ताईंची एकतानता

मुलगा मोठा झाल्यावर वेळ घालवण्यासाठी ‘करून बघूया’ म्हणून मी शाळेत यायला सुरुवात केली. पण इथले मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, प्रोत्साहन अशा अनेक गोष्टींमुळे इथे इतकी रमले की मला शाळेत यायला लागून बारा वर्षे कधी झाली तेच कळले नाही.

इथे बहुतेक सगळ्या बायकाच काम करतात. अधिकाराची उतरंड नाही. सगळ्या एकाच ठिकाणी बसतात. डबे खातात. सगळ्या गोष्टी एकमेकींशी बोलतात. बायका म्हटले की रेसिपी किंवा घरगुती विषय यावर गप्पा… असे इथे होत नाही तर सिनेमा, राजकारण, चालू घडामोडी, खेळ, एखादे वाचलेले पुस्तक या सगळ्या विषयांवरील चर्चा रंगतात. इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही. प्रत्येकीला आपल मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. किंबहुना प्रत्येकीने आपले मत मांडावे असा आग्रह असतो. यामुळेच एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे, मत मांडणे जमते. हळूहळू आत्मविश्वास वाढायला लागतो. चुकीच्या समजुती घालवणे शक्य होते. आपल्या मतावर ठाम राहाण्याचे बळ मिळते. 

इथे पगार नाही, अल्प मानधन मिळेल असे सुरवातीलाच सांगितलेले होते. पण त्या पैशांपेक्षा खूप मोलाच्या अनेक गोष्टी इथे  मिळतात.

मुग्धा कर्वे 

2000 साली मी शाळेत आले. सुरुवातीला मदतनीस म्हणून कामाला लागले. माझे शिक्षण ग्रामीण भागात कसेबसे बारावीपर्यंत. घरची परिस्थिती नाजूक होती. शाळेचा पगारही कमी होता. पण धुण्याभांड्यांचे  काम करण्यापेक्षा शाळेत नोकरी करणे चांगले, असे वाटले. त्याचवर्षी मोठया मुलालाही बालवाडीत प्रवेश घेतला. लहान मुलगा दीड वर्षाचा होता. दोन्ही मुलांना रोज शाळेत घेऊन यायचे कारण घरी लहान मुलाला सांभाळायला कोणीही नव्हते. शाळेने त्याला घेऊन येण्याची परवानगी दिली, तो शाळेकडून मिळालेला मला पहिला आधार होता. 

दोन वर्षांनी मी खेळाची ताई झाले. ग्रामीण भागातील व गरीब घरातील असल्यामुळे सुखसोयींबद्दल काहीच माहीत नव्हते. शाळेत आल्यावरच कळाले की संगीत, कार्यानुभव, चित्रकला, वाचन असे अभ्यासाव्यतिरिक्त तास असतात. गोष्टींची पुस्तके तर मला बारावीपर्यंत पाहायलाही मिळालेली नव्हती. पुस्तकांचे वाचन आणि माझा काहीही संबध नव्हता. ताई एकमेकींशी बोलायला लागल्या की मी फक्त भारावून जाऊन ऐकत राहायची. सर्व ताई शाळेत एका कुटुंबासारख्या राहायच्या. हे सगळे मला नवीन होते. मुख्य म्हणजे माझी भाषा अहिराणी. मराठी बोलताना बऱ्याचदा अहिराणी शब्द यायचे. पण त्यामुळे मला कोणीही कमी लेखले नाही. हळूहळू निरीक्षणातून व कृतीतून सगळे शिकत गेले. 

एका वर्षी क्रीडामहोत्सवाच्या वेळेस खेळ सुरू करण्यापूर्वी मैदानाची पूजा माझ्या हातून केली. त्यावेळेस मन खूप भरून आले. पुढे मला कार्यानुभव व खेळ हे विषय पूर्णवेळ मिळाले. ताईंचा माझ्यावरचा विश्वासच मला खूप शक्ती व बळ देत होता. बघता बघता विनोदिनीताईंच्या आग्रहामुळे सी. टी. सी. चा एक वर्षाचा कोर्स केला. थोडा त्रास झाला पण डिग्री हातात आली. दोन वर्षांपूर्वी शाळेतील काही ताईंनी डी. एड. करायचे ठरले. उज्ज्वलाताईंनी माझे नाव पुढे केले. मी बोलले, माझ्याकडून होणार नाही. त्यांनी मला खूप समजावले. तुला काही अडचण आली तर मला विचार पण तू करच. शोभनाताईंशी बोलले तर त्यांनी खूप धीर दिला. म्हणाल्या तू जे आता चाळिशीत शिकते आहेस त्याचा फायदा तुला तर होईलच, पण तुझ्या मुलांना जास्त होईल. त्यांना आठवेल की आपली आई एवढा त्रास घेऊन शिकत आहे. आपणही अभ्यास केला पाहिजे. मग काय, परत कंबर कसली व शिकायचे ठरवले. मनाशी जिद्द केली आणि डी. एड. पास झाले. 

भारती खैरनार 

माझ्या मुलाला, मानसला शाळेत घातले. तेव्हा शाळेत आल्यावर ताईंशी बोलताना वाटायचे की किती छान काम आहे. आपल्याला ते करायची संधी मिळेल का? की विशेष शिक्षण लागेल? 

पदवीधर असूनही, पटकन मनात येईल ते व्यक्त करायचे, असा स्वभाव नसल्याने विचारायची हिंमत व्हायची नाही. पण मानस दुसरीत गेल्यावर दीपाताईंनीच शाळेत मदतीला येणार का, म्हणून विचारले. सुरवातीला मी काही बोलत नसे. सगळ्या अनुभवी ताईंसमोर मी काय बोलणार, खूप प्रश्न पडायचा. 

मग सहवासातून मी थोडी मोकळी होऊ लागले. निवासी शिबिरांमुळे जास्त मोकळेपणा आला. केलेल्या कामाचे सतत कौतुक व्हायचे. त्यामुळे अजून उत्साह वाढायचा. शाळेत सगळ्या ताई असूनही घरगुती विषय नसल्याने खूप बरे वाटायचे. असे म्हणतात की दोन पुरूष आनंदाने एकत्र काम करू शकतात, पण दोन बायका नाही;  हे साफ खोटे आहे. आम्ही सगळ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आहोत पण एकत्र आहोत. मी खूप जुन्या विचारांच्या घरातून आले आहे. पण शाळेत आल्यावर माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला. मासिक पाळीबद्दलच्या समजुतीत तर फारच बदल झाला आहे. 

ताईंना सतत नवीन काय शिकायला मिळेल याकडे शाळेचे खूप लक्ष असते. ताईंनी काय वाचले पाहिजे, ट्रेनिंग कोणते घ्यायचे, कोणती शाळा बघायला जायचे, शाळेत कोणाला बोलवायचे हे सतत बघितले जाते. पण यातही ताईंनी हे केलेच पाहिजे अशी बळजबरी नसते. 

आनंद निकेतन परिवारामुळे मी संयम, शिस्त, कामाचा नीटनेटकेपणा, वाचन शिकले. एकत्र कुटुंबात आलेल्या अडचणी सोडवताना बळ आले. सगळ्यांना वाटते की नोकरी करून पैसे कमावणे म्हणजेच स्वत:च्या पायावर उभे राहणे, पण तसे मुळीच नाही, या शाळेत आल्यावर समजते की खरे उभे राहणे म्हणजे काय व कसे!          

भावना भट 

आम्ही रसिकाला आनंद निकेतनमध्ये घातलं. तेव्हा शाळेत वेगवेगळ्या उपक्रमांच्या वेळी जाणं व्हायचं. शाळेचं स्वरूप खूप छोटं होतं. शाळा म्हणजे दुसरं घरच असं रसिकाला व मला वाटायचं. पुढं शाळेत ताई झाल्यावर शाळेतील सर्व ताई अतिशय प्रामाणिकपणे, मेहनतीनं, पूर्ण प्रयत्नानिशी काम करताना मी पाहिलं. साहजिकच आपणही अशाच पद्धतीनं काम केलं पाहिजे ही जाणीव रुजत गेली.  

शाळेतल्या ताईंमध्ये सहकार्यशीलता आहे. हेवे-दावे नाहीत. दुजाभाव नाही. कोणालाही अडचण आली तरी सगळ्या मदतीला पुढं येतात. आणि एखादीला यश मिळालं तर सगळ्यांना आनंद होतो. 

शाळेतील सर्व निर्णय सर्वानुमते घेतले जातात. कुठंही लपवाछपवी नसते. निर्णय लादले जात नाहीत. त्यामुळे ताईंमध्ये हे आपले निर्णय आहेत ते आपण पूर्ण प्रयत्नांती अंमलात आणायला हवेत, ही जाणीव निर्माण होते. 

सुजाता सावळे