तुषार जयवंत परांजपे 

प्रस्तुत लेख ‘जेन झी’बद्दल असल्याने त्यांच्यासाठी वापरण्यात येणारी विशेषणे लेखात तशीच्या तशी ठेवतो आहोत. लेख वाचताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचकांना उलगडत जाईल – संपादक.

१. एन्टायटल्ड – ह्यांना प्रत्येक गोष्ट खूप सहज मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला हवी ती गोष्ट मिळायलाच हवी अशी अरेरावी ह्यांच्या वागण्या-बोलण्यात डोकावते. त्यातून एक घातक वृत्ती तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करायची ह्या मुलांना सवयच नाही अजिबात! 

२. डिस्-रिस्पेक्टफुल – दुसरा माणूस आपल्यापेक्षा शिक्षणाने, वयाने, ज्ञानाने, काही नाही तर निदान अनुभवाने मोठा आहे ह्याची तरी जाणीव ठेवावी, आदर ठेवावा. उद्धटपणे, उलट बोलू नये. निदान दिलेली वेळ पाळावी. एखादी गोष्ट करतो म्हटले, तर ती करावी. काम पूर्ण करायला जमत नसेल, तर निदान तसे सांगावे तरी. काहीच नाही. अजिबातच ‘रिलायेबल’ नाही ही पिढी.  

३. डिस्ट्रॅक्टेड सतत मोबाईलमध्ये घुसलेले असतात. सतत ‘स्क्रोलिंग’. एका गोष्टीवर लक्ष केंद्रितच करू शकत नाहीत. काय घंटा चांगले काम करणार हे. स्वतःच्या भवतालाशी असलेली नाळच तोडली गेलीये. कशाची काहीही पडलेली नाहीये. ‘ब्रेनरॉट’ होणार आहे अख्ख्या पिढीचे. 

ही आहेत माझ्यासारख्या ‘ओल्ड मिलेनियल’ लोकांची ‘जेन झी’ पिढीविषयी असलेली प्रातिनिधिक / वानगीदाखल काही मते. अनुभवाधारित. त्यामुळे ती पूर्णपणे चुकीची आहेत असे म्हणता येत नाही. मला स्वतःलाही ती चुकीची वाटतच नाहीत. खरे तर, मला ती मान्य आहेत. 

मी काही कुणाचा पालक नाही. पण एक कथा-पटकथा लेखक आणि सिनेमा-शिक्षक म्हणून गेल्या १० वर्षांपासून नवीन पिढीतल्या भरपूर मुला-मुलींशी – शहरी-ग्रामीण दोन्हीही – माझा पुरेसा संपर्क आहे, त्यांचा अनुभव आहे. शिवाय, कुटुंब-मित्रपरिवारातली नवीन पिढी आहेच. त्यातल्या बहुतांश पोरांशी माझी छान मैत्री आहे. पण तरीसुद्धा ढोबळ मानाने त्या पिढीचा मलाही असाच काहीसा अनुभव आहे. सिनेमा-नाटक-सामाजिक कार्य-तत्त्वज्ञान-मानवशास्त्र (humanities) ह्या विषयांशी निगडीत असलेल्या मुलांमध्ये आजूबाजूच्या भवतालाविषयी बऱ्यापैकी जागरूकता असते. पण बाकी मुलांच्या बाबतीत सगळा आनंदी-आनंद आहे असेच मलाही वाटायचे आणि त्यात बरेच तथ्यदेखील आहे असे मला अजूनही वाटते. पण ह्याच जेन झी च्या नेतृत्व आणि प्रचंड सक्रिय सहभागामुळे गेल्या ५० दिवसांत जे देशव्यापी विद्यार्थी-आंदोलन उभे राहिले आणि आपल्या देशातल्या जवळपास मृतवत लोकशाहीला नवसंजीवनी देण्याचे काम झाले, त्याने इतरांप्रमाणे मलाही ह्या पिढीविषयी नव्याने विचार करण्यास भाग पाडले. आणि असे वाटले, की ह्या पिढीची म्हणून जी वैशिष्ट्ये आहेत, ज्याकडे बहुतेक वेळेला आपण अवगुण म्हणून पाहिले, तीच वैशिष्ट्ये, तेच अवगुण ह्या आंदोलनात कामी आले कदाचित… 

एन्टायटल्ड  – अवेअर 

मी अनुभवलेला एक प्रसंग – 

एफटीआयआयद्वारे तेलंगणामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांची पटकथा लेखनाची एक कार्यशाळा आयोजित केली गेली होती. ती घ्यायला माझेच एक शिक्षक तिथे गेले होते. पण त्यांचे त्या मुलांशी काही केल्या जमेना. कार्यशाळा पटकथा लेखनाची होती, पण मुलांना लेखनामध्ये बिलकुल रस नव्हता. त्यांनी शिक्षकांना सरळ तसे सांगितलेदेखील. शिक्षक गोंधळले. त्यांच्या तब्येतीच्याही काही तक्रारी असल्यामुळे ती कार्यशाळा त्यांनी माझ्या हाती सुपूर्त केली. मी तिथे गेल्यावर त्या मुलांनी मला सरळ सांगितले, “सर, आम्हाला फिल्म लिहायची नाहीये; बनवायची आहे.” मी तर पटकथालेखन कार्यशाळेच्या तयारीने गेलो होतो. पण माझ्या लक्षात आले, की या मुलांना फिल्म बनवायचीच आहे. मग मी त्यांना तसे पूर्ण स्वातंत्र्य दिले. हवी तशी आणि हवी तेवढीच मदत केली आणि दहा दिवसांत त्या मुलांनी मोबाईलद्वारे चार शॉर्ट फिल्म्स बनवल्यादेखील. मी अवाक झालो होतो. विचार केला, की माझ्या पिढीतल्या मुलांची शिक्षकांना असे काही बोलण्याची हिंमतही झाली नसती कदाचित. त्यांनी गुपचूप, मान खाली घालून दहा दिवस रेटले असते. पण या मुलांनी बेधडक, निर्भयपणे ते सांगितले, कारण त्यांच्यात तो आत्मविश्वास होता. तो आला कुठून, तर त्यांच्या हातातल्या मोबाईलमधून. ते सतत रील्स बघत होते, यूट्यूब बघत होते, पॉडकास्ट बघत होते. त्यांना एडिटिंगची टूल्सपण येत होती. आपल्याला काय करायचेय हे त्यांना माहीत होते. मग चुकत, शिकत आणि थोडी माझी मदत घेत त्यांनी ते केलेदेखील. 

ज्याला आपण एन्टायटलमेन्ट म्हणतो, त्याची दुसरी बाजू अशी आहे, की आपण जी मागणी करतो आहोत, ती योग्य असेल, तर ती बेधडकपणे व्यक्त करण्यात या मुलांना कसलाही कमीपणा किंवा भीती वाटत नाही. ह्या पिढीचा हाच अवगुण (!?) आताच्या विद्यार्थी-आंदोलनातही खूप कामी आला असे मला वाटते. त्यांना माहिती होते, की आपण करत असलेली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नैतिकदृष्ट्या (‘एथिकली’ आणि ‘मॉरली’) पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे बदनामी, पोलिसांचा लाठी-चार्ज, टिअर गॅस किंवा इतर कोणत्याही दडपशाहीमुळे त्यांचा आत्मविश्वास ढळला नाही. कारण आपल्या बाबतीत काही चुकीचे घडले, तर आपण तेदेखील जगापर्यंत सहज पोहचवू शकतो हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे ती एन्टायटलमेन्ट न राहता आपल्या हक्कांविषयीची जाणीव बनली (awareness of your own rights). 

डिस्-रिस्पेक्टफुल अ‍ॅसर्टिव्ह 

माझ्याच अनुभवातला आणखी एक प्रसंग; एफटीआयआयमध्ये पूर्णवेळ शिकवत असतानाचा. 

एकदा मी वर्गात दोन-तीन विद्यार्थ्यांना काही काम देत होतो. तेवढ्यात दुसरा एक विद्यार्थी अचानक मला म्हणाला, “सर, तुम्ही नेहमी त्यांना ‘फेवर’ करता. कारण ते तुमचे ‘फेव्हरेट स्टुडंट्स’ आहेत. ते हुशार आहेत, म्हणून तुम्ही त्यांनाच सारखे पुढे  करता.” 

मी एकदम चपापलो. थोडा रागही आला. पण अर्धा मिनिट विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, की तो जे बोलतोय त्यात काही खोटे नाही. मी सरळ त्याची माफी मागितली आणि म्हणालो, “ठीक आहे. जे गट पाडायचे आहेत किंवा जी कामं आहेत, ती आपण सगळ्यांमध्ये विभागून करूया.” 

या पिढीचा हासुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे असे मला वाटते. समोरची व्यक्ती आपली शिक्षक आहे, वयाने आणि अनुभवाने थोडी मोठी आहे, केवळ म्हणून ती सांगेल त्याला होकार द्यायचा, असे ते करत नाहीत. हे त्यांचे गुणवैशिष्ट्य मला वारंवार, विशेषतः शिकवताना जाणवते. माझ्या पिढीत, शिक्षक वर्गात आले, की मनात आपोआप यायचे, ‘अरे, शिक्षक आहेत. त्यांना आदर दिला पाहिजे किंवा खरे म्हणजे, झक मारत द्यायलाच लागेल.’ पण आत्ताची पिढी अशी नाही. निदान मला तसा अनुभव येत नाही. सुरुवातीचा काही काळ तेच आपल्याला ‘जज’ करत असतात, असे मला वाटते. ‘या व्यक्तीकडून आपल्याला खरंच काही शिकायला मिळणार आहे का?’ हा प्रश्न ते स्वतःला विचारत असतात. आणि त्यांना वाटले की ‘हो, या व्यक्तीकडे आपल्याला देण्यासारखे काही आहे’, तरच ते आदर देतात. मग एकदा त्यांना हेही जाणवले, की ही व्यक्ती आपल्याशी आपल्या पातळीवर येऊन, मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलते आहे, आपल्याला कमी लेखत नाहीये, आणि खरेच तिच्याकडे देण्यासारखे काही आहे – तर मग आदर हा वेगळा मुद्दा राहतच नाही. कारण तिथे मैत्री निर्माण होते. आणि मग तुम्हाला भरपूर प्रेमही मिळते, आदरही मिळतो. तुमचे काही चुकत असेल, किंवा त्यांना काही पटले नसेल, तर ही मुले ते बिनधास्तपणे सांगतात. पण त्याच वेळी त्यांना तुमच्याकडून जे काही मिळेल, त्याविषयी ती भरभरून व्यक्तदेखील होतात. ईमेल लिहितात, ‘डीएम’ करतात, इन्स्टा स्टोरीज, पोस्ट टाकतात.  

केवळ एखादी व्यक्ती वयाने, अनुभवाने किंवा वरकरणी ज्ञानाने मोठी आहे, म्हणून तिला आपोआप आदर द्यायचा नाही हा ह्या पिढीचा गुण या आंदोलनात खूप कामी आला, असे मला वाटते. सरकार आहे, मंत्री आहेत, ते आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, अधिकाराने किंवा पदाने मोठे आहेत म्हणून ते जे बोलतील त्याला होकार द्यायचा, ते मान्य करायचे, ही सवय देशातल्या बहुसंख्य लोकांना लागलेली आहे. ती या मुलांनी धुडकावून लावली. आणि त्याचे मला प्रचंड, म्हणजे प्रचंडच कौतुक वाटते. कारण मुळात मलाच असे वाटते, की कुठल्याही व्यक्तीला केवळ तिच्या वयामुळे किंवा पदामुळे आदर फुकट मिळू नये. वय कितीही असो, आदर हा नेहमी कमावला(च) गेला (earned) पाहिजे. त्यामुळे या पिढीच्या बेधडक वृत्तीला मला डिस्-रिस्पेक्टफुल असे लेबल द्यावेसे वाटत नाही. उलट, अ‍ॅसर्टिव्ह म्हणावेसे वाटते. 

डिस्ट्रॅक्टेड – एंगेज्ड 

आता माझ्या मित्राच्या आयुष्यातला एक प्रसंग –

माझा मित्र दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या बेछूट अत्याचाराचे व्हिडिओ पाहत होता. त्याची तेरा वर्षांची मुलगी शाळेतून आली. तीही ते व्हिडिओ पाहू लागली. व्हिडिओ पाहिल्यावर ती लगेच म्हणाली, “हे सरकार किती क्रूर आहे!” माझ्या मित्राला अर्थातच बरे वाटले, कारण त्याच्या विचारांशी तिने सहमती दर्शवली. 

दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा मित्र पुन्हा अत्याचाराचेच व्हिडिओ पाहत होता. तेव्हा अचानक ती त्याला म्हणाली, “आता मला विरुद्ध बाजूचे व्हिडिओ दाखव.” माझा मित्र एकदम चपापला. कारण त्याच्या सोशल मीडिया ‘अल्गोरिदम’मुळे त्याला केवळ आंदोलनकर्त्यांच्या दृष्टिकोनातूनच व्हिडिओ दिसत होते.

ज्या पिढीला आपण डिस्ट्रॅक्टेड म्हणतो – सतत सोशल मीडियावर असणारी, मोबाईलमध्ये घुसलेली – ती पिढी त्यांच्या ह्याच अवगुणामुळे संपूर्ण जगाशी सतत एंगेज्ड देखील आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणतीही एक बाजू ते अंतिम सत्य म्हणून लगेच स्वीकारत नाहीत. कारण त्याच्या विरुद्ध बाजूचाही दृष्टिकोन कुठेतरी उपलब्ध असेल हे त्यांना माहीत असते आणि तो शोधणेही त्यांच्या दृष्टीने फार अवघड नसते. ऑस्करच्या मंचावरून ट्रम्पला उघडपणे विरोध करणारी किंवा टीका करणारी माणसे जशी त्यांना सहज यूट्यूबवर दिसतात, तशीच ट्रम्पच्या आवाहनानंतर कॅपिटॉलवर हल्ला करणारी माणसेही सहज दिसतात.

त्यांचा हादेखील गुण ह्या आंदोलनात भरपूर कामी आला असे मला वाटते. कारण त्यांना त्यांच्या विरोधातली बाजू, कथने (narratives) देखील चांगल्यापैकी माहिती होती. म्हणूनच त्याचे खंडनसुद्धा ते ताकदीने करू शकत होते. ह्या ‘यंग’ पोरांची रील्स आपण पाहिली, तर आपल्याला ते सहज दिसून येते. 

अर्थात, म्हणून ह्या पिढीचे सगळे दोष झाकले जातील, त्या दोषांमुळे त्यांचे काही नुकसान होणार नाही, ही पिढी संपूर्ण क्रांती घडवून आणेल… असे काही मला म्हणायचे नाहीये. मला असेही म्हणायचे नाही, की सरसकट सगळीच जेन झी ही अवेअर अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड वगैरे आहे. पण एवढे निश्चित, की ह्या आंदोलनाने जेन झी मधल्या, निदान त्यांच्यातल्या एका समूहामधल्या, गुणांचे प्रात्यक्षिक देशाला घडवले. स्वतःच्या हक्कांची जाणीव असणे, एखाद्याला फुकटचा आदर न देता त्या व्यक्तीकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करणे आणि ते मिळाले तरच त्याला आदर देणे, संपूर्ण जगाशी जोडलेले असणे, कोणतीही गोष्ट अंतिम सत्य म्हणून लगेच न स्वीकारता, तिच्या सगळ्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे गुण प्रकर्षाने दिसून आले. सगळ्या पिढ्यांनी ते आत्मसात केले, तर आपली लोकशाही नक्कीच अधिक सुदृढ आणि जिवंत होईल, असे मला वाटते.

म्हणून हा लेखनप्रपंच.

आणि जाता जाता, या जेन झी च्या तथाकथित असभ्य भाषेविषयी. 

ही ‘मीम्स’ आणि ‘रील्स’वर वाढलेली पिढी आहे. त्यांनी जे म्हटले, पोस्टर्सवर लिहिले किंवा दाखवले, ते प्रामुख्याने व्यंगात्मक होते. व्यंगात्मक भाषा / व्यंगचित्रे ही नेहमीच थोडी असभ्यतेकडे झुकणारी असतात. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी ज्यांच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी केली, ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हणून ज्यांना डोक्यावर घेतले, अशा आचार्य अत्र्यांची भाषाही अशीच व्यंगात्मक आणि त्यामुळे थोडीशी असभ्यतेकडे झुकणारी असायची. पण तेव्हा व्यंगात्मक भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा त्यामागच्या मथितार्थाकडे लक्ष द्यायचे असते, एवढे कळण्याइतपत समाज सुजाण होता कदाचित.

या आंदोलनाबद्दल, ‘ज्या विद्यार्थ्यांनी निदर्शनात भाग घेतला आहे, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ असे उघड उघड धमकीवजा आणि द्वेषपूर्ण विधान एका केंद्रीय मंत्र्यांनी केल्याचे आपण ऐकले वाचले असेल. त्याकडे लक्ष देणे आणि त्याबद्दल सत्तेला प्रश्न विचारणे गरजेचे आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या व्यंगात्मक आणि म्हणून काहीशा असभ्य (ती भाषा कायद्याच्या दृष्टीने अश्लील नाही) भाषेकडे लक्ष देत राहिलो, तर दडपशाही करणाऱ्या व्यवस्थेला आपण प्रोत्साहनच देऊ, एवढी जाणीव असू द्यावी. 

तुषार जयवंत परांजपे 

tushar.paranjape@gmail.com

हिन्दी-मराठी सिनेसृष्टीत स्क्रीनरायटर म्हणून कार्यरत. सिनेमा-स्क्रीनरायटिंग ह्या विषयाचे शिक्षक, तसेच बौद्ध तत्वज्ञानाचे विद्यार्थी.
(लेखातील चित्रे इंटरनेटवरून साभार)
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची असून संपादक मंडळ त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.)