ज्योती दळवी

सं काय आक्षेपार्ह आहे ‘आय ॲम मलाला’ या पुस्तकात, की एका शाळेच्या वाचन उपक्रमाच्या यादीत या पुस्तकाचं नाव असल्यानं धर्मरक्षकांनी इतका गदारोळ करावा? इतकचं नव्हे तर वाचनकट्टा चालवणाऱ्या काही हौशी पुस्तकप्रेमींना या पुस्तकाचं वाचन केल्याबद्दल मारहाण करावी? गुजरात राज्यातल्या अहमदाबादला घडलेल्या या दोन घटना. एक शाळेत घडली, तर दुसरी एका सार्वजनिक उद्यानात. या पुस्तकात इस्लामचा प्रचार केलेला आहे, की पाकिस्तानची गौरवगाथा गायलेली आहे, की इतर धर्मांविषयी अपप्रचार केलेला आहे? कुणाच्या भावना दुखावल्या जाव्यात असं काय असावं या पुस्तकात?

पहिल्यांदा जगाचा भौगोलिक नकाशा काढा. आपण इयत्ता सहावी-सातवीत शिकलेल्या हिंदुकुश पर्वतरांगा कुठे आहेत ते त्यात बघा. मग त्यात स्वात नावाच्या नदीचा प्रवाह शोधून काढा. या निळ्याशार नदीच्या खोऱ्यात आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली पश्तून जमातीची अनेक छोटी छोटी गावं इथे दिसतील. पश्तुनांबरोबरच इथे कोहिस्तानी, गुजर जमातीचे लोकही राहतात. सोळाव्या शतकात अफगाणिस्तानच्या काबुल प्रांतातून पळून आलेले पश्तून आता पाकिस्तानचाही भाग आहेत. पण त्यांचं वास्तव्य या खोऱ्यापुरतंच मर्यादित आहे. निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेला हा भाग सध्या खैबर पख्तूनख्वा नावानं ओळखला जातो.

आता इतिहासाचा विश्वकोश उघडा. फार खोलात जायचं नसेल, तर गूगलही करू शकता. तुलनेनं आदिवासी समजल्या जाणाऱ्या या भागात धर्म कुठून आला? त्याची कथा अशी, की पश्तुनांच्या आधी या भागात दुसऱ्या शतकात आलेल्या बौद्ध राजांची सत्ता होती. साधारण पाचशे वर्षं त्यांनी राज्यकारभार केला. या राजांनी उभारलेली अनेक मंदिरं, शिलालेख, स्तूपांचे अवशेष अजून इथे शिल्लक आहेत. (बौद्ध धर्माच्या अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते.) अकराव्या शतकात महमूद गझनीच्या आक्रमणानंतर इथे इस्लाम आला, असं सांगितलं आहे.

आता संस्कृती-कोश उघडा. अतिशय दुर्गम पण निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या लोकांची समाजव्यवस्था, त्यांच्या धारणा, त्यांची उपजीविकेची साधनं काय होती, ह्याबद्दल माहिती घेत असताना आपण नकळत त्यांची आणि आपल्याकडे अशा पद्धतीचं जीवन जगणाऱ्या लोकांची तुलना करत असतो आणि त्यातलं साधर्म्य टिपत असतो.

आता राजकीय इतिहासाचा विश्वकोश उघडा. अतिशय दुर्गम आणि सर्वार्थानं मागास समजला जाणारा हा भाग जगाच्या राजकीय पटलावर कसा आला, हे समजलं तर सध्याचे देशादेशांमध्ये असलेले राजकीय हितसंबंध समजायलाही मदत होईल. त्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतील. अमेरिकेतल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात मुस्लिमविरोधी वारं वाहू लागलं आणि देशादेशांतील राजकारणात धर्माचा मुद्दा केंद्रस्थानी आला. या हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन त्याच्या शेवटच्या दिवसांत या स्वात खोऱ्यातच आश्रयाला होता! तसेच तालिबान या अतिरेकी संघटनेचा संस्थापक मुल्ला ओमर हादेखील बराच काळ या भागात कार्यरत होता. खनिज तेलानं समृद्ध असलेल्या मध्यपूर्वेकडच्या देशांमध्ये तालिबानचा चांगलाच दबदबा आहे. तेलाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या जागतिक राजकारणात तालिबानचं महत्त्व नाकारता येणार नाही. या संघटनेची सुरुवात कशी, कुठे, का आणि कुणी केली, अमेरिका, रशिया या प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांची तालिबानच्या निर्मितीत काय भूमिका होती, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली तर राजकारणाचा खेळ समजायला मदत होते.

याच विश्वकोशातून आपण पाकिस्तानबद्दलही जरा माहिती घेऊया. शेवटी आपला सख्खा शेजारी तो! पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची हत्या करून सत्तेत आलेल्या जनरल झिया यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानात धार्मिक वारं कसं जोरात वाहू लागलं, या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आणि आपापसात लढणाऱ्या तिथल्या छोट्या छोट्या जमातींचा उपयोग बलाढ्य राष्ट्रांनी आपली पोळी भाजण्यासाठी कसा करून घेतला, त्यामुळे आधीच होरपळत असलेल्या या देशाची कशी वाताहत झाली, अशी सर्व माहिती आपल्याकडे असली म्हणजे ‘अपना मुकाबला किसके साथ हैं’ याचं भान राहतं.

आता विश्वकोशांची मदत घ्यायची ठरवली तर बरंच वाचावं लागणार आणि इंटरनेटच्या महाजालातून गाळून माहिती घेणंही फारसं सोपं काम नाही. त्यापेक्षा ‘आय ॲम मलाला’ पुस्तक वाचलं, तर सगळंच साध्य होईल. पाकिस्तानमधील स्वात खोऱ्यात राहणाऱ्या आणि शांततेसाठी कार्य करणाऱ्या मलाला युसूफ़झाई हिचं हे आत्मचरित्र आहे. ब्रिटिश पत्रकार क्रिस्टियाना लॅम्ब यांच्या मदतीनं तिनं हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक वाचताना कधी हरवायला होतं तर कधी आश्चर्यानं बोटं तोंडात जातात. कधी हळहळ वाटते, तर कधी संताप येतो. कधी काळजीनं डोळे पाणावतात. आणि गंमत म्हणजे असा वेगवेगळ्या भावनांचा प्रवास सुरू असताना नकळतच आपला जागतिक घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही विकसित होत असतो.

अशा सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर युसूफ़झाई या पश्तुनांच्या एका उपजमातीत एका गरीब शिक्षकाच्या घरात मलालाचा जन्म झाला. हिंदुस्तानात मुलीच्या जन्माची जी कहाणी आहे, थोड्याफार फरकानं तीच कहाणी पाकिस्तानात. आणि तीच अवस्था तिथल्या नोकरशाहीचीही.(त्यांची अवस्था आपल्यापेक्षा अधिक बिकट.) आपले लोक अशा अवस्थेत का आहेत आणि ही परिस्थिती बदलायची असेल, तर बंदूक नव्हे, शिक्षणाचं शस्त्र उचलावं लागेल असा मलालाच्या वडिलांचा आग्रह असतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मलाला त्यांनी हाती घेतलेलं शिक्षणाचं व्रत दारोदारी पोचवण्याचं काम हाती घेते. हे काम करत असताना तालिबान तिच्या हत्येचा कट रचते. त्याप्रमाणे कृतीही केली जाते; मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स बघताना जसे अंगावर काटे उभे रहातात तसं तिच्या जीवन-मृत्यूचा चित्तथरारक प्रवास वाचताना होत राहतं.

आपल्या वडिलांच्या सारासार विचारबुद्धीचं उदाहरण देताना मलालानं सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावरील हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित झालं. पैगंबरांचा अनादर केल्याच्या आरोपावरून संपूर्ण मुस्लिम-जगतात या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात आली. त्यावेळी मलालाचे वडील कॉलेजमध्ये शिकत होते. या विषयावर आयोजित एका वादविवाद स्पर्धेत बोलताना त्यांनी ‘पुस्तकावर बंदी घालण्याऐवजी आपण उत्तरादाखल म्हणून दुसरं पुस्तक छापायला हवं’ असं सभ्य मत मांडलं होतं. 

आपणही या लेखात पुस्तकांवरच्या बंदीविषयीच बोलतो आहोत, म्हणून हा उल्लेख प्रस्तुत ठरतो.

मलालाबरोबरच ॲन फ्रॅंक ह्या ज्यू मुलीचं पुस्तकही अहमदाबादमधल्या शाळेच्या वाचन-यादीत होतं. इतर धर्माचं पुस्तक म्हणून विरोधकर्त्यांनी याही पुस्तकाच्या वाचनाला विरोध केला. नाझी जर्मनीच्या काळात हिटलरच्या अत्याचारांपासून बचाव व्हावा म्हणून एका गुप्त ठिकाणी लपून बसलेल्या ज्यू कुटुंबातील १४-१५ वर्षांची ही ॲन फ्रॅंक. त्या काळात या किशोरवयीन मुलीनं केलेलं हे लिखाण, ‘द डायरी ऑफ ॲन फ्रॅंक’, वाचण्याचा आग्रह जवळपास सगळ्यांनाच त्यांच्या लहानपणी झालेला आहे. 

प्रत्येकानं आपापल्या धर्माचीच पुस्तकं वाचावीत असा नियम करायचा म्हटलं, तर मग तो नियम इतरही ठिकाणी लागू होईल. आपापल्या जाती-जमाती, गट, समाज, विचारप्रणाली आणि तत्सम इतर गोष्टी. 

मग साहित्य म्हणजे आरसा आणि खिडकी अशा गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही. 

मी आणि माझे पोट! खा, प्या, निजा! 

तळटीप : समाधानाची बाब म्हणजे अजून तरी ह्या दोन्ही पुस्तकांवर आपल्याकडे बंदी आलेली नाही. तेव्हा आपल्या मुलाबाळांसकट ही पुस्तकं आपण जरूर वाचूयात. 

ज्योती दळवी

bhadwal.jyoti@gmail.com 

पुस्तकप्रेमी.