आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेम…

आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात खरीखुरी आत्मीयता असली, तर मग

आपण त्यांना लढायला का पाठवतो?

 

आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेमाला संपूर्ण न्याय द्यायचा, तर

आपण शांतीपूर्ण न्यायाच्या बाजूनं राहायला हवं.

 

कारण युद्धात मृत्यू जास्त होतात, शांततेला तिथे कमीच वाव असतो.

म्हणूनच सैनिकांसाठी आपला जीव तुटतो

त्यासाठी सैनिकांच्या मृत्यूमागची हिंसा समजावून घेऊ.

प्रत्यक्ष युद्धाच्या बर्‍याच आधीपासून ती होत असते.

 

सैनिकांवर मनापासून प्रेम करायला हवंच; पण

ते त्यांच्यातल्या माणूसपणावर.

वरच्या गणवेशावर नाही.

 

जर असलंच प्रेम आपलं आपल्या सैनिकांवर, तर

त्यांचं त्यांच्या जीवनावरही प्रेम आहे, हे विसरू नये कधीही.

त्यांनाही मरावंसं वाटत नसतं, आपल्यासारखंच.

 

आणि तरीही, आपल्याला सैनिकांबद्दल खरोखरीच ममत्व वाटत असलं, तर

तेच ममत्व शेतकरी, कामगार, शिक्षक अशा सर्वांबद्दल वाटू दे.

ह्यातल्या प्रत्येकाचं मन आणि मनगट देशाच्या विकासाला साथ करत असतं.

 

सैनिकांबद्दल आपल्या मनात असलेला ओलावा सांगायला

एखाद्या दुष्काळलेल्या गावात जा.

मनामनांत फोफावणारा राष्ट्रवाद जिरवायला तिथे वाव आहे.

 

एवढ्यानंतरही सैनिकांबद्दल काही विशेष प्रेम उरत असेल, तर

मग इतिहास वाचायला घेऊ.

त्याच त्या गोष्टी आपण पुन्हापुन्हा का करत आहोत हे तरी बघू.

 

आपल्या सैनिकांवर आपलं अगदी मनापासून प्रेम आहे ना

मग रक्तपाताच्या आरोळ्या ठोकण्याआधी क्षणभर थांबू, एक खोल डास घेऊ आणि विचार करू…

हे सूडाचं युद्ध, आपल्यापैकी प्रत्येकजण लढणार आहे का?

 

तसं नसेल…

आणि आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात आत्मीयता जागी असेल,

तर शेतकर्‍यांबद्दल, रोजंदारीवर खपणार्‍या मजुरांबद्दल,

गरिबांबद्दल आणि रंजल्या-गांजल्यांबद्दलही ती असेलच ना,

नाही? का बरं?

गणवेशात नसले तरीही सैनिकच आहेत ते.

 

– सोमनाथ मुखर्जी

मराठी अनुवाद:  संजीवनी कुलकर्णी