जीवनशिक्षणाची प्रयोगशाळा !

शुभदा चौकर

मुक्त पत्रकार, वयम् या मुलांच्या मासिकाच्या संपादक

‘ताई, तुम्ही या नं आमच्या शाळेत… आताच या, आमची गच्चीवरची बाग बघायला… मस्त कलिंगड लागलंय..’ नासिकच्या ‘आनंद निकेतन’ शाळेच्या विद्यार्थिनी इतकं गोड, रसाळ आमंत्रण देत होत्या. ‘बहुरंगी बहर’ उपक्रमात सामील झालेल्या ‘आनंद निकेतन’ गँगशी आता जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. एखाद्यानं ज्या अगत्यानं घरी बोलवावं, त्याच भावनेनं या छोट्या मैत्रिणी मला त्यांच्या शाळेत बोलावत होत्या. 

‘बहुरंगी बहर’ उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या पन्नास मुलांचं पाच दिवसांचं व्यक्तिमत्त्व शिबिर ‘वयम्’ मासिक व आयपीएच यांनी संयुक्तरीत्या- आयोजित केलं होतं. त्यात सहा जणांचा गट ‘आनंद निकेतन’ शाळेचा होता. पाच दिवसांच्या आमच्या सहवासात अनेकदा जाणवत होतं की, ‘आनंद निकेतन’ची मुलं भाग्यवान आहेत. त्यांचं बालपण समृद्ध करणारी ही शाळा आहे. त्यामुळे या मुलांच्या समजशक्तीला आणि विचारशक्तीला फुलोरा येतोय.

शिबिरात कोणत्याही विषयावर अनुभवकथन करताना ‘आनंद निकेतन’च्या मुलांची सुरुवात ‘आमच्या शाळेत…’ नं व्हायची. त्यांच्या गप्पांत जितके उल्लेख आई-बाबांचे व्हायचे, तितकेच ताईंचेही. अनेकविध अनुभव त्यांना शाळेतून मिळताहेत, हे जाणवायचं. जे मांडायचं ते स्वच्छ भावनेनं आणि स्पष्ट शब्दांत, ही ‘आनंद निकेतन’च्या मुलांची खासियत! कुठून आली इतकी वैचारिक आणि भावनिक स्पष्टता असा प्रश्नच पडायचा.  

‘आनंद निकेतन’च्या मुलांमध्ये परस्पर नातेबंध दृढ होता. ही मुलं कधी एकमेकांना सावरून घ्यायची, कधी एखाद्याला उमेद देताना दिसायची, तर कधी एखाद्याचं ‘उडणारं विमान’ जमिनीवर आणायची… एकाच कुटुंबाचा भाग आहोत, असं वागणारा गट होता हा. कुठून आला हा एकोपा यांच्यात ? 

…या सर्व प्रश्नांचं स्वाभाविक उत्तर होतं, की ही मुलं ‘आनंद निकेतन’ या प्रयोगशील व विचारशील शाळेची आहेत. 

शाळेचे काही प्रयोग लक्षणीय आहेत. कार्यानुभव म्हणजे संगणक प्रशिक्षण- या प्रथेला झुगारून तेव्हा त्यांनी चक्क ‘स्वयंपाककला’ शिकवायला सुरुवात केली होती. स्वयंपाक करणं, हे महत्त्वाचं जीवनकौशल्य, पण त्यालाही अभ्यासाचा दर्जा दिल्यानं स्वयंपाकघर ही विज्ञानाची प्रयोगशाळा किंवा गणिताचं उपयोजन करण्याचं ठिकाण- या भावनेतून स्वयंपाक शिकवला जात होता. स्वयंपाककला शिकता-शिकता प्रमाण, अंदाज, जीवनसत्त्वं, पोषणमूल्यं, विविध प्रक्रियांतील विज्ञान, सजावटीची कला,  मल्टीटास्किंगचं तंत्र- अशा विषयांवर शिक्षक-विद्यार्थी यांच्यात गप्पा होत असत. आणि मुख्य म्हणजे मुली-मुले एकत्र स्वयंपाक करत! चित्रकला-हस्तकला या विषयांत ही मुलं क्विलिंग, वारली चित्रकला काय काय शिकतात, त्यापासून कलात्मक वस्तू तयार करतात. भरपूर पुस्तकं वाचतात, चित्रपट बघतात, सांस्कृतिक कार्यक्रमांना जातात. पूर्णतः मराठी माध्यमाची शाळा असूनही (सेमी इंग्लिश नाही) इंग्रजी भाषा अवगत करण्यात कमी पडलेली नाहीत. 

‘क्षेत्रभेट’ हे शाळेतलं शिक्षणाचं महत्त्वाचं साधन आहे. शेत, बाजार, कारखाना, रक्तपेढी, बालसुधारगृह अशा अनेकविध ठिकाणी जाऊन ही मुलं शिकतात. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आम्ही  ‘उद्योगभेट’  अशी लेखमाला ‘वयम’मध्ये सादर केली. पहिली उद्योगभेट (आईस्क्रीम कारखान्याला)  ‘आनंद निकेतन’च्या मुलांकडून करून व लिहून घेतली.  

एकदा शाळेतल्या एका मुलीचे आजोबा वारले, त्यांनी नेत्रदान व देहदान केलं. ही बातमी वर्गात पुरेपूर चर्चिली गेली आणि मग काही अवघड प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी या मुलांना चक्क स्मशानभूमीपर्यंत नेलं गेलं. हे ठरवताना, पालकांनाही विश्वासात घ्यायला ही शाळा विसरली नाही. एरवी मृत्यू हा विषय भयंकर किंवा निषिद्ध मानून मुलांपासून दूर ठेवला जातो, पण त्यामुळे त्यांचं त्याबाबतचं औत्सुक्य फार ताणलेलं असतं. या शाळेतील ताईंनी सर्वांना घेऊन स्मशानाला भेट देणं आणि मृत्यू या विषयावर बिनधास्त गप्पा मारणं, यातून या मुलांची सत्य स्वीकारण्याची, त्याकडे तर्कानं बघण्याची ताकद किती वाढली असेल! 

मुलांशी बोलला न जाणारा आणखी एक विषय म्हणजे राजकारण. इथं हाही विषय वर्ज्य नाही. ‘विधानसभा’ या विषयावरही मुलं प्रोजेक्ट करतात. काही वर्षांपूर्वी जेव्हा मराठी शाळांना मान्यता मिळत नव्हती, तेव्हा त्या प्रश्नाला शिक्षकांच्या बरोबरीनं ही मुलंही भिडली. त्यांनी त्यावर घोषणा लिहिल्या, फलक तयार केले आणि थेट अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पथनाट्य सादर केलं. 

एकंदर ‘गप्पा’ हा या शाळेतला अविभाज्य भाग आहे. इथं कोणत्याही विषयावर मनमुराद गप्पा होतात. त्या गप्पांमधून मुलांमध्ये निकोप दृष्टिकोन आणि सकारात्मकता पेरण्याचं काम इथल्या शिक्षिका सहजतेनं करतात. या गप्पा मुलांच्या मनातील किल्मिषं काढून टाकतात. त्यांच्या मानसिक, भावनिक, वैचारिक  विकासाला पोषक ठरतात.  

‘आनंद निकेतन’चा सुट्टीतला अभ्यासही फार अर्थपूर्ण असतो. उन्हाळी सुट्टीत या मुलांना काही प्रयोग घरी करायला दिले जातात. काही व्यावसायिक अनुभव घ्या, असं सुचवलेलं असतं. त्यामुळे ‘वयम्’तर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘सुटीतील अनुभव’ स्पर्धेसाठी ‘आनंद निकेतन’चा गठ्ठा कधी येतो, याची आम्ही आतुरतेनं वाट बघत असतो, कारण बाकीचे बहुतांश वाचक पर्यटनाचे अनुभव लिहून पाठवतात, पण या मुलांचे अनुभव आगळे असतात. गेल्या वर्षी एका मुलानं आंब्याच्या बागेत आंबे वेचणं, ते खोक्यात लावणं, विकणं या सर्व अनुभवाचं लेखन करताना फार बारीक निरीक्षणं आणि प्रांजळ भावना व्यक्त केली होती. त्या बागेतील कामगारांसोबत जेवताना आधी वाटणारा संकोच आणि नंतर आलेली मजा त्यानं सांगितली होती. आणि भाजीच्या टेबलावर उभं राहून 10 रुपयांची जुडी विकण्यापेक्षा आंबे विकले तेव्हा एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटलं, म्हणून त्यानं आंबे विकणं पसंत केलं- हेही त्यानं प्रांजळपणे व्यक्त केलं होतं. 

ही मुलं अगदी सच्च्या भावना लिहून मोकळी होतात, कारण पारितोषिकासाठी लिहिण्याचा त्यांचा हेतू नसतो. या शाळेतलं वातावरण स्पर्धेचं नाही, परस्पर सहकार्याचं आहे, हे लख्खपणे जाणवतं… मुलांच्या लेखनातून आणि सहवासातूनही! 

राष्ट्रीय शिक्षण आराखडा (NCF 2005) जेव्हा 2009 च्या सुमारास अमलात आला, त्यावेळी ‘ज्ञानरचनावाद’ ही संकल्पना चर्चेत आली. शिक्षकाची प्रेरक (facilator) ही भूमिका अधोरेखित झाली. ‘आनंद निकेतन’ला त्यावेळी 10 वर्षं झाली होती आणि त्यांच्या शाळेतील शिक्षण-अनुभवांचा प्रसार व्हावा, या हेतूनं लेखमाला लिहिण्याचा विचार त्यांनी मांडला होता. ‘आनंद निकेतन’ हे ज्ञानरचनावादाचं उत्तम उदाहरण होतं, असं मला प्रकर्षानं वाटलं. ते वाचकांसमोर आल्यास शालेय शिक्षण क्षेत्रातील अनेकांना ज्ञानरचनावादाच्या अंमलबजावणीची चुणूक मिळेल, म्हणून 2010 मध्ये ‘चतुरंग’ पुरवणीत आम्ही लेखमाला सुरू केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. इतका की, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं मॉडेल म्हणून राज्यभरातील अनेक शिक्षक खास ही शाळा बघायला, शिक्षकांशी संवाद साधायला नासिकला जाऊ लागले. 

शासनानं आखून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून शिवाय मुलांना इतकं वैविध्य द्यायचं- हे ‘आनंद निकेतन’मध्ये कसं काय घडत असेल, याचे काही आडाखे मांडावेसे वाटतात. 

‘आनंद निकेतन’ टीम स्वयंस्फूर्तीने शिकवण्याच्या पेशात आली आहे. सर्व ताई अगदी माफक मोबदल्यावर काम करताहेत, तरीही अव्याहतपणे, पूर्ण तादात्म्यतेनं. या शिक्षिकांचा स्वतःचा आवाका चांगला आहे. त्यांच्यातल्या काहीजणी पाठ्यपुस्तक-लेखक, प्रशिक्षक, विषयतज्ज्ञ अशा भूमिका पेलणाऱ्या आहेत;  बुद्धिवादी आहेत. त्यांचं परस्परांशी सकस नातं आहे. सतत नवीन शिकण्याची, नवे प्रयोग करून बघण्याची आस त्यांच्यात आहे. शाळेच्या शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी याचं स्वत:चं एक जिव्हाळ्याचं बेट आहे. आणि तरीही या शाळेनं मुख्य प्रवाहापासून स्वतःला फटकून ठेवलेलं नाही. 

रवीन्द्रनाथ टागोरांचं एक वचन आहे- ‘”The Highest Education is that which does not give mere information but makes our life in harmony with all existence.’

‘आनंद निकेतन’मधील शिक्षण हे मला दर्जेदार वाटतं कारण त्यात ‘हार्मनी’ आहे – ते मुलांच्या संपूर्ण जगण्याला भिडणारं आहे आणि त्यांच्या पुढच्या जगण्यासाठी पुरणारं आहे !

cshubhada@gmail.com