डोंगर ट्रिप प्राथमिक गट – १

सहल हा मुलांच्या आवडीचा विषय. कुठेही गेलो तरी मुले आनंदी असतात.जून मध्ये वर्ग चालू झाल्या पासून मुलांना कधी डोंगरावर नेले नव्हते. आपण डोंगरावर जायचे असे ठरल्यावर मुलं खूष झाली. घरून डबा घेऊन आली. आम्ही सगळे निघालो डोंगर बघायला.“डोंगरावर चालायला खूप आहे ओ ताई!!” “कुठे आणलंय आम्हाला? काय बघायचंय?” असे प्रश्न सुरु झाले. “चला तुम्हाला गंम्मत दाखवते” असे म्हणाले आणि पुढे चालत निघालो. ‘जे बघू त्याचं नीट निरीक्षण करूयात आणि वर्गात आल्यावर त्याचं चित्रं काढूयात’ असं आधीच ठरलं होतं.मुलं पुढे चालू लागली. पहिल्यांदा त्यांना खदान (खाण)दिसली “ताई हे काय, याला खदान का म्हणतात?” त्या खादानित पाणी होते, त्यात पानकोंबडी आणि कमळे होती हे सगळं बघून मुलं भारावून गेली.पुढे दुसरी खदान त्या जवळ म्हशी आणि गाई होत्या मुलांनी त्या मोजल्या किती आहेत. हे बघताना मला खूप मजा येत होती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसत होता. काही माणसे कसरत करत होती. दोरीवरून चालत होती.डबे खाऊन झाल्यावर आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला.मी म्हंटलं “खेळा” “ओ ताई, काय खेळू?? काहीच नाहीये इथे. मी म्हणाले “शोधा काय खेळता येईल?!!”“बरं, शोधतो” असे म्हणून मुलं पाला, काड्या आणि दगड गोळा करू लागले आणि त्याचा गठ्ठा गोळा केला.‘आता काय करूयात’ असा प्रश्न पडल्यावर ‘आपण याचं घर बनवूयात’ असे सगळ्यांन कडून आले आणि सगळे तयारीला लागले.घरं बनवायची सुरवात केली. दगडी बाजूला लावून भिंती तयार केल्या घराला दार आणि खिडकी हवी असं ते ऐकमेकांना सांगत होते त्यातील सानवी म्हणाली “घर आहे तर चूल पण पाहिजे”. तिने तीन दगड आणून त्यात लाकूड घालून चुलीचा आकार दिला.‘घराला पत्रे हवेत तर आपण लाकूड टाकू’ असे मुलांकडून आले आणि त्यांनी घराला छप्पर बनवले.मनमोकळं खेळण्याची आणि त्यांच्या कल्पनेतून काही साकार करण्याची अनुभूती त्यांना मिळाली. त्याची चमक त्यांच्या डोळ्यात दिसत होती. या सगळ्यात अनेक गप्पा झाल्या. समूहाने मिळून काम झालं.आल्यावर मुलांनी छान चित्रही काढली.अशा संधी मुलांना मिळाल्या तर मुलांना शिकवावं लागत नाही आणि मुलंच आपल्याला खूप काही शिकवतात याची नव्याने जाणीव झाली. सारिका जोरी, पालकनीती परिवार खेळघर