गेल्या अंकांविषयी वाचक म्हणतात…

जानेवारी 2018:

पालकनीती चा अंक खरंच देखणा झालाय. विषय अगदी महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व बाजूने विचार झालाय. भेट म्हणून पत्रं हे तर खूपच आवडलं. ‘गिफ्ट कल्चर’ चा पर्यावरण वादी उहापोह आवडला. मुलासाठी किंवा मुलींसाठी भेट घेताना आपण कसा विचार करतो हेही मस्त मांडलंय. – आनंदी

अंक नाही आवडला. अभ्यास कमी वाटला. वरवरचा वाटला. पुन्हा पुन्हा वाचू असा वाटला नाही. जपून ठेवावा असा वाटला नाही.  – पल्लवी

मला अंकांमधली विविधता आणि मुखपृष्ठ आवडले. लेखक पण किती वेगवेळ्या पार्श्वभूमीचे आहेत! – अद्वैत


फेब्रुवारी 2018:

‘आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण’ वाचून व्हाट्सऍपचं ‘अ‍ॅडिक्शन’ कमी करायचं ठरवलंय. लेख आवडला. -जेसिका मयूर

अंक ‘पॅट्रनायझिंग’ वाटला. म्हणजे सगळे चुकीचंच करतात असं गृहीत धरून काढलेला. छान छान सकारात्मक लिहा की! -मंदार गाडगीळ

‘मी तुमच्याहून भारी आहे’ असं वाटवून देणारे होते बऱ्यापैकी सगळेच लेख. कुठल्यातरी उंच स्टेजवरून भाषण दिल्यासारखे. एखादा लेख तसा, म्हणजे मूल्याधारित (value based) आणि इतर जरा रचनात्मक (constructive) असते तर जास्त आवडला असता अंक. रचनात्मक लेखाचं उदाहरण: तिसरी-चौथीची शाब्दिक गणितं (word problems) ‘साधी वजाबाकी येत नाही तुला!’ अशी चिडचिड न करता मुलांना कशी शिकवता येतील ह्यावर काहीतरी. – अनिरुद्ध खडके

हे वाचून कुणी मुलांशी असं वागायला लागेल असं नाही वाटत. दीर्घकाळ वाचून कदाचित काही परिणाम होऊ शकतो. आधीपासूनच मुलांना असंच वाढवणाऱ्यांसाठी हे ठीके. स्वतःच्या पाठीवर आश्वस्त थाप मारून घेतल्यासारखं. जरा ‘लोअर मिडल क्लास’ किंवा ‘आयटी सेक्टर’ मध्ये साधं ‘नॉर्मल’ असतं आयुष्य. प्रातिनिधिक कुटुंब म्हणून ते असू शकतात. – निनावी


मार्च 2018:

जगण्याशी जोडलेलं तत्वज्ञान, आकडेवारी, कायदा आणि लिंगभेद मेंदूला खाद्य मिळालं! आजी-आजोबा आणि नातवंडं ह्याबद्दलचे प्रश्न वाचून काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली. –श्रीयश शेटे

शब्दकोश मधून नवीन माहिती कळाली. आईमाणूस-बापमाणूस खूप आवडला. जगण्याशी जोडलेलं तत्वज्ञान पण चांगला आहे. बाकी लेख ठीक वाटले. –प्राजक्ता जोशी