निहारिका डबराल ह्यांचा ‘अॅज मोअर फॅमिलीज वरी अबाउट स्क्रीन अॅडिक्शन, धिस एक्स्पर्ट एक्स्प्लेन्स व्हाय डिटॉक्स बॅकफायर्स’ हा लेख ‘द बेटर इंडिया’ ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाला.
अनुवाद – अनघा जलतारे
| मुलांमधले स्क्रीनचे वाढते व्यसन हा विषय सध्या सगळीकडे चर्चेचा केंद्रबिंदू झालेला आहे. बालमानसशास्त्रज्ञ लविना नंदा पालकांना ह्या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सांगतात. मुलाचा स्क्रीन टाईम किती आहे ह्यापेक्षा त्याचा त्याच्या रोजच्या वागण्या-बोलण्यावर, झोपेवर, खेळण्यावर, भावनिक नियंत्रणावर किती परिणाम होतो आहे हा खरा विचारात घेण्याचा मुद्दा आहे. एकमेकांवर कुठलेही दोषारोप न करता कुटुंबात पुन्हा सुसंवाद कसा निर्माण करता येईल, ह्यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. |
गेल्या काही महिन्यांत भारतात ‘मुले आणि डिजिटल सुरक्षितता’ ह्याबद्दलची चर्चा अगदी शिगेला पोचली आहे. १६ वर्षांच्या खालच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीच घालायला पाहिजे इथपासून ते २०२५-२६ सालच्या आर्थिक सर्वेक्षणातही डिजिटल माध्यमांचा अतिवापर, त्यावरील अवलंबित्व आणि मुलांमध्ये दिसून येणाऱ्या वर्तनसमस्या ह्याबद्दल भाष्य करण्यात आलेले आहे.
मध्यंतरी गाझियाबादमध्ये तिघी बहिणींच्या आत्महत्येची घटना घडली. पालकांनी फोन काढून घेतले म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असे सांगितले जाते आहे. अधिक तपास सुरू आहे; पण ह्या घटनेने लोकांच्या मनातले चिंतेचे मळभ आणखी दाट झाले एवढे खरे.
त्या निमित्ताने पालकांसाठी काही प्रश्न उपस्थित होतात,
- मुलांना स्क्रीनचे व्यसन लागले आहे असे नेमके कधी म्हणता येईल?
- मुद्दा स्क्रीन टाईमचा आहे की वर्तणुकीचा?
- हातातून मोबाईल काढून घेतला, की मुले एवढी अस्वस्थ का होतात?
- घराची युद्धभूमी होऊ न देता पालकांना ह्यावर काय उपाययोजना करता येईल?
लविना नंदा ह्या मानसशास्त्रज्ञ आहेत. ‘चिल्ड्रन फर्स्ट’ ह्या बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेत त्या कार्यरत आहेत. प्रस्तुत लेखाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.
प्रश्न : मुलांमधल्या स्क्रीनच्या व्यसनाची वैद्यकीय दृष्टिकोनातून व्याख्या कशी करावी? स्क्रीनचा अतिवापर आणि त्याचे व्यसन ह्यात काय फरक करता येईल?
लविना नंदा : “मी अगदी लहान मुलांबरोबर काम करते. मोठ्या माणसांच्या व्यसनांकडे आपण ज्या दृष्टिकोनातून पाहतो, त्या प्रकारे मी ह्या मुलांच्या स्क्रीनच्या व्यसनाकडे बघत नाही. स्क्रीन केव्हा पाहायची, त्यावर काय पाहायचे हे ठरवणे त्यांच्या हातात नसते. सगळे अधिकार मोठ्यांच्या स्वाधीन असतात.”
“बरेचदा व्यसनाकडे एकाच एका पद्धतीने पाहिले जाते; जणू काही एखादी वस्तू निवडावी तशी मुले स्क्रीनची निवड करतात. पण मुळात मुलांचे पालक, मुलांची दिनचर्या, त्यांना स्क्रीन कधी आणि किती उपलब्ध होते ह्या साऱ्याची मिळून एक परिसंस्था असते; ही मुले त्याचा फक्त एक भाग असतात.”
मूल ‘किती तास’ स्क्रीन पाहते त्यापेक्षा स्क्रीनचा त्याच्या नित्यकर्मांवर काय परिणाम होतो हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
- स्क्रीन मिळाली नाही, तरी मुलाचे आपल्या भावनांवर नियंत्रण राहते का?
- मैदानी खेळांची जागा एका जागी निष्क्रियपणे बसून स्क्रीन बघत राहण्याने घेतली आहे का?
- मुलाच्या झोपेवर किंवा भुकेवर त्याचा परिणाम झाला आहे का?
- मुलाचे भाषिक कौशल्य, नातेसंबंध, त्याचा शाळेतला सहभाग ह्यावर परिणाम झाला आहे का?
- स्क्रीन हातातून काढून घेतली तर मूल चवताळून आरडाओरडा करू लागते का?
“मूल किती तास स्क्रीनला चिकटलेले राहते ही माझ्या दृष्टीने धोक्याची घंटा नाही, तर ठरलेल्या वेळेनंतर ते थांबू शकत नसेल, नियमांचे पालन करू शकत नसेल, त्याच्या दैनंदिन गोष्टींवर परिणाम व्हायला लागलेला असेल, तर ती चिंतेची बाब ठरते. खेळणे हे प्रत्येक लहान मुलाचे पहिले काम आहे. ती खेळायलाही जागेवरून उठत नसतील, नवनवीन गोष्टी करून बघत नसतील, लोकांना टाळत असतील, तर पालकांनी विचार करण्याची गरज आहे.”
आपले मूल किती तास स्क्रीनला चिकटले आहे ह्याचा हिशोब करून अनेक पालक घाबरून जातात. पण त्याचा त्याची झोप, भूक, अभ्यास, नातेसंबंध, भावनिक नियंत्रण ह्यावर किती परिणाम झाला आहे हे वैद्यकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचे ठरते.
खाताना, रडे थांबवण्यासाठी, झोपताना, गुंतून राहण्यासाठी… अशा कुठल्याही गोष्टीसाठी स्क्रीन हा मुलासाठी एकमेव पर्याय असेल, तर ते आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून त्याची भावनिक गरज झालेली असण्याचे लक्षण आहे.
प्रश्न : कंटाळा घालवण्याचे साधन म्हणून मुले आजकाल स्क्रीनवर विसंबतात का?
लविना नंदा : “मी म्हणेन हो आणि नाहीही. स्क्रीनवर बघायला मिळणाऱ्या गोष्टी खिळवून ठेवणाऱ्याच असतात. त्यांचा उद्देशच मुळी तो असतो. मोठ्यांनासुद्धा हातातला मोबाईल निग्रहानेच दूर करावा लागतो. एखादी वस्तू त्याचे व्यसन लागावे म्हणूनच जर तयार केलेली असेल, तर ज्यांचा मेंदू अजून पूर्णपणे विकसित झालेला नाही, त्यांनी अगदी सहजपणे ती वस्तू बाजूला ठेवावी अशी आपण अपेक्षा तरी कशी करणार?”
- कंटाळ्यावर मात केल्यास कितीतरी सर्जनशील गोष्टी करता येऊ शकतात हे कदाचित मुलांच्या लक्षात आलेले नसेल.
- एकीकडे वास्तव जगातल्या त्याच त्या संथ गोष्टी आणि दुसरीकडे मनाला भुरळ पाडणारा चकचकीत ‘कंटेन्ट’ अशी ती स्पर्धा आहे.
- त्याची जबाबदारी संपूर्णपणे मुलावर ढकलता येणार नाही.
“रिकामपणाचा मुलांना एवढा कंटाळा का – ह्याऐवजी माझा प्रश्न असा आहे, की ह्या रिकामपणाचाही आपल्याला काही फायदा असू शकतो हे मुलांना ठाऊक तरी आहे का? झटपट आनंद मिळवून देणारे काहीतरी हाताशी उपलब्ध असताना ती लांबचा संथ पर्याय का निवडतील?”
बऱ्याच पालकांना वाटत असते, की त्यांचे मूल आळशी आहे किंवा बेशिस्त आहे, कारण एका जागी बसणे त्याला जमत नाही. पण कंटाळा हाताळणे हे एक कौशल्य आहे आणि ते हळूहळू सरावाने विकसित होत जाते.
स्क्रीन बघण्यातून मेंदूला ताबडतोब डोपामाईनचा पुरवठा होत असताना कोडी सोडवणे, चित्र काढणे किंवा अगदी मैदानी खेळही त्या मुलाला खूप अवघड आणि रटाळ वाटू शकतो. कारण त्याच्या मेंदूला सततच्या उत्तेजनेची सवय लागलेली असते.
मुलाला आलेला कंटाळा आपल्याला दूर करायचा नाहीये, तर कंटाळा आलेला असताना काय करायचे हे शिकायला त्याला मदत करायची आहे.
प्रश्न : स्क्रीनच्या व्यसनाचा मुलांच्या मेंदूच्या विकासावर, एकाग्रतेवर आणि भावनिक नियमनावर कसा परिणाम होतो?
लविना नंदा : “धावपळ करणे, नवनवीन गोष्टी करून पाहणे, वास्तवातल्या अडचणींना सामोरे जाणे ह्या साऱ्यातून मुलाचा विकास होत जातो. स्क्रीन कितीही गुंतवून ठेवणारी असली, तरी शारीरिक हालचालींतून मिळणाऱ्या अनुभवांच्या मानाने तिचा आवाका अगदीच मर्यादित आहे.”
स्क्रीनच्या अतिरेकी वापरामुळे –
- स्नायूंची हालचाल आणि शारीरिक विकासावर मर्यादा येतात.
- भावनांवर ताबा ठेवणे जमत नाही.
- समाजात वावरताना तसेच नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात.
- कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही.
- लहान मुलांमध्ये भाषिक कौशल्य निर्माण होण्यात अडचणी येतात.
“जागेपणीचा बहुतांश वेळ मूल स्क्रीनसमोर घालवत असेल, तर त्याच्या मेंदूत नवनवीन जोडण्या तयार होण्यासाठीचा सुवर्णकाळ ते गमावून बसते. आज आपल्या विश्वातला मोठा भाग हा स्क्रीनने व्यापलेला आहे. तेव्हा आपल्याला त्याला खलनायक ठरवायचे नाहीय. त्यातल्या त्यात स्क्रीन टाईम जितका कमी ठेवणे शक्य असेल तितका कमी ठेवा. ते बघणेही निष्क्रिय असायला नको, मुलाला त्यात काहीतरी करायला असू द्या. एखादी गोष्ट मिळून पाहणे, काय पाहिले त्याबद्दल चर्चा करणे आणि केवळ वेळ घालवायचे साधन म्हणून त्याकडे न पाहता कृतिपूर्ण ठेवणे.”
बाळाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात माहितीचा भडिमार करून विकास साधला जात नाही. मूल अनुभवांतून शिकते. म्हणजेच – टेकडी चढणे, धडपडणे, धावणे, बरोबरीच्या मुलांमध्ये मिसळणे, लुटुपुटुचे खेळ, भांडणे, स्वतःच्या शरीराची ओळख करून घेणे ह्या प्रत्यक्षात करण्याच्या गोष्टींवर स्क्रीन हावी होऊन मुलाच्या शिकण्याच्या संधी त्याच्याकडून हिरावून घेते.
स्क्रीन टाळताच येणार नसेल, तर मुलांच्या बरोबर आपणही थोडा वेळ बघणे, त्याबद्दल मुलांना प्रश्न विचारणे, बघणे थोडे थांबवून चर्चा करणे, जरा शांत, कमी चकचकीत कार्यक्रम बघणे असे उपाय करावेत. स्क्रीनमुळे होणारी हानी त्यामुळे कमी करता येऊ शकेल.
प्रश्न : मागील काही वर्षांपेक्षा हल्ली स्क्रीनशी संबंधित वर्तन-समस्या किंवा मनो-आरोग्याच्या समस्या असणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झालेली दिसते आहे का?
लविना नंदा : “हो, वाढ तर निश्चितच दिसते. विशेषतः कोविडनंतर माझे असे निरीक्षण आहे, की मुलांना खूप लहान वयातच स्क्रीनची ओळख करून दिली जाते. स्मार्टफोन वापरायला खूपच सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला अक्षर-ओळख असण्याची किंवा बोटांच्या स्नायूंवर फार ताबा मिळवलेला असण्याचीही गरज नाही. अगदी एक वर्षाचे मूलही आता स्क्रीन ‘स्वाईप’ करून पाहिजे तो व्हिडिओ उघडू शकते. आधीपेक्षा हा एक मोठाच बदल पाहायला मिळतो आहे.”
आणखी काय काय बदल दिसताहेत :
- अगदी नुकत्याच चालू लागलेल्या तसेच बालवाडीत जाणाऱ्या मुलांचे स्क्रीनवरचे अवलंबित्व प्रचंड वाढले आहे.
- स्क्रीनचा वापर काही मिनिटांपासून ते कित्येक तासांपर्यंत वाढत चाललेला आहे.
- घरात दिवसभर टीव्ही चालत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
- टीव्ही, मोबाईल बंद केल्यास मुलांची अस्वस्थता वाढते आहे.
“पालक म्हणून मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत नाही. सगळे वातावरणच बदलले आहे. कोविडनंतर बरेच बदल झाले. ‘वर्क फ्रॉम होम’ मोठ्या प्रमाणात सुरू झाले, स्क्रीनवरचे अवलंबित्व वाढले, मनःशांतीसाठीसुद्धा स्क्रीनच आणि बाळांचे खाणेपिणेही स्क्रीनशिवाय अशक्य होऊन बसले. बरेच पालक रोजीरोटीचे साधन म्हणून स्क्रीनकडे वळले खरे; पण त्यातून बाहेर पडणे नंतर त्यांना शक्यच झाले नाही. तुम्हाला ह्या चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटत असेल, तरी तुम्ही एकटेच नाही आहात एवढे ध्यानात असू द्या.”
प्रश्न : आपले मूल स्क्रीनचा योग्य तो वापर करते आहे, की त्याच्या आहारी गेले आहे हे कसे ठरवायचे?
लविना नंदा : “माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे आहे ते पालक-मुलाचे नाते. तुम्ही ‘हे करा – हे करू नका’ छापाचे कुणाचेही मार्गदर्शन घेतले तरीही भावनिकदृष्ट्या तुमचे मूल तुमच्यापासून दूर चालले असेल, तर कुठल्याही बंधनांचा काहीही उपयोग नाही.”
आधी स्वत:ला प्रश्न विचारा.
- माझे मूल स्क्रीनवर काय बघते ते मला ठाऊक आहे का?
- त्याबद्दल आपण त्याच्याशी मोकळेपणी, शिक्षेचा बडगा न उगारता, बोलू शकतो का?
- कुठलीही लपवाछपवी न करता माझे मूल स्क्रीन वापरताना येणाऱ्या अडचणींबद्दल माझ्याशी बोलू शकते का?
तुम्ही काय शिकवताय ह्यातून मुले शिकत नसतात, ती शिकतात तुमच्या जगण्याकडे पाहून. पालक सतत फोनवर राहत असतील, तर मुले त्यांचे अनुकरण करणारच!”
केवळ स्क्रीनबाबत नियम करून भागत नाही. निराशा, वैफल्य अशा भावनांवर मात करण्याइतके नाते मजबूत असेल, तरच नियमांचा उपयोग होतो. तुमचे मूल तुमच्यापासून लपवून स्क्रीन पाहत असेल, खोटे बोलत असेल किंवा आक्रमकपणे वागत असेल, तर ह्याला केवळ स्क्रीन जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. पालक आणि मुलांमध्ये चालणारा सत्तासंघर्ष, मतभेद, भावनिक दुरावलेपण, सतत बदलणारे नियम, ठरावीक दिनचर्या नसणे असे विविध घटक ह्याला कारणीभूत ठरतात. आपण स्क्रीनवर दोष टाकून मोकळे होऊ शकत नाही.
प्रश्न : पालकांच्या स्क्रीन टाईमचा मुद्दा निघाला, की त्यांचे म्हणणे असते – अशी तुलनाच होऊ शकत नाही, आम्ही फोन कामासाठी वापरतो; मुले त्यावर ‘टाईमपास’ करतात.
लविना नंदा : “हो, कामासाठी फोनचा वापर समजण्यासारखा आहे. मुलांनाही काम आणि टाईमपास ह्यातला फरक कळेलच की! पण तरी मर्यादा प्रत्येकासाठीच ठरवलेल्या असाव्यात.”
- घरातल्या सर्वांनी काही वेळ आपापले मोबाईल लांब ठेवून एकमेकांसोबत वेळ घालवावा.
- आपण स्क्रीनवर काय करतो आहोत ह्याबद्दल मोठ्यांनी मुलांना कुठलाही आडपडदा न ठेवता कल्पना द्यावी. ती कल्पना मोकळेपणी देता येईल अशाच कारणांसाठी स्क्रीनचा वापर करावा.
- ताण घालवण्यासाठी मोबाईलऐवजी इतर पर्यायांचा विचार करावा.
“रिकामा वेळ मिळाला, की टीव्ही बघणे किंवा मोबाईलवर स्क्रोलिंग करत बसणे ह्याऐवजी तुम्ही काहीतरी वेगळे करताना मुलाला दिसणे गरजेचे आहे. ताण घालवण्यासाठी आपले पालक फोन घेऊन बसतात हेच चित्र मुलाला घरात दिसत असेल, तर मूल शाळेतून आले, की फोनकडेच वळणार. पालकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की मुलांना कामाचा अर्थ कळतो. त्यांना वळत नाही तो ढोंगीपणा.”
समजा घरात नियम केलेला असेल, की जेवताना मोबाईल बघायचा नाही, आणि त्याच वेळी मोठी माणसे मात्र व्हॉट्सप बघत असतील, तर मूल काढायचे ते अर्थ बरोबर काढते –
- नियम वाकवता येतात.
- स्क्रीन बघण्याची काही विशिष्ट वेळ नसते.
- आणि नात्यांपेक्षा फोन महत्त्वाचा.
पालक म्हणून तुम्ही नेहमी परिपूर्ण असण्याची गरज नाही, मात्र तुमच्या भूमिकेत सातत्य असले पाहिजे.
प्रश्न : मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेतला, तर त्यांच्यामध्ये ‘विड्रॉल सिम्प्टम्स’सारखी लक्षणे दिसतात. ही परिस्थिती पालकांनी कशी हाताळावी?
लविना नंदा : पहिली गोष्ट अशी आहे की पालकांना त्रास द्यायचा म्हणून मूल असे वागत नाही; त्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे हेच मुळी त्याला ठाऊक नाही. कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या गोष्टीचा त्याला आधार वाटत होता, तीच तुम्ही त्याच्या हातातून काढून घेतली म्हटल्यावर ते घाबरेघुबरे होऊन जाते. तर आपण काय करायचं?
आधी स्वतःवर ताबा मिळवा.
- कुठलीही कृती करण्याअगोदर मुलाशी असलेले आपले नाते महत्त्वाचे आहे हे ध्यानात ठेवा.
- मुलाच्या आयुष्यात स्क्रीनचे काय स्थान आहे ते समजून घ्या.
- दिनचर्येत करण्याचे बदल हळूहळू अमलात आणा.
- सीमारेषा ठरवताना त्या ठाम, स्पष्ट पण पालन करण्याजोग्या असू द्या. उगाच अवास्तव नियम ठरवू नका.
आधी नाते जपणे मला महत्त्वाचे वाटते; वळण त्यानंतर लावायचे. आणि तेही शांतपणे आणि दृढपणे. पहिले एक-दोन आठवडे कठीण वाटेल, मुले रडतील, मागे हटतील; पण प्रयत्नांत सातत्य राखणे महत्त्वाचे. कधी मुलाच्या काही समस्या उग्र रूप धारण करू शकतात. अस्वस्थ वाटणे, झोप विस्कळीत होणे अशा समस्यांसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदतही घ्यावी लागू शकते.”
सर्व मोठ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. मोबाईल काढून घेतल्यामुळे मुलाचा भावनिक उद्रेक होत असेल, तर ह्यात त्याची काही चालबाजी आहे असा त्याच्यावर ठपका ठेवू नका. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्याला मोबाईलचा आधार वाटत असेल, आणि तोच त्याच्याकडून काढून घेतल्यामुळे त्याला असुरक्षित वाटू शकते.
मग अशा वेळी पालकांनी काय करायचे आहे?
- शांत राहा.
- आपल्या भूमिकेवर ठाम राहा.
- मुलाला झिडकारू नका.
कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कालांतराने नवीन मार्ग शोधून काढा.
प्रश्न : मुलांच्या वयोगटांनुसार त्यांच्या समाजमाध्यमांच्या वापरावर बंदी घालण्याचा उपयोग होईल असे तुम्हाला वाटते का? त्याने मूळ मानसिक समस्या दूर होईल का, की ही केवळ लक्षणांवर केलेली तात्पुरती मलमपट्टी ठरेल?
लविना नंदा : “ही तरुण पिढी अत्यंत हुशार आहे. घातलेल्या निर्बंधांतून ती बरोबर मार्ग काढतील. केवळ बंदी घालण्याने मुळातल्या समस्या सुटण्याची शक्यता कमीच.”
- तंत्रज्ञान वापराची जबाबदारी वाढवायला हवी.
- डिझाईनच्या स्तरावर नियमन व्हायला हवे.
- तंत्रज्ञानाचा मुलांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो आहे हे त्यांना शिक्षणातून सांगितले जावे.
“कुठली एक गोष्ट करावी असे विचाराल, तर मी ठामपणे म्हणेन, की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात स्क्रीनचा वापर कमी करावा. अनुभवातून मुलांचे शिक्षण व्हावे. घरातल्या व्यक्तींशी बोलणे, वाचनालयात जाणे, वास्तव जगाला सामोरे जाणे अशा गोष्टींचा शिक्षणात अंतर्भाव करावा. स्वतःच्या मोबाईल वापरावर तरुण पिढीचे स्व-नियंत्रण असले पाहिजे ही अपेक्षा अवास्तव वाटते. कारण ह्या डिजिटल गोष्टींची निर्मितीच मुळी त्यांना नादी लावण्यासाठी झालेली आहे. मात्र रात्री उशिरा येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर अंकुश ठेवणे, काही विशिष्ट गेम्सवर कडक नियंत्रण ठेवणे अशा काही उपाययोजना डिजिटल प्लॅटफॉर्म्सना करता येतील.”
पालकांनी काय लक्षात घ्यायचे आहे?
अशी बंदी घातली गेली, तरी मुलांना काही गोष्टी शिकवाव्या लागतील –
- भावनांचे नियमन करण्याचे कौशल्य
- काटेकोरपणे विचार करणे
- माध्यम-साक्षरता
- जोखीम ओळखणे
मुळात समस्या मुलाच्या इच्छाशक्तीची नाही. मूल वाढते आहे ते वातावरणच भुरळ घालणारे आहे.
प्रश्न : एखादे मूल स्क्रीनच्या पूर्णपणे आहारी गेले असे उदाहरण तुमच्या पाहण्यात आले आहे का? त्यावर तुम्ही काय उपाययोजना केलीत?
लविना नंदा : “जेवताना समोर स्क्रीन सुरू असली तरच तोंड उघडणारी बरीच छोटी मुले मी पाहते. हळूहळू ही स्क्रीन त्यांच्या सगळ्या दिनचर्येच्या केंद्रस्थानी येते.”
अशा वेळी खालील उपाय योजावे लागतात –
- पालकांचा स्क्रीनचा वापर तपासून आवश्यक असेल तर त्यात बदल करणे
- कुटुंबात सगळ्यांच्या दिनचर्येला वळण लावणे
- घरात ‘स्क्रीन-फ्री’ वातावरण निर्माण करणे
- पालक आणि मुलांचे नात्याचे बंध मजबूत करणे
मुले ऑनलाइन गेम खेळतात त्यातल्या धोक्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. अनोळखी व्यक्तीशी चालणारे संभाषणसुद्धा धोकादायक ठरू शकते.
पालकांनी लक्षात घ्यायच्या गोष्टी –
एखादे मूल स्क्रीनशिवाय खातच नसेल, ह्याचा अर्थ ते वाया गेले असा होत नाही. जेवण आणि स्क्रीन असे समीकरण त्याच्या डोक्यात निर्माण झाले आहे, इतकेच.
ह्यातून सावरायचे म्हणजे,
- दिनक्रम नव्याने आखायचा
- कुटुंबाचा बिघडलेला ताल पुन्हा साधायचा
- नाती नव्याने जोडायची
प्रश्न : डिजिटल डिटॉक्सचा, म्हणजे मुलांच्या हातातून स्मार्ट फोन काढून घेऊन त्यांना पूर्वीचे बटणांचे फोन देण्याचा उपयोग होईल का?
लविना नंदा : “त्याने काही प्रमाणात फायदा होईल खरा; पण तोच एक इलाज नाही होऊ शकत. कुटुंबातल्या इतरांच्या सवयी, घरातले वातावरण तसेच राहिले, तर मुलांच्या वागण्यात काही लक्षणीय फरक पडेल असे वाटत नाही.”
पालकांनी ध्यानात घ्यावे –
डिटॉक्स मुलाच्या स्क्रीन-वापराच्या संधी कमी करेल खरे; पण मुलाला जीवन-कौशल्ये शिकवणार नाही. नवीन दिनक्रम ठरवले गेले नाहीत, ठरवलेले नियम पाळण्यात सातत्य राखले गेले नाही, भावनांवर नियंत्रण कसे राखायचे हे पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून दाखवून दिले नाही, तर डिजिटल डिटॉक्स करून फारसे काही साधणार नाही. वर्तन-समस्या वेगळे स्वरूप धारण करेल.
प्रश्न : काही मुले स्क्रीनच्या आहारी जाण्याची जास्त शक्यता असते का?
लविना नंदा : “माझ्या मते न्यूरोडायव्हर्सिटी असलेली मुले, म्हणजे ज्यांचा मेंदू सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करतो, त्यामुळे त्यांचे विकासाचे टप्पे सर्वसामान्य मुलांसारखे राहत नाहीत, ती मुले चटकन स्क्रीनच्या आहारी जाऊ शकतात, कारण ती कृती करायला सोपी आहे.”
त्यांनी एक कल्पना करायला सांगितली – समजा एखाद्या मुलाचा विकास त्याच्या वयानुसार होत नाहीय. त्यामुळे त्याच्या बरोबरीच्या मुलांसारखे सायकल चालवणे किंवा त्यांच्याबरोबर मैदानावर खेळायला जाणे त्याला जमत नाही. अशा वेळी स्क्रीन त्याला जवळची वाटू शकते. कारण इथे त्याची बरोबरीच्या मुलांशी स्पर्धा नसल्याने जिंकणे सोपे जाते. त्यातून मिळणारे समाधान त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचे ठरते. काही मुलांसाठी स्क्रीन केवळ मौजमजेचे साधन नाहीये; ती त्यांना दिलासा देणारी बाब असू शकते. आपणही काहीतरी करू शकतो हे समाधान त्यांना त्यातून मिळते, सुरक्षित वाटते, त्यांच्या मनावरचे दडपण त्याने कमी होते.
त्यामुळे उपाययोजना करताना मोठ्यांचा दृष्टिकोन सौम्य, हळुवार असला पाहिजे. मुलाला त्यांचा आधार वाटला पाहिजे. हवे तर व्यावसायिक मार्गदर्शकाची मदत घेतली जावी.
प्रश्न : एखाद्या मुलाने स्क्रीनच्या व्यसनावर मात केली हे कसे कळते?
लविना नंदा : “बरे व्हायला अमुक एक काळ लागतो असे ठामपणे सांगणे अवघड असते. मुलाचे वय, कुटुंबाचा सहभाग, ह्या साऱ्याच्या मागे असलेली भावनिक कारणे, आणि ज्याला आपण ‘व्यसन’ म्हणतोय ते, अशा बऱ्याच घटकांवर ते अवलंबून असते.”
- स्क्रीनचा अतिवापर हे लक्षण आहे, मूळ कारण नव्हे
- मूल बरे होण्यात कौटुंबिक पातळीवर केले गेलेले बदल, सुधारलेली नाती महत्त्वाची भूमिका बजावतात
- ताबडतोब बदल दिसावा ही अपेक्षा अवास्तव आहे; अनेक महिने सातत्याने प्रयत्न करावे लागतात.
- पहिले १-२ आठवडे : सर्वात कठीण असतात,
- १-२ महिने : दिनचर्येची घडी बसू लागते,
- ३-६ महिने : वर्तनात दृश्य परिणाम दिसायला लागतात .
तळ टीप
संपूर्ण चर्चेदरम्यान लविना नंदा एक मुद्दा अधोरेखित करत होत्या – स्क्रीनवरचे अवलंबित्व ही क्वचितच स्वतंत्र समस्या असते. म्हणजे मुलाच्या भावनिक गरजा पूर्ण न होणे, दिनचर्येला काहीही वळण नसणे किंवा मग पालक आणि मुलांचे ताणलेले सबंध अशी अनेक करणे त्याच्या मागे असतात. पण म्हणजे पालकांच्या काहीच हातात नाही का? तर तसे नाही. मुलांशी सातत्यपूर्ण संवाद, नियमांबद्दल स्पष्टता, वास्तव आणि आचरणात आणण्यासारखी दिनचर्या असे उपाय योजावेत. त्यातून मुलांचे स्क्रीनशी निकोप नाते जुळायला मदत होईल; मात्र दोषारोप न करता, कुठलीही भीती वा शरम न वाटता हे करायची जबाबदारी आपलीच.
निहारिका डबराल
(‘द बेटर इंडिया’मधून साभार)
अनुवाद : अनघा जलतारे
