एका सायकलीने चळवळ सुरू केली…

अ‍ॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने शाळेत मजेत सायकल पिटाळत जाणे त्याला फार आवडे. शाळेत पोचल्यावर सेंग इतर मुलांप्रमाणेच आपली सायकल बाहेर उभी करून ठेवे. एकदा काय झाले,  एका महिन्यात पाठोपाठ दोनदा सेंगची सायकल शाळेबाहेरून चोरीला गेली. पहिल्यांदा गेली, तेव्हा त्याच्या आईबाबांनी त्याला दुसरी घेऊन दिली; पण पुढच्या काही दिवसात ती देखील गेली.आता मात्र ह्या बिचार्‍या लहानग्याची गोष्ट कानोकानी गेली, शाळेतही सगळीकडे पसरली. शाळेतल्या मोठ्या वर्गातल्या मुलांनी मग ठरवलं, सगळ्यांनी मिळून निधी उभारायचा आणि सेंगला नवीन सायकल घेऊन द्यायची.वर्गावर्गात फिरून शिक्षक आणि मुलांकडून लवकरच त्यांनी 360 डॉलर जमा केले. त्यातून त्यांनी एक मस्त ‘माउंटन बाईक’ आणली आणि सेंगला शाळेत आल्यावर दिली. मुलांच्या ह्या स्नेहाळ वागणुकीने सेंग आणि त्याचे आईबाबा खूपच भारावून गेले. इतके, की ही स्नेहमालिका अशीच पुढे झिरपत ठेवण्याचे त्यांनी ठरवले.नवीन सायकलीच्या किमतीएवढी रक्कम म्हणजे 360 डॉलर त्यांनी ‘ऑफ द फ्रंट’ ह्या संस्थेला देणगी म्हणून दिली. ‘ऑफ द फ्रंट’ ही ज्या मुलांना सायकली घेणे परवडू शकत नाही अशांना सायकल घेऊन देणारी ‘ना नफा’ संस्था होती. ह्या रकमेतून तीन होतकरू मुलांना सायकली आणि हेल्मेटे मिळू शकली. म्हणजे बघा, एक मुलगा, त्याच्या दोन चोरी गेलेल्या सायकली – त्या कुणीतरी दोघे वापरत असणारच, शिवाय अनेकांची मदत, ह्यातून एकूण चार मुलांना नवीन सायकली मिळाल्या. ‘ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड…’ सेंगचे बाबा हसून म्हणाले.

स्रोत : http://www.huffingtonpost.in/entry/4-inspiring-stories-about-gifts-that-keep-on-giving_us_58262353e4b0c4b63b0c8811