पालकनीती परिवारातर्फे घेतल्या गेलेल्या/ जाणाऱ्या उपक्रमांची थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे.
पालकनीती मासिक
पालकत्व हा जिव्हाळ्याचा असला तरी तसा दुर्लक्षित विषय आहे. आजच्या काळात आपले काम, उदरनिर्वाह, जबाबदार्या, स्नेही-सोबती, मनोरंजन, महत्त्वाकांक्षा अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याकडे मुलांसाठी वेळ द्यायला नसतो. त्याबद्दलची जाणीव काही काळापूर्वी कमी होती, मुले अनेक असत, घरात मुलांकडे लक्ष द्यायला अधिक माणसे त्यामुळे आणि सगळ्यात म्हणजे मूल वाढवणे हा महत्त्वाचा – गंभीरतेने घ्यायचा विषय आहे याबद्दल जाणीव नसे. आता ती जाणीव आलेली आहे तरीही पुरेसा वेळ नसतो, त्यामुळे शक्यतो मूल होण्यापूर्वीच आपण सातत्याने किमान वेळ देऊ शकू ना, आवश्यक झाल्यास जास्त वेळही आजारपणासारख्या वेळेस द्यावा लागेल, ते दोघांमध्ये मिळून जमणार आहे ना याचा विचार करायला हवाच. पालकांनी स्वत:च्या करीयरचा विचारही करत राहायला हवा. त्याचे नेमके काय परिणाम आपल्या बाळावर त्याच्या वाढण्यावर होतील याकडे लक्ष मात्र ठेवावे लागते. यासाठी पालकनीती मासिक सुरु झाले.
पहिल्या काही वर्षात डाव्या वरच्या कोपर्यापासून उजव्या खालच्या कोपर्यापर्यन्त गच्च भरलेला असा चार किंवा आठपानी अंक निघत असे. पहिल्या काही वर्षांच्या एकाकी प्रयत्नांना पुढे समविचारी साथ मिळाली आणि त्यामुळेच आजवर हे मासिक अखंड सुरू आहे. एरवीचा अंक आताही १६-२४ पानी असा छोटेखानीच असतो, पण एखाद्या विषयाला अधिक न्याय द्यायची गरज असते म्हणून दिवाळी अंक मात्र मोठा १५०-२०० पानी निघतो. एरवीच्या अंकात जाहिराती घेतल्या जात नाहीत. दिवाळी अंकात मात्र त्याला अपवाद करावा लागतो.
मुख्यत: ० ते १८ या वयोगटाच्या संदर्भातून पालकत्वाचा विचार पालकनीतीत प्राधान्यानं मांडला जातो. एकल पालकत्व, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, शिक्षण-माध्यम, स्पर्धा, आमिषं –शिक्षा, शिक्षण, कला, खेळ, वाचन, उतसव, बालकांचे हक्क, स्त्रीपुरूष समानता, भाषाशिक्षण, बालसाहित्य, लैंगिकता शिक्षण, सामाजिक शास्त्रे, अशा पालकांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नांवर तसेच तरुणाईचे जीवन, परिवर्तन अशा अनेक विषयावर मासिकातून मांडणी होत असते. आहार- आजार यासारख्या इतर माध्यमांमधून भरपूर माहिती दिली जात असलेल्या विषयांवर क्वचितच काही लेख असतात. मुळात ‘फक्त माहिती देणे’ हा पालकनीतीचा हेतूच नाही. अभ्यास, विचार, धारणा आणि कृती यांना चालना देण्याचा आहे.
बालकांशिवाय पालकत्वाच्या आधाराची आवश्यकता असलेल्या सर्वांचाच विचार आपण सगळेच करतो कारण तुकड्यातुकड्यानी त्याकडे न बघता घर-समाज आणि त्यावर परिणाम करणारे सगळेच घटक आपल्या पालकत्वात समाविष्ट असतात. कोणीही व्यक्ती स्वत:पुरते जगू शकत नाही. तसे जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विविध अंगांनी फुलण्याची क्षमता असलेल्या जीवनाला धुमारे छाटून खुजे बनवणे आहे.
‘वैयक्तिक पालकत्व ज्या सामाजिक-राजकीय परिवेशात घडत असतं त्याचा केवळ संदर्भच नव्हे तर प्रामुख्यानं त्या सामाजिक परिस्थितीबद्दल बोलणे’ हा पालकनीती मासिकाचा उद्देश आहे. निदान आपल्या परीघातल्या बालकांचे पालकत्व ही तर आपली जबाबदारीच असते, ही सामाजिक पालकत्वाची कल्पना पालकनीतीतून अगदी 1986 जानेवारीच्या पहिल्या अंकापासून सातत्याने व्यक्त होत आलेली आहे.
पालकनीती- खेळघर
शिक्षण वांचितापर्यंत पोचावं ,ते आनंदाच व्हावं ह्या दिशेने काम करणारी “खेळघर” ही अर्थपूर्ण रचना आहे.
खेळातून मिळणाऱ्या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुल शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो.
लक्ष्मीनगर ह्या पुण्यातल्याच झोपडवस्तीतल्या मुलामुलींसाठी 1996साली पालकनीतीतर्फे खेळघर सुरू झाले. वारजे भागातल्या लक्ष्मीनगर मध्ये पत्र्याच्या अगदी छोट्याछोट्या झोपड्यांमधून माणसं-मुलं राहतात. वीज-पाणी-संडास अशा मूलभूत सुविधाही त्यांना अभावानंच मिळतात. ह्या मुलांना शिक्षणाची आवड वाटावी अशी परिस्थिती नाही. घरातून कुणाचा त्यासाठी आग्रह नाही. धाकटी भावंडे संभाळणे ही पालकांची मुलींकडून मुख्य अपेक्षा असते. शाळेतल्या दमदाटीच्या वातावरणात मुले रमत नाहीत. त्यांना शिकण्याची गोडी लागावी, त्यातून त्यांच्यात असणार्या विविध क्षमतांचा विकास व्हावा ही खेळघराची कल्पना. सोईसाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि युवक अशा चार गटात काम चालते. खेळघर, संवाद गट, अभ्यासवर्ग, जीवन-भाषा वर्ग, गणित वर्ग, पालक मंडळ, वैद्यकीय सहकार्य, वस्तीतल्या सामाजिक प्रश्नांची दखल असे खेळघराच्या कामाचे रूप आता विस्तारले आहे. लक्ष्मीनगर वस्तीत आनंदसंकुल हे अनौपचारिक शिक्षणाचं केंद्रही चालवले जाते. इतरत्रही अशी खेळघरे उभी राहावीत यासाठी प्रशिक्षणाचे वर्गही घेतले जातात.
संदर्भ द्वैमासिक
१९९८ साली मुलामुलींमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढावी यासाठी शिक्षक पालकांसाठी आणि ७वी – ८वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संदर्भ ह्या द्वैमासिकाची सुरवात पालकनीती परिवारानी केली. ह्या द्वैमासिकात एकलव्य संस्थेच्या संदर्भ याच नावाच्या द्वैमासिकातले अनेक लेख भाषांतर करून दिलेले असतात. सोईसाठी पुढे संदर्भ ह्या नव्या न्यासाची स्थापना होऊन हे त्यामार्फत हे नियतकालिक पालकनीतीप्रमाणेच अथकपणे सुरू आहे. त्याशिवाय विज्ञानप्रेम वाढावे यासाठी काही प्रकल्पही संदर्भ-संस्था आयोजित करत असते. https://www.sandarbhsociety.org/
सामाजिक पालकत्व पुरस्कार
वैयक्तिक पालकत्वाच्या पलीकडे, व्यापक पातळीवरच्या सामाजिक पालकत्वाची जाणीव हा पालकनीतीच्या आचारविचारांचा महत्त्वाचा भाग. त्यामुळे समाजातल्या वंचित घटकांचे पालकत्व पेलणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास १९९७ पासून सुरुवात झाली. एका वर्षी आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला कृतज्ञता पुरस्कार, तर एका वर्षी नवीन मूळ धरू पाहणाऱ्या कामासाठी प्रोत्साहन पुरस्कार दिले गेले. असे अनेक पुरस्कार इतर संस्था देत असल्यामुळे २००३ नंतर हा उपक्रम चालू ठेवला नाही.
१९९७ श्री. थॉमस गे – ब्रिटिश आयसीएस अधिकारी. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील सहा मुलींना आणि दोन मुलांना दत्तक घेऊन मोठे केले. स्वातंत्र्यानंतरही भारतातच राहून हे कार्य त्यांनी ९२ वर्षाच्या वयातही अशाच नातींना वाढवून चालू ठेवले.
१९९८ श्री. दत्ता अहिवळे – फलटणच्या कमला निंबकर बालभवनमधील शिक्षक. नंतर दलित वस्तीमध्ये प्रबुद्ध विद्यामंदिर ही शाळा सुरू केली. दारूबंदी व शिक्षणासाठी कार्यरत.
१९९९ श्रीमती इंदुताई पाटणकर – स्वातंत्र्य चळवळीपासून मुक्ती संघर्ष चळवळीच्या माध्यमातून श्रमिक स्त्रीमजूर, परित्यकता व अन्यायग्रस्त यांच्यासाठी काम करत आहेत.
२००० श्रीमती छबुबाई सुरवसे – दापोडी येथील सरस्वती अनाथाश्रमातील ३० लहान मुलांची स्वतःच्या तीन मुलांबरोबरीनं काळजी घेत आल्या. त्यांचं शिकणं-वाढणं अन् दुखणं-खुपणं छबुबाई आईच्या मायेने पाहतात.
२००१ औरंगाबादचे श्री. निर्मलदादा ग्यानाणी आणि पुण्याच्या श्रीमती सुधाताई सोवनी स्थलांतरितांच्या निम्न आर्थिक स्तरातील वस्तीमधील आईने स्थापन केलेली ‘मुकुलाहार’ शाळा दादा अतिशय निष्ठेने चालवतात.
सुधाताईंनी ‘सुजाण पालक मंडळा’ची स्थापना केली. गृहिणींचे वैयक्तिक पालकत्व अधिक व्यापक करण्यासाठी त्या आयुष्यभर सतत सक्रिय आहेत.
२००२ ‘एकलव्य’ या मध्य प्रदेशातील संस्थेला त्यांच्या होशंगाबाद विज्ञान शिक्षण कार्यक्रम या प्रकल्पाबद्दल. समाजातल्या बहुसंख्या गरीब मुलांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे यासाठी सतत ३० वर्षे हा प्रकल्प चालवला.
२००३ बेळगावजवळच्या कट्टणभावी – बंबरगा येथील वाड्यावस्त्यांचे पालकत्व घेणारे श्री. शिवाजी कागणीकर. वस्तीतील डोंगरांचे वनीकरण, पाण्याची व्यवस्था, इथपासून सगळ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने संघर्ष करत आले. सानेगुरुजींचा सेवाभाव त्यांनी अंगिकारला आहे.
माहितीघराबद्दल
आपण आपल्या मुलाचे पालक तर असतोच, शिवाय आपल्या आसपासच्या विशेषत: ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांचेच काही प्रमाणात पालक असतो. आपण आपले स्वत:चेही पालक असतोच. पालकत्वाच्या आणि शिक्षणाबद्दलच्या आपल्या धारणा विकसित करण्यासाठी आपल्या मनाबुद्धीला भरपूर खाद्य लागतं. भरपूर पुस्तकं, संशोधनांचे निष्कर्ष, संबंधित विषयांवरचे लेख आणि अधूनमधून विशेष पुस्तकावर, विषयावर चर्चा होत असे. आजच्या काळात आंतरजाल, किंडल असे पर्याय उपलब्ध झाल्याने पुस्तकस्वरूपात वाचण्याची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे असेल किंवा आमच्या बाजूनेही ती रचनेला स्थैर्य येईपर्यंत थांबण्याचा संयम कमी पडला असेल, हा उपक्रम काही वर्षे सुरू राहून बंद पडला.