दुकानजत्रा ही नुसती “जत्रा” कधीच नसते. सगळ्या वयोगटातील मुलं त्यातून वेगवेगळ्या प्रकारे खूप काही शिकत असतात. कागद कामाची कात्री नीट धरता येणे व ती काळजीपूर्वक वापरता येणे , पणत्या रंगवताना रंग आणि ब्रश कौशल्याने वापरता येणे इथपासून ते खाऊचा स्टॉल लावायचा म्हंटल्यावर प्रत्यक्ष त्या पदार्थांच्या गाडीवर जाऊन पदार्थ चाखून बघणे, तो अनेक वेळा बनवून त्याचे आयत्या वेळचे व्यवस्थापन शिकणे अशी खरोखर शेकडो कामं मुलं जीव ओतून करत होती. लागेल तिथे लागेल त्याप्रमाणे ताया मार्गदर्शन करत होत्या. मुलं गटात काम करुन एकमेकांच्या मदतीने खूप काही शिकत होती. वस्तू तयार झाल्यावर त्यांच्या किमती ठरवताना खूप कस लागला. शेवटी एकदाचा तो दिवस आला आणि उत्साहात पार पडलाही; पण तरीही अजून एक मोठं काम बाकी होतं ते म्हणजे जमा झालेल्या पैशांचा हिशोब करणं. किती वस्तू बनवल्या होत्या, किती विकल्या गेल्या, कशाची किंमत अजून जास्त ठेवली असती तरी चालली असती वगैरे वगैरे मुलांशी बोलणं खूप गरजेचं होतं. दुकानजत्रेनंतर सगळ्याच वर्गताईंनी हा विषय आपापल्या वर्गात घेतला. त्या निमित्ताने बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या सगळ्यांची शाब्दिक गणितं मुलांनी मांडली. काहींना प्रत्यक्ष पैसे नीट मोजता आले तर काहींना शिकावे लागले. नफा तोटा काढला. काही काही बाबतीत झालेला तोटा बघून थोडं हिरमुसायला झालं. नफा बघून आनंद वाटला. ‘हे दोन्ही स्वीकारायची तयारी’ याबद्दलही बोलणं झालं. ‘जमा झालेल्या पैशांचं काय कारायचं?’ ‘किती आणि कसे खर्च करायचे’ या बदल अनेक मतं मांडली गेली.दुकानजत्रेचं झकास चित्रंही काढलं मुलांनी. इतकी intresting प्रक्रिया झाल्याने कुणाला कंटाळा येण्याचा प्रश्नच नव्हता.