आम्ही क्रिकेट वेडे

वृषाली वैद्य

सोमवार, 24 मार्च, 2003. सकाळ होताच पहिल्यांदा काय जाणवलं आम्हाला? एक पोकळी आणि रिक्तपणा. म्हणजे रोजची कामं नेहमीप्रमाणे होत होती, नाही असं नाही. पण हवेमध्ये, शरीरातल्या रोमारोमात जो वर्ल्डकप भरून राहिला होता, तो आता नसल्यामुळे अतिशय ओकंबोकं वाटत होतं.

गेल्या महिन्या-दीड महिन्याची नशाच काही और होती. भारत त्यात असो नसो, आम्ही न चुकता वर्ल्डकपची प्रत्येक मॅच पाहात होतो. संपूर्ण  मॅच पाहिली तरी दुसर्‍या दिवशी सकाळी कालच्या सामन्याची क्षणचित्रे सोडत नव्हतो. त्यानंतर पेपर वाचताना त्याच बातम्या, टी.व्ही. लावल्यावर कोणत्या तरी आजी-माजी क्रिकेट समालोचकाची नाहीतर खेळाडूची मुलाखत, मंदिरा बेदीची फॅशन परेड (कारण त्यासाठी क्रिकेटचे ज्ञान असणे आवश्यक नव्हते) बघतच होतो. जेवणाच्या टेबलावर हात वाळेपर्यंत आपण क्रिकेटच खात होतो, बोलत होतो. मधेमधे जो वेळ मिळायचा त्यात डचड पाठवणे, फोनवरून क्रिकेटच्या गप्पा मारणे, रेडिओ मिरचीच्या कार्यक्रमात भाग घेऊन जिंकण्या-न जिंकण्याची भाकिते वर्तवणे किंवा क्रिकेट फंडा ऐकणे. जगण्याला एक अर्थ लाभला होता. क्रिकेट बघण्यासाठीच तर आपण जगत होतो ‘बिचारा फायनल बघायच्या आधीच मेला’ म्हणून एखाद्याच्या कमनशिबी आयुष्याला बोल लावत होतो. त्याचबरोबर, ‘एकदा वर्ल्डकप संपू दे मग सांत्वन करायला जाऊ,’ असंही म्हणत होतो. पण तेही लवकर जायला जमलं नाही कारण 

ऑस्टेलियाने वर्ल्डकल्प जिंकल्यावर पुढे तीन चार दिवस तर स्वत:चंच सांत्वन करण्यात घालवावे लागले. आता दिवसभर करायचं तरी काय?

आता वर्तमानपत्र वाचताना लक्षात आलं की इराकवर अमेरिकेने लादलेलं युद्ध सुरू झालं सुद्धा. आमच्या वर्ल्डकपच्या धुंदीमुळे आजूबाजूला काही घडतंय हे कळण्याइतपत, त्याची दखल घेण्याइतपत आमचं मन जागं असतं तर? पण आम्हाला त्याचा ना खेद ना खंत. तेव्हा क्रिकेटच आमचा धर्म होता.

आता जागेपणी, डोकं बधीर होऊ न देता जेव्हा आम्ही टक्क डोळे उघडून पाहिलं तेव्हा आपण जगाच्या दीड महिना मागे तर नाही ना? असा भास झाला. जाणवलं, गेला दीड महिना आपण क्रिकेट मॅचसाठी टी.व्ही.लाच तर लावून बसलो होतो. त्याच वेळी मुलांची परीक्षा जवळ आली होती किंवा बहुतेक चालूही झाली होती. मुलांनी अभ्यास केला की नाही तेही आता आठवत नाही. बरं, नसेल अभ्यास केला, तर त्यांना आपण कुठल्या तोंडानं जाब विचारणार? आपणही टी.व्ही.लाच चिकटून होतो. शाळेला दांडी मारली असेल पण आता रागावण्याची हिंमत होत नाही, मी काय वेगळं केलं?  मी सुद्धा त्यादिवशी रजेवरच होतो ना! ‘हीच्या मुलांचं हे असंच’ असं म्हणताना त्यांचे आदर्श म्हणजे आपणच पालक हे लक्षात आलं. हे आपण योग्य केलं का? महत्त्व कोणत्या गोष्टींना द्यायचं हे मोठ्यांनाही समजत नसेल तर त्यांचं अनुकरण करणार्‍या लहान मुलांनी काय करायचं? प्रसार माध्यमांनीदेखील ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिलं. रोजच्या वर्तमानपत्रात कमीत कमी चार ते जास्तीत जास्त सर्व पानं क्रिकेटशौकिनांसाठी ठेवली होती, त्याशिवाय जगात महत्त्वाचं काही नव्हतंच अशा थाटात.

बरं या खेळातून आपल्या खिलाडूवृत्तीचं तरी प्रदर्शन झालं का? ऑस्टेलियाविरुद्ध पहिल्या मॅचनंतर कैफच्या घरावर हा होणं किंवा गांगुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं लागणं हे काय होतं? उद्या मुलांनी हाच कित्ता आपल्या घरात गिरवला तर त्यांना काय म्हणणार? कारण या प्रक्षुब्ध प्रतिक्रिया कशा बरोबर आहेत, हे सांगताना मीच पुढे होतो. बंगाली लोकांच्या टोकाच्या प्रतिक्रियांचं आम्हाला भारीच अप्रूप.

पार्थिव पटेलच्या आईवडिलांनी बोर्डाला अशी विनंती केली म्हणे की त्याची परीक्षा नंतर घेण्यात यावी. तुम्हाला बोर्डाची परीक्षा महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडू म्हणून जाऊ नका आणि जर जाण्याचा निर्णय पक्का असेल तर पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा द्यायची तयारी ठेवा. आपल्यासाठी बोर्डासारख्या यंत्रणेनं नाचावं हे योग्य आहे का? अर्थात् आता राखीव खेळाडूंसाठीही अ‍ॅम्बी व्हॅली, इउउख व इतरांनी जी 67 लाख रुपयांची व सहारा लेक सिटी मधल्या 7 स्टार अपार्टमेंटची खैरात केली आहे ती बघता, ‘पार्थिव, तू राखीव खेळाडू म्हणून का असेना, एकदा साऊथ अफ्रिकेची वारी केलीस ते किती योग्य होतं,’ असं कुणीही म्हणतील. 

महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमुळे आपल्याला काय कळलं? आपण आत्मपरीक्षण केलं का? चार वर्षांनी पुन्हा वर्ल्डकपमधे खेळायचं आहे.  त्या संधीचं सोनं करण्याची दुर्दम्य इच्छा, कष्ट करण्याची शरीराची, मनाची तयारी आपण कधी करणार? या वर्ल्डकपपायी अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी आम्ही आमच्या मनाची दारं किलकिलीसुद्धा केली नाहीत. मुलांना अप्रत्यक्षपणे आम्ही कोणता संदेश दिला?

आपण ज्या खेळाडूंना इतकं डोक्यावर घेऊन नाचतो, त्यांच्या मनात भारताच्या नव्या पिढीविषयी, देशाविषयी किती आत्मीयता आहे? आज लाखो मुलं, तरुण आपले फॅन आहेत असं असताना पेप्सी-कोकच्या जाहिराती करून मुलांना आपलं आरोग्य आणि पैसा पाण्यात घालायला त्यांना सांगावं हे योग्य आहे का? याला सन्माननीय अपवाद फक्त पुलेला गोपीचंदचा. माझ्याकडून भावी पिढीला गैरसंदेश पोहोचू नये म्हणून एक कोटी रकमेवर पाणी सोडणारा गोपीचंद आपण पालक मुलांना दाखवतो का?

असे अनेक प्रसंग, निमित्तं असतात जी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यावेळी आपण काय करतो हे मुलंही बघत असतात. प्रत्येक घटना व त्यावरची आपली प्रतिक्रिया, वागणं मुलांना नकळत बरंच काही शिकवून जातं. कोणत्याही उपदेशाशिवाय मुक्त संवादाची ताकद असलेले असे क्षण दवडणं आपल्याला परवडणार नाही.