खेळघर मित्र – पुस्तकपेटी
वस्तीत काम करताना मुलांइतकेच पालकांबरोबर देखील काम करणे देखील महत्वाचे आहे. मुलांसोबतचे काम जितके आव्हानात्मक तितकेच पालकांसोबतचे!
लक्ष्मीनगर झोपडवस्तीतील निम्न आर्थिक स्तरातील या पालकांचे प्रश्नही अतिशय गुंतागुंतीचे आहेत.
खेळघराच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आता काही पालक जोडले गेले आहेत.
पोटापाण्यासाठी घरकाम करणाऱ्या असोत वा घरीच स्वतःचे छोटे छोटे उद्योग करणारे असोत आपलं मूल शिकावं यासाठी बऱ्याचशा आई पालक आता विशेष काळजी घेताना दिसतात.
खेळघरात वाचनाला खूप महत्त्व दिले जाते. पुस्तकांना पाय फुटावेत आणि त्यांनी मुलांच्या जवळ जावे म्हणून गेल्या वर्षी ‘पुस्तक पेटी’ या उपक्रमाला सुरुवात झाली.
दहा महिलांनी त्यांच्या घरी छोटी वाचनालये सुरू केली. पण काही काळाने सुरवातीचा उत्साह जरा कमी झाला आणि वाचनालये सुरू ठेवण्यात अडचणी येऊ लागल्या.
मग सारिका जोरी, मीना वाघमारे आणि सुषमा यादव या प्राथमिकच्या शिक्षिकानी पुढाकार घेतला आणि पुस्तकपेटीचे काम पुढे नेण्यासाठी एका प्रशिक्षणाची आखणी केली.
पुस्तकांच्या निमित्ताने मुलांसोबत खेळ, गाणी, चित्रे अशा काय काय activity घेता येतील याची प्रत्यक्षिकं झाली. पुस्तक कसं वाचावं याचंही प्रात्यक्षिक वंदना कुलकर्णी यांनी दिलं.
प्रशिक्षणाची जबाबदारी शिक्षकांच्या मदतीने शुभदा जोशी यांनी घेतली होती. जुन्या पालकांसमावेत काही नव्या पालकांनी देखील पुस्तक पेटीची जबाबदारी घेतली. नव्याने शिकण्याचा उत्साह आणि इथे मिळालेल्या अनुभवाचा आनंद त्यांच्या देहबोलीतून अगदी सहज व्यक्त होत होता. खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, संवाद, कला या सगळ्याला स्पर्श करत कार्यशाळा चांगली पार पडली.
अत्यंत कठीण परिस्थितीत देखील या महिला हे काम स्वयंसेवी पद्धतीने करत आहेत ही फार कौतुकाची गोष्ट आहे.