अजय चव्हाण (TY. BSC)

आज मला खेळघरात यायला लागून नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. खेळघरात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. जसे आपले आई बाबा आपल्यासाठी नवीन गोष्टी आणतात तसे खेळघर अनेक नवीन गोष्टीतून जीवन कसे घडवायचे ते शिकवते. सुरवातीच्या काळात मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे स्वतःचं मत मांडू शकत नव्हतो. जसा जसा मी मित्रांमध्ये मिसळू लागलो, खेळघराच्या संवाद गटात भाग घेऊ लागलो तेव्हा माझा आत्मविश्वास वाढू लागला आणि गटासमोर माझे मत मांडू लागलो. हा खूप महत्वाचा बदल माझ्या आयुष्यात झाला फक्त खेळघरामुळे!

१० वीत असताना संध्याकाकूंनी माझा गणित हा विषय खूप पक्का करून घेतला, त्यामुळे मला उत्तम मार्क मिळाले. दहावी पास झाल्यावर काय करायचे? असा प्रश्न मला पडला होता. मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचं ठरवलं पण खेळघरातल्या काकूंनी सांगितलं की तू विज्ञान शाखेत प्रवेश घे. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला. तेवढा माझा माझ्यावर सुद्धा विश्वास नव्हता. मग मी बारावी पास झालो ते ही उत्तम मार्कांनी ! खेळघर आम्हाला दरवर्षी शिक्षणासाठी आर्थिक मदत करते.

आज मी BSC computer science च्या शेवटच्या वर्षाला आहे. जर माझ्या आयुष्यात खेळघर आले नसते तर मी इथपर्यत आलोच नसतो.