माझा मुलगा सात-आठ वर्षांचा असताना आम्ही तिघं – मी, सृजन आणि त्याचा बाबा – गप्पा मारत बसलो होतो. कशावरून तरी ‘मरणा’चा विषय निघाला आणि आमच्या गप्पा एकदम वेगळ्याच दिशेला गेल्या.
‘‘आई, मरण म्हणजे काय ग?’’
‘‘म्हणजे… एखाद्याचं जिवंतपण संपून जाणं. आता बघ हं, सगळे प्राणी, पक्षी, झाडं हे हालचाल करतात, खातात, पितात, मोठे होतात, श्वास घेतात. पण काही काळानंतर हे सर्व बंद होतं. ते हालचाल करू शकत नाहीत, खाऊ पिऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यातलं जिवंतपण संपून जातं.’’
कापऱ्याच आवाजात सृजन म्हणाला, ‘‘माणसंपण अशीच मरतात?’’
बाबा, ‘‘हो, जे जे काही जिवंत आहे ते काही काळानंतर असंच संपून जातं.’’
‘‘संपून जातं म्हणजे कुठे जातं?’’
बाबा, ‘‘मातीत मिसळून जातं. तू मेलेलं झुरळ पाहिलं आहेस ना? काय होतं त्याचं सांग.’’
‘‘मुंग्या त्याला ओढून घेऊन जातात.’’
‘‘नेऊन काय करत असतील?’’
‘‘खाऊन टाकतात.’’
‘‘म्हणजे ते झुरळ संपून गेलं किनई?’’
सृजन शांत… गंभीर…
मी, ‘‘सृजन, आता मला एक आठवलं. दीड-दोन महिन्यापूर्वी आपल्या गेटजवळ झाडीमध्ये एक मांजराचं पिल्लू मरून पडलं होतं. आठवतं तुला? दुर्गंधी आली म्हणून आपण त्याचा शोध घेतला. आणि काय केलं नंतर?’’
‘‘त्याच्यावर घमेलं भरून माती व राख टाकली.’’
‘‘त्या पिल्लाचं काय झालं असेल पाहूया का?’’
‘‘काय झालं असेल?’’
सृजननं तिथे जाऊन पाहायची फारशी उत्सुकता दाखविली नाही. कदाचित त्याला भीती वाटत असावी. त्याचा चेहरा, त्याचा आवाज यावरून तरी असंच वाटत होतं.
मी, ‘‘ते पिल्लू आता तिथे दिसणारच नाही. त्याचं मातीत रूपांतर झालं असेल.’’
‘‘म्हणजे माणूस मेला की मातीतच मिसळून जातो?’’
असं सृजननं विचारलं मात्र, त्याचा आवाज खूपच घाबराघुबरा झाला होता. ते ऐकून त्याचा बाबा म्हणाला, ‘‘अरे पण काय गंमत आहे सांगू का, जीव एकीकडे मातीत मिसळतो आणि दुसरीकडे नवीन जीव निर्माण होतो. म्हणजे इथं एक मांजराचं पिल्लू मरून गेलं आणि मातीत मिसळलं आणि दुसरीकडे मठकरांच्या मनीला चार पिल्लं झाली, हो किनाई? त्यामुळे एकीकडं नष्ट झालं आणि दुसरीकडं जिवंत झालं…. असंच सुरुवातीपासून निसर्गामध्ये घडत आलेलं आहे. जर काही नष्ट झालंच नसतं आणि फक्त नवीन जीव निर्माणच होत राहिले असते तर किती गर्दी झाली असती? नुसती चेंगराचेंगरी. या पृथ्वीवर काही जागाच उरली नसती.
पुढचं सगळं बोलणं त्यानं ऐकून घेतलं, पण पुन्हा ‘मरण’ या विषयावर तो आला नि म्हणाला, ‘‘मग तुम्ही दोघंही मरणार, मी कुणाबरोबर राहायचं?’’….. आता मात्र त्याचे डोळे पाणावले होते. वाटलं की कशासाठी आपण हा विषय इतका वाढवत नेला. पण आमची एक सवय होती, की त्याचा कोणताही प्रश्न अनुत्तरित ठेवायचा नाही. आम्ही उत्तरं देत गेलो, समजावत गेलो. पण आत्ताची त्याची भावनिक अवस्था पाहून आम्हाला कसंसंच झालं. आम्ही दोघंही काही क्षण शांत राहिलो. मग सृजनच म्हणाला, ‘‘तुम्ही मरून गेल्यावर पुन्हा कुठे जिवंत झालात हे मला कसं कळेल? मग मी तुमच्याजवळ येऊन राहीन.’’ आता मात्र काहीतरी बोलणं भागच होतं. मी म्हटलं, ‘‘अरे, आम्ही नसू त्या वेळेस तू काही एकटा नसशील. तुझी बायको असेल, तू जसा आमचा गोड मुलगा आहेस, तशीच तुझीही मुलं असतील. तू त्यांच्या सोबत राहायचंस.’’ त्याची बायको, मुलं वगैरे ऐकल्यावर गाल फुगवून लाडात येऊन सृजन, ‘‘आई, तुम्ही काहीतरीच बोलत असता’’ इतकंच म्हणाला. आणि ‘मरणा’च्या गंभीर गप्पांवरून पुन्हा आम्ही हलक्याफुलक्या विषयांवर आलो.
मृत्यूचा विषय संपल्यानं मला अगदी हायसं वाटलं. कोण जाणे पुढे अजून काय काय प्रश्न सृजननं विचारले असते… यानंतर बरेच दिवस मी मात्र स्वतःलाच विचारत होते, की इतक्या लहान वयात सृजनला ‘मृत्यू’चं असं स्पष्टीकरण देणं योग्य होतं का?
एक दिवस सृजन व त्याचा मित्र पेपर वाचता वाचता काही बोलत होते. त्यांच्या एका मित्राच्या आजोबांच्या निधनाची बातमी व फोटो पेपरात आला होता. थोड्या वेळानं दोघंही माझ्याजवळ आले. सृजन म्हणाला, ‘‘आई, संदीपच्या आजोबांची माती झाली किनई ग? मी तन्मयला सांगतोय तर तो ऐकत नाहीए.’’ काय भानगड आहे माझ्या लगेच लक्षात आलं. मी सृजनला इतकंच म्हटलं, ‘‘अरे, तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. पण तन्मयला कुणी तसं समजावून सांगितलं नाहीए, तुम्ही उगाच या विषयावर भांडू नका.’’ दोघांचीही समजूत पटली आणि ते बाहेर निघून गेले. नंतर अनेक वेळा कुणाच्या मृत्यूची बातमी ऐकली, वाचली की सृजन सहजपणे विचारायचा, ‘‘म्हणजे ते आता मातीत मिसळणार?’’ आम्ही ‘हो’ म्हणायचो. पण माझ्या एवढं नक्की लक्षात आलं होतं, की ‘मरण’ ही गोष्ट त्यानं अगदी सहजपणे स्वीकारली आहे. त्याला मरणाची भीती वाटत नाहीए. त्या दिवशीच्या गप्पांमुळे मनात असलेली बोच आता मात्र कमी झाली.
आता सृजन साडेआठ वर्षांचा आहे. दोनच महिन्यांपूर्वी माझ्या नणंदेच्या मुली – एक दहावीतली आणि एक सहावीतली – माझ्याकडे राहायला आल्या होत्या. माझ्या राहणीविषयी, वागण्याविषयी, विचारांविषयी त्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. अन्य नातेवाईकांमधील चर्चा, सभोवतालच्या इतर बायका व अन्य वातावरण या गोष्टींमुळेच हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले असावेत. एक मात्र खरं की इतर बायांपेक्षा माझं वागणं वेगळं असलं तरी त्यांना माझ्याबद्दल प्रेम, आत्मीयता आहे हे मला जाणवतं. माझ्याशी अगदी मोकळेपणानं त्या गप्पा मारतात. तर त्या दिवशी दोघींनी माझी मुलाखतच घेतली जणू, ‘‘मामी, तू रोज साडी का नेसत नाहीस? गळ्यात मंगळसूत्र का घालत नाहीस? तुझ्याकडे देवघर का नाही? तुझ्या घरी आलेल्या बायांना बाहेर पडताना कुंकू का लावत नाहीस? तू तुझं माहेरचं आडनावच का सांगतेस? तुला तुझी आई याबद्दल काहीच सांगत नाही का? तुला मामीनं (माझ्या मोठ्या जावेनं) काही सांगितलं नाही का? तुला याबद्दल कुणी काहीच विचारत कसं नाही? तुझा देवावर विश्वास आहे की नाही?’’ अशा अनेक प्रश्नांच्या मालिकेनंतर त्यांनी एक प्रश्न विचारला, ‘‘मामी तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?’’ आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना माझं विद्रोही मन चांगलंच जागं झालं होतं. मी पटकन म्हटलं, ‘‘अजिबात नाही. पुनर्जन्म वगैरे काही नसतं. एकदा माणूस मेला की संपला. तो काही पुन्हा जन्माला येत नाही.’’ माझ्या भाच्यांना माझं हे उत्तर अपेक्षितच असावं. त्या दोघीही माझं बोलणं खूपच लक्षपूर्वक पण गंभीर चेहऱ्यानं ऐकत होत्या. असे वेगळे विचार, स्वतःची राहणी-जीवनशैली यांचा विचारपूर्वक केलेला स्वीकार, समतेचा विचार, काही मूल्यं… हे सारं त्या आश्चर्यचकित होऊनच ऐकत होत्या. त्यांचे विस्फारलेले डोळे, चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांनी आजपर्यंत कधीच न ऐकलेला, वेगळाच विचार आपण त्यांना सांगतोय हे माझ्या लक्षात येत होतं. आमच्या तिघींच्या या सर्व गप्पा सृजनसुद्धा शांतपणे ऐकत होता. अनेक गोष्टी त्याच्या डोक्यावरूनच गेल्या असतील, पण तो ऐकत मात्र जरूर होता. आपल्या आईला काहीतरी वेगळंच म्हणायचंय हे त्याला नक्कीच जाणवत होतं. पण पुनर्जन्माबद्दलच्या प्रश्नानं तो खूपच गंभीर झाला. मी दिलेलं उत्तरही त्याला बहुतेक अस्वस्थ करत होतं. त्या क्षणाला तो काहीच बोलला नाही. पण थोड्या वेळानं त्यानं मला हळूच विचारलं, ‘‘आई, म्हणजे माणूस मेला की पुन्हा
जन्माला येत नाही? तो पूर्णपणे संपूनच जातो?’’ गप्पांच्या ओघात मीही ‘हो’ म्हटलं आणि शांत राहिले. रात्री साडेबारापर्यंत अशा गप्पा मारून आम्ही सर्वजण झोपून गेलो.
त्यानंतरच्या काही दिवसात सृजनच्या वागण्यामध्ये मला बदल जाणवायला लागला. तो अनेक गोष्टींना घाबरायला लागला. विशेषतः मरणाची त्याला खूप भीती वाटू लागली. त्याच सुमारास जपानमधील त्सुनामी, भूकंप – जीवितहानी, आमच्या कोकणात येऊ घातलेला जैतापूर प्रकल्प अशा अनेक गप्पा त्याच्या कानावर पडायच्या, बातम्या वाचनात यायच्या. कधी कुठे नैसर्गिक आपत्ती तर कुठे अपघात, कधी वाघानं केलेल्या हल्ल्याची बातमी तर कधी कुणाच्या घरावर वीज पडल्याची. मृत्यूच्या कोणत्याही बातमीनं तो घाबरून जातो. घरात असला की दिवसाढवळ्याही दाराला आतून कडी लावून घेतो. वेगवेगळ्या प्रसंगी त्यानं काढलेले उद्गार आठवले की मला अस्वस्थ व्हायला होतं. ‘‘आई, जपानमध्ये इतकी माणसं मेली ती परत कधीच जिवंत होणार नाहीत?’’ ‘‘आपल्याकडेसुद्धा भूकंप होऊ शकतो? जैतापूर कोकणातच आहे म्हणजे आपल्याकडेही जपानसारखंच होणार? आपणही सर्वजण मरून जाणार?’’ ‘‘आई, मी एकटा कधीच कुठे जाणार नाही. तुला आणि बाबाला घेऊनच जाणार, मी गेल्यावर इथे भूकंप झाला तर?’’ अशा अर्थाचं काही तो वेगवेगळ्या प्रसंगी बोलतो. मी मात्र या सर्वांचा संबंध त्या रात्रीच्या गप्पांशी जोडत राहते. आधी तो मरण ही गोष्ट जितक्या सहजतेनं स्वीकारायचा तेवढ्या सहजतेनं आता स्वीकारत नाही. सगळं जग, आपले आई-बाबा, नातेवाईक, आपण स्वतः संपून जाऊ अशी भीती त्याला वाटत असते. आम्ही त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतो. पण पुन्हा पुन्हा माझ्या मनात येतं, की आपण त्या रात्री बोललो ते चुकलं. मृत्यूचा इतका रोखठोक अर्थ इतक्या सहजपणे आपण सांगायला नको होता.
यापूर्वी मृत्यूविषयी त्याच्याशी मोकळेपणानं चर्चा करूनही माणूस मरतो आणि दुसरीकडे नवीन जीव निर्माण होतो हे विधान त्याच्या निरागस मनाला दिलासा देत होतं. परंतु मेलेला माणूस परत जन्माला येत नाही हे ऐकून त्याचं पूर्ण भावविश्वच बदलून गेलंय, आता मी काय करायचं हे मला समजेनासं झालंय. मृत्यूचं भय नैसर्गिकच असतं असं समजून सोडून द्यायचं? आम्ही आजपर्यंत अगदी कटाक्षानं त्याला कोणत्याही गोष्टीची भीती दाखवायची नाही, धमकी द्यायची नाही हे तत्त्व सांभाळत आलोय. अशा प्रकारे नकळत निर्माण होणाऱ्या भीतीचं काय करायचं? त्याची समजूत कशी काढायची? ‘मृत्यू’ या विषयी मुलांना नेमकं काय सांगायचं? त्यांना दिलासा देण्यासाठी पुनर्जन्म आहे असं सांगायचं का? ‘याचं उत्तर मला अजून सापडलेलं नाही’ असं मोघम उत्तर द्यायचं का?… अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध मी घेत आहे. उत्तर शोधण्यात तुम्ही मला मदत कराल का?
नीला आपटे
प्रस्तुत लेखावर पालकनीतीच्या संपादक संजीवनी कुलकर्णी ह्यांनी आपले मत व्यक्त केले, ते वाचूया…
प्रिय नीलाताई,
मृत्यूचा खरा अर्थ समजणं कुणालाच सोपं जात नाही; लहान मुलांसाठी तर ते अवघडच असतं. सुरुवातीच्या प्रसंगात सहजपणे आपण सांगू शकू असा आविर्भाव तुम्ही आणला असलात, तरी ती एक व्यामिश्र प्रक्रिया आहे याची तुम्हालाही जाणीव आहे असं मला वाटतं. किडा मरणं, डास मरणं, भाजी खुडली जाणं, मांजराचं पिल्लू मरणं आणि कोणी माणूस मरणं या वर वर पाहता मृत्यूच्याच घटना असल्या, तरी त्याचा अर्थ आपण सारखाच घेत नाही. असं असूनही मुलांना समजावताना आपण ही उदाहरणं वापरतो. जन्माला आलेला प्रत्येक जीव केव्हा ना केव्हा मरणारच असतो हे वैश्विक सत्य मुलांनी सहजपणे स्वीकारावं यासाठी आपला हा प्रयत्न असतो हे मान्य केलं, तरी ते समजावून घेताना आपल्याही काही गफलती होतात. मुलंही त्यांना सोईस्कर असेल तेच समजून घेतात. उदाहरणार्थ एक मांजर मेलं, तर दुसऱ्या मनीला पिल्लू होतं किंवा कोणी माणूस मेलं तर लगेच दुसरीकडे जाऊन जन्माला येतं असं नसताना तसा समज व्हावा असं विवरण तुम्ही दिलेलं होतं. इतकंच नाही तर मृत्यूइतक्याच स्वाभाविकपणे लग्न आणि मूल होणं या संपूर्णपणे मानवनिर्मित आणि स्वाभाविक पण मानवाला नियंत्रित करता येण्याजोग्या घटनाही त्याच भरात सांगून मोकळ्या झालात. यामधून सृजननं त्याला सोयीचं असेल तेच समजून घेतलं असणार. त्याला लग्न, बायको म्हणजे काय हे तरी कुठे समजलेलं होतं? तरीही असा लग्नाचा विषय आला की लाजायचं असतं हे त्याला इतरत्र पाहून समजलेलं होतं. तेच त्यानं उत्तरादाखल वापरलं. आपण कधीतरी मरणार आणि मेलो म्हणजे संपलं की सगळं, ही स्वतः आणि प्रियजनांसंदर्भात समजून घ्यायला किंबहुना पटवून घ्यायला अवघड बाब अगदी अपरिवर्तनीय नाही, पुन्हा जन्मायची सोय त्यात आहे हे उत्तर त्यानं कदाचित आधी दुसरीकडूनही ऐकलेलं असू शकेल. तुमच्या सांगण्यानं त्यावर खात्रीचा शिक्का बसला. तो शिक्का तुम्ही नंतर काढून टाकायला लागलात तेव्हा तो घाबरला. मृत्यू समजावून देण्याची खात्रीलायक एकमेव पद्धत अशी नाही. त्या त्या परिस्थितीचा अदमास घेऊनच ठरवायला लागतं. अर्थात, खोटं न बोलणं, कधीही अशा विषयात घाबरवून न सोडणं, आपण सतत बरोबर आहोत, कुठलेही प्रश्न विचारायला मुभा आहे याची ग्वाही देणं, एकदम धक्का न देता पचेल त्या मानानं सांगत जाणं यासारखे काही मूळ नियम पाळायला मात्र हवेतच. मृत्यूबद्दल विचार करताना साहजिकच आईबापांच्या मृत्यूचा प्रश्न मुलांच्या मनात येणार; पण ‘आम्ही मरू, तू एकटा राहशील’ यासारख्या गोष्टी पहिल्याच चर्चेत यायला हव्यातच का? मला वाटतं की नाही. मी एच. आय. व्ही. या विषयात काम करते. तिथे एखाद्या लहान मुलाला ‘तुला हा आजार आहे’ हे अनावरण करायचं असतं, ते वयानुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण करावं असं आता जगभर मानलं जातं. मुलांना मृत्यूबद्दलचं अनावरणही एका अर्थाने तसंच आहे. इथे सोपेपणा इतकाच आहे, की ही बाब सर्वांसाठीची असून आपल्यालाच काही वेगळं स्वीकारावं लागत आहे हा भाग यात नाही. बरेचसे पालक मृत्यूबद्दल, जन्माबद्दल काहीच फारशी माहिती देत नाहीत, तरीही मुलं कधी ना कधी समजावून घेतातच. क्वचित प्रिय व्यक्तीच्या निधनानं किंवा अपघाताच्या प्रत्यक्ष अनुभवानंही आपापलं समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्थात, या निराधार समजावून घेण्यातून मुलांच्या मनात कायमच्यादेखील काही विचित्र कल्पना बसत जातात. ते न व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात हीच फार कौतुकाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित काही दिवस सृजन घाबरला असला तरी काळजीत पडू नका. आपण चांगले दणकट असतो, किडा मुंगी प्राण्यांहून आपल्या अंगात बरीच जास्त ताकद असते, भरपूर खाऊन खेळून ती आणखी वाढते, त्यामुळे आपण कोणी सहजपणे मरत वगैरे नाही. शिवाय कोणी मरू नाही, त्यांना काही होऊ नये म्हणून आजारी पडल्यावर औषध द्यायला डॉक्टरकाका – मावशीपण असतात. माणूस आजारी पडण्याची कारणं, उपाय असं शिकून डॉक्टर होता येतं हेही सहज बोलण्यात येऊ द्या. लहान मुलांमध्ये परिस्थिती स्वीकारण्याचं बळ आश्चर्य वाटावं इतकं मोठं असतं. त्यामुळे आता जरी सृजन काहीसा घाबरलेला असला तरी काही काळानं ते संपेल. सामान्य अंदाजानुसार तो मुद्दा समजावून घेऊन त्यातून त्याचा त्याचा मार्ग काढेल असं झालं नाही, तो त्यावरच विचार करत राहिला तर त्याच्याजवळ तात्त्विक विचारांची विशेष क्षमता आहे असं म्हणायला हरकत नाही. पालकनीतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात, अतिशय मनापासून विचारलात याबद्दल तुमचे आभार मानते. असे प्रश्न विचारले जाणं, त्यावर चर्चा होणं, मनात त्यावर विचार होणं फार आवश्यक असतं. केवळ तुमच्यासाठीच नाही, तर मासिकासाठी आणि सगळ्याच वाचकांसाठीही!
संजीवनी कुलकर्णी
