काही शिकले… काही चुकले…

स्मिता पाटील

आनंदीआई – तर महाराजाऽऽऽ मला काही सांगायचं आहे.
प्रियेशबाबा – बोल महाराजाऽऽऽ आज कुठली कहाणी सांगायची ठरवलीस?
आनंदीआई – महाराजा ही कहाणी आहे पालकनगरीची. या नगरात प्रजा तशी
सुखानं नांदत होती. म्हणजे अडचणी, संकटं येत होतीच; पण त्यावर आपापला
मार्ग काढून एकमेकांच्या सहकार्यानं लोक जगत होते. आणि अचानक…
प्रियेशबाबा – अचानक काय झालं महाराजा?
आनंदीआई – अचानक एक महाभयानक संकट त्या नगरीवर आलं आणि सगळे
हवालदिल झाले. आजपर्यंत बघायला मिळालं नव्हतं ते बरंच काही समोर आलं. ते
संकट होतं करोना महामारीचं. बघता बघता रस्ते ओस पडले, घरं बंद झाली.
कामाची ठिकाणं बंद झाली. लोकांच्या मनात भीतीनं थैमान घातलं. भीती अनेक
प्रकारची होती. त्यात एक भीती होती मुलांच्या शिक्षणाचं काय होणार ह्याची.
प्रियेशबाबा – होय महाराजा, आणि ती भीती खरी ठरली की! आत्ता आपण बघतोच
आहोत की मुलांच्या शिक्षणाचं किती प्रकारे नुकसान झालंय ते.
आनंदीआई- हो हो हो होऽऽऽ! एवढंच नाही काही. पालकनगरीमध्ये काही पालक
होते, ज्यांना मुलांच्या शिक्षणाचं खूप नुकसान होतंय या विचारानं झोप लागेना.
अजूनही त्यांच्या मनात भीती आहेच; पण परिस्थितीशी जुळवून घेणं हा माणसांचा
धर्मच आहे. त्यामुळे काही लोक म्हणायला लागले, शाळेतलं शिक्षण म्हणजे सगळं
काही नसतं हो. जीवनशिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
प्रियेशबाबा – जीवनशिक्षण? मला नाही कळलं. जरा उलगडून सांगणार काय?
आनंदीआई- पालकनगरीतली मुलं करोनाकाळात काय काय शिकली आणि
आयुष्यभरासाठी हे शिक्षण कसं उपयोगी ठरणार आहे हे आज मला सांगायचं आहे.
या काळात शाळा बंद झाल्या होत्या त्यामुळे वरच्या इयत्तेतल्या मुलांना शाळेचं
महत्त्व पुरेपूर कळलं. एकत्र खेळण्याचं, समवयस्कांबरोबर मैत्रीचं महत्त्व कळलं.

प्रियेशबाबा – होय खरंय बघ. जे सहज मिळत असतं त्याची तेव्हा जाणीव होत
नसते.
आनंदीआई – सगळे घरात अडकून बसल्यामुळे एकमेकांशी जुळवून घेणं, संवाद
साधणं झालं. एरवी कामाच्या रगाड्यात एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा नाही
तिथे गप्पांचे फड रंगले. वेगवेगळे विषय घेऊन चर्चा रंगल्या. आपण एकत्र येऊन
चांगला संवाद साधू शकतो, हे बर्‍याच जणांना नव्यानं कळलं. घरातले सगळे एकत्र
येऊन बैठे खेळ खेळायला लागले. अनेक नवनवे खेळ मुलांनी तयार केले. जुन्या
खेळांना उजाळा मिळाला. काचापाणी, सापशिडी, लंगडी, ठिकरी, व्यापार, कॅरम, पत्ते
आणि असे पुष्कळ खेळ सगळे एकत्र खेळू लागले. आहेत त्या गोष्टी मुलं पुरवून
वापरायला शिकली. कारण दुकानं काही वेळच उघडी असायची. त्यामुळे आणलेलं
सामान पुरवून वापरायचं, अन्न वाया घालवायचं नाही हे सगळं मुलांना कळलं.
काही गोष्टी मिळत नव्हत्या, तर त्याशिवायही जगता येतं हे कळलं. घरातले सगळे
सतत एकत्र होते. एकत्र मिळून काम करणं, घरातल्या कामांची जबाबदारी घेणं
याची मुलांना सवय लागली. काही घरांमध्ये मुलांनी नवीन पदार्थ केले. नवीन
कलाकृती बनवल्या. टाकाऊ गोष्टींतून टिकाऊ वस्तू तयार झाल्या. एकमेकांसोबत
खूप छान वेळ घालवला.
एका घरामध्ये सगळ्या नातेवाइकांना फोन करून गप्पा मारणं सुरू झालं आणि
आता ‘बॅक टू नॉर्मल’ काळातही त्या गप्पा सुरू आहेत. जवळच्या, दूरच्या
नातेवाइकांशी चांगलं नातं तयार झालं. मुलांना आणि पालकांना खूप ऑनलाईन
उपक्रम करता आले. खूप नवीन नवीन शिकता आलं, ज्ञान मिळवता आलं. मुलांना
स्वच्छतेच्या सवयी लागल्या. ती स्वतःची कामं स्वतः करणं शिकली. पदार्थ
करण्यातून स्वयंपाकघरातलं विज्ञान-शिक्षण मिळालं.
प्रियेशबाबा – एक मिनिट, स्वयंपाकघरात विज्ञान-शिक्षण? जरा उलगडून सांग.
आनंदीआई – फोडणी म्हणजे काय, पोळी मऊ होते आणि फुगते म्हणजे नक्की
काय होतं, पाणी उकळत असताना काय होतं, दुधाचं दही होताना काय प्रक्रिया
घडते या आणि अशा सगळ्या गोष्टींमधून विज्ञान शिकता येतं. स्वयंपाकघर ही
विज्ञानाची प्रयोगशाळाच असते. थोडं लक्ष दिलं की कळतं हो सगळं.

प्रियेशबाबा – पुरे पुरे. कळला टोमणा.
आनंदीआई – गंमत रे. याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना खूप काही गोष्टी
शिकता आल्या. नवीन कौशल्यं आत्मसात करता आली. तंत्रज्ञानाची मदत घेऊन
खूप चांगलं चांगलं पाहता आलं, ऐकता आलं. मुलं स्वतःचं मन स्वतः रमवायला
शिकली. काही घरांमध्ये मुलांचं वाचन वाढलं, एकाच शब्दाला किती वेगळे अर्थ
असतात हे कळलं. एकाच अर्थाचे आणि अर्थच्छटांचे वेगळे शब्द कळले.
शब्दसंपत्तीत वाढ झाली.
काही घरांमध्ये मात्र दुर्दैवानं आजारानं थैमान घातलं आणि माणसं गमावली. मुलं
या सगळ्याशी भावनिक पातळीवर सामना करायला शिकली. काही मुलांनी भीतीवर
मात केली. आयुष्यातलं एक सत्य काही मुलांना खूप लवकर कळलं. शिक्षणाचा
व्यापक अर्थ समजून घेता आला. शिक्षण हे घरात, बाहेर, शाळेत सगळीकडे सतत
मिळत असतं हे उमगलं. आपण मात्र फक्त शाळेशी त्याला जोडलं त्यामुळे घोटाळा
झाला बघ सगळा.
प्रियेशबाबा – बास बास, कळलं मला. फक्त चांगलं ऐकायला छानच वाटतंय. इतकं
सगळं छान झालं हे बरं झालं. मला कळलं ते. पण सगळंच काही फक्त गुडी गुडी
नाही झालं बरं.
आनंदीआई – कळलं मला तुझ्या मनात काय आहे ते. येणारच आहे मी त्या
गोष्टीकडे. स्क्रीनटाईमबद्दल तुझ्या मनात प्रश्न आलाय ना?
प्रियेशबाबा – हो ना.
आनंदीआई – मलापण याची खूप काळजी वाटते बरं. या काळात मुलांचा
स्क्रीनटाईम प्रचंड वाढला, त्याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. अनेक
पालकांना ही समस्या चांगलीच जाणवते आहे; मात्र याचं उत्तर त्यांनी शोधायचं आहे
आणि तसं कामसुद्धा करायचं आहे.
अनेक घरातील पालकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे खूप
अडचणींचा पालकांना सामना करावा लागला. अनेक पालकांना घरून काम करावं
लागलं. दिवसभर घरात असूनही कामाच्या गडबडीत मुलांना वेळ देणं शक्य नसे.
सगळे घरात असल्यामुळे आणि मदतनीस नसल्यानं कामं वाढली. काम,

जबाबदार्‍या, आर्थिक विवंचना असा बराच ताण पालकांना सोसावा लागला. त्याचे
परिणाम मुलांच्या मनावरपण झाले. ज्या घरांमध्ये ताण-नियोजन जमत होतं, तिथे
बर्‍याच गोष्टी सुकर झाल्या; पण जिथे याची जाणीव नव्हती तिथे आणखी
अडचणी निर्माण झाल्या. आणखी महत्त्वाचं म्हणजे काही मुलांना शाळा हे सुरक्षित
ठिकाण वाटायचं, ते ठिकाण बंद झाल्यामुळे काय काय झालं याचा विचार करूनही
अंगावर शहारा येतो.
प्रियेशबाबा – काय बोलते आहेस तू?
आनंदीआई – हो रे. ज्या मुलांचा घरात वेगवेगळ्या प्रकारे छळ होतो त्यांना शाळेत
जाणं हा दिलासा असायचा, त्यांचं काय?
प्रियेशबाबा- अग, भयंकर आहे हे. हा एक नवीनच मुद्दा कळला मला.
आनंदीआई – जाता जाता सांगायचं आहे ते म्हणजे शैक्षणिक पातळ्यांवर मुलांनी
काही टप्पे कमी गाठले असतील; पण जीवनशिक्षणाचे आयुष्यभर उपयोगी पडणारे
अनेक पुढचे टप्पे मुलांनी या काळात गाठले. कितीतरी अनुभव त्यांना मिळाले.
अनुभव-शिक्षणाच्या पातळीवर बरीच मुलं वरच्या टप्प्यांवर पोचली आहेत हे
नाकारून चालणार नाही.
प्रियेशबाबा – हो, अनुभव-शिक्षण खरंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या अवघड काळात
मुलं बाकीचं जे शिकली त्याचा उपयोग त्यांना होणारच आहे.
हो, पण आणखी एक घडतं आहे. पुन्हा सगळं सुरळीत झाल्यावर आपण काय काय
करू शकलो नाही, काय काय मिळू शकलं नाही म्हणून आता काही लोक जे करत
सुटलेत त्यानं पर्यावरणाचं नुकसान पुन्हा व्हायला सुरुवात झालीय. मधल्या
काळाची शिकवण सोडून काही लोकांची पुन्हा चंगळवादाकडे वाटचाल सुरू झालेली
दिसतेय.
आनंदीआई – हो अनेक ठिकाणी. हॉटेलमध्ये अन्नाची नासाडी, पर्यटनाच्या ठिकाणी
कचरा अशा अनेक गोष्टी परत दिसायला लागल्या आहेत. मधल्या काळात जी
जाणीव झाली होती ती आता पुन्हा नाहीशी झाल्याचं चित्र दिसतंय आणि हे फार
भयंकर आहे.

तर या झाल्या मला दिसलेल्या गोष्टी. आणखी वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव
वेगवेगळं काही सांगत असतीलच… तेही जाणून घ्यायला हवेत आपण. म्हणून
महाराजा, अजून शोधून काढू मुलं काय काय शिकली ते! जरा विचार कर तूसुद्धा.
अशी ही पालकनगरीची कहाणी अजून सुफळ संपूर्ण होतेय बरं का.
स्मिता पाटील
smita.patilv@gmail.com
लेखक स्वतंत्र पत्रकार व संवादक आहेत. ‘पालक अभ्यास मंडळा’च्या संस्थापक
संचालक आणि पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य आहेत.
(हा लेख लिहिताना स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशनच्या ‘मुलांसोबत वाढताना’ या पालक
अभ्यास मंडळातील काही पालकांच्या चर्चेतील मुद्द्यांचा उपयोग झाला. 0 ते 25
वयोगटातील मुलांच्या पालकांचे हे अभ्यास-मंडळ आहे.पालक आणि मुलांसाठी इथे
वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.)