ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन – प्रतिक्रिया

प्रतिक्रिया १
DSC_0094.JPG
ऍक्टिव टीचर्स फोरमच्या वतीने होत असलेल्या शिक्षण संमेलनाची बातमी लोकसत्तात वाचली आणि भाऊ चासकरांशी संपर्क साधून मी पुणे येथील शिक्षण संमेलनात दाखल झाले. संमेलन म्हटलं की उद्घाटन, स्वागत समारंभ असं चित्र समोर असतं. पण अशा सोपस्कारांना फाटा देऊन हे संमेलन भरवण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या या संमेलनात अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी विविध विषयावर संवाद साधला. विशेषत: ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती हा विषय केंद्रस्थानी ठेवून या चर्चा झाल्या.
ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तो कसा कार्यान्वित करायचा? यासाठीचे मार्ग कोणते? साहित्य काय असावं? याचबरोबर वर्गात संख्या कमी असो वा जास्त, ज्ञानरचनावादी पद्धतीनं मुलांच्या हाताला काम देऊन त्यांचा विकास साधता येतो या गोष्टीवर जाणीवपूर्वक प्रकाश टाकण्यात आला. वयानं मोठ्या होणार्‍या मुलांशी संवाद, विशेष मुलांशी जुळवून घेणं, त्याच्यासाठी विविध संधी निर्माण करणं यात शिक्षकांबरोबर पालकांचाही सक्रिय सहभाग याविषयी संजीवनीताईर्ंंचं विवेचन महत्त्वपूर्ण ठरलं.
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शिकणं कसं कृतिशील होऊ शकतं यावरचं एमकेसीएलच्या विवेक सावंत यांचं प्रश्‍नोत्तरांचंं सत्र मार्गदर्शक झालं. व्यक्तिश: मला असं वाटलं की वर्तनवादी शिक्षणपद्धती शिकलेल्या आपल्या पिढीला ज्ञानरचनावाद हा शब्द नवा असला तरी त्या पद्धतीनं आपण काम केलं आहे.
संमेलनातले तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आणि शिक्षकांचे अनुभव ऐकून, लातूरमध्ये ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून आपण करत असलेलं काम योग्य दिशेनं जात आहे असा विश्‍वास वाटला. अर्थात प्रवाहाच्या विरोधात पोहताना होणारी दमछाक गृहीत धरलेलीच आहे.
संमेलनात आणखी एका विषयावरचं सत्र हवं होतं, ते म्हणजे ‘उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता यातील फरक’ किंवा ‘उपक्रमशीलता म्हणजेच प्रयोगशीलता आहे का?’ कारण आज, उपक्रमशील शाळा म्हणजेच प्रयोगशील शाळा, असा काहीसा समज झाल्याचं दिसत आहे. या संदर्भात पुढील संमेलनात संवाद व्हावा ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. संमलेनाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट होतं. ऍक्टिव टीचर्स फोरमच्या या पहिल्या यशस्वी प्रयोगाचं अभिनंदन!
सविता नरहरे,
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प, लातूर
sssnarhare@gmail.com

प्रतिक्रिया २
fundilal.tif
या संमेलनात राज्यातील उपक्रमशील, प्रयोगशील शिक्षकांनी करून पाहिलेले उपक्रम, प्रयोग जवळून पाहता आले. मी शाळेत करीत असलेले उपक्रम व विद्यार्थ्यांना देत असलेले अनुभव यांचे आकाश अचानक विस्तारले गेल्याचा मला अनुभव आला.
‘पाठ्यपुस्तकांचे अभ्यासक्रमातील स्थान’ या विषयावरचे किशोर दरक यांचे विवेचन ऐकले. माझेही विद्यार्थी नेहमी म्हणतात, ‘‘हे चित्र कशाचे? पाठ्यपुस्तकात आपल्याच परिसरातील चित्रे का नसतात?’’ या चित्रांची आपल्या परिसराशी सांगड घालून सांगण्यासारखा दुसरा पर्याय नसतो. मात्र संमेलनात वैशाली गेडाम यांनी सांगितलेला पाठ्यपुस्तके न वापरण्याचा पर्यायही उपलब्ध झाला. मी विद्यार्थ्यांशी चर्चा करून पाहिलेल्या अनुभवाचे पुस्तक तयार करण्याला लागलो आहे. संमेलनाने पर्यायी शिक्षणासाठीचे दरवाजे असे उघडले असल्याचे जाणवते.
हाच अनुभव प्रयोगशील शिक्षकांचे अनुभवकथन ऐकताना येत होता. या शिक्षकांनी समस्येलाच संधी बनवले होते. हलके फुलके विज्ञानाचे प्रयोग-कीट पासून ते सर्व शाळेचा ब्लॉग करण्यापर्यंत माहिती मिळाली. संमेलनानंतर गावी पोहोचून, तिथल्या शिक्षकांशी चर्चा करून मी लगेच एक शिक्षक अभ्यास मंडळ स्थापन केले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. नाविन्याची गरज असणारे शिक्षक सर्वच ठिकाणी असतात, हे या निमित्ताने लक्षात येत आहे.
शिक्षक म्हणून नेहमीच महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे वाढत्या वयातल्या मुलांच्या वर्तन समस्या आणि शिक्षण. पालकनीतीच्या संपादक डॉ. संजीवनी कुलकर्णी यांनी यावर जिवंत चर्चा घडवली. अनेक मुले-मुली बहुतांशवेळा या समस्यांचा सामना करीत असतात. संवाद साधणे व मोकळेपणा ठेवणे यातून या समस्यांवर काही मार्ग शोधण्याची दिशाही या संमेलनातून मला मिळाली आहे.
आदिवासी भागात असल्याने नेहमीच सामना करावा लागत असणारी बाब म्हणजे भाषा होय. बोलीभाषा व प्रमाणभाषा असा संघर्ष नेहमीच सुरू असतो. मात्र भाषा विषयातील गुणवत्ता आणि शिक्षण यावर नीलेश निमकर यांनी केलेल्या मांडणीतून मिळालेला आशावाद काम बरेच सोपे करून गेला. आपल्या बोलीभाषेत व्यक्त होणारे चेहरे प्रमाण-मराठीत गप्प असतात, म्हणून त्यांना बोलीभाषेत बोलते करून नंतर मराठीकडे वळवण्याचे काम आणखीन नवीन उपक्रमांनी करता येईल असे लक्षात आले.
संपूर्ण समजेवर आधारित गणित-शिक्षण पद्धतींची ओळख गीता महाशब्दे व डॉ. विवेक मॉंटेरो यांच्या ‘गणित विषयातील गुणवत्ता व शिक्षण’ या सत्रातून झाली. विद्यार्थी कोणत्याही परिसरातील असो त्याला वस्तु-भाषा, कृति-भाषा, चित्र-भाषा समजण्यास अडचणी निर्माण होत नाहीत. नेमके हेच हेरून तयार करण्यात आलेली पद्धत गणित शिकवणे सोपे करते.
या संमेलनात मानवतावादी शिक्षणाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना भेटता आले. सरकारी कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी असोत, स्वत: प्रेरणा घेऊन कार्य करणारे ध्येयवेडे शिक्षणप्रेमी असोत, शिक्षणाच्या परिवर्तनाकडे डोळस रीतीने पाहणारे शिक्षक असोत – या सर्वांचाच अनुभव आस व्यक्त करणारा होता. विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतांचा वापर रचनावादी पद्धतीने करण्याचा मोठा संदेश या संमेलनातून मिळाला आहे.

फुंदिलाल माळी,
कॉ. बी. टी. आर. हायस्कूल, मोड, नंदुरबार.
fundilalmali@gmail.com

प्रतिक्रिया ३
आमचं ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन हा एक आनंदोत्सव होता. व्हॉट्सऍपवर रोज चालणारा संवाद, शैक्षणिक चर्चा, वाद-विवाद, निकोप मतभेद आणि चेष्टामस्करी, कोपरखळ्या, गमती-जमती या सगळ्यामुळे हा अगदी छान स्नेहपूर्ण गट तयार झाला आहे. या गटातल्या सर्वांनी एकत्र यावं, प्रत्यक्ष भेटावं या हेतूनं हे संमेलन आयोजित केलेलं होतं. अभ्यासपूर्ण व्याख्यान, चर्चा, presentation सुरू झालं की सगळेजण एकदम अभ्यासू विद्यार्थी होऊन जात! लक्षपूर्वक ऐकणं , बघणं, योग्य तिथे दाद देणं, शंका विचारणं आणि प्रसंगी परखडपणे संयमानं विरोधी मत देखील नोंदवणं, आणि अधेमध्ये नेहमीच्या चर्चांमधला एखाद्या विनोदी संदर्भाचा उल्लेख करून थोडा हशा…अशा वातावरणात दोन दिवस शिकणं, स्वत:ला समृद्ध करणं चालू होतं.
दिवसभर अशी बौद्धिक मेजवानी झाली आणि रात्रीच्या जेवणानंतर एस.एम.जोशी सभागृहाच्या ऍम्फी थिएटरच्या पायर्‍यांवर मैफल जमली. परेशची शायरी, मीनानाथचं अप्रतिम चित्रकला प्रात्यक्षिक, अभिजितचे जपान भेटीचे अनुभव, काही मित्रमैत्रिणींच्या कविता, विनोदी चुटके आणि एकमेकांची धम्माल चेष्टामस्करी…. मध्यरात्र कधी झाली ते कळलं नाही! थोडीशी जी संकोचाची, औपचारिकतेची बंधनं होती तीपण गळून पडली.
कोणाचीही विशेष कामगिरी, कौतुक, वाढदिवस याप्रसंगी पुण्याची सुप्रसिद्ध मस्तानी देण्याची / प्रेमानं भांडून घेण्याची पद्धत आमच्या गटात आहे! (अर्थात virtually). ही मस्तानी इतकी प्रसिद्ध आहे की नंदकुमार सर यांना पण त्यांच्या भाषणात तो उल्लेख करण्याचा मोह टाळता आला नाही! (आणि मग त्यांच्याकडेच मस्तानीची जोरदार मागणी करण्यात आली. )
पुस्तकं , शैक्षणिक साहित्य यांची विक्रीकेंद्रं हीसुद्धा संवादाची ठिकाणं झाली होती. चांगली पुस्तकं, चित्रफिती, मासिकं यांच्याविषयी गप्पा आणि माहितीची देवाणघेवाण तिथं चालू होती. संजय टिकारिया न कंटाळता त्याच्या अभिनव शोधाची ‘माझी छोटीशी प्रयोगशाळा’ची माहिती प्रत्येकाला देत होते. तर टाचणी आणि एक छोटासा कागदाचा कपटा यांच्या मदतीनं डॉ. विवेक मोंटेरो काही प्रयोग दाखवून सगळ्यांना चकित करत होते!
हे संमेलन म्हणजे ‘मस्ती की पाठशाला’ होतं. जिथे धमालही होती आणि शिक्षणही!
सुजाता पाटील,
मुख्याध्यापिका, माध्यमिक विद्यालय, कुरूळ – अलिबाग
ppsujata@gmail.com