गुंतागुंत उकलताना

मुक्ता गुंडी

सामाजिक आरोग्य या विषयात पी.एच.डी. करत आहेत.

पौगंडावस्थेतल्या मुलांचं आयुष्य केवढं गुंतागुंतीचं असतं! एकीकडे स्वतःची नव्याने होणारी ओळख, जगाची नव्याने कळत जाणारी ओळख, तरीही मनात लपून असलेली निरागसता, दर क्षणाला धडका मारणारे प्रश्न, स्वतःला लहान म्हणू की मोठं यात गोंधळलेलं मन.. असं आणि यापलीकडचं बरंच काही या वयात घडत असतं. मुली आणि मुलगे कोणत्या अनुभवातून जात असतात, त्याचा त्यांच्या मनाशरीरावर काय परिणाम होत असतो, हे एकमेकांना माहीत असतं का, पालक आणि शिक्षक यांना हा सगळा नाजूक अनुभव समजावून सांगताना काय अडचणी येतात, असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी सामाजिक आरोग्यसंशोधक या नात्यानं नाशिकमधल्या काही शाळांना गेल्या वर्षभरात भेटी दिल्या, काही मुलांमुलींशी त्यांच्या घरी जाऊन बोलले. तेव्हा जाणवलं की त्यांच्या मनातली मासिक पाळीबाबत असलेली सगळी उत्सुकता दाबली जाते किंवा ती निर्माणच होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. बहुतांश शिक्षक आणि पालक मुलांमुलींच्या प्रश्नांना ‘मोठा झालास की आपोआप कळेल’ असं उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेतात. कित्येक शाळांमध्ये मुलग्यांना आणि मुलींना वेगवेगळ्या गटात बसवून मुलींना फक्त मुलींपुरती मर्यादित आणि मुलग्यांना फक्त मुलग्यांपुरती अशी मर्यादित माहिती दिली जाते. मानवी प्रजनन संस्थेविषयीची पाठयपुस्तकातली माहिती बहुतांश शाळांमध्ये शिकवलीच जात नाही. एका बाजूला मुलीला ‘आता मोठी झालीस’ असं सांगितलं जातं आणि याच वयात मुलग्याला मात्र त्याच मासिक पाळीविषयी माहिती कळायला ‘तू अजून लहान आहेस’ असं ऐकवलं जातं. अशा गोंधळाच्या वातावरणात एक सुखद अनुभव आला तो नाशिकच्या आनंद निकेतन या शाळेमध्ये. 

या शाळेतल्या आठवी-नववीच्या बहुतेक सर्व मुलांना आणि मुलींना मासिक पाळीसंबंधी मूलभूत शास्त्रीय माहिती होती. फक्त माहिती असून पुरत नाहीच. त्याहूनही महत्त्वाचं असतं ते विचार करणं. या शाळेतल्या मुलामुलींनी गटचर्चेत कित्येक प्रश्न विचारले – पॅड आणायला मुलींना लाज का वाटते;  माझ्या काकूला मी वेगळं बसताना पाहिलं आहे, तसं का; देवीला पाळी येतच असेल की, मग देवी वेगळी कुठे बसते; बहिणीच्या पोटात दुखत होतं; मला कळलं की पाळीमुळे दुखतंय,पण ती आईच्या कानात जाऊन बोलली. मी डॉक्टरकडे येऊ का, विचारलं पण तिनं नाही नेलं मला; असे कित्येक अनुभव या शाळेतले मुलगे मोकळेपणाने मांडत होते. शाळेत होत असलेल्या आत्मभान शिबिराचा ह्या मोकळेपणात महत्त्वाचा वाटा आहे, हे तर खरंच;  परंतु आत्मभान शिबिराचा अनुभव अजून नसलेल्या, आठवीत नुकत्याच गेलेल्या मुलामुलींमध्येही हा मोकळेपणा बऱ्याच प्रमाणात होता, हे पाहून फार आश्चर्य वाटलं. म्हणजे केवळ शिबिर नाही तर शाळेतलं एकूणच मोकळं वातावरण, प्रश्न विचारायला मिळणारं प्रोत्साहन, कुतूहल शमवण्यासाठी दिलं जाणारं सहकार्य या सगळ्याचा या मोकळेपणा येण्यात वाटा असणार! 

आनंदनिकेतन शाळेचा अनुभव खूप सुखद असला तरी इतर अनेक शाळांत गेल्यावर राहून राहून वाटत होतं की आनंद निकेतनसारखी शाळा ही केवळ एक पणती आहे. शाळेची शिक्षणपद्धती आणि दृष्टिकोन दुर्मिळ आहे, तो तसा दुर्मिळ न राहता महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षणाचा सहजभाव व्हायला हवा! 

mukta.gundi@iitgn.ac.in