पाहिजे – एक आदर्श आई

माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. अतिशय दमलेल्या आवाजात ती म्हणत होती, ‘‘मी चांगली आई बनू शकणार्‍यापैकी नाहीच  की काय, असं वाटायला लागलंय. धाकट्याचे उपद्व्याप नि माझं वैतागणं, मोठी आता सहा वर्षाची – तिची सारखी कुरकुर, ‘आई मी काय करू?’ नि त्यावर माझं ओरडणं, हे घरात सतत चालू असतं. त्यांच्या खाण्याच्या वेळा, आजारपणं नि अभ्यास ह्या चक्रातून तर सुटकाच नाही. ऑफिसच्या कामाचं देखील असं नसतं गं! एकदा संध्याकाळी घरी आलं की ते विसरलं की चालतं. शिवाय आठवड्याच्या सुट्ट्याही असतात. इथे म्हणजे बारा महिने चोवीस तासांची ड्यूटी.’’

मी सुद्धा एक आईच आहे. माझ्या मनात आलं, ‘‘हे तर काहीच नाही. जरा मोठी होऊ देत पोरटी, मग समजेल.’’ विचार करताना माझ्या लक्षात येऊ लागलं की मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे प्रश्न वेगवेगळे असतात नि त्यानुसार आईला चक्क बदलायला लागतं. एक वेगळीच कल्पना सुचली. समजा, अशा आदर्श आईच्या पदासाठी जाहिरात द्यायची असेल तर त्याचं वर्णन असं करता येईल –

पाहिजे – एक आदर्श आई 

पाहिजे : समाधानी, प्रेमळ व तान्ह्या बाळाची काळजी घेणारी आई. 

डोलवणे, गोंजारणे, कुशीत घेणे यासारख्या गोष्टींचा आनंद घेणारी, दर तीन तासांनी न कंटाळता 20 मिनिटे स्तनपानासाठी छातीशी धरणारी आई. झोप कमी, पहाटेच उठणारी असावी. पदवीधर असणे आवश्यक नाही. दिवसरात्र तिन्ही पाळ्यांत काम करणे अत्यावश्यक. सात दिवसांचा आठवडा असेल. स्वत:च्या आईला तात्पुरत्या बदलीवर आणल्यासच रजा. वैयक्तिक प्रगतीसाठी संधी मिळणार नाही.

दीड वर्षांनंतर त्याच मुलाच्या आईची जागा भरण्यासाठी योग्य अशा उमेदवाराचे वर्णन – पाहिजे : 

न दमणार्‍या बाळासाठी उच्च प्रतीचा अ‍ॅथलीट, चपळ हालचाली आवश्यक, अमर्याद ऊर्जा व सहनशक्ती आवश्यक. प्रथमोपचाराची माहिती असावी. सतत अडथळ्यांची शर्यत असतानासुद्धा स्वयंपाक करणे, डायव्हिंग करणे, फोन घेणे, व काम करण्याची कला अवगत असावी. दिवसाचे 15 तास काम करण्याची सवय असणे आवश्यक. जोपर्यंत बाळ झोपत नाही तोपर्यंत चहा किंवा जेवणाची सुट्टी घेण्याची मुभा नाही. ऑलिंपिकची पार्श्वभूमी असलेल्या बालसंगोपन परिचारिकेला प्राधान्य.

आणखी दीड वर्षांनंतर याच आईची पात्रता खालील प्रमाणे असावी : 

बालशिक्षणात तज्ज्ञ व्यक्ती, शालापूर्व, निर्मितीक्षम तसेच व्यक्तिसापेक्ष शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे वातावरण निर्मिती करण्याची क्षमता असावी. कला, संगीत, मनोरंजन याचा अनुभव असावा. एक तरी परकीय भाषा अवगत असावी. भाषा व बालकांच्या मानसशास्त्राचे प्रशिक्षण आवश्यक. ज्यावेळी बालक निरोगी असेल व शाळा चालू असेल त्यावेळी सोमवार ते शुक्रवार दोन तास सुट्टी मिळेल.

जेव्हा बालक 6 ते 12 वर्षे वयोगटातील असेल तेव्हा नोकरीत स्थैर्य वाढेल. खालील पात्रता असणार्‍या आया यात वरचढ ठरतील – 

उत्तम संधी : मनोरंजन, शिबिरे, भारतीय कला व सर्व खेळांमधील्या तज्ज्ञ आयांसाठी उत्तम संधी. मध्यस्थाची भूमिका बजावता येणे आवश्यक. जनसंपर्कासाठीचे कौशल्य आवश्यक. इतर मुलांच्या पालकांशी, शिक्षकांशी व इतर अधिकार्‍यांशी परिणामकारक व्यवहार करण्याची कला अवगत असावी. गणित विषयांची व लैंगिकता शिक्षणाची माहिती आवश्यक, सदर व्यक्ती ही चिखल, कीटक पालन, पाळीव प्राणी व शेजारपाजारची बच्चे कंपनी यांना हरकत घेणारी नसावी.

मूल जेव्हा 14 वर्षांचे होईल तेव्हा – 

आईने नवीन जबाबदार्‍यांसाठी सिद्ध असावे : किशोरवयाचे मानसशास्त्र या विषयात तज्ज्ञ असणार्‍या व्यक्तीलाच भरपूर स्वयंपाक करण्यातही विशेष गती असावी. सहनशीलता ही महत्त्वाची बाब आवश्यक. थोड्या प्रमाणात बहिरेपणा असल्यास प्राधान्य किंवा स्वत:साठी कापसाचे बोळे जवळ बाळगावे. आपली उपस्थिती मुलांना अडचणीची होत आहे हे त्वरित ओळखून तेथून सटकण्याची कला अवगत असणे अत्यावश्यक.

मूल 18 वर्षांचे झाल्यावर आईला आणखी एक गोष्ट करता यावी – 

कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलास पॉकेटमनी, कपडे, म्युझिक व दुचाकी पुरविणारा फायनान्सर पाहिजे. सा देणे जरुरीचे नाही. सदर जागा अनिश्चित कालावधीसाठी आहे. अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी आईला भरपूर वेळ मिळेल. त्याचा सदुपयोग करण्याची इच्छा हवी.

तळटीप – (1) ज्या आईला एकापेक्षा अधिक मुले आहेत ती आई दोन किंवा जास्त जागांसाठी एकाच वेळी काम करू शकेल.

(2) ज्यांना हे काम उत्तमरीत्या करता येते त्यांना नोकरी नसूनसुद्धा कायमस्वरूपी काम करावे लागते.

(3) आपण कल्पना केल्यापेक्षाही चांगला मोबदला आपल्याला नक्कीच मिळतो.

Chicken soup for women’s soul मधून साभार अनुवाद : वृषाली वैद्य