अटकमटक

बालसाहित्य हे मराठी साहित्यातील तसं दुर्लक्षित अपत्य. इसापनीती, पंचतंत्र, त्यातील चकचकीत कृत्रिम चित्रं, राजे-राण्या, शूर सैनिक किंवा मग माधुरी पुरंदरे, राजे, मठकर, फारुक काझींसारख्या चित्रकार-लेखकांची किंवा काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिस म्हणावं अशी एकांडी बेटं. मुलांची साहित्यिक भूक भागवायला हे निश्चितच पुरेसं नाही, ह्या विचारातून दोन वर्षांपूर्वी atakmatak.com या वेबसाईटची निर्मिती झाली.

समकालीन, उदारमतवादी, परंपरेनं लादलेले लिंगाधारित साचे/ लिंगभाव न मानणारं, आजच्या मुलामुलींना रुचेल आणि समजेल असं साहित्य मराठीत उपलब्ध करून देणं हा ह्या वेबसाईटचा उद्देश.  केवळ लेखनभाषाच नव्हे, तर दृश्यभाषा म्हणून विविध शैलीतील चित्रं मुलांपर्यंत पोचावीत असा प्रयत्न इथे केला जातो.

वेगवेगळ्या विषयांवरच्या 200 पेक्षा जास्त साहित्यकृती; उत्तमोत्तम कथा, कविता, खेळ, एकांकिका ह्या दोन वर्षांत प्रकाशित झाल्या आहेत. नामवंत लेखकांपासून ते चंद्रपूर जिल्ह्यातील गोवरी किंवा सोनाळ्यातल्या आदिवासी मुलांनी लिहिलेल्या कथांचा ह्यात समावेश आहे. प्रमाणमराठीबरोबरच बोलीभाषांमधील लेखनाचंही इथे स्वागत असतं. ग्रेटा थनबर्गची चळवळ, भारतावर पुलवामा इथे झालेला हल्ला किंवा गेलं वर्षभर धुमाकूळ घालणारा करोना, मुलांची चौफेर अभिव्यक्ती आपल्याला बघायला मिळते. शिवाय नावाजलेल्या चित्रकारांबरोबरच मुलांची विविध शैलींमधील चित्रंही आहेत.

नवीन बालकथालेखक तयार व्हावेत यासाठी ‘अटकमटक’तर्फे बालकथालेखन कार्यशाळाही घेतल्या गेल्या आहेत.

आगामी काळात साईटवर ‘लोकसाहित्य’ विशेषांक प्रकाशित होणार आहे. शिवाय इतर अनोख्या विषयांवरील सकस साहित्य येत राहीलच. तुम्ही लिहू इच्छित असाल किंवा चित्रं काढू शकत असाल तर जरूर संपर्क करा.

संपर्कासाठी पत्ता: monitor.atakmatak@gmail.com