पालकत्व खरेच इतके महत्त्वाचे आहे का

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते अगदी संपूर्ण नसले तरी खरेच आहे. नैसर्गिक निवडीतून आईवडिलांमधले गुण घेऊन ते जन्माला येते आणि वाढते पालकांच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या धारणांनुसार. निसर्ग आणि संगोपन या दोन्हींचा त्याच्या विकासात सहभाग असतो. संशोधक सांगतात, मुलांच्या घडणुकीत निसर्ग म्हणजे जनुकीय बांधणी सत्तर टक्के कारणीभूत असते, तर तीस टक्के संगोपन आणि आजूबाजूचे वातावरणही भूमिका बजावत असते. अर्थात, हा झाला आकडेवारीचा भाग. निसर्गातून मुलाकडे काय आलेय यावर आपले फारसे नियंत्रण असू शकत नाही. आपल्या हातात असते आपण त्याची प्रेमाने केलेली निगराणी. आणि तीस टक्के म्हणजे काही कमी आहेत असे नाही. आणि आपले मूल वाढवणे म्हणजे काय आपल्या फॅक्टरीत प्रॉडक्ट तयार करून देणे असते का, कच्च्या मालात डिफेक्ट आहे म्हणून जबाबदारी नाकारायला? मूल हे माणूस असते, आपले प्रेमाचे माणूस. पालक आणि मुलात प्रेमाचा दृश्य-अदृश्य धागा असतो. स्वार्थातून न जन्मलेले निखळ प्रेम पालक मुलांवर करत असतात. आणि मुलेही अनेकपटींनी त्याची भरपाई करत असतात. प्रौढ असलेल्या वाचकांनीही विचार करावा, की कुणीही आपल्यावर केलेल्या तुटपुंज्या प्रेमाचाही परिणाम आपल्यावर होत नाही का? मग मुलांवर त्या प्रेमाचा परिणाम होणार नाही, असे होऊच शकत नाही. तेव्हा आपल्या हातात जे नाही ते स्वीकारणे आणि जे आहे ते चांगल्यात चांगले करणे, याहून अधिक काय!

शीर्षक वाचून एकदम दचकायला झाले ना? हा प्रश्नच गैरलागू नाही का, असे आपल्याला वाटून जाते. वास्तविक हा प्रश्न योग्य आहेच, शिवाय त्याचे उत्तर ठामपणे ‘हो’ देता येणार नाही इतका तो गुंतागुंतीचा देखील आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये इंग्लंडमध्ये ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात तज्ज्ञांनी केलेल्या मांडणीमधील काही ठळक मुद्दे पालकनीतीच्या वाचकांसाठी आम्ही संक्षिप्त स्वरूपात मांडत आहोत.

पालकत्व (इतके) महत्त्वाचे नाही :

रॉबर्ट प्लॉमीन : (किंग्स कॉलेज लंडन येथील सेंटर फॉर सायकिअ‍ॅट्री, सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्समध्ये बिहेवियरल जेनेटिक्सचे प्राध्यापक)

माणसांमध्ये निर्माण झालेले वेगळेपण कशातून जन्मते? ‘नेचर’(जनुके) की ‘नर्चर’(वातावरण, जडणघडण) हा वाद तसा जुना आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये जनुकीय संशोधनामध्ये कमालीची प्रगती झाली आहे. बहुतांश शास्त्रज्ञ मानतात, की आपल्याला घडवण्यामध्ये आजूबाजूच्या वातावरणापेक्षा खूप मोठा वाटा आपल्या जीन्सचा (जनुके) असतो. जन्मल्याबरोबर आपल्याला कोणी दत्तक घेतले असते आणि आपण वेगळ्या शहरात, शाळेत आणि मित्रमैत्रिणींच्या सांनिध्यात वाढलो असतो तरी देखील, व्यक्ती म्हणून थोड्याफार फरकाने आपण आज आहोत तसेच राहिलो असतो. वातावरणाचा आपल्यावर होणारा परिणाम जनुकांच्या प्रभावाच्या तुलनेत नगण्य असतो. हे माझे फक्त वैयक्तिक मत नसून असे अभ्यास झालेले आहेत. न्यूयॉर्कमधील मुले दत्तक देणार्‍या एका संस्थेमधून तीन वेगवेगळ्या घरांत दत्तक गेलेल्या मुलांचा अभ्यास केला असता लक्षात आले, की वरवरचे बदल वगळता, ही तिन्ही मुले सारखीच होती. हे सारखेपण फक्त दिसण्यात नव्हते, तर त्यांची मानसिक घडण देखील सारखी होती. त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव एवढेच नव्हे तर त्यांची मानसिक आरोग्याची निदर्शके देखील सारखी होती – तिघेही डिप्रेशन या आजाराला बळी पडण्याची शक्यता होती. या तिघांपैकी एक जण गरिबीत वाढला, एक मध्यमवर्गीय कुटुंबात तर तिसरा उच्चभ्रू कुटुंबात. तरीदेखील त्यांच्यातले साम्य नजरेआड करता येण्यासारखे नाही. नैसर्गिक पालकांबरोबर वाढणारी मुले त्यांच्या पालकांशी जेवढे साधर्म्य दर्शवतात, तेवढेच दत्तक गेलेली मुले देखील त्यांच्या नैसर्गिक पालकांशी साधर्म्य दर्शवतात. अर्थात, आपण बोलतोय ते सर्वसाधारण पालक आणि मुलांबद्दल. ज्या घरांमध्ये मुलांवर अत्याचार होतात किंवा त्यांची उपासमार होते, अशा वातावरणाचे त्यांच्यावर खोलवर परिणाम होतात. थोडक्यात, आपली जनुकीय घडण हा आपल्यावर पद्धतशीरपणे परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे. वातावरणाचा परिणाम होत असला, तरी तो यादृच्छिक (रँडम), अनित्य असतो. त्याची नेमकेपणाने एकासएक संगती लावता येत नाही. मला वाटतं, हा शोध पालकांना काही प्रमाणात आश्वस्त करणारा आहे, आपल्या एका चुकीमुळे आपले मूल बिघडेल अशी भीती बाळगायला आता जागा नाही.

स्टुअर्ट रिची : (किंग्स कॉलेज लंडन येथील सोशल जेनेटिक्स अँड डेव्हलपमेंटल सायकिअ‍ॅट्री सेंटरमध्ये अध्यापक)

माझ्या मते पालकत्व महत्त्वाचे आहे; पण आपल्याला वाटते तितके नाही. पालकत्वाला वाजवीपेक्षा खूप जास्त महत्त्व दिले गेलेले आहे. बरेचदा हे अर्ध्याकच्च्या संशोधनाचे फलित असते. मी नुकताच एक संशोधन अहवाल वाचला – ज्या घरांमध्ये खूप पुस्तके आढळली, त्या घरांमधली मुले अभ्यासात पुढे होती. आणि म्हणून म्हटले होते, की वातावरणाचा परिणाम म्हणून मुले हुशार होतात. या अभ्यासातील महत्त्वाची त्रुटी म्हणजे या हुशार मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये असणार्‍या महत्त्वाच्या साधर्म्याचा – जनुकीय बांधणीचा – विचार केलेला नव्हता. या अभ्यासातील तथ्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येईल. हुशार आईवडिलांची मुले हुशार असतात आणि हुशार आईवडील जास्त वाचन करतात त्यामुळे त्यांच्या घरात जास्त पुस्तके असतात. म्हणजे मुलांमध्ये आलेली हुशारी पुस्तकांमुळे आहे हे कशावरून? अभ्यासात पुढे असणे, जास्त प्रश्न विचारणे, विचार करणे हे बर्‍याच अंशी जनुकीय बांधणीशी संबंधित आहे. मी अनेक अभ्यास पाहिले आहेत, जे मुलांमधील एखाद्या गुणधर्माचा संबंध सरसकट पालकांच्या वर्तनाशी किंवा पालकत्वाच्या पद्धतीशी जोडतात; जनुकीय प्रभावाची शक्यता देखील विचारात घेत नाहीत. खरे पाहता, जनुकीय बांधणी आणि संशोधन या गुंतागुंतीच्या संज्ञांकडे वळण्याआधी आजूबाजूला नजर टाकली, तरी आपल्या लक्षात येईल, की एकाच घरात वाढणारी दोन मुले सारखी नसतात. ह्याला त्यांची जनुकीय बांधणीच कारणीभूत ठरू शकते, वातावरण तर दोघांनाही समान मिळते. तुम्ही म्हणाल, म्हणजे आम्ही आमच्या मुलांना संगीत, खेळ, साहित्य वगैरे गोष्टींची ओळख व्हावी म्हणून करत असलेले प्रयत्न बंद करावे का? तर तसे नाही. या सर्व गोष्टी माणूस म्हणून जगण्यात महत्त्वाच्या ठरतात आणि त्या जोपासल्याच पाहिजेत. मात्र त्यामुळे आपले मूल खूप वेगळे घडेल ही समजूत खोटी आहे. पालकत्वाने काहीच फरक पडत नाही असे नाही. जनुकीय बांधणीचा परिणाम समान असताना मुलांच्या शैक्षणिक निष्पत्तीबद्दल जे अभ्यास केले गेले – म्हणजे एकाच घरातील आयडेंटिकल ट्विन्स (समान जुळी मुले), दत्तक मुले इत्यादी, त्यात पालकत्वामुळे होणारे थोडेफार फरक जाणवले. तसेच वर्तणुकीचे प्रश्न असलेल्या, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या तसेच कुपोषित मुलांमध्ये पालकत्वाचा, सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम जाणवला; पण अशी टोकाची परिस्थिती वगळता पालकत्वाचा मुलांच्या क्षमतांवर आणि व्यक्तिमत्त्वावर असणारा प्रभाव हा अतिशय कमी, अगदी नगण्य असल्याचे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेतले, तर पालक म्हणून मुलांना ‘घडवण्यापेक्षा’ त्यांना ‘स्वीकारण्यावर’ आणि त्यांना स्वतःच्या गतीने, पद्धतीने उमलू देण्यावर आपण भर देऊ.

पालकत्व महत्त्वाचे आहे :

सुझन पॉलबी: (डेव्हलपमेंटल क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट)

माझ्यामते पालकत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक अभ्यासांतून दिसते, की गर्भधारणा झाल्यापासून आजूबाजूच्या वातावरणाचा मुलावर परिणाम होत असतो. मूल पोटात असताना आईला नैराश्य(डिप्रेशन) आलेलं असेल, तर मुलाच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. जनुकीय संशोधन जसे झपाट्याने पुढे गेले, तसेच बायोकेमिस्ट्री, मनोविज्ञान, मनोविश्लेषण या शाखांमध्ये देखील संशोधन झाले. गर्भवती असताना आई काय जेवते याचाच नाही तर तिच्या मानसिक अवस्थेचा देखील गर्भावर परिणाम होतो. आई तणावात असली, तर त्यामुळे निर्माण होणारे कॉर्टिसॉल हे संप्रेरक बाळाच्या मेंदूवर विपरीत परिणाम करू शकते. गर्भातील वातावरणाचा परिणाम मुलाच्या रोगप्रतिकारक्षमतेवर तसेच त्याच्या आयुर्मानावरही होतो. आपल्यामधली जनुके स्विचसारखी सुरू-बंद होतात. याचा अभ्यास एपिजेनेटिक्स या शाखेत केला जातो. आपल्यामधली काही जनुके कधी आणि किती प्रमाणात अभिव्यक्त होतील हे ठरवण्यात देखील आजूबाजूच्या वातावरणाचा हात असतो, असे अभ्यास सांगतो. त्यामुळे फक्त जनुकीय बांधणी महत्त्वाची, वातावरण नाही, हे म्हणणे तितकेसे योग्य नाही. जनुकीय बांधणीवरच सर्व काही ठरले असते, तर आईला असलेला मानसिक आजार मुलांमध्येही आला असता. प्रत्यक्षात, मुलांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे निर्माण होण्यामध्ये गर्भावस्थेत आईची मानसिक अवस्था काय होती हे महत्त्वपूर्ण ठरते, असे दिसून आले आहे. म्हणजेच वातावरणाचा परिणाम महत्त्वाचा ठरतो.

अ‍ॅन प्लेषेट मर्फी : (थेरपिस्ट, पालक समुपदेशक)

मी म्हणेन, जनुकीय बांधणी एखाद्या ब्लूप्रिंटसारखी काम करते हे खरे; पण मुलांना मिळणार्‍या प्रेमामुळे आणि नात्यांमुळेच पुढची इमारत आकार घेते. विशेषतः त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करणार्‍या व्यक्तींशी – अर्थात पालकांशी – असलेले नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे ठरतात. एखाद्या मुलामध्ये असलेल्या आक्रमकतेला किंवा बुजरेपणाला किंवा त्याच्या लैंगिकतेला 50% त्याची जनुकीय बांधणी जबाबदार असली, तरी आपण पालक म्हणून या सगळ्याला दिलेला प्रतिसाद देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. एकाच घरातील दोन मुले वेगळी असतात, कारण पालक एकच असले, तरी पहिल्या आणि दुसर्‍या मुलाने अनुभवलेले पालकत्व वेगवेगळे असते. पालक देखील काळानुरूप बदलत जातात. मूल तान्हे असताना त्याच्याशी झालेला संवाद, स्पर्श आणि त्याला त्याने दिलेला प्रतिसाद यामुळे मुलाच्या मेंदूत जोडण्या निर्माण होत असतात. न्यूरोसायन्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे मेंदूतली ही प्रक्रिया आपल्याला बघता येते. ज्या मुलांना प्रेमळ वातावरण मिळत नाही, त्यांच्या मेंदूतील पुढील भागात (प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स) खूप कमी क्रियाशीलता दिसून येते. हा भाग मुलाच्या सामाजिक-भावनिक वर्तनाशी संबंधित आहे. अभ्यास सांगतो, की ज्या मुलांना लहानपणी प्रेमाचा, सकारात्मक, आश्वासक प्रतिसाद मिळतो, ती इतरांच्या भावना अधिक चांगल्या समजू शकतात, इतरांबरोबर मिळून-मिसळून काम करू शकतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, त्यांचा बौद्धिक आणि मूल्यात्मक विकास होतो. एखाद्या मुलाची बौद्धिक क्षमता त्याच्या जनुकीय बांधणीमुळे जन्मतःच कमी आहे असे आपण म्हणतो, तेव्हा माझ्या मते आपण त्या मुलाला एक लेबल चिटकवत असतो. त्यातून त्या मुलाच्या यशस्वी होण्याच्या शक्यता आपण अधिकच कमी करतो. मुलाची बुद्धिमत्ता जनुकीय बांधणीमुळे 70 टक्के ठरत असली, तरी उरलेल्या 30 टक्क्यांमुळे विशेषत: लहान वयात आणि गरीब परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणून प्रत्येक मुलाला हे 30 टक्के त्याच्या भोवतीच्या वातावरणातून मिळावेत यासाठी पालक म्हणून आपण आणि एकूणच समाजाने, सरकारने प्रयत्न केला पाहिजे.

या प्राथमिक मांडणीनंतर आलेले काही प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. त्यातील काही निवडक प्रश्न आणि त्यांना तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे पाहूया :

प्र : मुलाचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी या जनुकीय बांधणीच्या आधारे पूर्वनिश्चित असल्याने त्याचा स्वीकार करा, त्यांना बदलायला जाऊ नका असे आपण म्हणतो आहे. मुलांचा स्वीकार न करता आपली मते, इच्छा त्यांच्यावर लादण्याचे दुष्परिणाम होतील का? पालकत्वाने फरक पडत नसेल तर अशा दुराग्रहाने देखील फरक पडायला नको, नाही का?

स्टुअर्ट : अशा दुराग्रहाने दुष्परिणाम होतात असे फारसे पुरावे माझ्या पाहण्यात नाहीत. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे, की मुलांना बदलणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. त्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य करता येणार नाही.

प्र : आपल्या मुलांची जनुकीय बांधणी तशीही आपल्या हातात नसते. मग त्याचा विचार करण्यापेक्षा जबाबदार पालक होण्याकडे लक्ष का देऊ नये?

स्टुअर्ट : अगदीच. मी आधी म्हणल्याप्रमाणे काही गोष्टी – उदाहरणार्थ आहार, आरोग्य हे घटक महत्त्वाचे आहेत. त्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. गरिबीतून लोकांना बाहेर काढणे याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र यापलीकडे जाऊन आपल्याला फारसे काही साध्य करता येणार नाही याची जाण आपण बाळगली पाहिजे.

प्र : (सुझन पॉलबी) : तुम्ही म्हणता, टोकाची परिस्थिती वगळता जनुकीय बांधणीचा प्रभाव सर्वसामान्य परिस्थितीमधील मुलांसाठी वातावरणापेक्षा अत्यंत जास्त महत्त्वाचा ठरतो; पण ज्यांना तुम्ही टोकाची उदाहरणे म्हणताहात, ती तितकी टोकाची नाहीत. आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी शाळेत किंवा इतरत्र, धमकावणे, त्रास देणे अनुभवले असेल. अशावेळी पालकांचा मिळणारा आधार महत्त्वाचा ठरला नाही का?

रॉबर्ट : तसे पाहिले तर इथे बसलेल्या प्रत्येकच व्यक्तीला काही ना काही नकारात्मक अनुभव आलेला असणार. पण इथले सगळे लोक समायोजित (वेल अ‍ॅडजस्टेड) आहेत. म्हणजे मग आश्वासक पालक असण्याचा काही संबंधच उरत नाही. मी असा एखादा नकारात्मक अनुभव येणार्‍या मुलांबद्दल नव्हतो बोलत. टोकाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार्‍या मुलांवर वातावरणाचा खूप परिणाम होतो असे मी म्हणालो.

प्र : आपल्या क्षमता आपल्या जनुकीय बांधणीवर ठरतात असे मानले, तरी देखील आपली रुची किंवा इंटरेस्टचे काय? माझ्या घरात मला कोणत्या गोष्टींची ओळख करून दिली जाते यावर माझी त्यातील रुची ठरणार नाही का?

(‘पालकत्व तितकेसे महत्त्वाचे नाही’ असे म्हणणार्‍या गटातील कोणीच या प्रश्नाला हात घातला नाही.)

प्र : गर्भवती स्त्रीच्या पोटातील मायक्रोबायोममुळे (रसायने, त्यांची पातळी, जीवाणू या सर्वांचा समावेश असलेली एका अर्थाने परिसंस्था) जनुकीय अभिव्यक्ती प्रभावित होते, असे काही अभ्यास सांगतात. याला तुम्ही काय म्हणणार – जनुकीय बांधणीचा परिणाम की वातावरणाचा परिणाम? यामध्ये दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे.

स्टुअर्ट : मायक्रोबायोमबद्दल आपल्याकडे अजून पुरेशी माहिती नाही. आपल्याला अजून त्याबद्दल फारसे काही सांगता येणार नाही.

प्र : जनुकीय बांधणी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते, असे म्हणताना वापरलेल्या विदामध्ये (डेटामध्ये) पूर्वग्रह(बायस) असण्याची शक्यता नाही का? कारण तुम्ही सांगितलेली जुळी भावंडे वगैरे स्वतः होऊन या अभ्यासासाठी पुढे आली होती.

अ‍ॅन प्लेषेट मर्फी : मला तर याही पुढे जाऊन सांगावेसे वाटते, की जनुकीय बांधणी सर्वात महत्त्वाची आहे हे सांगणारे बहुतांश संशोधन पाश्चिमात्य, ख्रिश्चनधर्मीय, लोकशाही पद्धतीने चालणार्‍या देशांतील गोर्‍या, शिकलेल्या आणि श्रीमंत लोकांवर झाले आहे.

स्टुअर्ट : अ‍ॅन प्लेषेट मर्फी यांचा मुद्दा मला मान्य आहे; पण हे सर्वच मानसशास्त्रीय संशोधनांना लागू आहे.

प्र : माझा प्रश्न ‘पालकत्व खूप महत्त्वाचे आहे’ असे मानणार्‍या गटासाठी आहे. जुळ्या मुलांच्या अभ्यासातून पुढे आलेल्या निरीक्षणांमागे काय कारण आहे असे तुम्ही मानता? कारण त्या मुलांना वेगवेगळ्या पालकांनी वाढवून देखील ती सारखी निघाली.

अ‍ॅन प्लेषेट मर्फी : एक तर अशी उदाहरणे आणि अभ्यास फार कमी आहे. त्यामुळे त्यातून निघालेले निष्कर्ष किती अंशी सार्वत्रिक आहेत, याबद्दल शंका घ्यायला वाव आहे. दुसरे म्हणजे जनुकीय बांधणी महत्त्वाची आहेच. त्या मुद्द्याबद्दल काही वाद नाही. त्यामुळे मुलांमधील साधर्म्य जनुकीय बांधणीमुळे निर्माण झाले का तर हो, तसे होऊच शकते. पण मुले एकमेकांपेक्षा वेगळी का असतात म्हणाल, तर मी म्हणेन, ते वेगळेपण थोडेफार जनुकांमध्ये तर आहेच; पण पालकत्वाच्या पद्धतीमध्ये देखील आहे.

प्र : तुच्यापैकी कोणीच मुलांच्या मित्रमैत्रिणींच्या प्रभावाबद्दल बोलले नाही.

स्टुअर्ट : जेव्हा मी वातावरणाचा परिणाम म्हणतो, तेव्हा त्यात समवयस्क मित्रमैत्रिणींचा (पिअर्स) देखील समावेश आहे.

या चर्चेत काही त्रुटी आहेत. काही संज्ञांचे अर्थ सुरुवातीला स्पष्ट करणे आवश्यक होते. तज्ज्ञमंडळींच्या पालकत्वाच्या व्याख्येत भिन्नता असल्याचे आढळून आले. तसेच दोन्ही बाजूंमध्ये असलेली असहमती नेमकी कशावर आहे हे देखील स्पष्ट करणे गरजेचे होते. एका बाजूच्या तज्ज्ञांचे म्हणणे, ‘पालकत्वाच्या नवनवीन फॅड्सच्या’ मागे लागू नये तर दुसर्‍या बाजूचा आग्रह होता, की मुलांकडे (विशेषत: लहान वयात) दुर्लक्ष करू नये. हे दोन स्पष्टपणे परस्परविरोधी मुद्दे आहेत असे नाही. पालकत्व महत्त्वाचे आहे का, याला घडलेल्या चर्चेमधून ‘हो’ किंवा ‘नाही’ असे नेमके उत्तर मिळत नाही. मात्र सर्व तज्ज्ञांचे काही गोष्टींवर एकमत होते. पहिले म्हणजे व्यक्ती म्हणून आपण कसे घडतो यात 50 टक्क्यांहून अधिक प्रभाव आपल्या जनुकीय बांधणीचा असतो. त्यामुळे त्याच्या विरोधात जाऊन काही करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळणे कठीण आहे. त्याऐवजी त्याचा स्वीकार करून ते कसे हाताळावे, त्या आधारे प्रगती कशी करावी याचा विचार व्हावा. दुसरे, मुलांचा आहार, सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या अभावी व्यक्तीवर वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतो. तिसरे, योग्य आहार न मिळणे, असुरक्षितता, अत्यंत गरीबी ही देशातील व्यवस्थेपुढची समस्या असून ही विषमता कमी केली नाही, तर देशातील मनुष्यबळावर त्याचे विपरीत परिणाम होतील हे नक्की.

Source: https://media.acast.com/intelligencesquared/parentingdoesntmatter-ornotasmuchasyouthink-/media.mp3

Sayali

सायली तामणे | sayali.tamane@gmail.com

लेखिका पालकनीती संपादक गटाच्या सदस्य आहेत.