आदरांजली – शोभा भागवत

आज अंक छापायला जातानाच शोभा भागवत ह्यांच्या निधनाची दुःखद बातमी कानावर आली. आयुष्यभर त्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करत राहिल्या. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’चा त्यांनी पाया घातला. बालमानसशास्त्राच्या अभ्यासक आणि पालकांना मार्गदर्शन करणार्‍या लोकप्रिय लेखक अशी त्यांची आपणा सर्वांना ओळख आहे. मुलांशी संवाद कसा हवा आणि पालकांची वागणूक कशी हवी हे आपल्या अनुभवातून त्यांनी अत्यंत सोप्या आणि नेमक्या शब्दांत सांगितलं. आपली मुलं, सारं काही मुलांसाठी, मूल नावाचं सुंदर कोडं, गारांचा पाऊस, अशी त्यांची विविध पुस्तकं. पुस्तकांच्या शीर्षकांतूनच त्यांचे मूलकेंद्री विचार ध्यानात यावेत. पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे, हे शोभाताईंनी आपल्या कामातून वेळोवेळी पटवून दिलं. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. 

पालकनीतीच्या दुसर्‍या अंकाचा प्रकाशन समारंभ शोभाताईंच्या हस्ते होण्याचं सौख्य पालकनीतीला लाभलं. तसेच पालकनीतीला 25 वर्षं पूर्ण होण्याचं औचित्य साधून ‘खेळ’ विशेषांकाचं प्रकाशनही शोभाताईंच्या हस्ते झालं होतं. त्यांच्या निधनानं पालकनीतीचा मित्र आणि मार्गदर्शक हरवला आहे.

 पालकनीती परिवारातर्फे शोभाताईंना विनम्र आदरांजली.