आम्ही गृहीत धरलंय…

आम्ही गृहीत धरलंय,

की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय

वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा

खच पाडण्याचा आणि शेवटी 

नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा  

 

आम्ही गृहीतच धरलंय,

‘सोशल डिस्टन्सिंग’चं निमित्त करायचं 

आणि जैविक इंधनाचा चुराडा करायचा

प्रत्येकानं दामटायची आपापली वाहनं

वातावरणानं धरावा की आपला जीव मुठीत 

 

आम्ही गृहीतच धरलंय,

की ऑनलाईन शिक्षण हा उत्तम पर्याय आहे

मग भले गरीब बिचार्‍या मुलांकडे,

नसेनात का आवश्यक ‘डिवाइसेस’ किंवा इंटरनेट

पडेनात का ती मागे ह्या जीवघेण्या स्पर्धेत 

 

आम्ही गृहीतच धरलंय,

की आरोग्याच्या बाजारात 

चाचण्या किंवा इलाजासाठी

लठ्ठ फिया आकारल्या जाणं आणि 

खाजगी डॉक्टरांच्या तुंबड्या भरल्या जाणं 

अगदी ‘नॉर्मल’ आहे

 

आम्ही गृहीतच धरलंय,

की आपले तन-मन-जीवन घेऊन

कष्टकरी आहेतच तयार

आपल्या सेवेला

हां, आता कठीण परिस्थिती उद्भवलीच,

तर आम्ही त्यांना बेदखल करणारच ना

 

आम्ही गृहीतच धरलंय,

की ‘लोकशाही’ मार्गानं निवडून दिलेले राजकारणी

वास्तविक राजेच, 

त्यामुळे त्यांच्या कृष्णकृत्यांमुळे 

अनर्थ ओढवला तरी बेहत्तर,

त्याचं एवढं काय?

 

आम्ही गृहीतच धरलंय,

की ‘हॅप्पी न्यू इयर’ साजरा व्हायलाच हवा

धूमधडाक्यात

जणू काय धरणी कधी हादरलीच नव्हती,

आभाळ कधी फाटलंच नव्हतं

शेवटी काय

आपल्या जगण्याचा सोहळा झाल्याशी मतलब.

दिपांकर  (dips.treelabs2@gmail.com)

दिपांकर ह्यांच्या मूळ इंग्रजी कवितेचा अनघा जलतारे ह्यांनी केलेला स्वैर अनुवाद. दिपांकर हे वैज्ञानिक, संशोधक आणि आंत्रप्रिनर असून ‘व्हेअर द माईंड इज विदाउट फियर’ ह्या टागोरांच्या कवितेतल्या सुंदर जगाला प्रत्यक्षात आणू इच्छितात.