करोना काळातील मुलांची भीती

अमृता गुरव

भीती ही एक आदिम आणि अतिशय नैसर्गिक भावना आहे. मनुष्याच्या
जन्मापासूनच ती त्याच्याशी जोडलेली असते. अगदी लहान बाळेही नवा चेहरा
दिसला किंवा मोठा आवाज झाला, तर घाबरून रडायला लागतात. अशा वेळी
स्पर्शातून, पाठीवर हात फिरवण्यातून मुलांना सुरक्षित वाटते. आपल्या आवडत्या
मित्रमैत्रिणींबरोबर खेळणे, गप्पा मारणे, मनसोक्त हुंदडणे यातून त्यांचा आनंद,
उत्साह, सकारात्मकता टिकून राहते. त्याचबरोबर कळत नकळत त्यांची भावनिक,
सामाजिक वाढदेखील होत असते. मार्च 2020 मध्ये आलेला करोना आणि
त्यापाठोपाठचा लॉकडाऊन, मुलांच्या या सामाजिक गरजांनाच कुठेतरी छेद देणारा
ठरला. एरवी अगदी सहज वाटणार्‍या या गोष्टी करणे करोनामुळे अवघड होऊन
बसले.
मी काम करते तिथे येणार्‍या, सोसायटीतल्या, शाळेतल्या अशा माझ्या संपर्कात
येणार्‍या सर्वच मुलांमध्ये लॉकडाऊननंतर खूप गोष्टी बदलल्या असल्याचे जाणवले.
बालभवनच्या गटात येणारे 3-4 वर्षांचे मूल साधारण चार-पाच दिवसांत रुळते,
आईला सोडून निवांत खेळू लागते हा आमचा नेहमीचा अनुभव. पण आई सोडून
जाऊ लागली, की रमा खूप जोरजोरात रडायची, किंचाळायची. जवळजवळ महिना
होत आला, तरी असेच चालू होते. रमाला वाटणार्‍या या भीतीवर काम करणे
गरजेचे होते. काही दिवस मग तिची आई तिचा हात धरून गटात खेळात सहभागी
झाली. नंतर आम्ही रमाला सांगितले, की आई आता गटात नाही थांबणार,
समोरच्या पायरीवर बसेल. रमा थोड्या थोड्या वेळाने जाऊन आई बसलेली
असल्याची खात्री करून घ्यायची. चार दिवसांनी आम्ही तिला सांगितले, की आपण
सगळे इथे खेळू आणि आई गेटबाहेर उभी राहून तुझा खेळ बघेल. साधारणपणे एक
आठवडा तिची आई बाहेर थांबत होती, अशी आईला सोडून गटात रुळायची तिची
भीती टप्प्याटप्प्याने कमी केली.

घरातली सोडून इतर माणसेच कधी बघितली नसल्यामुळे, आपल्या वयाच्या
मुलांमध्ये मिसळणे रमेशला खूप जड जात होते. इतर मुलांना बघून तो रडायचा,
चिडायचा, गट सोडून सारखा पळून जायचा. रमेशला नेमके काय करायला आवडते
हे आम्ही त्याच्या पालकांकडून जाणून घेतले. त्याला आवड निर्माण होईल असे
खेळ घ्यायला सुरुवात केली. रमाच्या बाबतचा अनुभव आम्हाला रमेशसाठीपण
वापरता आला.
मुलांना मुक्त ओरडू देणे असा एक गंमत-व्यायाम आम्ही छोट्या गटात घेतो. मुले
अगदी जीव खाऊन ओरडतात आणि याची मजा घेतात. पण मुलांच्या आवाजाची
कानाला सवय नसल्यामुळे खूपशी मुले घाबरली, कानावर हात ठेवून उभी राहिली.
आधी मुलांना मनापासून आवडणारा हा व्यायाम काही काळ आम्ही बंद ठेवला. त्या
ऐवजी ताईचे हात वर खाली जसे हलतात त्या पद्धतीने आवाज कमी-जास्त
करायचा असा त्यात बदल केला. ज्या मुलांना मोठ्या आवाजाची भीती वाटत होती,
त्यांनाही हा खेळ आवडला. काही दिवस हा खेळ खेळल्यावर मुले आता मोठ्या
आवाजाला सरावली आहेत हे लक्षात आले. काही दिवसांनी मुक्त ओरडण्याचा खेळ
पुन्हा सुरू केल्यावर मुलांची भीती बर्‍याच अंशी कमी झाल्याचे जाणवले. मग हा
व्यायाम गटात पुन्हा सुरू केला.
मोठ्या मुलांच्या गटात आम्ही एकमेकांचे हात धरून जोडीने करायचे व्यायाम किंवा
वाघशेळीसारखे खेळ घेतो. सुरुवातीला अमितला इतर मुलांचे हात धरायची भीती
वाटायची; तो अजिबात कुणाचा हात धरायचा नाही. जरा हाताला माती लागली
किंवा व्यायाम संपला रे संपला, की तो बॅगेतल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ
करायचा. नाकावर मास्क असला की पळताना दम लागतो म्हणून आम्ही मुलांना
मास्क खाली करून धावायला सांगायचो. पण कितीही दम लागला तरी बरीच मुले
मास्क लावूनच पळायची. फक्त पाणी पिण्यापुरता मास्क खाली करायची. शारीरिक
हालचालींवर मर्यादा आल्यामुळे त्यांचा दमसास कमी झाल्याचे दिसत होते. खो खो,
लंगडी असे खेळ खेळायला तर ती तयारच नसायची. कितीही अभिनव खेळ असला,
तरी पाच-दहा मिनिटातच बोअर होते आहे, कंटाळा आला आहे अशा तक्रारी सुरू
व्हायच्या. खेळताना किंवा गोष्ट ऐकताना मुलांचे अवधान आणि उत्साह टिकवून

ठेवणे अवघड होऊन बसले होते. खूप काळ काही नियमित दिनक्रम नसल्यामुळे
रोज इथे का यायचे असा प्रश्न मुलांना पडत होता.
श्वेता आणि वरद ही आतेमामे भावंडे. दोन्ही घरचे वातावरण एकाच पद्धतीचे.
आजीआजोबा म्हातारे असल्यामुळे करोनाकाळात घरातले सगळेच सतत चिंतेत
आणि घाबरलेले असत. आजीआजोबांना काही त्रास होऊ नये म्हणून कुणात
मिसळत नसत. स्वच्छतेच्या बाबतीतपण फार काटेकोर होते. त्यामुळे श्वेता
मुलांमध्ये मिसळून खेळत नव्हती. एकटीच आपल्या विश्वात रममाण असायची.
याउलट वरद मात्र आईबाबांच्या सततच्या सूचना, काळजी झुगारून देऊन मनसोक्त
खेळत-बागडत असायचा. साराला वाचनाची खूप आवड. न चुकता रोज
वाचनालयातून पुस्तक वाचायला घेऊन जायची. करोनाकाळात तिने घरातली सगळी
पुस्तके परत परत वाचून काढली. गट सुरू झाल्यावर सारा नेहमीसारखी
वाचनालयातून पुस्तके नेत नाही असे लक्षात आले. का म्हणून विचारले तर
म्हणाली, ‘‘ताई तेच तेच करून आता कंटाळा आला.’’ काही मुलांच्या बाबतीत सतत
तेच तेच करून त्या छंदाबद्दलच नावड निर्माण झाली. कित्येक दिवस मोकळ्या
मैदानात न खेळल्यामुळे सतत बैठ्या खेळांची अथवा ‘चला न काहीतरी क्राफ्ट करू’
अशी मागणी छोटी मुले सतत करत होती, याउलट मोठ्या मुलांना बसून अजिबात
काही करायचे नव्हते.
बोलण्यात अडचणी असणारी काही मुले सर्व वयोगटात असतातच. पण
लॉकडाऊननंतर मुलांमध्ये बोलताना येणार्‍या अडचणी वाढल्या होत्या. मोठ्या
मुलांशी संवाद साधताना, समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मग आपले मत
मांडताना किंवा गटात समोर येऊन बोलताना असे प्रश्न जाणवत होते.
कोविडकाळात स्क्रीनसमोर बसून शिक्षण झाल्याने चर्चेला फारसा वाव नव्हता.
घरात आईवडील कामात असल्याने कमी बोलणे अथवा खाणाखुणा करून बोलणे
असे घडत होते. तुम्हाला एखादा खेळ किंवा गोष्ट आवडली का असे विचारल्यावर
काहीजण हाताचा अंगठा वर-खाली करून दाखवत. तुम्हाला यातले नेमके काय
आवडले, काय आवडले नाही अशा चर्चा सुरू केल्या. त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे
विषय आवडता खाऊ, चित्रपट, गाणी अशी सुरुवात करून मुलांना लॉकडाऊनच्या

काळात काय वाटले, सतत घरात बसून कंटाळा येत होता का, त्यावर काय मार्ग
काढले अशा चर्चा मोठ्या मुलांच्या गटात घेतल्या. मुलांना खूप काही बोलायचे होते
हे या चर्चेतून अगदी जाणवत होते. त्यामुळे गटात आल्यावर पहिली दहा मिनिटे
गप्पा मारण्यासाठी
ठेवली.
शिनची तीनचाकी सायकल, गोष्ट आलियाच्या ग्रंथालयाची, तोत्तोचान अशा
पुस्तकांमधल्या काही प्रसंगांची मदत घेतली. कठीण प्रसंग आल्यावर न घाबरता
आलियाने आपली पुस्तके कशी वाचवली, आपण कशा पद्धतीने आपली भीती कमी
करू शकतो अशा गप्पा गटात मारल्या. ‘द लिटीलेस्ट रॅबिट’ नावाची सशाची एक
सुंदर गोष्ट आहे. आपल्या भीतीवर सशाने कशी मात केली ते ह्या गोष्टीत
उलगडून दाखवले आहे. अशी थेट विषयाला भिडणारी किंवा ‘मूल सार्‍या गावाचं’,
‘सिंह आणि चिंगुली चिमणी’, ‘महागिरी’ अशी नातेसंबंध उलगडून दाखवणारी
पुस्तकेपण वाचली. स्वतःची आवश्यक ती काळजी घेत आपण खेळाचा आनंद कसा
घेऊ शकतो यावर गप्पा मारल्या.
निसर्गाच्या जवळ जाणे हेदेखील मुलांना तितकेच शांत करणारे आणि आनंद देणारे
असते. त्यामुळे आजूबाजूला दिसणार्‍या फुलपाखरांचे निरीक्षण, पक्ष्यांसाठी पाणी
ठेवणे, बागेला पाणी घालणे, मातीकाम करणे, मातीवर चित्रे काढणे, पाने, फुले,
काड्या यापासून चित्र तयार करणे असे निरनिराळे उपक्रम घेतले. मुलांमध्ये
निर्माण झालेली भीती कमी व्हावी यासाठी कला-संवादाचे माध्यम वापरले. कोविड
असो किंवा नसो, आवश्यक स्वच्छता ठेवणे, चांगल्या सवयींचे महत्त्व असे रोल प्ले
करत, वेगवेगळी पुस्तके वाचून दाखवत त्यांच्यात विश्वासाचे आणि प्रेमाचे बीज
लावण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो.
करोनाच्या काळात मुलांच्या मनात निर्माण झालेली स्पर्शाची, मृत्यूची, चारचौघात
मिसळण्याची, आपले सुरक्षित ठिकाण सोडून नवीन ठिकाणी जाण्याची,
घरातल्यांव्यतिरिक्त इतरांवर विश्वास ठेवण्याची, काही काळ त्यांच्याबरोबर
थांबण्याची अशा अनेक प्रकारच्या भीती मुलांच्या मनात अजूनही दबा धरून
बसलेल्या आहेत, असे लक्षात येतेय. आताशा मुले सतत हात धुवत राहण्याच्या,

मास्क लावण्याच्या सवयीतून बाहेर पडून मातीत खेळण्याचा, गवतावर लोळण्याचा
आनंद घेताना दिसताहेत. त्यांना आवश्यक तेवढा वेळ देत या सगळ्यांत आपण
त्यांच्याबरोबर आहोत हा दिलासा मिळत राहणे महत्त्वाचे!
(लेखातील मुलांची नावे बदलली आहेत. छोटी मुले म्हणजे साधारण वयोगट 3 ते 6
आणि मोठी म्हणजे 7 ते 12 असे गृहीत धरलेले आहे.)

अमृता गुरव
amruta.gurav@gmail.com
लेखक संगणक अभियंता आहेत. मुलांचे शिक्षण आणि पर्यावरण ही त्यांची आवडती
क्षेत्रे असून त्यांना मुलांबरोबर काम करायला आवडते.