शिक्षा – वृषाली वैद्य

1983 सालची गोष्ट. तेव्हा मी इयत्ता सहावीत, मुलींच्या शाळेत शिकत होते. मी आणि माझ्या वर्गमैत्रिणी, आम्ही शाळा सुटल्यानंतर नाटकाच्या प्रॅयिटसला जात असू. एका नाट्यप्रेमी संस्थेचं हे नाटक होतं. त्यात आम्ही चौघी वर्गमैत्रिणी भूमिका करणार होतो. आमचा छान ग्रुप तयार झाला होता.

एकदा मधल्या सुट्टीच्या आधीचा तास आम्हाला ‘ऑफ’ मिळाला होता. या पाऊण तासात काय करायचं? असा विचार करतानाच आम्हाला एक धमाल आयडिया सुचली, स्वत।ची लग्नपत्रिका बनवण्याची. त्यात वधू म्हणून आम्हा चौघींची नावं लिहायची हे नक्की झालं. पण मग चार नवरे कुठून आणायचे? आम्हाला पटापट मुलांची नावंही सुचेनात. मग आम्ही आमच्या मैत्रिणीच्या तीन चुलतभावांची नावं लिहायचं ठरवलं. त्यातला एक भाऊ आमच्या बरोबर नाटकात कामसुद्धा करत होता. चौथं नाव मात्र आम्हाला तसं शोधावंच लागलं. एवढा खटाटोप झाल्यावर आमची लग्नपत्रिका तयार झाली. लग्नपत्रिकेतले काही टिपिकल शब्द वापरताना मजा येत होती. कुलस्वामिनीच्या ऐवजी कोण प्रसन्न म्हणून लिहायचं? आमचे येथे श्रीकृपेकरून आमची आठवी कन्या म्हणायचं का कितवी? अशी धमाल चर्चा झाली. खाली ‘आहेर जरूर आणावा’ असं लिहितानाच ‘रोख रकमेस पहिली पसंती’ अशीही तळटीप टाकली होती. एकेका शब्दाचा कीस पाडताना हसून हसून पोटात दुखायची वेळ आली. मधली सुट्टी झाली तरी डबा खातानासुद्धा काही तरी आठवून हसणं चालूच होतं. मधल्या सुट्टीनंतर मात्र आम्ही ती तयार केलेली लग्नपत्रिका फाडून टाकली आणि सगळं विसरूनही गेलो.

चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट. आम्हा चौघींना उपमुख्याध्यापिका बाईंचं बोलावणं आलं. आम्ही तिथे पोहोचताच, त्यांनी ‘सध्या तुमचे शाळेत काय धंदे चालतात?’ असा अनपेक्षित प्रश्न आमच्या पुढे टाकला. आम्हाला काहीच कळेना. आम्ही एकमेकींच्या तोंडाकडे बघत बसलो. आमच्या त्या लग्नपत्रिकेचे तुकडे आमच्या समोर फेकल्यावर आम्हाला थोडा थोडा संदर्भ कळू लागला. पण आमचं चुकलं तरी काय? हे मात्र आम्हाला कळेना. ‘तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल’ असं सांगून त्या निघून गेल्या. ‘या चौघी एकत्र आल्या की त्यांच्या डोययात काही वेगळंच शिजतं… तर या मुली कधीही एकत्र येऊ नयेत, अशी शिक्षा हवी,’ असा विचार करून आमच्या वर्ग तुकड्या बदलायचं ठरलं. आम्ही ‘अ’ तुकडीतल्या मुली. चिठ्ठ्या टाकल्या. प्रत्येकीनं एकेक चिठ्ठी उचलली. मी ‘क’ तुकडीत गेले. माझ्या मैत्रिणी ‘ड’, ‘ई’, ‘फ’ अशा तुकड्यांत गेल्या. 

या नवीन मुलींशी धड काय बोलावं तेही कळेना. सतत तिघींची, आपल्या वर्गातल्या मुलींची आठवण यायची, अभ्यासात लक्षच लागायचं नाही. जणू काही शाळेतली प्रत्येक मुलगी, प्रत्येक शिक्षिका, कर्मचारी आमच्याकडे बोट दाखवून ‘याच त्या मुली, यांच्याच तुकड्या बदलल्या आहेत!’ असं म्हणताहेत असेच भास व्हायचे. कधी कधी वर्गातच रडू कोसळायचं. कॉरिडॉरमधून चालताना नजर वर करून बघताही येत नसे. प्रचंड अपमान वाटत होता. पण काय चुकलं होतं आमचं?

आम्ही चौघी जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा हीच चर्चा चालायची, अशी काय चूक झाली होती आमची की त्यासाठी अशी जबर शिक्षा मिळावी? लग्नपत्रिका करताना तर एकदम धमाल आली होती. आम्ही कुणाला काहीच त्रास दिला नव्हता. शिक्षा द्यायच्या आधी विचारायचं तर खरं की का आम्ही ही लग्नपत्रिका लिहिली? पण तेही कुणी आम्हाला विचारलं नाही.

आमच्या मनातही नसलेला काही तरी विपरीत अर्थ लावून वयानं मोठ्या असलेल्या शिक्षकांनी या गोष्टीला एखाद्या गुन्ह्याचं स्वरूप दिलं होतं. नुसती लग्नपत्रिका बनवण्यातला निखळ आनंद, गंमत यांना दिसत नाही ही काय आमची चूक होती? आम्हाला त्या मुलांशी लग्नच करायचं आहे, आत्तापासून भानगडी चालू आहेत असली तिरकी डोकी या मोठ्यांची चालत होती. मग लहानांनी काय करायचं? आपल्याला हवं ते करायचं पण सापडायचं मात्र नाही, नाही तर मग शिक्षा आहेच – हे आम्ही नक्कीच शिकलो. 

आणि शिक्षा तरी कशासाठी करायची? शिक्षा केल्यामुळे काय व्हावं असं अपेक्षित आहे? आता मोठं झाल्यावर विचार करायला लागले तसं वाटतं की शिक्षा केल्यामुळे चार गोष्टी व्हायला हव्यात. पहिलं म्हणजे स्वत।ची चूक समजणं. आपलं नक्की कुठं चुकलं? नंतर त्या चुकीची जबाबदारी स्वीकारणं. नुसत्या चुकीचीच नाही तर त्या चुकीमुळं घडणार्‍या परिणामांची देखील जबाबदारी स्वीकारणं. त्यामुळे जे नुकसान झालं असेल त्याची भरपाई करणं आणि चौथी अपेक्षित गोष्ट म्हणजे वर्तनात कायमस्वरूपी बदल होणं, एकदा घडलेली चूक पुन्हा कधीही घडू न देणं, तेही जाणतेपणी.

आम्हाला जी शिक्षा दिली गेली त्यानं काय साधलं? आमची चूक आम्हाला समजली का? आमच्या मते आम्ही चूक केलीच नव्हती. ती आम्हाला तेव्हाही मान्य नव्हती आणि आजही मला ती चूक वाटत नाही. चूक केलीच नाही म्हटल्यावर त्याची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच उरत नाही. नुकसान भरपाई करायची झाल्यास कोणाचं नुकसान झालं? नुकसान आमचंच झालं. इतकं लाजिरवाणं, ओशाळं, अपराधी भावनेनं जगावं लागलं. कोणाच्या नुकसानाची भरपाई आम्ही देणं लागत होतो? आणि वर्तन बदल? तो मात्र कायमस्वरूपी झाला. प्रत्येक गोष्टीचा, प्रस्थापित विचारसरणीच्या (थोडययात मोठे लोक करतात तसा) विरूद्ध, वेगळा असा विचार करू लागले. त्यानंतर मोठ्यांना, प्रस्थापितांना जिथे जिथे पटत नाही तिथे तिथे विरोध, ही बंडखोर वृत्ती कायमस्वरूपी माझ्या वर्तनाचा भाग बनली, ती अगदी आजपर्यंत!