अंकाबद्दल

लांडगा आला रे आला’ गोष्ट पहिल्यांदा ऐकल्यावर निरागस मनाला वाटतं, ‘खोटं बोलणं वाईट.’ काही वर्षांनी त्याच मनाला ‘लोकांची फजिती करायला त्या मुलाला किती मज्जा आली असेल, कधीतरी करून बघावी लोकांची अशी मजा’ असं वाटलं असेल, तर आणखी काही वर्षांनी, ‘हे संकट कधीतरी येऊ शकेल असं आपल्याला माहीत असेल तर आधीपासूनच तयारीत राहावं, इतरांवर अवलंबून कशाला राहायचं!’ असं वाटेल.

कथा वाचताना-ऐकताना मन सतत आपल्या आयुष्याशी कुठलातरी समान धागा शोधत असतं आणि तोच धागा पकडून आपल्या अनुभवानुसार, कल्पनेनुसार वेगवेगळ्या वाटा धरून प्रवासाला निघतं. कथा संपली तरी मनाचा प्रवास थांबत नाही. वाट ओळखीची झाली, की मन पुन्हापुन्हा त्या वाटेनं जातं. कधी त्या वाटेला फुटलेला आणखी एखादा फाटा दिसतो, तिकडे वळतं, तर कधी त्याच वाटेवर नवनवीन अनुभव गोळा करत पुढे जात राहतं, आपल्या क्षितिजाच्या कक्षा रुंदावत राहतं.

कथा माणसाच्या अस्तित्वापासूनच जन्माला आल्या असाव्यात. माणसं एकमेकांशी बोलू लागली असतील तेव्हापासून कथा असणारच. भाषेच्या उत्पत्तीच्या आधी चित्र काढण्याची सुरुवात झालेली आहे हे पुराभ्यासातून दिसतंही.

कथा मनात विचारांचं बीज पेरतात. आपल्या कृतीतून, वृत्तीतून ती कथा आणि त्यातल्या अनुभवांचीही एक कथा इतरांपर्यंत पोहोचते आणि तिथे रुजू पाहते. अर्थात, मुलांना उपदेश करायला म्हणून एखादी कथा सांगायची, त्याचं तात्पर्य सांगायचं आणि मग कथा सांगूनही तुझ्यात बदल कसा झाला नाही असं ओरडायचं, असल्या वाटेला शहाण्या पालकांनी कधीही जाऊ नये.

कथा मनात अलगद, सहजपणे प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा ठसा तिथे उमटवते. लहानपणी कथेत तार्किक सुसंगती नसली तरी चालतं. तात्त्विक प्रश्नही पडत नाहीत. वाघ म्हणाला, ‘म्हातारे म्हातारे मी तुला खातो’ अशा वाक्यातली अवास्तवता जाणवत नाही. ऋषीमुनी यज्ञ करून चांगल्या चांगल्या वस्तूंची राख का करत, आणि ह्या अयोग्य कृत्याला थांबवायला राक्षस आले तर ते वाईट, दुष्ट कसे, असे प्रश्नही आपल्याला बऱ्याच पुढच्या वयात पडल्याचे आठवत असेल.

या अंकातल्या कथा कोणासाठी आहेत, लहानांसाठी की मोठ्यांसाठी? मनाची कवाडं उघडी असणाऱ्या सगळ्यांसाठी या कथा आहेत; लहानांना त्यात काहीतरी सापडेल त्यापेक्षा वेगळंच काही मोठ्यांना.

इथे तीन प्रकारच्या कथा आहेत. लहान मुलांसाठी लिहिलेल्या, लहान मुलांचं भावविश्व उलगडणाऱ्या आणि मुलांनी लिहिलेल्या कथा. त्याचबरोबर कथाविषयाला धरून काही लेखही आहेत.

या अंकाच्या निमित्तानं घडलेली आणखी एक गोष्ट तुम्हाला सहजच; पण सांगायला हवी.

लक्ष्मीनगर वस्तीतल्या मुलांसह काम करणाऱ्या आमच्या खेळघरातल्या ताई अनेकदा काही अनुभव सांगत. त्यात सहजच कथाबीजं दिसत. या अनुभवांना साहजिकपणे वस्तीतल्या जीवनाची पार्श्वभूमी होती. इथे माधुरी पुरंदरे या बालसाहित्यात महत्त्वाचं नाव असलेल्या मैत्रिणीनं खूप मदत केली. सकल ललित कलाघराच्या सहकार्यानं खेळघरातल्या तायांची कार्यशाळा घेतली. अगदी मांडणीपर्यंतच्या प्रक्रियेत ती सामील झाली. तशा तीन कथा या अंकात समाविष्ट केलेल्या आहेत.

बालकांच्या वाढीशी, शिक्षणाशी जोडलेल्या नीलेश निमकर, फारूक काझी, शिल्पा बल्लाळ यांच्यासारख्या नावाजलेल्या लेखकमित्रांनीही आपापल्या कथा पाठवल्या, अंकाची कल्पनाच आवडून काही मित्रमैत्रिणींनी आपणहून कथा पाठवल्या, आमच्या संपादकमंडळातल्या सदस्यांनाही कथा लिहिण्याचा उत्साह आला.

सुशील शुक्ल आणि शुची सिन्हा ह्यांच्या सहकार्यामुळे ‘साईकिल’ ह्या हिंदी द्वैमासिकातील तसेच ‘टिटहरी का बच्चा’ पुस्तकातील कथा अनुवादित रूपात तुमच्यापर्यंत आणता आल्या.

चिनाब ह्या इयत्ता दहावीतल्या चित्रकर्तीनंही एका कथेसाठी चित्रं काढली; परंतु काही कारणानं ती कथा अंकात येऊ शकली नाही. पालकनीतीच्या येत्या अंकांमधून तिची चित्रं आपल्या भेटीला येतील, अशी आशा करूया.

वर म्हटल्याप्रमाणे अंकात मुलांनी स्वत: लिहिलेल्या कथाही आहेत. त्यांच्याबद्दल आपण त्या विभागाच्या सुरुवातीला बोलू.