दुसरा डोळा केव्हा उघडणार?

प्रगत समाजाला केवळ औपचारिक शिक्षण पुरेसे ठरत नाही. प्रगत समाजाचे शिक्षण आणि संशोधन हे दोन डोळे आहेत. संशोधनासाठी जिज्ञासू वृत्ती हवी, तसेच उचित मार्गदर्शनही हवे.

माणसामध्ये काही उपजत क्षमता वाढीच्या क्रमात ठराविक वेळात जागतात. उदाहरणार्थ, अंगावर पिणे, स्मित करणे, उपडे वळणे, वयात आल्यावर भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे. पण जीवनाचा सामना करण्यासाठी ही उपजत शिदोरी पुरेशी नसते. अस्फुट क्षमतेवर अनुभवाचे कलम होऊन क्षमतांच्या पुंजीत बदल होतो किंवा भर पडते. माणूस शिकतो-उदाहरणार्थ, धग लागल्यामुळे आगीपासून दूर राहायचे माहीत होणे. पण ही स्वार्जित ज्ञानाची पुंजीही पुरेशी होत नाही. माणूस दुसर्‍याच्या देखरेखीखाली शिकतो, म्हणजे दुसरा त्याला शिकवतो. उदाहरणार्थ खेळातल्या सोबत्यांकडून गोट्या खेळायला, शिव्या द्यायला, मारामारी करायला शिकणे, मोठ्या माणसांकडून खोटे बोलायला, शिष्टाचार पाळायला, चहा करायला शिकणे. उपजत ज्ञान व स्वार्जित ज्ञान यांच्या जोडीला उपार्जित ज्ञान येऊन मिळते.

माणसाच्या समाजात अशा रीतीने काही समाईक ज्ञानाची पुंजी तयार होते. तिला आपण म्हणतो संस्कृती. शिक्षणाच्या रूपाने मागच्या पिढीचे संचित पुढच्या पिढीपर्यंत पोचवले जाते. माणसाचे बरेच शिक्षण अनौपचारिक असते. स्वभाषाशिक्षणाचा बराचसा भाग याचे एक ठळक उदाहरण. पण प्रगत समाजाला शिक्षणाची शिवाय औपचारिक तरतूदही करायला लागते. शिक्षणाचा आशय, त्या आशयाला अनुकूल असे अनुभवाचे माध्यम, शिकणार्‍याची प्रेरणा आणि क्षमता आणि शिकवणार्‍याची प्रेरणा आणि क्षमता असे शिक्षणाचे चार घटक. त्यांचा या औपचारिक शैक्षणिक तरतुदीमध्ये विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, शिक्षणाचा आशय म्हणजे केवल तथ्य (फॅक्ट) किंवा नैपुण्य (स्किल) नव्हे, जोडीला अंतर्दृष्टी (इन्साइट – तथ्य कशाबद्दल, नैपुण्य कशासाठी) आणि अभिवृत्ती (अ‍ॅटिट्यूड उदाहरणार्थ, कशाला लाजावे आणि कशाला लाजू नये) यांचीही गरज असते. अगदी मर्यादित उद्दिष्टासाठी प्रशिक्षण (ट्रेनिंग) द्यायचे असते तरीही. या आशयाच्या सर्व घटकांची, अंगांची गरज असते. शिक्षणाचे माध्यम म्हणजे केवळ भाषणबाजी किंवा उपदेश नाही. चर्चा, कार्यानुभव अवलोकन इत्यादी बरेच काही त्यात समाविष्ट असते. 

पण प्रगत समाजाला केवळ औपचारिक शिक्षणाची तरतूद पुरेशी ठरत नाही. समाजातील माणसांचे स्वार्जित ज्ञान पुष्कळदा संचित ज्ञानातच मोडणारे असते. (हा तुला आता शोध लागला होय, अरे सगळीच तसे करतात!) पण कधी कधी ते संचित ज्ञानाच्या पलीकडे जाणारे असते. अशा नव्या ज्ञानाची समाजात कदर व्हायला पाहिजे. (‘मोठा शहाणा लागून गेलास’ न म्हणता ‘वा, आपण पण करून बघायला पाहिजे’), ते समाजाच्या संचितात म्हणजे संस्कृतीत जमा व्हायला पाहिजे. (‘विज्ञानाची कमाल आहे’ म्हणून न थांबता विज्ञान संस्कृतीत जमा झाले पाहिजे), आणि त्याचा औपचारिक शिक्षणाच्या आशयात समावेश झाला म्हणजे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचेल. (मध्ययुगीन चीनमध्ये बीजगणिताचा शोध लागला, पण त्याला फावल्या वेळेची करमणूक एवढीच किंमत मिळाल्यामुळे दोनएक पिढ्यात ते विरलेही गेले). मग ते स्वार्जित ज्ञान संशोधन ठरते. 

प्रगत समाजाचे शिक्षण आणि संशोधन हे दोन डोळे आहेत. उगीच नाही प्रगत औद्योगिक संस्थेत प्रशिक्षण विभाग आणि संशोधन विकास विभाग (आर-अँड-डी) असतात. पण नेहमीच असे होते असे नाही. आपले पूर्वज सर्वज्ञ होते, आपण त्यांच्यापुढे अज्ञ बालके आहोत अशी समाजात धारणा असली तर संशोधनाची आबाळ होते. (‘पूर्वज’ ऐवजी ‘पाश्‍चात्त्य’ म्हटले तरी फारसा फरक पडणार नाही.) याच्याउलट आपले पूर्वज तुलनेने अज्ञ बालके होती, आपल्याला सर्व काही नव्याने मिळवायला पाहिजे अशी समाजाची धारण असली तर शिक्षणाची आबाळ होते. (नव्याने वसाहत करणार्‍या समाजात असे कधी कधी होते.) काहीवेळा तर दोन्हींची आबाळ होते, मग तो समाज प्रगत रहात नाही. 

अठराव्या शतकातील भारतात अशी स्थिती होती. (बारभाईंनी लहान वयाच्या सवाई माधवरावाच्या शिक्षणाची तरतूद केली त्यात ‘भविष्यपुराण’ आणि ‘दंडकारण्यमाहात्म्य’ ही इतिहास भूगोलाची पाठ्यपुस्तके होती! पेशव्यांना इंग्रज वकिलाने भेटीदाखल दिलेले घड्याळ बंद पडले तेव्हा ते मुंबईला परत पाठविण्यात आले.) एकोणिसाव्या शतकात शिक्षणातील मरगळ झटकली गेली; विसाव्या शतकात शिक्षणाला खरी गती मिळाली. विसाव्या शतकात संशोधनातील मरगळ थोडी दूर झाली, पण झटकली गेली नाही; स्वातंत्र्य मिळाल्यावर संशोधनाला गती मिळाली, पण खरी गती अजून मिळायची आहे. आपले पूर्वज, पाश्चात्त्य आणि पाश्चात्त्यांचे पूर्वज यांच्याखेरीज उरलेल्या मानवजातीकडेही बरेच संचित आहे याची जाणीव भारतात अजूनही पुरेशी नाही. (विदेशी भाषांतून वाचन करायचे म्हणजे फार तर फ्रेंच, जर्मन भाषांतून वाचन करायचे – खरे तर इंग्लिश भाषेतून वाचन केले म्हणजे खूपच अशी भावना असते.) संशोधनाला जी गती मिळाली आहे असे म्हटले ती मुख्यत: नैसर्गिक विज्ञानशाखांतून आणि त्यांच्या अभियांत्रिकी, कृषी, वैद्यक अशा विविध उपयोजनांमधून. मानवी विज्ञानशाखा, मानव्यविद्या आणि त्यांची शिक्षण, समाजकार्य अशी विविध उपयोजने या क्षेत्रामधील स्थिती मुळीच समाधानकारक नाही. संशोधनाला पुरेशी गती नसली की शिक्षणात सुधारणा होत नाही. शिक्षणात सुधारणा होत नाही तोपर्यंत संशोधनात दर्जा येत नाही, किंबहुना प्रेरणाच मिळत नाही. या घातचक्राचे प्रसादचक्रात रूपांतर कसे व्हायचे?

संचित ज्ञानाच्या पलिकडे शोध घेण्याची बुद्धी माणसाला का होते? त्याला प्रश्न पडतो म्हणून. व्यावहारिक अडचण आल्यावर कोणालाही प्रश्न पडेल, पण तशी अडचण नसतानाही प्रश्न पडण्यासाठी जिज्ञासू अभिवृत्ती पाहिजे. (जिज्ञासू अभिवृत्ती ही काही पीएच. डी. पदवी पदरात पडल्यावर लोप पावणारी किंवा निवृत्ती मिळाल्यावरच जागृत होणारी अभिवृत्ती नव्हे!) असा प्रश्न पडल्यावर जरूर ते ज्ञान स्वत:च्या संचितात घालण्याची बुद्धी व्हायला जिज्ञासा तीव्र हवी. (नादुरुस्त घड्याळ इंग्रजांकडे पाठविणारांची बुद्धी नको!) प्रश्न पडण्याची क्षमता आणि प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत चैन न पडण्याची वृत्ती ही संशोधनाची पूर्व अट आहे. येरा गबाळाचे काम नोहे. आपले पूर्वज म्हणत असत की समोर विषय असून भागत नाही, विशय म्हणजे चैन पडू न देणारा संदेहही तितकाच आवश्यक आहे. संदेहामुळे सुचलेले उत्तर पारखण्याची बुद्धी होते. 

नव्या संशोधकाला संशोधन-नैपुण्य पुरेसे नसणार, त्यासाठी संशोधन शिक्षकाची म्हणजे मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शकाचे काम मार्ग दाखवण्याचे आहे. ठेच लागलीच तर हात देण्याचे आहे, उत्साह कमी पडला तर प्रेरणा देण्याचे आहे. नव्या संशोधकाला निव्वळ मदतनिसाची भूमिका देऊन त्याचे काम आपणच करून टाकायचे याला मार्गदर्शन म्हणू नये. फार तर पीएच. डी.ची गिरणी टाकणे म्हणावे. नव्या संशोधकाला आपली मते बनविण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी, पुरावा गोळा करण्यासाठी प्रोत्साहित न करता आपली मते त्याच्यावर लादणे म्हणजे मार्गदर्शन नाही. शिष्याकडून पराजित होण्याची ज्याच्या मनाची तयारी नाही त्याने आचार्य होऊ नये, गुरुबाजी करण्यात समाधान मानावे. संशोधनाचे परीक्षण संशोधक आपल्या चिंतनात करील, बरोबरीच्या इतर संशोधकांशी चर्चा होते त्यातून परीक्षण होईल, फार काय संशोधक आपल्या संशोधनावर आधारलेले आपले प्रगत अध्यापन करील तेव्हा बुद्धिमान आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान त्याला करावे लागेल त्यातून हे परीक्षण होईल. नव्या संशोधकांचे संशोधन मात्र परीक्षणकर्त्यांकडे पाठविण्याची पद्धत असते. परीक्षणकर्त्याचे काम प्रबंधातील प्रतिपाद्याशी आपण सहमत होतो का हे पाहण्याचे नसून प्रबंधकर्त्याने आपली मांडणी आणि समर्थन हे चोख केले आहे का हे पाहण्याचे आहे. प्रतिपाद्य पटले पण समर्थन ढिसाळ असल्यामुळे पटले नाही असेही होऊ शकते!

आधी प्रश्न विचारण्याचा कंटाळा, विचारला तर उत्तरादाखल नवा प्रस्ताव मांडण्याचा कंटाळा, प्रस्ताव मांडलाच तर स्वत: कठोर परीक्षण करण्याचा कंटाळा किंवा इतरांच्या कठोर परीक्षणाचे स्वागत करण्याचा कंटाळा मग संशोधन कार्याला बरे दिवस कसे येणार?

(भाषा आणि जीवन : हिवाळा 95, संपादकीय.)