… अशी बरीच चर्चा झाली.

यातून गावातल्या मुलांचा एकूण खाऊवरचा महिन्याचा आणि वर्षाचा खर्च काढला. मन्या आणि वर्षानी त्यांच्या दुकानातील विक्रीचा अनुभव सांगितला. गणेशच्या आजोबांचंही किराणा-दुकान आहे. त्यानेही आजोबांच्या दुकानात किती खाऊ विकला जातो, याचा अंदाज सांगितला.

आता हळूहळू आकडे हजारात… आणि मग लाखात जाऊ लागले. 

गाव वर्षाकाठी मुलांच्या खाऊवर लाखात खर्च करतं; हे खाऊ किती पोषक आहेत, याबद्दल बरीच चर्चा केली. मुलं याबद्दल बरीच गंभीरपणे विचार करू लागली. आता मी ही आकडेमोड आणि त्याभोवतीची चर्चा थोडी थांबवली. मला मुलांना दुसऱ्या एका बाबीबद्दल विचार करायला लावायचा होता.

मी मुलांना विचारलं, “तुमचे आईबाबा लहान असताना काय काय खायचे?”

क्षणभर सगळे गोंधळले.

ते विचार करू लागले. स्वतःच्या विकतच्या खाऊचा हिशेब मांडणं सोपं होतं. पण आता आईबाबांच्या खाऊचा हिशेब मांडायचा होता.

सर्व मुलांच्या चेहऱ्यावर परत प्रश्नचिन्ह. मी थोडं तपशिलात सांगायला सुरुवात केली.

“मुलांनो, आपण आपला खाऊ आणि त्यावरील खर्च पाहिला. आता सांगा, तुमचे आईबाबा लहान असताना हाच खाऊ खात होते का? त्यांचाही खर्च इतकाच होता का, खाऊ म्हणून ते नेमकं काय काय खात होते, याचाही आपण अभ्यास करणार आहोत.”

वर्षा म्हणाली, “सर… माझी आई सांगते, ती लहानपणी बोरकूट खायची.”

प्रथमेश म्हणाला, “माझे बाबा भोपळ्याच्या बिया खात होते.”

महादू म्हणाला, “माझी आजी रानातील बिबे वाळवून खायची.”

मी फळ्यावर नवीन यादी लिहायला सुरुवात केली.

बोरकूट, भोपळ्याच्या बिया, बिबे, खारोड्या, वाळवलेली इतर फळं…

मी म्हणालो, “तुमच्यापैकी काही जणांनी त्यांचे आईबाबा, आजीआजोबा काय खात होते ते सांगितलं. पण अनेकांना हे सांगता आलं नाही. त्यासाठी घरी जाऊन तुम्हाला आईबाबांशी, आज्जीआजोबांशी बोलावं लागेल. खूप गप्पा माराव्या लागतील.”

मुलं यासाठी उत्सुक दिसली. त्यांना हे एक कोडं वाटत होतं आणि ते सोडवण्याची उत्सुकताही होती.

आजची चर्चा इथेच थांबवली. मुलांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी माहिती घेऊन यायला सांगितलं. मुलं अगदी उत्साहात घरी गेली.

गावभर चर्चा सुरू झाली. सगळी मुलं त्यांच्या आईबाबांना जुन्या गोष्टी विचारू लागली. त्यातून त्यांच्याही आठवणी ताज्या व्हायला लागल्या. मोठी माणसं मुलांना तर ह्या गोष्टी सागत होतीच; पण मोठ्यांच्या कट्ट्यावरही हीच चर्चा रंगत होती. 

दुसऱ्या दिवशी मुलं आनंदशाळेत आली, तेव्हा त्यांच्या सोबत फक्त खाऊच्या याद्या नव्हत्या; त्या खाऊबद्दलच्या गोष्टीही होत्या.

अमृता सांगत होती, “माझे बाबा मोहळाचं मध काढायला कडुलिंबाच्या झाडावर चढले होते. अंग कापडांनी झाकलं होतं. फक्त हाताची बोटं उघडी होती. बोटांना मधमाशांनी खूप चावलं. मग ते झाडावरून खाली पडले!…”

असे एक ना अनेक किस्से मुलं गमतीदार पद्धतीने सांगत होती. सगळे मन लावून ह्या गोष्टी ऐकत होते. एकूण सूर लागला होता.

सर्वांचं बोलून झाल्यावर मी मुख्य मुद्दा मांडायला सुरुवात केली.

“मुलांनो, आता मला सांगा, तुम्ही आज जे खाऊ खाता ते चांगलं आहे का आईबाबा खात होते ते चांगलं होतं?”

मुलं विचारात पडली..

महादू, “सर, आईबाबा खात होते ते खाऊ कधीही चांगलेच आहे.”

“मुलांनो, आईबाबा खायचे तो खाऊ चांगला असेल, तर तो अजूनही मिळू शकतो का?”

महादू म्हणाला, “हो सर, मिळतो, पण आम्ही खात नाही आता.”

“मिळत नाही सर. आता झाडंच नाहीत.” प्रथमेशनं अगदी उलट मत मांडलं.

आता अजून एक नवीन प्रश्न समोर आला. आईबाबा आणि आज्जीआजोबा खात होते त्या खाऊच्या गोष्टी आता किती उपलब्ध आहेत? 

मुलांना या विषयात खूप रस निर्माण झाला होता. त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. आईबाबांनी खाल्लेल्या खाऊपैकी आज शिवारात काय काय मिळू शकतं, याची यादी बनवायला घेतली. काही गोष्टी शिवारात मिळतात, पण खूप कमी प्रमाणात. काही गोष्टी मिळतात, पण आता कोणी खात नाही. अशा वर्गवाऱ्या तयार झाल्या.

मी मुलांसमोर एक प्रश्न ठेवला,

“मुलांनो, आपण दुकानातला खाऊ कमी करून आपल्या शिवारातला किंवा घरी बनवलेला खाऊ जास्तीतजास्त खाण्याचं ठरवायचं का?”

सगळ्यांनी एकदम होकार दिला.

महादू हळूच म्हणाला, “मग वर्षाचं दुकान बंद होईल सर!”

सगळे हसू लागले.

मी मुद्दा स्पष्ट केला, “दुकान बंद होणार नाही. पण या खाऊच्या गोष्टी कमी झाल्या, तर गिऱ्हाईक कमी होईल. आणि तुम्ही घरी बनवलेला खाऊ खाल्लात, तर तुमचा खर्च कमी होईल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील.”

दुकानातला खाऊ, त्याची पौष्टिकता, घरी बनवलेला किंवा रानात मिळणारा रानमेवा यांची पौष्टिकता याबद्दल बरीच चर्चा रंगली.

आता गोष्ट सगळ्यांना पटली. सगळे मिळून मग एकेक गोष्ट पक्की करू लागले. 

विकतचा खाऊ कमी करायचा!

घरी खाऊ बनवायचा!

शेत-शिवारातली फळांची झाडं जपायची!

शेतीत खायच्या गोष्टी पेरायच्या!

अशा एक ना अनेक कल्पना मुलांकडूनच येत होत्या. ज्या गोष्टी सांगायचा मी विचार करत होतो, त्या मुलांकडूनच येत होत्या. यापेक्षा समाधानाची गोष्ट अजून काय असू शकेल! मुख्य म्हणजे हे समाधान सर्व मुलांमध्येही जाणवत होतं. 

बसवंत विठाबाई बाबाराव

baswantv@gmail.com 

गेली पंधरा वर्षे शाळेमधील पर्यावरण शिक्षण विषयात कार्यरत. पुण्यातील वनराई संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक.

(कथेतील चित्रे इंटरनेटच्या मदतीने)