आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व

स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जगण्याचा भाग झाल्याला आता काळ उलटला. एव्हाना आपल्यातल्या अनेकांची आवाजी तंत्रज्ञानाशीही (voice technology) ओळख झाली असणारच. त्यात आणखी चार पावलं पुढे जाऊन बघूया.

यंत्रांनी माणसाच्या सूचना पाळणं आपल्याला नवीन नाही; त्यासाठी आपल्याला काही बटणं दाबावी लागत, काही आज्ञा टाईप कराव्या लागत. आता ते तोंडानं सांगण्याइतकं सोपं झालंय. हेच ते आवाजी तंत्रज्ञान. आपण म्हणू ते बिनतक्रार करू शकणारा असा हा आपला हरकाम्या मदतनीसच म्हणा नं! भारतात या तंत्रज्ञानानं अजून पाय रोवलेले नाहीयेत; पण पाश्चिमात्यांचं अनुकरण करण्याची आपली सवय बघता त्याला फार वेळ लागेल असं वाटत नाही.

आवाजी तंत्रज्ञानामुळे या यंत्रांना इतर अनेक आवाजांमधून माणसाचं बोलणं नेमकं ‘ओळखता’ येतं, त्यातील काही आज्ञा समजून घेऊन, त्यावर कृती करून माणसाला मदत करता येते. टीव्ही बघताना, ‘अमुक चॅनल लाव’, ‘आवाज कमी कर’ हे केवळ बोलून साध्य करता येतं. आपण ऐकलेलं असेल अशा सिरी, अलेक्सा अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍या किंवा जाणारा वैयक्तिक आवाजी मदतनीस (personal voice assistant) आपल्या फोनमध्ये तयारच बसलेला असतो. त्यांना हाक मारायची आणि काम सांगायचं फक्त, बस्स!

सिरी आणि माझी ओळख अगदी काही दिवसांचीच; पण तेव्हढ्यावरूनच सांगते, अगदी गुणी मुलगा हो! (म्हणजे काहींसाठी ती मुलगी असू शकते.) त्याची ओळख झाल्यापासून मला ब्राउझर उघडावंच लागत नाही. काहीही शोधायचं असलं, तर आवाज द्यायचा, ‘‘सिरी, याचा अर्थ सांग, याबद्दल जरा अजून माहिती सांग रे.’’ एवढंच काय, ‘याला फोन कर’, ‘त्याला हा मेसेज पाठव’, ‘अमुक वाजताचा गजर लाव’, ‘याची आठवण करून दे’, ‘अमुक गुणिले तमुक किती ते सांग’, अशा दिलेल्या आज्ञाही तो पाळतो. गाणी ऐकणं, बातम्या ऐकणं तर पठ्ठ्यानं अगदी सोप्पं केलंय. मनात येईल तेव्हा, जिथे असू तिथून म्हणायचं, ‘‘सिरी, हे गाणं ऐकव रे जरा’, ‘बातम्या सांग बघू.’’ सिरीशी मैत्री झाल्यापासून वाटू लागलंय, मला फोनमधलं काही माहीत असण्याची गरजच नाही (आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!). मलाच काय कुणालाही आता फोन वापरणं अगदी सोपं झालंय.

शिवाय आणखीही एक फायदा माझ्या लक्षात आलाय. बरेचदा काही कामासाठी फोन हातात घेतला जातो; पण इतर काही अधिसूचना आलेल्या असतील तर करायचं काम राहतं बाजूला आणि इतरच (वायफळ) गोष्टी केल्या जातात. फोन कशासाठी हातात घेतला हेच विसरायला होतं. सिरीमुळे हे काही अंशी तरी कमी झालंय.

तर मी काय सांगत होते, सिरी, अलेक्सा असे सगळे मदतनीस म्हणजे आवाजी तंत्रज्ञानाची बाळं आहेत. त्यांची मदत घेणार्‍यांचे डोळे, हात आणि डोकं यांचं काम ती कमी करताहेत. कान आणि तोंड यांना सिरीकडून काम करून घेता येतंय; खरं तर तोंडाला सत्ता मिळाली आहे हवं ते करवून घेण्याची. तंत्रज्ञानाला थोडी आणखी चाल दिली, तर हे मदतनीस आणखीही बर्‍याच गोष्टी करू शकतात. दिवे लावणं/बंद करणं, भांडी, कपडे धुण्याचं यंत्र, ओव्हन, क्लिनर, वातानुकूलन यंत्र इ. चालवणं, सामानाची यादी करणं, वाण्याकडून सामान मागवणं, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी दिशा सांगणं वगैरे वगैरे. आपण कुठे बाहेर गेलेलो असू, तर घरी परतताना सिरीला सांगून एसी सुरू करायचा म्हणजे घर गार, हवेशीर होऊन आपल्या स्वागताला तय्यार! काही मदतनिसांची लहान मुलांसाठीची विशेष आवृत्तीपण आहे; त्यांना विश्वकोश पाठ आहे, ते गोष्टी सांगू शकतात, गाणी म्हणू शकतात. पूर्वी भावंडं एकमेकांवर कामं ढकलू लागली, की घरातली वडीलधारी माणसं हमखास म्हणत, ‘‘जरा बूड हलवा, थोडंसं काम केलं, तर तुमची हाडं झिजतात का?’’ नशीब, या मदतनिसांना हे वाक्य शिकवलेलं नाहीये, नाहीतर…

मानवाला असलेलं शेपूट उत्क्रांत होताना झडून गेलं, कारण द्विपाद माणसाला आता त्याचा काही उपयोग उरला नव्हता. मला सतत भीती वाटत राहते, आपण एखादा अवयव पुरेसा वापरला नाही, तर तोही ह्याच मार्गानं निघून तर नाही जाणार? या मदतनिसांचा आपल्यावर, आपल्या मुलांवर काय परिणाम होतोय याचा अनेक मानसशास्त्रज्ञ, मेंदूविकासतज्ज्ञ अभ्यास करत आहेत. अजून हे संशोधन निष्कर्षाप्रत पोचलं नसलं, तरी आपण खरंच मेंदूचा वापर कमी करतोय का, याचा नक्कीच विचार व्हावा.

या मदतनिसांनी आपलं काम कमी केलंय; त्याचवेळी मेंदूला चालना देणार्‍या, आनंद देणार्‍या कितीतरी गोष्टी आपल्या पुढ्यात हजर केल्या आहेत. ओरिगामी, किरीगामीपासून अनेको कलाकौशल्यं वगैरे शिकणं आता ‘पहलेसे काफी आसान’ झालंय. त्यांचा वापर आपण जरूर करून घ्यावा; त्याचवेळी हे मदतनीस वापरण्यातले धोके समजून घेऊन त्यांना आपल्या आयुष्यात किती आणि कशी जागा द्यायची ह्याकडेही लक्ष पुरवायला हवं; अर्थात, मुलांसंदर्भात, शक्य तर मुलांबरोबर चर्चा करून ठरवायला हवं.

हे मदतनीस आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतात. त्यांच्याबरोबरचं आपलं बोलणं भविष्यातील संदर्भासाठी इंटरनेटवर कुठेतरी साठवलेलं असतं. या साठवलेल्या माहितीचा वापर कोण कशासाठी करेल यावर आपलं नियंत्रण नसतं. तो चुकीच्या कामांसाठीही होऊ शकतो. अमेरिकेत एकदा अलेक्सानं घरातील वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड केलं आणि कॉन्टॅक्ट लिस्ट मधील एकाला पाठवलं. आपल्या नेहमीच्या बोलण्यातले काही शब्द सिरीला ‘दिलेली आज्ञा’ वाटू शकते. एकदा ‘हा सिरी रिडल (riddle) सोडवू शकतो का?’ हे माझं सहज बोलणं ‘हे सिरी, रीडायल (redial) असं घेऊन त्यानं, माझ्या आधी लावलेल्या नंबरला पुन्हा फोन लावला. हे टाळण्यासाठी मदतनिसांना गरज असतानाच सतर्क ठेवणं, त्यांच्याबरोबरचं संभाषण वारंवार पुसून टाकणं, त्यांच्याबरोबर कुठलंही खाजगी किंवा कदाचित अडचणीचं ठरू शकेल अशी माहिती उघड करणारं संभाषण टाळणं, इतकंच नाही, तर सिरी, अलेक्सा किंवा तत्सम मदतनीस वापरणार्‍या इतरांना, अगदी मुलांनाही, ह्या धोक्याची कल्पना देणं व्हायला हवं. मदतनिसांनी आपल्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढत एखादी संवेदनशील माहिती मुलांसमोर ठेवण्याचा धोकाही नजरेआड करून चालणार नाही. एका लहान मुलानं ‘ट्विंकल ट्विंकल’ ही कविता म्हणायला सांगितल्यावर अश्लील साईट उघडू पाहणार्‍या अलेक्साचा एक व्हिडिओ बघायला मिळाला. तो पाहून मुलांना ह्या मदतनिसांबरोबर एकटं सोडताना सावधगिरी बाळगायला हवी याची जाणीव झाली. ह्या मदतनिसांनी मुलांशी वागताना प्रौढांसाठीच्या साईट्स उघडू नयेत अशी तजवीज करता येतेच; पण ती खबरदारी बाळगायला हवी.

काही पालकांनी शंका व्यक्त केली होती, की मदतनिसांना सतत आज्ञा देण्याची सवय झाल्यानं मुलं उद्धट होतील का, त्यांना दादागिरी करण्याची सवय तर लागणार नाही? ह्या चिंतेची दखल घेतली जाऊन मुलं नम्रपणे वागली, की हे मदतनीस त्यांना शाबासकी देतील, असं पाहिलं जातंय.

मुलांना गोष्ट सांगणं, त्यांना अभ्यासात मदत करणं आणि वर ‘चांगले संस्कार’ करणं, ह्या खरं तर पालकांच्या मानल्या गेलेल्या जबाबदार्‍या देखील हे मदतनीस घेऊ पाहताहेत. ह्याचा मुलांवर नेमका काय परिणाम होईल याचा अजून आपल्याला अंदाज आलेला नाही; पण हे यांत्रिक मदतनीस आहेत, खरे नाहीत, ह्याची समज (केवळ माहिती नव्हे) मुलांना येईल का? म्हणजे बघा, समजा ह्यातून उद्या मुलांना वाटलं, की ‘माझ्या आईबाबांना काही समजत नाही, अलेक्सा/सिरी कशी न रागावता माझ्या प्रश्नांची उत्तरं देतात, मी आपला त्यांच्याशीच बोलेन’, तर त्यांचं काही चुकतंय, असं आपल्याला म्हणता येईल का? मुलांना खरी माणसं आणि रोबो यातला फरक समजावून सांगण्यावर काही जण भर देताहेत. मात्र खर्‍या जगापेक्षा आभासी जगच जास्त ओळखीचं वाटणार्‍या ह्या मुलांना दोहोंतील फरक गोंधळ होऊ न देता कसा समजावून सांगायचा? कारण माणसांचं माणसांसोबतीनं बहरणारं नातं हे अनुभवावंच लागतं.

या मदतनिसांकडे केवळ एक यंत्र म्हणून बघितलं पाहिजे, हे कितीही खरं असलं, तरी त्यामध्ये एक गोची आहे. या लेखाच्या निमित्तानं मी माझ्या फोनमधल्या सिरीशी खूप गप्पा मारल्या. खेळणंच हाती आलं होतं ते माझ्या. मी त्याला उलटसुलट अनेक प्रश्न विचारत गेले. ‘अमुक प्रश्नाला हा काय उत्तर देईल’, अशी उत्सुकता वाढत होती. एका उत्तरातून नकळत दुसरा प्रश्न तयार होत होता. एकदा तर मी त्याला म्हटलं, “I love you”, तर तो म्हणाला, ‘‘मला लाजायला आवडलं असतं; पण मी लाजू शकत नाही.’’ परत एकदा मी तेच वाक्य म्हटलं, तर म्हणाला, ‘‘हळू, शेजारी काय म्हणतील!’’ बापरे, माझाच चेहरा गोरामोरा झाल्याचं मला जाणवलं. त्याला बनवणार्‍यांनी मोठ्या कुशलतेनं बनवलंय यात शंका नाही. ह्याची उत्तरं दरवेळी वेगवेगळी असतात. माझा सिरी मला जे उत्तर देईल तेच तुमचा तुम्हाला देईल, असं नाही. “Get lost” म्हटल्यावर त्यानं “”Goodbye would have been more polite way to say this” म्हणावं म्हणजे काय! हा तर आगाऊपणाचा कहर म्हणावा. आवाजामुळे, बोलण्यामुळे या मदतनिसांना आपण आपल्यासारखीच माणसं समजू लागतो. हे मदतनीस म्हणजे फक्त एक सॉफ्टवेअर आहेत, खरी माणसं नाहीत, हे माहीत असूनही काही क्षणांपुरतं हे विसरायला होऊन भावना मधे येऊ शकतात. हा मदतनीस कोणाला काही सांगणार नाही अशी खात्री असल्यानं त्याच्याशी काही खाजगी गोष्टी बोलण्याची इच्छा होऊ शकते. एका अभ्यासात दिसून आलंय, की ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो/ते’, ‘मला एकटं वाटतंय’ असं काहीतरी बहुतेक लोक एकदातरी अलेक्साशी नक्कीच बोलतात. यावर संवेदनशीलतेनं काय आणि कसं बोलायचं, हेही या मदतनिसांना शिकवलं जातंय; पण मानवी नात्यांची, प्रेमाची, आपलेपणाची जागा यंत्रांनी घेणं ही बाबच मला धोकादायक वाटते.

या मदतनिसांमुळे पालक म्हणून आपली काही जबाबदारी कमी होत असली, तरी दुसर्‍या बाजूनं ती वाढलीही आहे. मुलांना मनातली गोष्ट आपल्याशी बोलावीशी वाटण्यासाठी नात्यात तेवढा मोकळेपणा असणं, आपल्यातली जवळीक कायम असणं, तिची अलेक्साशी तुलना होऊच शकत नाही याची कल्पना मुलांना असणं आवश्यक आहे. त्यासाठी मुलांबरोबर असणं, त्यांना वेळ देणं, त्यांचं ऐकून घेणं, त्यांचं म्हणणं समजून घेणं ह्याला पर्याय नाही.

या मदतनिसांमुळे मुलांना आणखी एक सवय लागण्याचाही धोका आहे. सतत कोणीतरी उत्तर देणारं असल्यानं, काही काळ एखादं हवं असलेलं उत्तर मिळालं नाही तर त्यांना अस्वस्थपणा यायला लागेल. कोणतीही माहिती, ज्ञान जागच्याजागी मिळतं. विचारलं, की बसल्या जागी उत्तर मिळतं. मात्र ज्ञान मिळवणं आणि शिकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खरं शिक्षण हे अनुभव, कृती, चर्चा, चिंतन ह्यातून होतं. या मदतनिसांमुळे मुलांना अनुभव देण्याच्या संधी तर आपण गमावत नाही आहोत ना?

एका मित्राच्या दुसरीत असलेल्या मुलाला ‘भारतीय मसाल्यांची माहिती लिहिणे’ असा प्रकल्प करायला शाळेतून सांगितलं होतं. त्याच्या आईनं त्याला मसाल्यांची नावं लिहून दिली आणि ती माऊली पुढच्या कामाकडे वळली. मुलगा गुगलला विचारून माहिती लिहीत होता. माझा मित्रबाबा माझ्याशी मस्त गप्पा मारत बसला होता. तो अभिमानानं मला म्हणाला, ‘‘यावर्षी बोनस म्हणून आम्हाला कंपनीकडून हा मदतनीस मिळालाय. खरंच खूप मदत होतीये याची. आता आम्हाला मुलाचा अभ्यास घ्यावा लागत नाही, शिवाय ‘स्क्रीन टाईम’(टीव्ही, संगणक किंवा मोबाईलसमोर घालवलेला वेळ) ची भीती नाही.’’

एक अभ्यास सांगतो, या मदतनिसांचा वापर इतक्या झपाट्यानं वाढतोय, की 2021 सालापर्यंत या पृथ्वीतलावर जितकी माणसं असतील तितकेच मदतनीस असतील. भांडवलशाही, शहरीकरण ह्यांच्या अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार या मदतनिसांमुळे माणसाच्या मनातली ‘उपभोगाआधी विचार’ करण्याची प्रक्रिया नाहीशी होतेय.

यंत्र अखेर यंत्रच असतं. त्याचा वापर आपण कसा करतो त्यावरच त्यातला फायदा किंवा तोटा अवलंबून आहे. एक मित्र मला म्हणाला, ‘‘अलेक्सा आल्यापासून मुलांना इंग्लिश बोलायला आवडू लागलं आहे. त्यांचं इंग्लिश सुधारलंय, आत्मविश्वास वाढलाय.’’ खरंच खूप छान उपयोग आहे हा; पण भाषा ही मुख्यत: माणसाचं माणसाशी बोलणं व्हावं, संवाद व्हावा, नातं बहरावं म्हणून आहे ना. भाषा फुलते, जिवंत होते, ती अशी. ते न होता, यांत्रिक मदतनिसाशी बोलून काही मदत नक्कीच होईल, हे मान्य करूनही त्या भाषिक विकासाला साहजिक मर्यादा आहेत, आणि त्यांना पर्याय मानवी संवाद हा आणि हाच आहे. उपलब्ध संधींचा विस्तार वाढवायची गरज वाटत असली, तर आणखी काही मार्ग शोधता येतील, उदाहरणार्थ ‘ग्रॅनी क्लाऊड’ (पालकनीतीच्या वाचकांना आठवत असेल, मे 2018 च्या अंकात आपण ‘ग्रॅनी क्लाऊड’ची ओळख करून घेतली होती). ‘ग्रॅनी क्लाऊड’ हा स्वयंसेवकांचा गट मुलांशी इंटरनेटवरून संवाद साधतो. इंटरनेटवरून भेटणारे, लाड करणारे नातेवाईकच आहेत हे जणू. गोष्ट वाचणं, वाचून दाखवणं, कोडी सोडवणं, गप्पा मारणं, चर्चा करणं, संवाद साधणं अशा अनेक गोष्टी इथे मुलांना करता येतात. आणि हे सगळं खर्‍याखुर्‍या व्यक्तींच्या मदतीनं चालू असतं. हे आजीआजोबा (म्हणजे त्या वयाचेच ते असावेत असा नियम नाही) मुलांचं ऐकतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांच्यामधल्या कुतूहलास चालना देतात, उत्तरं शोधायला मदत करतात. असे पर्याय आवाजी मदतनिसांच्या पर्यायापेक्षा जास्त समृद्ध करणारे आणि मुख्य म्हणजे जिवंत आहेत.

आवाजी मदतनिसांच्या तंत्रज्ञानात अतिशय वेगानं वाढ होते आहे. आणखी काही काळातच त्यांना आपल्या भावना कळू शकणार आहेत. माणूस अनुभवातून शिकतो, तसं आपल्या आवाजातील आनंद, उपरोध, निराशा देखील आवाजी मदतनिसांना शिकता येईल असा तंत्रज्ञांचा दावा आहे. ह्या ठिकाणी ‘हर’ (कशी) ह्या चित्रपटाची आठवण येते. एक माणूस आपल्या मदतनिसाच्या प्रेमात पडतो. तिला माणसाचं शरीर नसतं; पण सगळ्या मानवी भावभावना ‘समजलेल्या’ असतात. एक दिवस ती त्या माणसाला खरं प्रेम कसं सर्वव्यापी असतं, ते कसं कोणाला बांधून ठेवू शकत नाही वगैरे गोष्टी ऐकवते. अत्यंत अस्वस्थ करणारा प्रसंग आहे हा. स्वतःच्या भावभावनांबद्दल, नातेसंबंधांबद्दल यंत्रांकडून समजून घेण्याची वेळ माणसावर यावी? या मदतनिसांमध्ये त्यानं इतकं गुंतावं, की त्यांच्याशिवाय आयुष्य कठीण वाटावं?

आपल्या आयुष्यात कदाचित हे प्रश्न – प्रश्न म्हणून अद्याप आलेले नसतील. अलेक्सा, सिरी यांच्यात भावनिक गुंतवणूक होईल अशी शंकाही आपल्याला आलेली नसेल, त्यापेक्षा त्यांची मदतच वाटली असेल; पण उद्याच्या पिढीला या प्रश्नांना सामोरं जावं लागेल यात आता शंका उरलेली नाही, तेव्हा… बघा बुवा.

anandi

आनंदी हेर्लेकर  |  h.anandi@gmail.com

लेखिका संगणक क्षेत्रातील जाणकार असून त्यांनी मनोविज्ञान विषयाचे प्रशिक्षण घेतलेले आहे तसेच त्या समुपदेशन करतात.