स्वप्नील देशपांडे

कुठल्या कारणांमुळे ते माहीत नाही, पण शाळेत असताना मला केस वाढवण्याची खूप इछा होती. पण इतर शाळांप्रमाणेच माझ्याही शाळेत मुलग्यांना केस वाढवण्याची परवानगी नव्हती. नखं वाढवायची नाहीत हे समजत होतं, कारण त्यामागे स्वच्छता हे कारण होतं, पण केस वाढवण्याबद्दल नेमका काय आक्षेप आहे, हे मला समजत नव्हतं. बरं शाळेतल्या अनेक मुलींचे केस तर लांब होते, मग मी का ठेवू शकत नाही, हा प्रश्न काही माझ्या मनातून जात नव्हता. घरूनही कुणाचा काही विरोध होता असं नाही, माझ्या मोठ्या भावाचेही केस चांगले लांब होते.

शाळाही खूप पारंपरिक विचारांची नव्हती. संवाद, प्रश्न विचारणं, शिक्षकांच्या मतांशी सहमत नसणं, या सगळ्याला प्रोत्साहनच दिलं जायचं. स्वातंत्र्य, समता या तत्त्वांवरही शाळेचा विश्वास होता. म्हणून मी नियमांना न जुमानता केस वाढवायचं ठरवलं.

केस आणखी वाढल्यावर खेळाच्या ताईंनी मला ते कापायला सांगितले, आणि मी अर्थातच त्याला विरोध केला. थोडीफार भीती वाटत होती, पण माझा माझ्या मतांवर विश्वास होता. एक-दोन आठवड्यांनी ताईंनी पुन्हा केस कापण्याची आठवण केली, पण मी तरीही कापले नाहीत. ‘तू अजूनही केस कापले नाहीस, तर मी शाळेतच तुझे केस कापेन’ असं त्यांनी मला सांगितलं; शिवाय, तोपर्यंत मला खेळाच्या तासाला, कुठल्याही खेळात सहभागी व्हायला मनाई केली. माझे मित्र-मैत्रिणी खेळत असायचे, आणि मी आपला माझ्या केसांसोबत बाजूला बसून फक्त त्यांना बघायचो.

एव्हाना या सगळ्याबद्दल मी इतर ताईंशी चर्चा करायला सुरुवात केली होती.

“मला केस वाढवण्याचं स्वातंत्र्य किंवा अधिकार का नाही? त्यातही, मुली केस वाढवत असतील, ताईंचे केसही लांब असतील, तर माझे का असू शकत नाहीत?” 

वेगेवगेळ्या ताईंनी मला वेगवेगळे प्रतिसाद दिले. एक-दोन ताईंना माझं म्हणणं तत्त्वतः पटत होतं; पण या कारणावरून मी ताईंशी वाद घालू नये असं त्यांना वाटत होतं. कुणाला हा मुद्दा खूपच निरर्थक वाटत होता. ह्यावर विनाकारण माझा वेळ आणि ऊर्जा खर्च होते आहे, असं त्यांना वाटत होतं, तर कुणी ‘बरोबर आहे तुझं, पण जाऊ दे रे’ असंही म्हणत होतं. कुणी मला ठामपणे चुकीचं ठरवत नव्हतं, पण मी केस का वाढवू नयेत ह्याचं एकही ठोस कारण देत नव्हतं. कदाचित कुणी यावर फारसा विचार केलेला नव्हता, आणि आजवर कधी कुणी हा प्रश्नही विचारला नव्हता.

या सगळ्यात वर्गातल्या किंवा शाळेतल्या इतर मुलांचं फार काही परखड असं मत नव्हतं. अराजकीय किंवा कुंपणावर म्हणतो, तसे बहुतेक सर्व याबद्दल उदासीन होते. माझ्याशिवाय इतर कुणाला बहुधा केस वाढवण्यात फारसा रस नव्हता, आणि असला, तरी त्यासाठी ताईंशी वाद घालण्याची कुणाची इच्छा नव्हती. माझ्यासाठी मात्र हा केस वाढवण्यापेक्षा जास्त लिंगभाव आणि तत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे इतर मुलं उदासीन असली, तरी मी माझं मत मांडतच राहिलो. 

या सगळ्या चर्चा, खेळाच्या तासाला बाहेर बसणं, कधी वेळ पडली तर इतर मुलींचा हेअर बॅन्ड लावून सहभाग घेण्याचा प्रयत्न करणं, हे काही दिवस चाललेलं होतं. ताईंनाही आता समजत होतं, की समता व स्वातंत्र्य या तत्त्वांवर आपली शाळा उभी आहे. त्यामुळे याला केस वाढवण्याची परवानगी नाकारताना आपण किमान एक तरी ठोस कारण द्यायला हवं, आणि तसं ते कुणाकडे नसलं, तर मग शाळेच्या नियमात आपल्याला बदल करायला हवेत.

मध्ये काही दिवस गेले. आणि एक दिवस सकाळची नियमित प्रार्थना झाल्यानंतर ताई म्हणाल्या, की त्यांना एक सूचना द्यायची आहे. त्यांनी सांगितलं, की आता मुलगा असो वा मुलगी, कुणीही हवे तितके लांब केस ठेवू शकणार होतं. त्याची नियमावलीही त्यांनी सांगितली. केस खांद्यापर्यंत लांब असतील तर ते कशा प्रकारे बांधावेत, त्याहून मोठे असतील तर कसे बांधावेत वगैरे; मात्र ते नियम मुलगे व मुली दोघांसाठीही सारखे होते. त्या क्षणी मी इतका आनंदलो होतो, की त्या नियमापेक्षा, मला केस वाढवायला मिळतील, त्याला कुणाचाही कसलाही विरोध असणार नाही, आणि मुख्य म्हणजे खेळाच्या तासाला मला खेळता येईल, या कल्पनेतच मी रमलो होतो.

प्रार्थना झाल्यावर सगळे वर्ग रांगेनं आपापल्या वर्गात जायचे. आणि तेव्हा, जाताना मी काही ताईंकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि काही प्रमाणात अभिमान दिसत होता. कुठेही राग किंवा असहमती दिसली नाही, कारण त्यांच्याच एका विद्यार्थ्यानं, शाळेच्या तत्त्वांच्या आधारानंच, शाळेत एक बदल घडवून आणला होता. हा बदल क्रांतिकारी नसेलही, पण माझ्यासाठी तो, तत्त्वांवर आधारित, एक मूलभूत बदल होता.

जसजसा मी मोठा होत गेलो आणि समाजशास्त्र व लिंगभावाचा अभ्यास करू लागलो, तसतसं मला हे अजूनच जाणवू लागलं. या सगळ्यात कुठेही मी विरुद्ध शाळा किंवा मी विरुद्ध ताई, असा वैयक्तिक संघर्ष नव्हता. प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला गुन्हा मानलं जाईल अशा वातावरणात सध्या राहत असताना, व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वावर आधारित, संवादाच्या माध्यमानं, लोकशाहीवर असलेल्या विश्वासामुळे, लिंगभावाधारित भूमिकांच्या चौकटी मोडणारा, असा हा अनुभव अजूनही मला उमेद देतो.

या सगळ्यानंतर जवळजवळ १२ वर्षांनी, म्हणजे आत्ता २०२६ मध्ये, शाळेत प्रयास आरोग्य गटाचा ‘सहज’ हा सर्वंकष लैंगिकता शिक्षणाचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्रशिक्षक म्हणून जाणार होतो. कार्यक्रम सुरू होण्याआधी सगळ्या ताईंची ‘लैंगिकता शिक्षण’ या विषयावर एक कार्यशाळा घ्यायला म्हणून मी शाळेत गेलो होतो. यावेळी माझे केस मोठे नव्हते, पण मी स्कर्ट घालून गेलो होतो. उपस्थित असलेल्या एकाही ताईनं मला त्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारला नाही, किंवा भुवया उंचावल्या नाहीत. तेव्हा मला जाणवलं, की बारा वर्षांपूर्वी मी जे काही मांडलं होतं त्याचा, काही प्रमाणात का होईना, परिणाम म्हणून मी स्कर्ट घातला असूनही कुणाला त्यात काही वावगं वाटलं नाही.

कार्यशाळा सुरू व्हायच्या आधी काही ताई आणि मी बोलत होतो. त्यावेळी मी प्रश्न विचारणं कसं योग्यच होतं, मुलांनी प्रश्न विचारायलाच हवेत, वेगवेगळ्या विचारांचं महत्त्व या अंगानं आमच्यात अनौपचारिक चर्चा सुरू होती. ताई म्हणाल्या, की आम्ही अजूनही मुलांना त्या प्रसंगाचं उदाहरण देतो. त्या प्रसंगाचा दाखला देत माझ्याकडे बघत एक ताई कौतुकानं म्हणाल्या, “आम्ही मुलांना सांगतो, ‘गॉन केस’ असावी तर तुझ्यासारखी!”

स्वप्नील देशपांडे

swapneel@prayaspune.org

स्त्रीवादी सामाजिक कार्यामध्ये पदव्युत्तर पदवी. सध्या प्रयास आरोग्य गट, पुणे येथे कार्यरत आहेत. 

प्रयास आरोग्य गट गेली अनेक वर्षे लैंगिकता व त्याच्याशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन व प्रत्यक्ष काम करत आहे. ‘प्रयास’चे सध्या महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सर्वंकष लैंगिकता शिक्षणाची सत्रे घेणे, त्याचबरोबर विविध संस्थांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सर्वंकष लैंगिकता शिक्षणावर आधारित ‘सहज’ (सन्मान, हक्क, जबाबदारी) एज्युकेटर्स फेलोशिप’ राबवणे, हे व असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.