एका ध्यासाचा मागोवा


विनायक व सार्शा माळी
1001 व्या निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
डॉ. सुधीर कुंभार म्हणजे एक ध्येयवेडा शिक्षक, पर्यावरणप्रेमी आणि रयत विज्ञान
परिषदेचे समन्वयक. नुकतेच त्यांच्या 1001 व्या ‘निसर्गज्ञान साप्ताहिक
भित्तिपत्रका’चे प्रकाशन झाले.
निसर्गज्ञान हे भित्तिपत्रक तयार करणे हा कुंभारसरांच्या अनेक छंदातील एक छंद.
सन 1994 साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून गेली 28 वर्षे दर
रविवारी कुंभारसर हा अंक काढतात. आजवर या अंकांची संमेलनांत, शाळांत,
सामाजिक कार्यक्रमांत, शिबिरात हजारो प्रदर्शने लागली आहेत. प्रत्येक अंकात
निसर्गातील अद्भुत गोष्टी सोप्या-कल्पक भाषेत, फोटो व चित्ररूपात मांडलेल्या
असतात.
कुंभारसरांचा हा छंद अनेकांना वेडेपणाचा वाटतो. कुणाला हा वेळेचा अपव्यय
वाटतो. सगळे एका क्लिकवर उपलब्ध असताना ही भित्तिपत्रके कोण वाचते असेही
काही लोक म्हणतात. त्यांना सर हसून उत्तर देतात, ‘हे मी लोकांसाठी करत नाही.
माझी निसर्गाची समजूत अजून वाढावी यासाठी हे चालू आहे.’ एखादी गोष्ट
सातत्याने, चिकाटीने करत राहणे म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कुंभारसर!
कुंभारसर रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव मावळ, ढेबेवाडी ह्या शाखेत शिकवायचे.
गेल्या वर्षापासून ते सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कडेगाव येथील शाळेत
विज्ञान-शिक्षक आहेत. शाळेतले विद्यार्थी सोमवारची आतुरतेने वाट पाहत असतात.
कारण निसर्गज्ञानावर आधारित एक नवे भित्तिपत्रक शाळेत त्यांची वाट पाहत
असते.
प्रत्येक शाळेत एक सूचनाफलक असतो. तिथे विद्यार्थ्यांऐवजी सूचना देणार्‍या
कागदांचीच गर्दी बघायला मिळते. कुंभारसरांच्या शाळेचे चित्र मात्र वेगळे दिसते.
सरांनी तयार केलेले नवे भित्तिपत्रक वाचायला, समजून घ्यायला भोवती मुलांची
गर्दी असते.

भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुंभारसरांचे विज्ञानावर, निसर्गावर प्रेम आहे.
आपली ही आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्यासाठी त्यांनी हा भित्तिपत्रकाचा कल्पक
मार्ग शोधला. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे.
सरांचे अनेक विद्यार्थीही आता या भित्तिपत्रकांमध्ये आपणहून रस घेऊ लागले
आहेत. भित्तिपत्रक तयार करण्यात सरांना मदत करू लागले आहेत. कुणी अमुक
एखादा विषय घ्या, असा हट्ट करतो आणि सर तो पुरवतातही. भित्तिपत्रकाचा
विषय ठरवताना त्या आठवड्यात पर्यावरण व निसर्गाशी संबंधित दिवसाचा विचार
केला जातो. त्या दरम्यान असणारे सणवार, त्यांचे निसर्गाच्या दृष्टीने असणारे
महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो. त्याबाबत माहिती, फोटो ह्यांना पत्रकात
स्थान दिले जाते. त्यातून समाजप्रबोधनाचीही संधी घेतली जाते. उदा.
नागपंचमीसारखा सण जवळ आला असल्यास सापांबद्दल शास्त्रीय माहिती दिली
जावी, ह्यावर भर असतो. त्यांना दूध पाजणे कसे चुकीचे आहे, उंदीर, बेडूक हे
त्यांचे खरे खाद्य आहे, अशा विविध गोष्टी ह्या माध्यमातून सांगितल्या जातात.
फुलझाडे, औषधी वनस्पती, फुलपाखरे, पक्षीविज्ञान, घरटी, सर्पविज्ञान, जलसंपदा,
जलसाक्षरता, फटाके, वायू, ध्वनी, जलप्रदूषण, सस्तन प्राणी असे अनेक विषय
निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या निमित्ताने सादर केले गेले. यातील प्राणी, पक्षी, कीटक
आणि वनस्पती यांची माहिती तसेच शास्त्रीय नावे दिलेली असतात. महत्त्वाचे
म्हणजे ह्यातून दिल्या जाणार्‍या माहितीची सत्यता पडताळूनच संपूर्ण संदर्भ
दिलेले असतात. आणखी एक विशेष असे, की ह्यातील फोटो शक्यतो स्वतः
काढलेले असतात. काही वेळा इतर स्रोतही वापरले जातात. ह्यातील माहिती
सामान्य लोकांना कळावी यासाठी भाषा सोपी असावी, असा कटाक्ष असतो.
निसर्गज्ञान भित्तिपत्रकांचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी लावले जाते. उद्याने, शाळा,
महाविद्यालये, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, वनविभागाच्या कार्यशाळा, गणेश मंडळे,
पर्यावरण कार्यक्रम, अशा विविध ठिकाणी ही प्रदर्शने विनामूल्य लावली जातात. ही
भित्तिपत्रके तसेच इतर वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोचावी ह्यासाठी व्हाट्सपचे
गट केलेले आहेत. त्यावर दर आठवड्याला ही पत्रके तसेच इतर माहिती पाठवली
जाते. तसेच कुंभारसरांच्या फेसबुकपेजवरही ही भित्तिपत्रके बघायला मिळतात.

विद्यार्थ्यांच्या विज्ञानाच्या भुकेला खाद्य मिळावे म्हणून ‘वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी
विज्ञान-पंधरवडा’ हा अनोखा उपक्रम सरांनी सुरू केला आहे. पुस्तकांच्या पलीकडचे
विज्ञान समजून घ्यायचे, तर विद्यार्थ्यांनी प्रयोग करायला हवेत, हा त्यामागचा
मुख्य हेतू आहे. रयत शिक्षण संस्थेपुरताच हा उपक्रम मर्यादित आहे. डिसेंबर-
जानेवारीच्या आसपास शाळा आणि विद्यार्थी यांना सोयीचे होतील अशा पंधरा
दिवसात हा उपक्रम राबवला जातो. शाळा भरायच्या आत सकाळी 9 ते 11 पर्यंत
व्याख्याने, तज्ज्ञांशी गप्पा, विज्ञान-प्रयोग, शिवाय पोलीस ठाणे, रुग्णालय,
एमआयडीसीमधल्या कंपन्यांना भेटी असे विविध कार्यक्रम असतात. कधी सर्पमित्र,
पक्षिमित्रांकडून निसर्गातील अद्भुत गोष्टी समजून घेतल्या जातात. विज्ञान-
प्रदर्शनात कुंभारसरांची निसर्गज्ञान भित्तिपत्रके हे आकर्षणाचे केंद्र असते.
विज्ञान आणि निसर्गाच्या अभ्यासात महत्त्वाचा भाग म्हणजे निरीक्षणे आणि
सर्वेक्षणे. विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य विकसित व्हावे, यासाठी कुंभारसरांनी
विद्यार्थ्यांना गावातल्या वेगवेगळ्या गोष्टींची सर्वेक्षणे, निरीक्षणे करायला लावली.
त्यासाठी त्यांच्याकडूनच प्रश्नावली तयार करून घेतली. उदा. ढेबेवाडीमध्ये किती
पाणी वाया जाते याची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली. इतकेच नव्हे, तर त्यावर
उपाययोजनाही सुचवल्या. अशाच प्रकारे गावातील वाहनांची संख्या, इमारतींची
स्थिती, वीज, पाणी याविषयी विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणे केली आहेत. प्रत्यक्ष काम
करणार्‍या तज्ज्ञांशी गप्पा मारायला हव्यात, त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी.
त्यातून विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य वाढते. अहवाल-लेखन करण्याने विश्लेषण
करण्याचे, निष्कर्षाप्रत येण्याचे कसब विकसित होते. ह्यामुळे विद्यार्थ्यांनी छोटे
संशोधन करावे असा कुंभारसरांचा आग्रह असतो.
निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या चौकटीत न मावणार्‍या विषयांच्या, प्रकल्पाच्या सरांनी
पीपीटी बनवल्या आहेत. महाराष्ट्रातल्या देवराया, फटाक्यांचे दुष्परिणाम अशा
विषयांवर व्याख्यान देण्यासाठी ते महाराष्ट्रभर भटकंती करत असतात.
सरांनी आखलेल्या ह्या सूत्रबद्ध उपक्रमात अगदी पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी
सहभागी होतात. आपली जबाबदारी निवडतात, ती पारही पाडतात. माजी

विद्यार्थीही त्यात उत्साहाने सामील होतात. एकूणच या उपक्रमांतून कुंभारसरांच्या
मनातला विज्ञाननिष्ठ, निसर्गप्रेमी विद्यार्थी हळूहळू आकाराला येतो आहे.
विनायक व सार्शा माळी
vinayakmali90@gmail.com
sarshakumbhar1995@gmail.com
लेखक शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील विद्योदय मुक्तांगण परिवार या सामाजिक
संस्थेचे संस्थापक आहेत. ते ऊसतोडकामगारांच्या मुलांसाठी सेवांकुर साखरशाळा
अभ्यासकेंद्राचे आयोजन करतात.