बाळ काही खातच नाही…


डॉ. सुहास नेने
बालविकासाच्या सौधावरून ही लेखमालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली. मुलांचा
सर्वांगीण विकास हा सगळ्या पालकांसाठी अगदी संवेदनशील मुद्दा असतो, हे
लक्षात घेऊन ह्या मालेची आम्ही आखणी केली. त्या अंतर्गत आपण आतापर्यंत डॉ.
पल्लवी बापट ह्यांनी लिहिलेले लेख वाचले. त्याद्वारे आपण विकासाचे विविध
टप्पे, त्यात येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. ह्या महिन्यापासून डॉ. सुहास नेने
ह्यांनी बालविकासाबद्दल आपल्या मिश्कील शैलीत लिहिलेले लेख आम्ही घेऊन
येत आहोत.
(तुमच्या-आमच्यासारख्यांच्या घरी आढळणार्‍या सर्वसाधारण बाळाप्रमाणे वाटणारे,
वागणारे, वाढणारे, वाढवले जाणारे बाळ या ठिकाणी अभिप्रेत आहे. आजारी
असल्याने भूक कमी लागणार्‍या बाळांचा विचार येथे केलेला नाही.)
‘याला भूकच लागत नाही’ किंवा ‘हा काही खातच नाही’ यासारखी तक्रार घेऊन
लहान मुलांच्या डॉक्टरांकडे कधी गेलेला नाही असा पालक विरळाच! आमच्या एका
बालरोगतज्ज्ञ डॉक्टर-मित्रानं त्याच्या बंगल्याचं नाव ’भूक बंगला’ ठेवलं आहे.
सगळ्यात गमतीची गोष्ट ‘हा काही खातच नाही’ असं ज्याच्याबद्दल बोललं जातं
तो चांगला सुदृढ, ‘खात्यापित्या घरातला’ मुलगा असतो. हे म्हणजे दहाही बोटांत
अंगठ्या घालणार्‍या, गळ्यातल्या वजनदार साखळीनं वाकलेल्या, भारी गॅागलनं
डोळे झाकणार्‍या आणि महागड्या गाडीतून उतरणार्‍यानं ‘मी आर्थिकदृष्टया दुर्बल
आहे’ असं म्हणण्यासारखं आहे. पण ‘भूक नसणं’ ही सर्वाधिक आढळणारी, सहज
पुढे करता येण्यासारखी आणि मुख्य म्हणजे सहजपणे टाळता येणारी तक्रार आहे,
हे मात्र अगदी खरं आहे.
काही गोष्टी इतक्या सोप्या असतात, की त्यासाठी काहीही न करणं हेच त्या
प्रश्नाचं उत्तर असतं. आई जेव्हा म्हणते, की ‘याला भूक लागावी म्हणून मी जिवाचं
रान केलं पण आता मात्र मी थकले!’ तिथेच खरी ग्यानबाची मेख असते. तिनं
काहीच केलं नसतं न, तर बाळानं अगदी हक्कानं, मागून मागून खाल्लं असतं.

बाळाची आई, बाबा, आजी क्रमानं, बाळानं त्यांना वाटतं तेव्हा आणि त्यांना वाटतं
तेवढं खावं म्हणून जीव पाखडत असतात. अक्षरशः धोशा लावतात बाळाच्या मागे!
ही मंडळी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काय काय करू शकतात आणि कोणत्या
पातळीपर्यंत जाऊ शकतात हे बघितलं, तर अक्षरशः थक्क व्हायला होतं.
पहिली पायरी – मनपरिवर्तन
बाबापुता करून, अंजारून-गोंजारून, लाडीगोडीनं बाळाचं मन वळवणं
‘माझं लाडकं बाळ ते! माझा राजा ना तू, शोना, खा ना!’ म्हणत आई बाळाच्या
ताटलीकडे टक लावून बसलेली असते. ‘एक तरी घास घेणार ना राजा, हा काऊचा
घास, हा चिऊचा घास, एकच रे,’ म्हणत एक बाबांसाठीपण घास घे म्हणत राहते.
‘बाबा घरी आले ना म्हणजे मी त्यांना सांगेन’ म्हणत लाडीगोडी करत राहते.
अमुकतमुक पदार्थ किती छान झाला आहे हे ती परोपरीनं समजावत असते. बाळ
मस्त ढिम्म. त्याला खायचंच नसतं. आई काय म्हणते आहे हे खरं तर त्याला
कळलेलंच नसतं. (आईला तरी कुठे कळलेलं असतं म्हणा!)
दुसरी पायरी – साम
दुसरीकडे लक्ष वेधून, विचलित करून बोलता बोलता तोंडात घास सरकवणं
हा आईबाबांचा सगळ्यात आवडता छंद. सार्‍या बडबडगीतांचा जन्म झाला तो इथे!
आई, बाबा सगळेच गायक बनतात. रोज नवं गाणं आणणार तरी कोठून! मग
यूट्युबवर जावंच लागतं. बाळंपण हुशार असतात. मोबाइल, टीव्ही, आयपॅडची
स्क्रीन दिसल्याशिवाय त्यांची तोंडं उघडतच नाहीत. काही बाळांना फक्त चालताना –
घरभर किंवा घराभोवती फिरतफिरत – तोंड उघडायला जमतं. बाकी काही नाही तर
बाबांनी घोडा घोडा किंवा भू भू बनून घरात चाललं तरच यांना खायचं सुचतं. आणि
मग घरातल्या सगळ्यांचं मत बनतं, की असलं काही केलं तरच बाळ ‘खाणार नाही’
म्हणायला विसरतं. ‘मग आम्हाला तसंच वागायला लागतं. आम्ही तरी काय
करणार बघा ना, शेवटी खाल्ल पाहिजे ना बाळानं, किती वाळलाय बघा बिचारा!’
असं म्हणत बाळाची मनधरणीही सुरू आणि बडबडगीतं, बाबांनी चार पायांवर
फिरणं, यूट्युबही सुरू.
तिसरी पायरी – दाम

लालूच-लाच किंवा चिरीमिरी
‘या ताटलीमध्ये आहे एवढं खाल्लंस, तर तुला आइस्क्रीम देणार आहे मी. का तुला
मोठ्ठं चॉकलेट घ्यायचं आपण? किंवा आपण आज संध्याकाळी बागेत जाऊन खाऊ
घ्यायचा? अजून एक घास खाल्लास ना, तर आपण तुला खेळण्यातली कार किंवा
गाडी आणू’. झालं! अशा पद्धतीची लाच मिळाली तर बाळ शंभर-दोनशे गाड्यांचा
मालक सहज होऊ शकतं. सध्याच्या जमान्यात अशी खेळणी मिळवणं काही
अशक्य नाही. तू एवढं खाऊन दाखवलंस तर तुला आज रात्री उशिरापर्यंत जागायला
परवानगी. आईबाबांच्या बरोबर झोपायला जायचं म्हटल, की बाळ डोक्यावर बसलंच
समजा!
चौथी पायरी – तोडा आणि फोडा
भूक लागण्याचं औषध… नावीन्यपूर्ण कल्पना
ही अफलातून कल्पना ज्या कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली त्याचे अक्षरशः
पाय धरले पाहिजेत. ज्याला लहानपणी अशीच भूक न लागण्याची लागण झाली
असावी तोच महाभाग या औषधनिर्मितीच्या मागे असणार. अशी औषधानं भूक
वाढली असती, तर लोकांनी बाकी सगळं सोडूनच दिलं असतं ना! कशाला डोक्याला
त्रास! उठा, काम करा, फिरा, व्यायाम करा. खरं तर एवढं तर्कविसंगत औषध दुसरं
कुठलंच नसेल.
पाचवी पायरी – दबावतंत्र
दंडाची सुरुवातीची स्थिती
वरील कुठल्याच गोष्टीनं बाळ बधलं नाही, तर हुकमाचा एक्का निघतो. चढत्या
क्रमानं पुढच्या गोष्टी अवतरतात. ‘हे जर तू खाल्लं नाहीस, तर त्या दादासारखा
‘स्ट्राँग’ होणार नाहीस… पप्पांसारखं ‘फिट’ व्हायचंय ना तुला… यापुढे तू खाल्लं
नाहीस, तर तुझी माझी कट्टी… इतकं खाल्लं नाही, तर मला तू अजिबात आवडत
नाहीस… माझी दीदी बघ कशी गुड गर्ल आहे. मी सांगेन तेवढं सगळं खाते’. (खरं
तर दादा स्ट्राँग नसतो, पप्पा फिट कधीच नसतात, दीदीनं असाच त्रास दिलेला
असतो आणि कट्टी म्हणताना आईच्या डोळ्यात गंगा-जमुना उभ्या असतात!) पण
प्रयत्न जोरात चालू असतात. दबावतंत्र एवढं वाढतं, की ‘तू आता मी सांगते तसे

खाणं-पिणं घेतलं नाहीस, तर मी मरून जाईन’ असंही सांगण्यापर्यंत आयांची मजल
जाते.(शेवटी आईचंच हृदय असतं ते, त्यामुळे नशीब, तूच मरशील असं म्हणायला
तिची जीभ धजावत नाही). नाही म्हणायला, ‘तू खाल्लं नाहीस तर शेजारच्या
चिंटूला मी तुझा खाऊ देऊन टाकीन, चिंटूला इकडे आपल्या घरी घेऊन येईन’ असं
म्हणून काही वेळा काम साधतं.
अंतिम सत्य
धाकदपटशा
अगदी डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ येते तेव्हा ‘आत्ता जर खाल्लं नाहीस तू, तर
एक फटका देईन बरं का’ असं म्हणणारी आई कधी तरी खरंच तसं करते. एखादा
गालगुच्चा घेते. चिमटा घेते. बाळ आता चांगलंच बिथरतं. ‘मी खाणार नाही’ या
अटळ निश्चयाला येतं. या प्रक्रियेतच एखाद्या बाळाला आईकडून चटक्याचीपण
शिक्षा मिळते. (आपण असं कसं करू शकलो, असं म्हणून नंतर बाळाला औषध
लावण्यात डोळे पुसत पुसत आईच पुढे असते हे तितकंच खरं आहे.)
हे सारं कमी की काय म्हणून खाल्लं नाहीस तर तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन’
असं म्हणून डॉक्टरांचं एक दुष्ट, नकारात्मक, रागीट, भीतीदायक चित्र बाळाच्या
डोळ्यासमोर उभं केलं जातं. ‘डॅाक्टरांचं घर आपण उन्हात बांधू’, असं म्हणून बिचारे
डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय उगाचच सावलीला मुकतात.
शक्तिसामर्थ्य
राजकीय समर्थन, पाठबऴ
शक्तिप्रदर्शनाचा मुद्दा पुढे आला, की इतका वेळ मागे पडलेले बाबा पुढे
सरसावतात. अशा वेळी आई त्यांचीच री ओढते. बाबा आईएवढे सोशीक कधीच
नसतात. त्यांचा तोंडाचा पट्टा आणि हात एकाच वेळी चालतो. ‘मुकाटपणे खाल्लं
नाहीस, तर मुस्काड फोडीन’ म्हणताना नाक दाबल्यावर नाईलाजानं बाळ तोंड
उघडतं. अशा वेळी चमच्यात घास घेऊन तो तोंडात कोंबणार्‍या आईबाबांइतकं
निर्दयी जगात कुणी नसेल! या बाळानं अधिकच आक्रमक होऊन चमचाच उडवून
दिला, तोंडात घुसवलेला घास आईबाबांवरच थुंकला किंवा जे आधी नीट खाल्लं
होतं, तेही रडताना ओकून काढलं, तर त्यात त्याला दोष देता येईल का?

सहावी पायरी – भेद
शिक्षा
आईच्या म्हणण्यानुसार खायला नकार दिल्यामुळे शिक्षा म्हणून बाळाला खायला न
देणं, यासारखा विरोधाभास कुठलाच नसेल. काही जणांच्या बाबतीत ‘न
खाल्ल्याबद्दल दोन-चार फटके’ हे रोजच्या जेवणातल्या पदार्थांइतकंच सरावाचं
होऊन जातं. जेवणाची वेळ आनंददायी वाटण्याऐवजी मग एक शिक्षा ठरते.
तुरुंगातले कैदी हळूहळू निर्ढावतात, तसं बाळही अजिबात भीक घालेनासं होतं.
केकवरची चेरी
काहीतरी खायला दे
आपल्या स्वप्नातही येणार नाही इतक्या तर्‍हांनी बाळ खाण्याचे पदार्थ स्वतः
चोखंदळपणे निवडायला शिकतं. मी फक्त अमुक एकच खाणार, दुसर्‍या कुठल्याही
गोष्टीला हात लावणार नाही असं ठामपणे नुसतं सांगतं असं नाही, तर तसं
वागतंही. गंमत म्हणजे आईच अशा गोष्टींना खतपाणी घालते. ‘हे नको ना तुला,
मग ते घे’ म्हणताना जणू काही आईच्या हातात द्रौपदीची थाळी तयार असते.
बाळानं तोंडातून शब्द काढावा आणि आईनं तो झेलावा. ‘काहीतरी चांगलं खायला
दे!’ म्हणून बाळानं मागू नये म्हणून काही आया अगदी जय्यत तयारीत असतात.
दोन काजू, चार मनुका, साडेतीन(!) बदाम, अर्धा अक्रोड, छोटीशी चिक्की, एखादी
राजगिर्‍याची वडी, फारच भूक लागली तर एखादा लिंबाएवढा लाडू, काहीच नाही
तर सफरचंद किंवा पाच-सहा संत्र्याच्या फोडी त्यांच्याकडे पर्समध्ये छोट्या छोट्या
डब्यांतून नेहमी तयारच असतात. (या ठिकाणी बाजारात उपलब्ध असणार्‍या
पाकिटबंद वस्तू विचारात घेतलेल्या नाहीत. त्यावर न बोललेलं बरं.) यातल्या
बर्‍याचशा गोष्टींचा समाचार थोड्या थोड्या वेळानं बाळानं घेतल्यावर प्रत्यक्ष
जेवणाची वेळ येते, त्या वेळी भूक लागणार कशी? आयांनो, स्टार्टर्स खाऊन जर
तुमची भूक भागते आणि मेन कोर्सला सुरुवात करताना ढेकरा येतात, तर या
छोट्या बाळांचा विचार करा ना.

‘हे नको मला, आवडलं नाही,’ असं बाळाच्या तोंडातून बाहेर पडायच्या आत ‘राजा,
तुला हे देऊ? सोना, हे घे ना, सॉरी बेटा, बेबी प्लीज’, अशी मिनतवारी केल्यावर
बाळ सोकावणारच ना!
एक खरं आहे, की कुणीही कधीही भुकेलं राहत नाही; कितीही छोटं असलं तरी.
आपण वाकवू शकतो, आपण वाकवू तसं सारे वाकतात हे शिकायला आणि
ब्लॅकमेल करायला बाळं खूप पटकन शिकतात.
आईला नमतं केल्यावर बाबा बाळाचे गिर्‍हाईक बनतात. पटकन रागवणं, चिडणं,
एखादी चापटी मारणं, अंतच पाहिला तर फटका, तोंडात घास कोंबणं ह्यात त्यांचा
हातखंडा असतो. बाबांच्या या सार्‍या कृती बाळाला आणिकच निग्रही बनवतात.
त्यातून ‘दुधावरची साय ग माझी’ म्हणून एखादी भावुक आजी नातवंडाभोवती
घोटाळत असली, की मग बाळाची मजाच मजा. या सार्‍यांना आपल्याभोवती
नाचवण्यात बाळाला गंमत वाटते. बाळ नेहमीच या खेळात जिंकतं. कारण
दिवसेंदिवस बाळाचा आत्मविश्वास दुणावत जातो. बाळ आत्मनिर्भर झालेलं असतं.
‘मी खाणार नाही, मला भरवायचं नाही’ (‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं
उचलणार नाही’ ह्या चालीवर) ह्या निग्रहाप्रत बाळ का येतं, खाण्यासाठी अडून का
बसतं, यामागे काही कारणं असतात. ती पुढील भागात बघू या.
(बाळाचे आई, बाबा आणि आजी यांच्याप्रति पूर्ण आदर ठेवून हा लेख लिहिला आहे.
यात कुणाचीही निंदा-नालस्ती करण्याचा उद्देश नाही; पण ओसंडून जाणारं प्रेम,
अतिरिक्त वात्सल्य आणि नको एवढी काळजी यामुळे काही वेळा कुठे थांबायचं हेच
समजेनासं होतं आणि त्यातून ह्या न-नाट्याची सुरुवात होते.)
डॉ. सुहास नेने
doctorsuhasnene@gmail.com
लेखक गेली 40 वर्षे वैद्यकीय व्यवसायात असून ते इंडियन मेडिकल असोसिएशन,
पुणे तसेच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे या संघटनांचे अध्यक्ष होते. त्यांनी
20 वर्षे वैद्यकीय नियतकालिकाचे संपादन केले आहे. ललितलेख, व्यक्तिचित्रण

तसेच सामाजिक प्रबोधनात्मक वैद्यकीय लेखांच्या माध्यमातून ते साहित्य-क्षेत्रात सक्रिय आहेत.