उत्तरा जाधव 

जगण्याचा सरधोपट मार्ग सगळ्यांना माहीत असतो. मात्र हीच वाट इंद्रधनुष्याची झाल्यावर सगळंच बदलून जातं. आपल्या अवतीभोवती असलेल्या एलजीबीटीक्यू (LGBTQ) जगाविषयी मी थोडं लिहिणार आहे; माझ्या स्वतःच्या अनुभवातून!     

माझा उन्मेष 

मी एका सुशिक्षित घरातली मुलगी.  आजारानं माझे बाबा अंथरुणाला खिळून होते. त्या काळी त्या आजारावर फारसे औषधोपचार उपलब्ध नव्हते. तरीही आम्ही सगळे मिळून आनंदानं राहत होतो. सात माणसांचं कुटुंब चालवणारी आई आणि अंथरुणावरून प्रकाशन-व्यवसाय चालवणारे बाबा! या दोघांना मी कधीही निराश झालेलं पाहिलं नाही. मोठे जिद्दीचे होते दोघंही! त्यांच्यावरची एक जबाबदारी कमी व्हावी या एकमेव विचारानं मी लग्न केलं. एक चांगला माणूस घडवायचा आहे अशी मनाशी खूणगाठ बांधून काही वर्षांनी उन्मेषला जन्म दिला. त्याला चांगलं आयुष्य द्यायचं हे माझं पक्कं ठरलं होतं! आणि चांगल्या आयुष्याची व्याख्याही माझ्या मनात आकार घेत होती. माझ्या स्वप्नातलं छान घर मला उन्मेषला द्यायचं होतं; असं घर जिथे त्याला मोकळेपणानं आणि आनंदानं जगता यईल, त्याच्याबरोबर आमचा चांगला संवाद असेल, तो चांगला माणूस बनेल. आई म्हणून माझ्या मनात काही रूढ प्रतिमा होत्या आणि काही स्वप्नं होती.  

एक फार सुंदर प्रार्थना म्हणत मी मोठी झाले : ‘हे परमेश्वरा, जे बदलता येणार आहे ते बदलण्याची शक्ती दे. जे बदलता येणार नाही ते हसतमुखाने पूर्णपणे स्वीकारण्याची बुद्धी दे आणि या दोन्हीतील फरक ओळखण्याचा विवेक मला दे.’ 

लहानपणापासून जे शिकत आपण मोठे होतो ते आयुष्यात कधी महत्त्वाचं ठरेल सांगता येत नाही. २००२ साली, उन्मेष आठ वर्षांचा असताना, त्याचं इटुकलं बोट धरून मी माझ्या लग्नाच्या घरातून बाहेर पडले. घरातली परिस्थिती कठीण होती. मला गुदमरायला होत होतं. अशा परिस्थितीत मोठं करायला मी उन्मेषला जन्म दिलेला नाही असं राहून राहून वाटत होतं. सगळं बळ एकवटून आणि जे काही करावं लागेल ते करण्याची जिद्द उराशी बाळगून मी माझ्या पोराबरोबरचा प्रवास सुरू केला. असंख्य अनपेक्षित गोष्टींना तोंड देत आम्ही दोघंही सोबत मोठे होत होतो. सुरुवातीचं भय आणि वाईट वाटणं संपून, आम्हाला राहायला जमतंय असं वाटल्यावर ताण कमी होऊन आमच्या छोटुशा घरात आनंद शिरला. कुठल्या न कुठल्या गोष्टीशी लढाई करत आणि त्याबरोबरच हसतखेळत पुढची दहा वर्षं आम्ही दोघं छान जगत होतो. ह्यातून एक गोष्ट मनात खोलवर रुजली, की माणूस-धन हीच खरी संपत्ती आहे. 

काही वर्षांनी मला वाटू लागलं, की उन्मेष अस्वस्थ आहे. आम्ही एकमेकांशी अगदी मोकळेपणानं बोलायचो; पण मला न कळणारं काही तरी त्याच्या डोक्यात चालू आहे असं मला वाटत होतं. २०१३ सालची गोष्ट. एक दिवस तो मला म्हणाला, “आई मला तुझ्याशी बोलायचं आहे.” मी म्हटलं, “चल बोलूया.” त्याला व्यक्त व्हायला खूप अवघड जातंय असं वाटत होतं. ते कशामुळे असेल असा मी विचार करत होते. त्यावेळी मी एका अमेरिकन शैक्षणिक कार्यक्रमाची भारताची डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्या प्रोग्रॅमला येणारी काही मुलं सुरुवातीला असेच आढेवेढे घेत बोलायची. ती मुलं एलजीबीटीक्यू कम्युनिटीमधली असायची. मी त्याचा अभ्यास केलेला होता. 

मी उन्मेषला विचारलं, “बाळा काय होतंय?” 

तो म्हणाला, “काय आणि कसं सांगू हे मला सुचत नाहीये ग आई.” 

माझ्या अनुभवांचा विचार करून मी त्याला विचारलं, “माऊ, तू गे आहेस का?”

तो मला म्हणाला, “हो आई. तुला कसं समजलं? तू मला घरातून बाहेर काढून टाकणार आहेस का?” 

मी त्याला म्हणाले, “नाही रे बाळा! तू माझा मुलगा आहेस हे वास्तव तुझ्या लैंगिकतेमुळे (सेक्शुआलिटी) कसं बदलेल? असू दे मला काही फरक नाही पडत. वेडू मुलगा!” 

हे ऐकून मला त्याचा जीव भांड्यात पडलेला दिसला! कारण स्वतःबद्दल आईवडिलांना विश्वासानं सांगणाऱ्या या मुलांना घरातून सर्रास हाकलून दिलं जात होतं. काय करत असतील अशी मुलं? माझं डोकं चक्रावून गेलं होतं. उन्मेषचं भोवताल बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला.   

आमचा भोवताल…

२०१३ साली आपल्या देशात एलजीबीटीक्यू व्यक्ती गुन्हेगार ठरवली गेलेली होती. त्यामुळे मी घरात मायेनी जवळ घेतलं, तरी बाहेरच्या जगात त्यानं काळजीपूर्वक व्यक्त व्हायला हवं असं आम्ही बोललो. माझ्या प्रोग्राममध्ये येणाऱ्या मुलांना मला सांगावं लागायचं, की तुमच्या सेक्शुआलिटीविषयी तुम्ही आमच्या देशात अपरिचित लोकांशी बोलू नका. कारण दुर्दैवानं इथे एलजीबीटीक्यू समाजाला ‘क्रिमिनल’ मानलं जातं. माझ्या मुलाचं मला कसं आणि कुठे रक्षण करावं लागेल असा एक भुंगा माझ्या डोक्याला लागला. 

जे काही करावं लागेल ते करायची जिद्द माझ्या मनात होती. मी स्वतःशी तीन गोष्टी ठरवल्या. पहिली : या नव्या माहितीमुळे जे काही आमच्या वाट्याला येईल त्यासाठी उन्मेषचा हात घट्ट धरून मी त्याच्या बरोबर असेन. दुसरी : आमचं घर ही त्याच्यासाठी सुरक्षित जागा असेल. त्यानं कुठल्याही कारणासाठी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही. आणि तिसरी :  आम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागणार असलं, तरी आम्ही दोघं एकमेकांच्या सोबतीनं त्या परिस्थितीला सामोरे जाऊ आणि त्यातून बाहेर पडू. 

बिंदूमाधव खिरे ह्यांच्या ‘समपथिक ट्रस्ट’ या संस्थेनं २०१३ साली सुप्रीम कोर्टाच्या कलम ३७७ निकालाविरुद्ध एक मूक निषेध आयोजित केला होता. मी आणि उन्मेष तिथे गेलो होतो. आम्ही बालगंधर्वच्या चौकातल्या फुटपाथवर बसलो होतो. पोलिसांची गाडी आली. त्यांनी आयोजकांना परवानगीची कागदपत्रं मागितली. ती बघून जीप निघून गेली. त्यात एक मुख्य महिला आधिकारी होत्या. त्यांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेला कटाक्ष माझ्या अजूनही लक्षात आहे. माझ्या मनात आलं, की ही माझ्याभोवती बसलेली मुलं घाबरतील का? रूढ समाजापेक्षा वेगळं असणं या मुलांना काय काय अनुभवायला लावेल! 

एलजीबीटीक्यू समुदायानं ठरवलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मी माझी त्यांच्याबद्दलची समज वाढवायला हवी हे मला समजलं होतं.    

प्राइड वॉक…

समपथिकप्राइड वॉक’ घेते असं समजलं. हे नावही तोवर मला माहीत नव्हतं. माझ्या टीममध्ये असलेल्या अमेरिकन लोकांशी बोलले, त्याविषयी वाचलं. मग समजलं, की प्राइड वॉक हा एलजीबीटीक्यू समुदायाचं अस्तित्व, हक्क आणि प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम आहे. प्राइड मार्च किंवा प्राइड परेड म्हणूनही तो ओळखला जातो. १९७० मध्ये न्यूयॉर्कमधील स्टोनवॉल इन इथे पोलिसांनी धाड घातली होती. तिथे एलजीबीटीक्यू समुदायातले लोक होते. पोलिसांचा निषेध करण्यामधून दंगल झाली. तेव्हापासून भेदभाव, हिंसाचाराला विरोध करणाऱ्या आणि समानता, विवाहाच्या हक्काचा पुरस्कार करणाऱ्या जागतिक चळवळीचं रूपांतर ‘प्राइड वॉक’ मध्ये झालं. २००८ मध्ये मुंबईतील पहिल्या प्राइड मार्चनं भारतात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. आणि कलम ३७७ च्या सावटातही, २०१८ मध्ये एलजीबीटीक्यू नाते संबंध गुन्हेगारीमुक्त होईपर्यंत, दरवर्षी प्राइड वॉकमध्ये वाढ होत राहिली. वॉकमध्ये सहभागी होणारे लोक इंद्रधनुषी झेंडे घेऊन नाचतात, संगीतावर थिरकतात आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम’ (Love is Love) किंवा पालकांचा सहभाग सुरू झाल्यावर ‘जैसे है सच्चे है, ये हमारे बच्चे है!’ सारख्या घोषणा देतात. हे मोर्चे समुदायामध्ये एकत्रितपणा निर्माण करतात, कलंकभावनेला आव्हान देतात, त्याचबरोबर समाजानं त्यांना सामावून घेण्याची अपेक्षा व्यक्त करतात.

मी २०१६ च्या ‘प्राइड वॉक’ला गेले होते. खूप तरुण मुलंमुली आलेली होती. सगळ्यांबरोबर मी चालत होते. दोन अनोळखी मुलं माझ्या जवळून चालू लागली. मला म्हणाली, “काकू आम्ही तुमच्याशी बोलू शकतो का?” माझ्यासाठी हे अनपेक्षित होते. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक नव्हते. कोणीतरी आपल्याशी बोलावं असं या मुलांना वाटतं आहे हे माझ्या लक्षात आलं. मनात आलं, अशी किती मुलं असतील? त्यांना धीर कसा द्यायचा? 

२०१७ सालच्या प्राइड वॉकमध्ये मुंबईच्या हरिषनं माझी त्याच्या आईशी ओळख करून दिली. मला बरं वाटलं. मुंबईत एलजीबीटीक्यू मुलांच्या पालकांचा ‘स्वीकार नावाचा एक सपोर्ट ग्रुप आहे असं मला समजलं. मी त्याची मेंबर झाले आणि पुण्यातही असा ग्रुप तयार करावा यासाठी प्रयत्न करू लागले. या सपोर्ट ग्रुपला जोडून घेण्यासाठी एका गूगल फॉर्ममध्ये पालक स्वतःविषयीची माहिती भरून पाठवायचे. त्यांच्याशी बोलून मुंबईच्या अरुणा देसाई त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरच्या मुख्य गटामध्ये सहभागी करून घ्यायच्या. पुण्यातल्या पालकांना मी पुण्याच्या गटामध्ये सामील करून घ्यायचे. मुंबईत पालकांचा प्रतिसाद जास्त होता. पुण्यातले पालक मोकळेपणानं पुढे येत नव्हते. उत्तरा जाधव या पालक कम्युनिटीच्या कार्यक्रमांना येतात, सगळ्यांशी बोलतात हे कम्युनिटीमधल्या मुलांना समजल होतं. मुलं मला मेसेज करून किंवा फोन करून आईवडिलांना कसं समजावू म्हणून विचारू लागली. मी त्यांना ग्रुप जॉईन करण्याची लिंक पाठवत असे. 

‘स्वीकार’ बरोबरची ओळख मला पालक म्हणून खूप विचार करायला लावणारी ठरली. तुमच्या स्वतःच्या मुलाचा स्वीकार ऐच्छिक कसा असू शकेल? तुम्ही त्याला जन्म दिला आहे, त्यामुळे ते आहे तसं तुमचं आहे ना? त्या ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चा वाचून मी परमेश्वराचे आभार मानायची, की मला याबद्दल थोडी माहिती होती आणि माझं आणि उन्मेषचं नातं मजबूत होतं म्हणूनच केवळ रूढ अर्थानं कठीण असलेला प्रसंग आम्ही सहज पेलू शकलो! इतर पालकांना ते किती जड जातंय हे मला दिसत होतं. मी नकळत या कम्युनिटीचा विचार करू लागले. समाजाच्या प्रतिक्रियांना आपण आपल्या आयुष्यात किती महत्त्व देतो? का देतो? आपल्या मुलाशी कोणी नीट वागत नसेल तर आपण त्याच्या विरोधात ठामपणे उभं का नाही राहू शकत? खूप प्रश्न आणि फक्त प्रश्न! 

आईचा प्रवास…

या प्रवासात मला ‘आईपणा’ची असंख्य रूपं उलगडत गेली. काही रूढ प्रतिमा आणि स्वप्नं असलेलं आमच्या आयुष्याचं जे चित्र मी रेखाटलं होतं ते बदलणार आहे हे मला जाणवलं. रूढ प्रतिमा माझ्या उपयोगाच्या नाहीत आणि माझी स्वप्नं मला पुन्हा नव्यानं रेखाटावी लागणार आहेत. अर्थात, माझ्या भोवतालची परिस्थिती गुंतागुंतीची होती. इतर पालक काय करत असतील ह्याबद्दल माझ्या मनात कुतूहल वाढू लागलं. ते आपल्या मुलांना किती आणि कसं महत्त्वाचं समजतात?

अनेक मुलं माझ्याशी संपर्क साधतात. त्यातल्या कुणाला आपलं मन माझ्यापाशी मोकळं करायचं असतं, तर कुणाला मी त्यांच्या आईवडिलांशी बोलायला हवं असतं. असे अनेक अनुभव तुमच्यासमोर मांडायचे आहेत या लेखमालेतून. मला दिसलेलं माणसाच्या स्वभावाचं मनोहारी रूप तुमच्यासमोर मांडावं म्हणून हा लेखनप्रपंच. 

आज इथेच थांबते. 

टीप : लेखात उल्लेख आलेल्या सगळ्या मुलांची नावे बदललेली आहेत. 

उत्तरा जाधव 

uttaraad@gmail.com

गेली ४५ वर्षे प्रकाशन, आयटी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण ह्या क्षेत्रात कार्यरत. सध्या ‘वंचित विकास’ ह्या संस्थेसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करतात. आपले जग चांगले बनवण्यासाठी काम करण्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.