पालकत्व

पालकत्व जेवढं आनंददायक असतं, तितकंच आव्हानात्मकही. पावलोपावली परीक्षा
पाहणारं. पालकही शेवटी माणूसच तर असतात. त्यांचं पालकत्वही मुलांच्या
सोबतीनंच मोठं होत असतं. ह्या पानावर इथून पुढे वर्षभर आपण पालकत्वाशी
संबंधित छोटे प्रसंग, घटना पाहणार आहोत. त्याबरोबरच अंतर्मुख करणारे, विचार
करायला लावणारे काही प्रश्नही देणार आहोत. वाचकांनी मेल करून
(रिश्ररज्ञपशशींळऽसारळश्र.लेा) किंवा व्हॉट्सपवर (9834417583) आपली मतं,
प्रतिसाद पाठवावेत ही विनंती.
अथर्व खूपच वैतागला होता. वर्गात ताई काय शिकवताहेत काही कळत नव्हतं. काल
उशिरापर्यंत टीव्ही बघितल्यामुळे डोकं दुखत होतं. झोपही येत होती. तेवढ्यात
ताईंनी त्याला उभं राहायला सांगून काहीतरी वाचायला सांगितलं. कोणतं पुस्तक…
कुठला धडा… अथर्वला काहीच कळेना. ताई रागावून म्हणाल्या, ‘‘कुठे लक्ष असतं
रे? उद्या अभ्यास करून आला नाहीस, तर तुला घरी पाठवीन परत.’’ आज घरी
गेल्यावर नक्की अभ्यास करायचा असं अथर्वनं मनाशी ठरवून टाकलं. घरी आला
तेव्हा भुकेनं पोटात कावळे ओरडत होते. घाईघाईनं काहीतरी पोटात ढकलून अथर्व
ट्यूशनला गेला. तिथेही शाळेसारखीच गत. मला काहीच जमत नाही असं त्याला
वाटू लागलं.
घरी आला तर आई स्वयंपाक करता करता म्हणाली, ‘‘आज ताईंचा फोन आला
होता मला. वर्गात लक्ष देत नाही म्हणत होत्या. असं करू नको माय, अभ्यास
करशील तरच त पुढं जाशील न. चल अभ्यास कर.’’
आता त्याला ताईंनी दिलेल्या अभ्यासाची आठवण झाली. कोणता अभ्यास, कोणता
धडा, कोणता प्रश्न काही आठवेना. दप्तर समोर ठेवून विचार करत होता, तेवढ्यात
शेजारच्या घरी दारुड्यांची भांडणं सुरू झाली. अभ्यासाची इच्छाच होईना. डोकं पुन्हा
भणभणू लागलं. कुठेतरी पळून जावं असं अथर्वला वाटू लागलं. पण आता कुठे
जाणार? आई रागवेल. आई स्वयंपाक करत होती. पप्पा अजून घरी आले नव्हते.
थोडा वेळ गेम खेळू म्हणून तो आईचा फोन घेऊन बसला. जुनेदपण ऑनलाईन
होता. गेम खेळायला खूप मज्जा येऊ लागली. जुनेद खूप छान खेळत होता.

त्याच्यासारखं खेळता यावं म्हणून अथर्व खेळू लागला आणि त्याला जमूही लागलं.
त्याला मज्जा येऊ लागली. इतक्यात आईनं पाठीत जोरात धपाटा घातला तेव्हा
अथर्व भानावर आला. ‘‘किती वेळापासून हाक मारते आहे. बहिरा झालास का?
आणि मला वाटलं अभ्यास करत बसला असशील. फोन काय घेऊन बसला आहेस?
हे पैसे घे आणि दुकानातून चहापत्ती घेऊन ये. चहा करायला पत्तीच नाही.’’ असं
म्हणून पैसे देऊन आई आत गेली. अथर्वच्या डोक्यात अजूनही गेम चालू होता.
एकच गेम खेळू म्हणून त्यानं पुन्हा फोन हाती घेतला. थोड्या वेळानं आई बाहेर
आली. अथर्वच्या हाती पुन्हा फोन बघून…

  1. आईने अथर्वला का मारले असावे?
  2. आईने मारले त्याचे अथर्वला वाईट का वाटले? त्याच्या मनात तेव्हा काय चालू
    होते?
  3. आईच्या मारण्याचा उपयोग झाला असे तुम्हाला वाटते का? का?
  4. अथर्वची कोणती गरज मोबाईलमुळे पूर्ण होत होती? तशी गरज असणे तुम्हाला
    योग्य वाटते का? असेल तर वेगळे काय करता येईल?
  5. नसेल तर अथर्वला मारण्याऐवजी तुम्ही वेगळे काही केले असते का? काय?