गोष्ट एक – दृष्टिकोन अनेक: इस्मत की ईद

आपल्या आसपास कुठेही बघा, निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या मुलांच्या खेळण्याच्या जागा, वस्तू विकत घ्यायला जायची दुकानं, एवढंच काय, त्यांच्या शाळाही वेगवेगळ्या असतात असं दिसतं. त्यांचा आपापसात संबंध येण्याचे, एकमेकांच्या भावविश्वात डोकावून बघण्याचे प्रसंग दूरान्वयानंही येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात कुठलीही वैचारिक देवाणघेवाणही घडून येत नाही. खरं तर, मुलांना विविध प्रकारचे जीवनानुभव मिळणं खूप गरजेचं आहे. समाजातल्या निरनिराळ्या लोकांबद्दल, समूहांबद्दल मुलांना समजायला हवं, म्हणजे त्यांच्याबद्दल संवेदनशीलतेनं विचार करणं घडू शकेल. मुलांना पुस्तकं उपलब्ध करून दिल्यास अशा अनेक सांस्कृतिक-सामाजिक परिसराची त्यांना ओळख होण्यास आपोआपच मदत होईल. पुस्तकासारख्या सुरक्षित माध्यमातून विचारांचं आदानप्रदान होणं आणि एकमेकांची जीवनशैली जाणून घेणं शक्य आहे. पुस्तक वाचून त्यावर चर्चा घेतल्यास मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय, ती काय विचार करताहेत हेही जाणून घेता येईल आणि आवश्यक तिथे त्यांच्या विचारांना विधायक वळणही देता येईल.

‘इस्मतकी ईद’ह्या तुर्की कथेच्या निमित्तानं आलेले काही अनुभव तुमच्यासमोर मांडू इच्छिते. या कथेच्या मूळ लेखक आहेत फौज़िया विलियम्स. हिंदीत तिचा अनुवाद राजेश उत्साही ह्यांनी केला असून या पुस्तकाला चित्रसाज चढवलाय प्रोइती राय यांनी.

ही गोष्ट मी दोन निरनिराळ्या वाचनालयात मुलांना सांगितली. गोष्ट मुस्लीम वातावरणातली असल्यानं आधी मी ती बसेरा ह्या वाचनालयात सांगितली. इथे येणारी सगळी मुलं मुस्लीम आहेत. त्यामुळे गोष्टीतल्या व्यक्ती, प्रसंग ह्यांच्याशी त्यांना पटकन जोडून घेता आलं.

गोष्ट सांगायला सुरुवात करताना मी मुलांना पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखवलं, कथेचं शीर्षक मी झाकून घेतलं होतं. मग त्यांना विचारलं, ‘‘सांगा बघू, काय असेल ह्या गोष्टीत?’’

त्यावर एक मुलगा म्हणाला, ‘‘ह्या माणसानं टोपी घातलीय आणि चित्रात गालिचाही दिसतोय, त्याअर्थी हा आता नमाज पढणार असेल.’’

दुसरा म्हणाला, ङ्ग‘ही एका शिंप्याची गोष्ट असणारे.’’ बाकीच्या मुलांनीही त्याला दुजोरा दिला. मग मी त्यांना गोष्टीचं नाव सांगितलं, ‘इस्मतकी ईद’. मग म्हटलं, ‘‘आता सांगा बरं, ह्या गोष्टीत काय असेल?’’

ह्यावेळी जास्त मुलांकडून प्रतिसाद मिळाला. कुणी म्हणालं, ‘ईदसाठी कपडे शिवून घ्यायला सगळे ह्याच्याकडे येतील’, कुणाचा विचार, ‘इदेला सगळे नवीन कपडे शिवतात. हा शिंपी असल्यानं इदेच्या दिवसात ह्याची खूप कमाई होईल आणि मग हा आनंदात ईद साजरी करेल’ असा होता.

एक मुलगा म्हणाला, ‘इस्मत ह्याची मुलगी असेल.’ एक लहानगी म्हणाली, ‘ताई, हा इतरांचे कपडे शिवण्याच्या नादात स्वतःसाठी काहीच घेणार नाही.’ तिचं उत्तर गोष्टीच्या जवळ जाणारं होतं म्हणून मग मी गोष्ट पुढे सांगायला सुरुवात केली. मुलांनी आतलं पहिलं चित्र पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की इस्मत चपला शिवण्याचं काम करतो. त्यांना ते जरा विचित्र वाटलं. त्यांचं म्हणणं, ‘आमच्या आजूबाजूला तर कुणी मुसलमान हे काम करत नाहीत.’

मी त्यांना म्हटलं, ‘‘मी तर पाहिलंय मुसलमानाला जोडे विकताना. ह्या गोष्टीतला इस्मत जोडेच विकत असतो.’’

त्यावर मुलं म्हणाली, ‘‘विकतात; पण स्वतः शिवत नाहीत जोडे. चित्रातलं दुकान जोडे शिवणार्‍याचं वाटतंय.’’

गोष्ट त्यांना पटावी आणि पुढे सरकावी ह्या उद्देशानं मी त्यांना म्हटलं, ‘‘इथे आपल्या शहरात नसतील शिवत; पण दुसरीकडे कुठे असेल तसं.’’

हे मुलांना पटलं, ‘‘हं, असं असेल.’’

गोष्ट पुढे जाऊ लागली, तसतशी मुलांना खूप मजा वाटू लागली. त्यांनीही त्यांच्या घरी केल्या जाणार्‍या पक्वान्नांबद्दल सांगितलं. काही मुलांनी शिरकुर्मा, शेवयांची खीर कशी करतात, इदी म्हणजे काय आणि इदेला काय करतात तेही सांगितलं. चर्चेदरम्यान एक गोष्ट माझ्या लक्षात आली, स्वतःबद्दल सांगताना मुलांचे चेहरे उजळून निघायचे.

आपल्या संबंधातल्या व्यक्तिंची नावं गोष्टीत आली, की मुलांना जास्तच मजा वाटत होती. ‘यास्मिन’ हे नाव गोष्टीत आल्याबरोबर दोन मुलं ओरडली, ‘हे माझ्या ताईचं नाव आहे.’

शेवटी त्यांना थांबवत मला त्यांना सांगावं लागलं, की बाकीचं आपण गोष्ट पूर्ण झाल्यावर बोलूया. गोष्ट वाचून झाल्यावर ती कशी वाटली, कुणाला त्यातलं काय भावलं आणि काय नव्यानं कळलं, वगैरे मी त्यांना विचारू लागले.

मुलांकडून तर्‍हेतर्‍हेची उत्तरं आली. एक मुलगा म्हणाला, ‘‘मला इस्मत खूप आवडला. तो सगळ्यांना काहीनाकाही भेटी देतो. माझे अब्बापण असेच आणतात.’’ कुणाला पूर्ण गोष्टच आवडली. कुणी म्हणालं, ‘सगळे एकेक करून पँट कापत होते, ते पाहून मला फार मजा वाटली.’ आणखी एक मुलगा म्हणाला, ‘‘पण ताई, मला कळत नाहीय, ते सगळे पँट कापत होते. कुणाच्याही लक्षात आलं नाही, पँट कुणालाही लहान वाटली नाही, असं कसं झालं?’’ आणि इतरांनीच त्या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलं, की घाईघाईत सगळेच फक्त कापत होते, बघत कुणीच नसणार. मुलांना गोष्टीत काही नाविन्य न जाणवूनही ती आवडली, कारण ती इदेबद्दल होती. आमची ही चर्चा चांगली बराच वेळ रंगली. नंतर 3-4 मुलं हे पुस्तक त्यांच्या नावावर घरी नेण्यासाठीपण मागू लागली.

ह्या गप्पांमधून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की गोष्ट मुलांच्या परिसराशी मिळतीजुळती असली तर मुलं तिच्याशी लगेच जोडली जातात. आनंदानं वाचतात आणि एकीकडे निःसंकोचपणे मनातल्या गोष्टीही बोलून दाखवतात.

‘मुलांच्या विकासात साक्षरता आणि पुस्तकांचं महत्त्व’ ह्या लेखात डेनिस वॉन स्टोकर म्हणतात, ‘आपल्याला वैयक्तिक पातळीवर जोडून घेणार्‍या साहित्याच्या वाचनानं आनंदाची अनुभूती मिळते.’ हे अगदीच पटण्यासारखं आहे. व्यक्त व्हायला मदत करण्याबरोबरच पुस्तकं संस्कृतीचं वहनही करताना दिसतात. भाषा, स्वयंपाक, रीतीभाती, जीवनशैली, अनुभव अशा कित्येक गोष्टी जाणून घेण्याची ह्यातून संधी मिळते. प्रस्तुत कथेत भाषेपासून ते खाण्यापिण्याच्या पद्धतींपर्यंत सगळ्या गोष्टींची झलक बघायला मिळते.

हीच गोष्ट नंतर मी प्रेमपुरा भागातल्या वाचनालयातल्या मुलांनाही ऐकवली. इथली बहुतांश मुलं हिंदू आहेत. काही मुस्लीम मुलंही आहेत; योगायोगानं मी गोष्ट सांगितली, त्या दिवशी ती मुलं काही आलेली नव्हती. त्यामुळे मला आधीपेक्षा संपूर्ण वेगळ्या गटासमोर गोष्ट सांगायला मिळाली.

आधी दाखवलं त्याचप्रमाणे इथेही मी मुलांना मुखपृष्ठ दाखवत गोष्टीत काय असेल असं वाटतंय, म्हणून विचारलं. त्यावर एक मुलगा म्हणाला, ‘‘ही गोष्ट मुसलमानांबद्दल असेल.’’ एक मुलगा म्हणाला, ‘‘मुसलमान बकरी कापतात आणि मटण खातात.’’ मी त्याला विचारलं, ‘‘तुम्ही नाही खात?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘आम्ही अंडीसुद्धा नाही खात.’’ मटण खाणं वाईट आहे का, म्हणून विचारल्यावर तो गप्प बसला. बाकीच्या मुलांनाही बोलायला मी प्रोत्साहन देऊ लागले, तेव्हा 3-4 मुलं म्हणाली, ‘‘आम्हीपण खातो बरं का ताई. आमच्या बाबांचे मुसलमान मित्र आहेत, आणि ते इदेच्या दिवशी आम्हाला मटण देतात.’’ मटण न खाणार्‍या मुलाचा चर्चेच्या सुरुवातीचा अभिनिवेश कमी होऊन तो चूप झाला. त्याचं अवघडलेपण कमी व्हावं म्हणून मी ती चर्चा आवरती घेतली आणि पुन्हा गोष्टीकडे वळले. गोष्टीचं नाव सांगून त्यात काय असेल ते विचारलं. मुलं म्हणू लागली, ईद साजरी करण्याची गोष्ट असेल. मुलांमधून एक आवाज आला, ‘दोन ईद असतात. एका इदेला बकरा कापतात आणि दुसरीला शेवयांची खीर करतात.’ म्हटलं, चला. मुसलमानांच्या खाद्यपदार्थांबद्दल ह्यांना काहीतरी माहीत आहे.

मग मी गोष्ट वाचायला सुरुवात केली. दरम्यान मी फक्त एकदा थांबले. इस्मतची आई हबीबा म्हणते, ‘मला शिरकुरमा करायचा आहे.’ मी मुलांना शिरकुरमा म्हणजे काय ते विचारलं. ‘‘काहीतरी मटणापासून करत असतील,’’ एका मुलीचं उत्तर. मी सगळ्यांना उद्देशून विचारलं, ‘‘नक्की का?’’ सगळी म्हणू लागली, ‘हो, तसंच असेल.’ मला हे थोडं विचित्र वाटलं. कारण मुसलमान कुटुंबांशी काहीच संबंध येऊ नये, असा काही प्रेमपुरा हा भाग नव्हता. आणि नऊ मुलांपैकी कुणीही म्हणू नये, की शिरकुरमा मटणाचं नाही करत! शेवटी मीच त्यांना सांगितलं, की शिरकुरमा खिरीसारखा गोड पदार्थ असतो, सुकामेवा आणि दूध घालून करतात. त्यावर एकानं विचारलं, ‘सुकामेवा म्हणजे काय?’ मग मी त्यांना सांगितलं, ‘काजू-बदाम-बेदाणे ह्यांना सुकामेवा म्हणतात.’

गोष्ट संपल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. गोष्ट कशी वाटली, कुणाला गोष्टीतलं काय आवडलं, वगैरे. बहुतेक मुलांच्या बोलण्यातून आलं, की पँट छोटी-छोटी होत गेली, त्याची त्यांना खूप मजा वाटलीय. एक मुलगा म्हणाला, ‘‘मला शिरकुरमा आवडला,’’ ‘‘सगळ्यांनी एकत्र जमून मशिदीत जाणं मला आवडलं,’’ असं एक म्हणाला. ‘तुम्हाला नवीन काय कळलं?’ ह्या माझ्या प्रश्नावर एकदम 3-4 आवाज आले, ‘‘शिरकुरमा आणि गोडाची ईद कशी साजरी करतात ते कळलं.’’ एक मुलगा म्हणाला, ‘‘अस्सलावालेकुम म्हणजे काय तेही समजलं.’’

दोन्ही ठिकाणचे गोष्ट ऐकवण्याचे अनुभव वेगवेगळे होते; मुस्लीम मुलांनी गोष्टीत खूपच रस दाखवला आणि स्वतःला त्या गोष्टीशी जोडून घेणं त्यांना सहजच जमलं, तर मुस्लिमेतर मुलं ऐकीव माहितीच्या भांडवलावर अंदाजे उत्तरं देत होती.

ह्या दोन अनुभवांमधून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. एका वेटाळात राहूनही या दोन समुदायांत परकेपण आहे, त्याचं प्रतिबिंब अगदी मुलांमध्येसुद्धा पडलेलं बघायला मिळालं. मुसलमान आहे, म्हणजे मांसच खात असणार, असं लहान मुलांच्यासुद्धा मनात ठसलेलं असतं. अशा विषयांवर चर्चा करत राहिल्यानं मुलांना निरनिराळ्या संस्कृती जाणून-समजून घेण्याची संधी मिळेल. त्यातून आपल्याच पूर्वग्रहांबद्दल ती तार्किक दृष्टीनं विचार करू शकतील. कुठल्याही एका समुदायाबद्दल पक्षपातीपणे विचार करण्यापासून ती दूर राहतील. त्यांच्या विचारांना आपण नवी दिशा देऊ शकू.

माझी एक सहकारी हिंदू आणि दुसरी ख्रिश्चन आहे. उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलं, की शिरकुरमा हा मुस्लीम पदार्थ कसा करत असावेत? दोघींचंही म्हणणं पडलं, की चिकनचं काहीतरी करत असतील. खरं पाहता क्षीर म्हणजे दूध. म्हणजे शब्द नीट वाचला तरी काहीएक अर्थ कळायला अडचण नसावी. परंतु आपले पूर्वग्रह नेहमीच तर्कावर मात करताना दिसतात. ह्या निमित्तानं मला आठवलं; एहसाननगर वाचनालयात पारधी समाजातील लकी नावाच्या मुलाला मी ‘नाबिया’ म्हणून एक पुस्तक वाचायला दिलं होतं. ‘मला मुसलमानांचं पुस्तक नाही वाचायचं,’ असं म्हणून त्यानं ते मला परत केलं. नंतर समजावून सांगितल्यावर तो वाचायला तयार झाला.

मुस्लीम कुटुंबही आपल्यासारखीच असतात, हा संदेश समाजात नेण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक मला खूपच भावलं; पण अफसानाला ते अजिबात पटलं नाही. अफसाना ही आमच्या गटातली वाचनालय चालवणारी एक मुस्लीम कार्यकर्ती आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पूर्ण कुटुंब मशिदीकडे बघतंय, असं चित्र आहे. अफसानाचं म्हणणं, बायका कधीच मशिदीत जात नाहीत. आणि गेल्याच तरी असे केस मोकळे सोडून तर नाहीच नाही. तिचं बोलणं ऐकून मी देखील स्वतःच्या समजुतींवर पुन्हा विचार करायला लागले.

मला प्रश्नच पडला, खरंच हे पुस्तक त्या समुदायाच्या बारकाव्यांचं नेमकं चित्रण करतंय का? कारण त्यात दर्शवलेलं सगळंच काही लोकांना बरोबर वाटत नाहीये. त्यातून मला आणखी एक बाब जाणवली, एखाद्या संस्कृतीचं समग्र आणि वास्तव चित्रण करण्याच्या दृष्टीनं आपल्या बालसाहित्यात खूप कमी पुस्तकं आहेत. थोडी आहेत पण तुलना करण्यासाठी ती पुरेशी नाहीतच.

रूदीन सिम्स बिशप (1990) म्हणाले होते, की पुस्तकं खिडक्यांप्रमाणे असतात. ती जगाची झलक दाखवतात. कधी ह्या खिडक्या काचेच्या दरवाज्यांप्रमाणे असतात. वाचक त्यातून आत-बाहेर करू शकतात, लेखकानं वसवलेल्या जगाशी जोडले जातात, आणि कधीतरीच त्या आरश्याप्रमाणे असतात; त्यात आपण आपलं वास्तव निरखू शकतो.

काही प्रमाणात तरी ‘इस्मतकी ईद’ अशा मोजक्या पुस्तकांच्या पंगतीला जाऊन बसतं, ते एका समुदायाची ओळख करून देतं आणि इतरांना त्या संस्कृतीच्या वरवरच्या पैलूंचं का होईना, दर्शन घडवतं. आजच्या संदर्भात तर हे पुस्तक खूपच महत्त्वपूर्ण आहे. अशी अजून पुस्तकं मुलांना उपलब्ध करून द्यायला हवीत असं मला वाटतंय, म्हणजे मुस्लीम कुटुंबातल्या मुलांचे छोटेछोटे आनंद, त्यांच्या वाट्याला येणार्‍या विवंचना, भीती, चिंता, बाहेर होणारे अपमान आणि त्यातून होणारा आंतरिक संघर्ष ह्यांची ओळख करू देऊ शकेन. मला वाटतं, यातूनच माझी मुलं वेगळ्या समुदायांतल्या मुलांना समजून घेतील, कदाचित त्यांच्याशी मैत्रीही करू शकतील. कधीतरी त्यांच्या आयुष्याशी स्वतःला माणुसकीच्या नात्यानं जोडून घेत दोघांमध्ये असलेला काचेचा दरवाजा ओलांडून पलीकडे जाऊ शकतील.

Neetu_Yadav

नीतू यादव | neetu.yadav23@yahoo.in

लेखिका ‘मुस्कान’ संस्थेच्या शिक्षणविषयक कार्यक्रमात काम करतात. विशेषतः त्यांना मुलांबरोबर काम करायला आवडते.

अनुवाद:  अनघा जलतारे

थोडक्यात कथानक…

इस्मतचं चपला, जोडे विकण्याचं छोटंसं दुकान असतं. इदेच्या आदल्या दिवशी दुकान बंद झाल्यावर तो आपली आई, बायको आणि मुलीसाठी भेटवस्तू खरेदी करतो. दुकानदाराच्या सुचवण्यावरून तो स्वतःसाठी एक पँट खरेदी करतो. खरं तर ती त्याला चार बोटं मोठी होत असते; पण दुसरा पर्याय नसल्यानं ती घेऊन तो घरी येतो. घरातल्या तिघींना त्यांच्या भेटवस्तू देऊन त्यांना पँट लांबीला कमी करून देण्याबद्दल विचारतो. सगळे इदेच्या तयारीच्या गडबडीत असल्यानं आपली असमर्थता व्यक्त करतात. ते जाणून इस्मत स्वतःच पँट दुरुस्त करून, घडी घालून ठेवून देतो. आपण नाही म्हटल्याचं तिघींनाही वाईट वाटतं आणि प्रत्येकजण ती पँट 4-4 बोटं लहान करून ठेवतं. दुसर्‍या दिवशी सगळ्यांना प्रार्थनेसाठी मशिदीत जायचं असतं. सगळे नवीन कपडे घालून तयार होतात, तेव्हा गोंधळ झाल्याचं लक्षात येतं. मग ते तुकडे पुन्हा पँटला जोडून पँट पूर्ववत करण्यात येते आणि सगळे बाहेर पडतात.