चकमक

‘एकलव्य’ ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी गैरसरकारी संस्था जवळपास चार दशके औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते आहे. शैक्षणिक साहित्य, बालसाहित्य, मासिके, पाठ्यपुस्तके अशा निरनिराळ्या माध्यमांतून एकलव्य हे काम पुढे नेते आहे. 

एकलव्यच्या ‘चकमक’ ह्या हिंदी मासिकाची आखणी ११ ते १४ वयाचा वाचकगट डोळ्यासमोर ठेवून केलेली असली, तरी घरातील मोठेही त्यातील साहित्य आवडीने वाचतात. कथा, कविता, लेख, चित्रे, कोडी, मुलांचे साहित्य असा सगळा खजिना त्यात असतो. बालसाहित्य म्हणजे राजा-राणीच्या, प्राण्यांच्या गोष्टी, उपदेशात्मक साहित्य असे काहीतरी असायला हवे, ह्या प्रचलित धारणेला ‘चकमक’ छेद देते. मुलांच्या आयुष्यातही आनंद, दुःख, भावनांचे चढ-उतार (आणि अगदी कट-कारस्थानेसुद्धा!) येतच असतात. त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्यासाठी लिहिलेल्या साहित्यात दिसायला हवे, हा ‘चकमक’चा दृष्टिकोन आहे. त्यामुळे कल्पनारम्य साहित्यासोबतच, वास्तव जगातले विविध पैलू आणि घटना माहितीपूर्ण आणि रंजक तऱ्हेने मांडलेले असतात. साहित्य, विज्ञान ह्यांच्या बरोबरीने ‘चकमक’मध्ये कलेला स्थान आहे. विविध कलाकारांच्या रचनांच्या माध्यमातून वाचकमित्रांना कलांकडे बघण्याचा दृष्टिकोन देण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे.

Chakmak cover 1चकमक‘मध्ये मुलांचा सक्रिय सहभाग असावा ह्यासाठी तुम भी बनाओसारखा उपक्रम असतो. त्यात टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कल्पना दिलेल्या असतात. क्यों क्योंसदरात दर महिन्याला वाचकांसाठी एक प्रश्न देऊन, निवडक उत्तरे पुढील अंकात प्रकाशित केली जातात. ह्यातून बालवाचकांच्या भावविश्वात डोकावण्याची संधी मिळते. मेरा पन्नाहाही मासिकातला अफलातून कोपरा आहे. चित्र, गोष्ट, अनुभव, किस्सा; कुठल्याही माध्यमातून मुक्तपणे व्यक्त व्हा. 

उगाचच जड, अलंकारिक भाषा न वापरता मुलांना आपलीशी वाटेल अशी सुबोध, जिवंत भाषा हे ‘चकमक’चे आणखी एक वैशिष्ट्य. त्याला आपल्या परिसराचा गंध असतो. ‘तुम्ही लहान, तुम्हाला काय कळतं? आम्ही सांगतो काय तेअसा आव न आणता चकमक मुलांना एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे बरोबरीने वागवते. त्यामुळे मुलांना ‘चकमक’ हे आपले मासिक वाटते. 

(चकमकसाठी आपण किंवा आपल्या ओळखीतले बाल किंवा युवा वाचक आपले लेख/ कथा/ कविता/ चित्र/ अनुभव chakmak@eklavya.in ह्या email वर पाठवू शकता). 

चकमकची वर्गणी भरण्यासाठी https://www.pitarakart.in/magzines?product_id=674 ह्या संकेस्थळावर भेट द्या.