प्रीती पुष्पा-प्रकाश
संवाद व्हायचा असेल, तर स्वतःची आणि मुलांची ‘टु-डु लिस्ट’ बाजूला ठेवावी लागते, अशी नवी दृष्टी इतक्यातच प्राप्त झाली होती तिला. तरीही प्रत्येक वेळी तशी ती बाजूला ठेवणं शक्य नसतं. ‘हे’ काम वेळेत झालं नाही, तर अजून कोणाचं तरी काम अडेल… ‘ते’ काम वेळेत झालं नाही, तर कोणीतरी रागवेल… गृहपाठ वेळेत केला नाही, तर उद्या वर्गात ताई कशा बोलतील… हा विचार करून रात्री झोपताना मुलाला ताण येईल, ऑफीसचं काम वेळेत झालं नाही, तर आपल्याला ताण येईल… एक ना दोन! आयुष्य म्हणजे टु-डु लिस्ट आणि जगणं म्हणजे ती लिस्ट पूर्ण करत राहणं या विचारांनी तिला उबग आला होता.
रविवार संध्याकाळ. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. ११ वर्षांचा मितानही कधी नव्हे ते खाली मित्रांशी खेळायला जायला उत्सुक नव्हता. रेनकोट घालून खेळायला मजा येत नव्हती आणि पूर्ण भिजावंसंही वाटत नव्हतं. मिळालेला हा वेळ एक क्राफ्ट करण्यासाठी वापरायचा असं त्याचं नियोजन होतं. त्यासाठीचा पुठ्ठा त्याला मागच्याच आठवड्यात घरी आलेल्या काजू-कतलीच्या खोक्यातून मिळाला होता. रिकामी सिरिंज आणि काही रबर बॅंड कोपर्यावरच्या दुकानातून आणलेले होते. हे क्राफ्ट एका बैठकीत पुरं केलेलं चांगलं असतं असं त्याला पूर्वीच्या दोन अनुभवांवरून उमगलं होतं. काकाला वाढदिवसाची भेट म्हणून देण्यासाठी त्याला हे मनापासून आणि मन लावून तयार करायचं होतं.
आता दोघंही आपापल्या वाटेनं जाऊन कामाला लागणार, एवढ्यात ती ज्या व्हॉट्सॅपच्या मेसेजमध्ये गुंतली होती त्यातून डोकं वर काढत म्हणाली, “जंतरमंतरला चाललेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जे डॉक्टर्स काम करत होते त्यांच्याविषयी आलंय. तुला वाचून दाखवू?” आपल्याला काय ऐकायला आवडतं, चालतं, उत्सुकता असते याची आईला जाण आहे या विश्वासानं मितान ‘हो’ म्हणाला. नाहीच आवडलं तर मध्ये थांबवता येतं हेही तो जाणून होता.
फेसबुकवरची ती पोस्ट वाचायला तिनं सुरुवात केली. मेडिकलचे विद्यार्थी, तरुण डॉक्टर यांनी काय परिस्थितीत काम केलं, कशा प्रकारे काम केलं, एवढ्या अवघड परिस्थितीत अनोळखी लोकांशी बोलून, एकत्र येऊन काम केलं. आंदोलनातील मुलांना कसं मारण्यात आलं, त्यांना कुठे आणि कशा जखमा झाल्या वगैरे वाचत असताना मितान फुटला. रडू लागला. तो संवेदनशील आहे हे तिला ठाऊक होतं. वेगवेगळ्या वेळी त्याचं रडणं सहज बाहेर पडत असलं, तरी तिच्यासाठी ते ‘रोज मरे…’ झालेलं नव्हतं. त्याची ही संवेदनशीलता तिनं संवेदनशीलतेनं जपली होती. ‘मुलींसारखा काय रडतोस!’ असं त्याला मित्रांकडून मानहानीपूर्वक ऐकावं लागत असलं, तरी ‘आपल्या मुलाला रडू येतं’हे तिला महत्त्वाचंच वाटायचं. रडू न येणार्या किंवा रडू न शकणार्या पुरुषांपेक्षा रडणारे पुरुष भले अशी एक आपली तिची धारणा!
“आई, असं खरंखुरं मारतात पोलीस त्यांना?”
आजकालच्या मुलांनी घरीदारी, शाळेत खूपच कमी किंवा अजिबातच मार खाल्लेला नसतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेला लाठीमार हा मितानला मोठा आणि अशक्यप्राय गुन्हा वाटत होता.
“असं कसं मारू शकतात ते?”
“पोलिसांनी आंदोलकांना असं मारायचं आहे हे कोण ठरवतं?”
“पण पोलिसांना ते मान्य कसं होतं?”
त्याचे अनेक प्रश्न… आणि त्या अनुषंगाने घडलेले अनेक प्रसंग ती सांगत राहिली.
‘आपण अशा प्रकारे मारणार नाही’ असं एका पोलिसानं सांगितलं.आणि वरिष्ठांनी ते मान्य केलं नाही तेव्हा त्यानं ठामपणे राजीनामा दिला हे ऐकून मितानला बरं वाटलं. नोकरीसाठी, पैशासाठी लोकांना आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीही मनाविरुद्ध कशा करत राहाव्या लागतात हे त्याच्यासाठी आश्चर्यचकित करणारं होतं.
“असे कसे काय लोक स्वतःच्या जिवावर उदार होतात गं आई?”
“आई, तुला आंदोलनांना जाताना भीती नाही का वाटत? तुला मारलं तर!”
कित्ती छटा होत्या ह्या सगळ्या भावनांना. गांधींचा सत्याग्रह त्याने यापूर्वीही ऐकला होता आणि तरीही त्याला हे प्रश्न नेहमीच पडले होते. ही संधी साधून तिनं परत एकदा सत्याग्रहाची मानसिक ताकद काय असते, आजच्या काळातही हा पूर्ण लढा अहिंसेच्या मार्गानं व्हावा असं लोकांनी कसं ठरवलं वगैरे गोष्टी सांगितल्या.
समोरच्यानं मारूनही आणि आपल्याला शक्य असूनही आपण ठामपणे उभे राहतो, त्याला मारत नाही ह्यात काही तरी विशेष आहे हे त्याला हळूहळू जाणवत होतं. पूर्णपणे मान्य होतं असं नाही, पण कळत मात्र होतं.
“आई, तुलापण पकडलं तर?”
“अरे, आपल्याकडे पोलीस इतकी टोकाची भूमिका घेत नाहीत. आपलं शहर त्या मानाने शांत आहे. पोलीस सहकार्य करतात. कधीकधी पकडलं तर ते भीती निर्माण करण्यासाठी; पण मग सोडूनही देतात. आणि आपण जोवर शांततेच्या मार्गानं जातोय, तोवर शक्यतो नाही काही करत. जंतर मंतर दिल्लीत आहे. तिथे ते वाढत जाणारं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतात. स्विगी झोमॅटोनं अन्न आणून देणार्यांना नंतर नंतर तिथे जाऊ देईनात. तिथली सार्वजनिक शौचालयं बंद केली…”
तिथले खरेखुरे तपशील सांगताना ती चेहर्यावरून तरी शांतच दिसत होती. गेले १५-२० दिवस अस्वस्थतता, भीती, राग, हतबलता, अपराधीभाव या सगळ्यातून जाताना तिच्या भावनांचा नको त्या ठिकाणी झालेला उद्रेक त्यानं पाहिला होता; पण हे सगळं कशामुळे याची कल्पना मात्र त्याला आता येत होती.
“आई, तुला वाईट नाही का वाटत आहे? तुझ्या चेहर्यावर नाही दिसत तसं…”
ती मंद हसली. “वाटतंय ना… गेले अनेक दिवस वाटतंय. मलाही जंतरमंतरला जावं असंच वाटत होतं. आपण तिथे जात नाही आहोत, तर आपण भ्याड आहोत असंही वाटत होतं. पण माझ्यावर असलेली घरची आणि तुझी जबाबदारी मी पूर्ण करायला पाहिजे हेही कळत होतं. त्यामुळे ते सांभाळून किमान पुण्यातल्या आंदोलनाला तरी आपण जायलाच हवं असं मी ठरवलं आणि तशी मी गेले.”
“आई, मी नाही जाणार आंदोलनांना कधीच. पण मी गप्पपण नाही बसणार. हे असं होऊ नये म्हणून काय करता येईल ते मी करेन.”
त्याच्या पहिल्या अर्ध्या वाक्यानं झालेलं धस्सं आपण चेहर्यावर दाखवलं नाही हे बरं झालं असं तिला पुढचं अर्धं वाक्य ऐकताना वाटत राहिलं. त्याच्या आवडीच्या रोबोटिक्सच्या विश्वात घुसत तिथे काही उत्तरं सापडतील का या खर्या आणि कल्पनेतल्या विश्वात ती दोघं थोडा वेळ रेंगाळली.
या आंदोलनात किती विद्यार्थी मारले गेले, देशभरात किती शहरांतून पाठिंबा म्हणून अशी आंदोलनं झाली अशीही काही माहिती त्याला हवी होती. गूगलआज्जी दिमतीला होतीच. एक मात्र त्या दोघांनीही टाळलंच – अशा प्रकारच्या हिंसाचाराचे कुठलेही व्हिडिओ बघणं.
“आई, बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, सईदिदी पुढच्या वर्षी देणार असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या निमित्तानं हे सगळं सुरू झालं होतं असं थोडं थोडं मला माहीत होतं. पण सगळं नव्हतं माहीत. पण मला आत्ता काय वाटतंय, की कळलं ते बरंही झालं आणि वाईटही. आधीच अभ्यासाचा ताण त्यात याचा पण ताण वाढला!”
“हं,” माऊली अजून कायच बोलणार! आपल्या भावना लहानपणापासून स्पष्ट मांडू शकणार्या जेन अल्फा बरोबर आपलंही चांगलंच शिक्षण होतंय हे तिला (बापडीला) दिसत होतं. आपल्या भावना व्यक्त करून झाल्यावर आता मात्र वर्तमानकाळात यायला हवं अशी तिची भुणभुण सुरू होण्यापूर्वीच त्याच्या इतर गप्पा, कल्पना, गोष्टी सुरू झाल्या होत्या. क्राफ्ट झालं नाही याची खंत एवढी नव्हती. हा संवाद घडला याचा आनंद मात्र होता. जगातल्या घडामोडींसाठी उभी राहणारी आई, आपल्यासोबत, आपल्यासाठी आहे या सुरक्षिततेच्या भावनेचं पांघरूण घेऊन दोघंही देनिसच्या गोष्टी वाचत, हसत खिदळत, गप्पा मारत झोपी गेले.
प्रीती पुष्पा-प्रकाश

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या आवडत्या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करून आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात.
