पुस्तकावरचे प्रतिसादात्मक लेखन

आपण जे वाचले त्याच्याविषयी लिहिणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, पटलेल्या मुद्द्यांवर सहमती किंवा एखाद्या मुद्दयाबाबतची असहमती मुद्देसूदपणे मांडणे अशा लिखाणाला प्रतिसादात्मक किंवा प्रतिक्रियात्मक लेखन म्हणता येईल. मुलांनाच काय, बरेचदा मोठ्यांनाही एखाद्या घटनेवरचे आपले मत चांगल्याप्रकारे व्यक्त करता येत नाही. लोकशाही समाजव्यवस्थेत कृतिशील नागरिक म्हणून सहभाग नोंदविण्यासाठी प्रतिक्रियात्मक लेखन करता येणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकातील आशय स्वत:च्या जगण्याशी जोडून पाहणे, आलेल्या अनुभवांधारे त्यावर भाष्य करणे, आपले मत, आपली भूमिका ठरवता येणे आणि लिहून ती व्यक्त करता येणे यासाठी सर्जनशील लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये प्रतिसादात्मक लेखनक्षमता विकसित होणे गरजेचे आहे. क्वेस्ट व महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या प्राथमिक भाषाशिक्षण या दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमांतर्गत मुलांच्या प्रतिसादात्मक लेखनाबाबत अभ्यास करण्याची संधी मिळाली होती. एखादया वाचलेल्या पुस्तकाबद्दल मुलांना प्रतिसादात्मक लेखन करता येईल का, मुलांचे लेखन कसे असेल, पुस्तकाचा आशय समजून घेताना किंवा अशा प्रकारच्या लेखनाबाबत मुलांना काय अडचणी येऊ शकतात, त्यांना कोणत्या टप्प्यावर आणि कशा प्रकारची मदत लागू शकते, या प्रश्नांच्या अनुषंगाने, पश्चिम महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या आश्रमशाळेमध्ये सातवीच्या मुलांसमवेत केलेल्या कामाच्या निष्कर्षांतून केलेली ही मांडणी आहे. 

पार्श्वभूमी:

या वर्गातील मुलांसोबत प्रकटवाचनाचे थोडे काम केले होते. पुस्तकाचे प्रकटवाचन करत असताना वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा व त्याला जोडून काही उपक्रम घेतले जात होते. मुलांना आता पुस्तकांची गोडी लागली होती. केवळ पुस्तकातील आशयाशीच त्यांना बांधून न टाकता त्याच्या अनुरोधाने त्यांना स्वत:च्या अनुभवविश्वाचा धांडोळा घेता आला, तर पुस्तकाची खूप मजा येते. त्यावर त्यांना बोलायला, सांगायला आणि लिहायला मिळायला हवे. वाचलेल्या पुस्तकावर ही मुले त्यांची प्रतिक्रिया लिहू शकतील का याची उत्सुकता होती. याप्रकारचे लेखन मुले पहिल्यांदाच करणार होती. मुलांनी यापूर्वी स्वतंत्रपणे केलेल्या लेखनाचा अनुभव लक्षात घेता, त्यांना लेखनाच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज लागू शकेल याची जाणीव होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर काही निवडक मुलांसोबत काम करावे असे ठरवले. मुलांची निवड करताना त्यांची वाचनाची आवड, त्यांनी वर्षभरात वाचलेल्या पाठ्येतर पुस्तकांची संख्या विचारात घेण्यात आली होती. ‘चांगली वाचक असलेली मुले लिखाणातही स्वतःला चांगली व्यक्त करतात’ (वाचन आणि वाचनाची सवय लावणे आणि वाढविणे) ह्या उषा मुकुंदा यांच्या अभ्यासाचा आधार येथे गृहीत धरला होता. निवडलेल्या मुलांनी गोष्टी, माहितीपर पुस्तके, विज्ञानकथा, छोटी चरित्रात्मक पुस्तके वाचली होती. वर्गातील इतर मुलांच्या तुलनेत त्यांचे वाचन व लेखन चांगले होते. वर्षभरात त्यांनी अंदाजे सात ते दहा पुस्तके वाचली होती.

प्रतिसादात्मक लेखनासाठी सर्वांनी एकाच पुस्तकावर काम करायचे ठरवले होते. पुस्तकाचा आशय समजून घेताना मुलांना काही अडचणी आल्यास पुस्तकाचे प्रकटवाचन व त्यावरील चर्चेतून एकत्रितपणे अर्थ लावण्याची प्रक्रिया घडवून आणता येईल. लेखकाची मुलाखत व इतर काही उपक्रम सामूहिकरित्या घेण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकाच पुस्तकावर काम करणे सोयीचे होते. यासाठी आम्ही स्वाती राजे यांचे ‘पाऊस’ (ज्योत्स्ना प्रकाशन) हे पुस्तक निवडले. या मुलांचा वयोगट, त्यांची वाचनपातळी, त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक परिवेश, विचार करायला लागून त्यावर भाष्य करता येईल असा पुस्तकाचा आशय व चित्रांतील वैविध्य असे निकष आम्ही विचारात घेतले होते आणि या सर्व निकषांवर हे पुस्तक खरे उतरत होते. 

पुस्तकाविषयी थोडक्यात-

जाती-धर्मापलीकडे माणसाचे जगणे महत्त्वाचे असते हे सत्य ‘पाऊस’ या गोष्टीतून लेखिकेने मांडले आहे. आनंदपूर गावात सगळे लोक सुखात राहायचे. हळूहळू पाऊसमान कमी झाल्याने नदीचे पाणी अडवून तळे बांधायचे ठरते. पण तळ्याला नाव काय द्यायचे यावरून ठिणगी पडते आणि गावाचे गावपण, माणुसकी यांना तडा जातो. माणसांमध्ये तेढ निर्माण होते. धर्मश्रेष्ठत्वाची चढाओढ सुरू होते. याची झळ लहानग्यांनाही पोचते; पण ती बिचारी मोठयांच्या शब्दाबाहेर जात नाहीत. अशातच गावात दुष्काळ पडतो. प्रत्येक जण पावसासाठी आपापल्या देवाला साकडे घालायला लागतो; पण पाऊस काही पडत नाही. हा सारा प्रकार ही निरागस मुले पाहत असतात. पाऊस पडायला हवा अशी त्यांचीही मनोमन इच्छा असते. मग त्यासाठी मुले आपल्यापरीने प्रयत्न करायचे ठरवतात. एके दिवशी सगळी मुले एकत्रितपणे पावसासाठी आपापल्या देवाकडे प्रार्थना करतात आणि पाऊसही त्या चिमुकल्यांच्या प्रार्थनेला मान देऊन बरसतो. अशाप्रकारे मुलांच्या प्रयत्नातून  खुशीने बरसलेल्या पावसाची आणि त्यात न्हाऊन नव्याने निर्मळ झालेल्या गावाची ही गोष्ट.

पूर्वतयारी –

पुस्तकातील सुरुवातीची काही पाने मुलांना वाचून दाखवली व राहिलेला भाग मुलांना वाचायला दिला. वाचलेल्या भागावर मुलांनी आपापल्या गटामध्ये चर्चा केली. त्यानंतर पुस्तकामधील महत्त्वाच्या घटना, पुस्तकामधला कोणता भाग आवडला, काय आवडले नाही यावर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात वर्गात चर्चा झाली. चर्चेतील सहभागावरून पुस्तकातील घटनाक्रम त्यांना बऱ्यापैकी समजल्याचे दिसून आले. नंतर मुलांना पुस्तक घरी वाचायला दिले. तुम्ही ही गोष्ट पुन्हा वाचा. आता तुम्हाला या गोष्टीविषयी दुसऱ्या कोणाला काही सांगायचे असेल तर काय सांगाल ते लिहून काढा, 

मुलांच्या पहिल्या लिखणाबाबत निरीक्षण-

मुलांनी लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला होता. गोष्ट नेमकी कशाविषयी आहे, लेखिकेने ती का लिहिली असेल, हे मुलांना फारसे समजले नव्हते. शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधण्यासाठी त्यांना मदतीची गरज होती. त्यांचे सगळे लिखाण पाऊस व दुष्काळ, ध्वनिप्रदूषण याविषयी होते. काहींचे लेखन त्रोटक तर काहींची मांडणी विस्कळीत होती. त्यांना आपल्या लेखनाचे योग्यप्रकारे नियोजन करता आले नव्हते. अशा प्रकारच्या लेखनाची त्यांना सवयच नव्हती. गोष्टीत घडलेल्या घटनांविषयी मुलांशी पुन्हा चर्चा केली. त्यांनी सगळ्या घटना व्यवस्थितपणे घटनाक्रमानुसार सांगितल्या. त्यांना या गोष्टीतल्या कोणत्या घटना आणि का महत्त्वाच्या वाटतात, याविषयी चर्चा झाली. पुढच्या खर्ड्यामध्ये लिहायला सांगितले. या लेखिकेविषयी तुला काही म्हणायचे आहे का, तू अजून कोणत्या घटनेविषयी लिहू शकतोस, ती घटना तुला का महत्त्वाची वाटते, अशाप्रकारची घटना तुमच्या गावामध्ये घडली होती का, असेल तर पुस्तकातील घटना व तुमच्याकडे घडलेली घटना यामध्ये काय साम्य आहे, त्या घटनेचा गावावर काय परिणाम झाला, त्याआधारे तुला तुझे मत ठरवता येईल का, ही गोष्ट दुसऱ्याने वाचायची असेल तर तू काय सांगशील ते लिही. पहिल्या लिखाणात लेखक अथवा चित्रकार यांच्याविषयी फारसे लिहिले गेले नव्हते; त्यांविषयी काही लिहिता येईल का, असे काही मुद्दे व त्यासाठी लागणाऱ्या स्रोतांची माहिती देऊन त्यांना दुसरे लिखाण करायला सांगितले.

 

मुलांच्या दुसऱ्या लिखाणाबाबत निरीक्षण-

मुलांनी लेखिका आणि चित्रकार यांच्याविषयी लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला होता. त्यांच्याबद्दल इंटरनेट व ग्रंथालयातील पुस्तकांमधून माहिती शोधली. गोष्ट काय सांगू बघते, हेही आता त्यांना नेमकेपणाने कळले होते. मात्र इतर काही महत्त्वाचे मुद्दे सुटले होते, तर काहींना त्याबाबत व्यवस्थित लिहिता आले नव्हते. त्यांच्या लेखनाचे स्वरूप दिलेल्या मुद्द्याबरहुकूम प्रश्नांचे उत्तर देणे या स्वरूपाचे होते.

 इतरांनी पुस्तक का वाचले पाहिजे, पुस्तकातील घटनांविषयी त्यांना काय वाटते आहे, याविषयी अजूनही नेमकेपणाने लिहिता आलेले नव्हते. त्यांच्या लेखनात अजून कायकाय सुधारणा करता येतील याविषयी मुलांशी वैयक्तिक आणि नंतर समूहात चर्चा केली. मुलांनी स्वाती राजेंच्या इतर पुस्तकांविषयी तसेच चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याविषयी बरीच माहिती इंटनेटवरून मिळवली होती. त्याच्यावर आम्ही चर्चा केली. मुख्य म्हणजे त्यांना आता स्वाती राजेंची इतर पुस्तके खुणावत होती. चित्रांतील तपशिलांचे बारकाईने निरीक्षण करणे, पुस्तकातील आशय आणि चित्रांची एकमेकांशी सांगड घालून वेगवेगळे अर्थ शोधण्याचा हा नवा रस्ता त्यांना सापडला होता. ‘रस्ता’, ‘प्रवास’, ‘फुगा’, ‘न ऐकलेली गोष्ट’ ही लेखिकेची इतर पुस्तकेही चाळायला मुलांनी सुरुवात केली.

या प्रवासात प्रत्यक्ष लेखिकेची मुलाखत घेता आली, तर पुस्तक लिहिण्याचा उद्देश, त्यामागची त्यांची भूमिका समजून घेता येईल, हे लक्षात घेऊन स्वाती राजेंची फोनवर मुलाखत घेण्याचे ठरले. चर्चा करून त्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली. हवी असलेली माहिती मिळण्यासाठी नेमके प्रश्न व ते कुणी व कसे विचारायचे हे अगोदरच ठरवणे महत्त्वाचे असते, अन्यथा चर्चा नाव, गाव, शिक्षण याच प्रश्नांवर रेंगाळते. मुलांमध्ये प्रश्न विचारण्याचे कौशल्य निर्माण करता आले पाहिजे हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी स्वाती राजेंनी मुलांशी गप्पा मारल्या. मुलांनी त्यांना पडलेले सर्व प्रश्न मोकळेपणाने विचारले. प्रत्यक्ष लेखक आपल्याशी बोलताहेत याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

पहिली गोष्ट कधी लिहिली, मुलांसाठी लिहावेसे का वाटले, ‘पाऊस’ची कथा कशी सुचली, हे पुस्तक लिहायला किती कालावधी लागला, तुम्ही चित्रकाराला कोणत्या सूचना दिल्या होत्या, तुमची कोणती नवीन पुस्तके येणार आहेत, अशा प्रश्नांतून मुलांना लेखकाची भूमिका समजली. लिखित मजकुरामधून नेमका अर्थ कसा शोधायचा, ‘रीडिंग बिटवीन द लाईन’ म्हणजे काय, प्रतीके व प्रतिमांची रचना कशी केली जाते हे त्यांनी काही उदाहणांवरून समजावून सांगितले. पुस्तकातली चित्रे कशी पाहायची, ती आशयाला कशी बळकटी देत आहेत, वाच्यार्थापासून लक्ष्यार्थापर्यंत पोचण्याच्या या प्रवासातील काही मुददे माझ्यासाठीही नवीन होते. पुस्तकातील आशय खोलवर समजून सांगण्यासाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते हे आता समजत होते. आता हे सारे मुलांच्या लेखनामध्ये कसे उतरते हे पाहण्याची मला उत्सुकता होती.

मुलांच्या तिसऱ्या (अंतिम) लिखाणाबाबत निरीक्षण-

मुलांच्या लेखनात आता बऱ्यापैकी सुधारणा दिसत होती. चर्चेनंतर काहींनी तर चौथा खर्डाही लिहिला. लेखकाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी मुलांनी लिहिले आहे. चित्रकाराची शैली, चित्रांतील रंगसंगती ह्याचाही उल्लेख मुलांनी आपल्या लेखनात केला आहे. ‘कलेच्या दृष्टीने चित्रातले बारकावे जरी कळले नाहीत, तरी चित्राचे निरीक्षण करून चित्रातल्या बारीकबारीक तपशिलांचा अर्थ लावणे, रंगरेषांच्या फटकाऱ्याने सूचित केलेली भाववृत्ती, वेळ पुन्हापुन्हा अनुभवायला मिळाल्यावर मुले चित्रलिपी/ चित्रभाषा वाचायला शिकतात. त्यासाठी धड्यातला आशय लक्षात घेऊन दोन्हीतली सुसंगती किंवा विसंगती शोधणे, ही गोष्ट महत्त्वाची असते’ असे लीलाताई पाटील त्यांच्या ‘लिहिणे मुलांचे शिकवणे शिक्षकाचे’ या पुस्तकात म्हणतात.

मुलांनी गोष्टीमध्ये घडलेल्या घटना लिहिलेल्या आहेत. महत्त्वाच्या घटना चांगल्या पकडता आल्या आहेत. त्या व्यवस्थितपणे, घटनानुक्रमे मांडल्या आहेत. काही घटनांबाबत आपले मतही नोंदवण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. आवडलेल्या, न आवडलेल्या बाबी नोंदवल्या आहेत. आपण सर्वच धर्मांचा आदर केला पाहिजे हे भारतीने मांडलेले मत विचार करायला लावते.

इतरांनी हे पुस्तक वाचायला हवे हे लिहिले आहे, पण का, हे मात्र नेमकेपणाने सांगता आलेले नाही. पुस्तकातील आशयाला जोडून आपल्या आयुष्यातील घटना व तिचे परिणाम यावरून आपले मत ठरवणे यावर वर्गात अजून काम करण्याची गरज आहे.

माझे मत-

मुलांचे पहिले आणि शेवटचे लिखाण यांचा तुलनात्मक विचार करता लिखाणात खूप सुधारणा झाल्याचे दिसून आले. लेखिकेशी चर्चा केल्यावर काही मुलांच्या लेखनात शेवटच्या खर्ड्यापर्यंत स्पष्टता आलेली दिसली. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू होती; तथापि अशा प्रकारच्या लेखनाचा मुलांना अजिबात कंटाळा येत नाही असे दिसले. प्रत्येक टप्प्यावर आव्हान मिळत राहण्याचा तो परिणाम असावा. मुलांचे वाचन तसे मर्यादित आहे. शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजण्याइतकी ती सक्षम नाहीत. त्यांना विचार व्यक्त करायला शब्दसंपत्ती तोकडी पडत आहे हे प्रकर्षाने जाणवते. मनामध्ये विचारांचे नियोजन करता येणे, ते व्यक्त करण्यासाठी नेमके शब्द वापरता येणे, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण ह्यांचा समर्पकपणे वापर करता येणे, सुसंगत वाक्यरचना करता येणे, यासाठी मुलांचा पुरेसा भाषाविकास होणे आवश्यक आहे. अगदी सुरुवातीपासूनच व नियमितपणे त्यावर काम व्हायला हवे.

या प्रकारच्या लेखनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी वर्गात पुस्तकाच्या प्रकटवाचनाबरोबरच लेखनाची संधी नियमितपणे उपलब्ध करून दिली, सरावासाठी पुरेसा वेळ दिला, मुलांच्या नजरेतून सुटलेल्या बाबींविषयी वर्गात चर्चा घडवून आणली, त्यांच्या विचारांना खाद्य पुरवून, पुस्तकाचे आकलन व लेखनासाठी आवश्यक तेथे मदत केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आपल्या लिखाणावर परत विचार करण्याची, हवे तेवढ्या वेळा सुधारणेची संधी आणि प्रोत्साहन मिळाले तर मुलांचे लिखाण फुलू शकते. मुलांनी लेखनातून व्यक्त केलेल्या मतांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर व्हायला हवा. त्यांचे लेखन म्हणजे त्यांचे स्वत:चे ‘असणे’ असते ही जाणीव त्यांच्यात रुजली की, कोणी सांगावे, आपल्या जगण्याकडेही ती चिकित्सक नजरेने पाहायला शिकतील.

बाळासाहेब लिंबीकाई | balasaheblimbikai@gmail.com

लेखक प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून मुलांचे भाषाशिक्षण या विषयावर गेली 15 वर्षे काम करत आहेत. ते पाठयपुस्तक मंडळाचे (बालभारती) मराठी विषयाचे निमंत्रित सदस्य आहेत.