अध्यापनातून मला काय मिळाले?


अविजित पाठक
‘मूल्यमापन’ आणि ‘श्रेणी’ यातच धोरणकर्ते अडकून पडलेले असताना एक शिक्षक
मोजमापापलीकडच्या एका मुद्दयाबद्दल – शिकवण्यातल्या आनंदाबद्दल – काही
सांगू पाहतो.
शिक्षकीपेशा मला मनापासून आवडतो. त्यात येणारे अनुभव अनेकदा थक्क करून
टाकणारे असतात. अशा अनुभवांचा आनंद मी पुरेपूर लुटला आहे. एकतीस वर्षांहून
अधिक काळ मी संशोधनावर भर असणार्‍या एका विद्यापीठात प्राध्यापक होतो.
आता मागे वळून पाहताना जाणवतेय, की ह्या शिक्षकी पेशाने मला आमूलाग्र
बदलून टाकले आहे. एक साधा ‘विषय-तज्ज्ञ’ ते ‘उत्साही भटक्या संशोधक’ असे
परिवर्तन माझ्यात घडवून आणले. हे एवढेच नाही, संशोधन आणि अध्यापन या
गोष्टींचा मी चिकित्सकपणे विचार करू लागलो. मला त्यातील परस्परविरोध समजू
लागला आणि त्याच्यापलीकडे बघता येऊ लागले. अर्थपूर्ण अध्यापनात आकंठ
बुडाल्याशिवाय दर्जेदार संशोधन होऊच शकत नाही. शिक्षकाला नोकरशाहीने नेमून
दिलेल्या चौकटीत – अभ्यासक्रम संपवणे, परीक्षा घेणे, मूल्यमापन करणे – या
पद्धतीने जीवनाशी जोडलेले शिक्षण देणे शक्य नाही. मानवी जीवन बहरत नेणारे
शिक्षण ही एक कला आहे. रोज सकाळी वर्गात आल्यावर विद्यार्थ्यांशी केलेल्या
हितगुजातून तिची मशागत होत जाते. शिक्षक म्हणजे काही पुस्तकात लिहिलेले
घडाघडा बोलून दाखवणारा टेप-रेकॉर्डर नाही. तो एक विचारवंत, सर्जनशील संशोधक
असायला हवा. शिकवणे म्हणजे एका दृष्टीने रोज करायचे संशोधनच आहे!
स्वतःच्या बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक कक्षा सतत विस्तारत न्याव्या लागतात.
स्व’ आणि ‘पर’ यांमध्ये सेतू बांधावा लागतो. पुस्तकातील छापील मजकूर प्रत्यक्षात
उतरवण्याचे ते एक अवघड पण हळुवारपणे निभावण्याचे काम आहे!
सहृदयतेने ऐकण्याची कला
शिक्षक म्हणून मी तीन धडे शिकलो. पहिला महत्त्वाचा धडा म्हणजे सहृदयतेने
ऐकणे! प्रत्येक विद्यार्थ्याकडे सांगण्यासारखे काहीतरी असते. शिक्षकाने
विद्यार्थ्यांवर हुशार-जेमतेम, विशेष-उपेक्षित, मागासलेला-प्रागतिक असे कोणतेही

शिक्के मारता नये. उलट स्वतःच्या कल्पना मोकळेपणाने मांडण्यासाठी त्यांना
अवकाश मिळवून द्यायला हवा. त्याशिवाय खरे शिकणे-शिकवणे होऊच शकत
नाही. अनेकदा असे दिसून येते, की शिक्षक आपले प्रकाशित शोध-निबंध, संशोधने
आणि पांडित्य यांमुळे निर्माण झालेल्या ‘तज्ज्ञ’ प्रतिमेची छाप पाडून विद्यार्थ्यांना
गप्प करतात; विशेषतः मी शिकवत होतो तशा संशोधनावर भर असलेल्या
विद्यापीठांमध्ये हा प्रभाव अगदी सूक्ष्म, जाणवेल न जाणवेल असा असतो. आपण
काही प्रश्न विचारला किंवा आपले वेगळे मत मांडले, तर या सर्वज्ञ प्राध्यापकांसमोर
आपण कदाचित मूर्ख ठरू, असे वाटून विद्यार्थी प्रश्न विचारेनासे होतात. शिवाय
शिक्षकांनाही विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्यात फारसा रस असेलच असे नाही.
विद्यार्थ्यांच्या निष्क्रिय शांततेत शिक्षकांचे विद्वत्तापूर्ण, आणि एकसुरी स्वगत
घोंगावत राहते. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतील, त्यांच्या
बोलण्यात रस घेत असतील, त्यांच्या कल्पनांचे स्वागत करत असतील; तर जादू
होते. वर्ग जिवंत होतो! कल्पनांची देवाण-घेवाण सुरू होते. मार्क्सवादी गांधीवादींचे
म्हणणे ऐकून घेऊ लागतात, केवळ सिमॉन दे बोवा आणि ज्युडिथ बटलर वाचलेली
शहरी स्त्रीवादी युवती, पुरुषप्रधानतेच्या आणि जातीयवादाच्या बेड्या झुगारून
स्वतःचे निर्णय घेऊ पाहणार्‍या एखाद्या भोजपुरी तरुणीशी संवाद करू लागते.
या एकतीस वर्षांत मी सहृदयतेने ऐकण्याच्या कलेचे मूल्य समजलो आहे. काही नवे
शिकलो आणि आधी शिकलेले बरेच काही समजून-उमजून सोडून दिले आहे. माणूस
म्हणून मी अधिक प्रगल्भ झालो आहे; कदाचित, अधिक मोकळा, ग्रहणक्षम आणि
अधिक संवादी! विद्यार्थ्यांना गप्प करून शिक्षकांना शिकण्यायोग्य वाटते तेच
विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात अधिकाराची, सत्तेची एक उतरंड असते. त्यातली
वैय्यर्थताही मला समजली आणि दुसर्‍याचे ऐकण्याची, परस्परसंवादाची ताकदही
समजली. अनुभवांती एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना
‘तुम्ही महत्त्वाचे आहात! तुमच्या नजरेने, संघर्षामधून, अनुभवांतून तुम्ही
तत्त्वज्ञानाकडे बघा’ असा विश्वास देतो, तेव्हा विद्यार्थ्यांना मार्क्स आणि फूको
अधिक चांगला समजतो. या ऐकण्याच्या कलेमुळे मी वर्गात अनुभव सांगण्याला

मान देऊ लागलो. तसे करताना शिक्षकी पेशातील कोरडेपणाची, अमूर्ततेच्या
स्तोमाची जणू उलटतपासणी घेतली जात होती.
संवादाची कला
दुसरा धडा म्हणजे संवादाची कला! संवादाचे महत्त्व मला समजले आहे. वर्गात
शिकवत असताना ना तुमच्या डिग्र्या महत्त्वाच्या असतात, ना तुमचे पद. तिथे
लागतो फक्त तुमचा चैतन्यमय वावर. तुमचा उत्साह, आनंद आणि तुमच्या
कल्पना विद्यार्थ्यांपर्यंत रसरशीतपणे पोचायला हव्यात. त्यांना कल्पनांच्या जगात
घेऊन जाण्याची तुमची क्षमता महत्त्वाची! म्हणूनच अर्थपूर्ण शिकवणे हे नामांकित
जर्नल्समध्ये शोध-निबंध लिहिण्यापेक्षा खूप वेगळे आहे. शोध-निबंध सहकार्‍यांनी
वाचण्यासाठी, विचार-विनिमय करण्यासाठी लिहिले जातात. त्यातली भाषा, शब्दांची
निवड, लेखनपद्धत ही नुकत्याच शिकू लागलेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना
उपयोगी ठरेलच असे नाही. ‘अहम’ जोपासणार्‍या बुद्धिवादातून शिक्षकाने आधी
स्वतःला जाणीवपूर्वक बाहेर काढले पाहिजे. आपण उलगडून दाखवत असलेले
कवितेचे सौंदर्य, रूपके विद्यार्थ्यांपर्यंत पोचताहेत का, जिवंतपणाने त्यांना वेधत
आहेत ना ह्याकडे शिक्षकाचे लक्ष असले पाहिजे. ह्याने मुलांचा शिकण्याचा उत्साह
वाढेल आणि ती संकल्पनांचा अर्थ खोलवर आणि उत्कटतेने समजून घेतील. सदैव
बोजड शब्द वापरणे, पुस्तकी भाषेत बोलणे, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान कोरड्या
सिद्धांतांमध्ये बांधणे, ही चांगल्या शिक्षकाची लक्षणे मुळीच नाहीत. कल्पनांची
देवाणघेवाण करण्यातून मिळणारा आनंद किंवा विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक
दिसल्याने वाटणारा आनंद शिक्षणाला आनंदोत्सव करून टाकतो. आणि हे साध्य
करणे एखादा शोध निबंध लिहिण्याएवढेच कठीण काम आहे! संशोधन करताना मी
गंभीर असतो आणि वर्गात शिकवताना खेळकर असतो; असा फरक करणे शक्य
नाही. गेल्या एकतीस वर्षांत मी संवादकलेची खूप साधना केली आहे. मी
समाजशास्त्र शिकवत असलो, तरी मला कुणीही वर्ज्य नव्हते. वॉल्ट
व्हिटमनबरोबरच रवींद्रनाथ टागोर, चार्ली चॅप्लिन आणि सत्यजित रे, मुन्शी प्रेमचंद
आणि फ्योडोर दोस्तोयेव्हस्की, खळाळणारी नदी आणि पर्वताचे शिखर,
रेल्वेप्रवासातल्या गमतीजमती ते अगदी मासळीबाजारापर्यंत सगळ्यांना मुक्त

प्रवेशद्वार असे. कल्पनांची देवाणघेवाण जितकी जास्त, तितके तुम्ही जास्त प्रगल्भ
होत जाता. आजूबाजूचे जग वाचायला शिकलात, की आपोआप पुस्तकातले अनुभव
जिवंत होऊ लागतात. एका अर्थाने, संवाद म्हणजे सजग बुद्धिमत्तेकडे नेणारा
प्रवास! विद्यार्थ्यांशी समरस होऊन संवाद साधताना विचारांना आपोआप खोली येऊ
लागते. अशक्य ते शक्य होताना दिसते; सिद्धांतातून काव्य जन्माला येते आणि
काव्यातून सिद्धांत! मग काय – एमिल डर्खाईम, मॅक्स वेबर आणि कार्ल मार्क्स –
सगळ्यांबरोबरच आनंदाची अनुभूती प्रत्ययाला येते.
‘डीकंडिशनिंगची’ कला
तिसरा धडा मी शिकलोय तो म्हणजे शिकलेले विसरून जाण्याचा (डीकंडिशनिंग).
मला बरेचदा वाटते, की आपल्यापैकी बर्‍याच जणांना कमावलेल्या ज्ञानाचे मोठ्ठेसे
गाठोडे मिरवायला फार आवडते. एखाद्या विषयात पांडित्य प्राप्त केलेले विद्वान
अनेकदा ज्ञानाचे – विविध संकल्पना, कार्यपद्धती, सिद्धांत – ओझे आनंदाने
वागवत असतात. थोर तज्ज्ञांचा शब्दसंग्रह आत्मसात केल्याने आपल्याला सगळ्या
जगाचे ज्ञान असल्याचा अहंकार होतो. निर्मळ दृष्टी, विस्मय, निरागस प्रश्न
पडण्याच्या तो आड येतो. आपल्या ज्ञानाच्या चौकटीबाहेर जाऊन आपण जगाकडे
पाहूच शकत नाही. समाजशास्त्राचा एखादा गंभीर अभ्यासक ज्ञान आणि सत्तेच्या
संबंधांकडे फक्त वेबर आणि फूकोच्या नजरेतूनच पाहू शकतो, किंवा जातींचा विचार
फक्त लुई डुमोंट किंवा श्रीनिवास यांच्या मांडणीनुसारच करू शकतो. मला असे
अजिबात म्हणायचे नाही की हे विचारवंत, त्यांची विद्वत्ता महत्त्वाची नाही, आपण
त्यांच्या मार्गाला जाऊच नये. मात्र आपल्या जाणिवांमध्ये टवटवीतपणा, निरागसता,
मोकळेपणा असावा अशी मला कळकळ वाटते. त्यामुळे विद्यार्थी नवे प्रश्न मांडू
शकतील, निरीक्षणे करू शकतील, पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊ शकतील. शहाणे
व्हायचे तर आधी ‘मूर्ख’ असायला हवे. त्यासाठी शिकलेले मागे टाकण्याची
(डीकंडिशनिंग) कला आत्मसात करायला हवी. मान्यवर अधिकार्‍यांनी जे
‘शिकण्यायोग्य’ असे म्हणून पवित्रस्थानी ठेवले आहे, ते जाणीवपूर्वक विसरायला
शिकायला हवे. त्यासाठी हसायला शिकले पाहिजे. स्वतःला, आपण लिहिलेल्या
गंभीर शोध-निबंधांना, त्यातील संदर्भांना, परिसंवाद आणि परिषदांमध्ये सादर

केलेल्या शैक्षणिक प्रवचनांना, प्रबंधांना आपल्याला हसता आले पाहिजे. मी स्वतःला
हसायला शिकलो आहे. असे हास्य आणि हलके-फुलके वातावरण आपल्या वर्गात
असायला हवे. असा तरल मुक्तपणा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असायला हवा.
त्या मुक्तपणातून आणि मोकळ्या अवकाशातूनच नवीन विचार जन्माला येतील.
अविजित पाठक
लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक होते.
अध्यापनशास्त्र, संस्कृती आणि राजकारण ह्या विषयांवर ते सातत्याने लिखाण
करतात.
अनुवाद : मानसी महाजन