पुस्तक परिचय : ‘हॅत्तेच्या!!’ आणि ‘किती काम केलं!’

 लेखक : माधुरी पुरंदरे

प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

आपण नवीन पुस्तक हातात घेतो, त्याचे मुखपृष्ठ निरखतो, मग आतल्या पानांकडे वळतो. प्रस्तावना वाचतो, अनुक्रम बघतो… इ. इ. साधारणपणे क्रम हा असा असतो.

ज्योत्स्ना प्रकाशनाने चिमुकल्या ‘वाचकांसाठी’ दोन नवीन पुस्तके आणली आहेत. बालगोपाळांच्या आणि त्यांच्या पालकांच्याही आवडत्या लेखिका माधुरी पुरंदरे ह्यांची.

आधी पुस्तकाचे मलपृष्ठ बघावे, त्यावरील मजकूर नीट समजून घ्यावा आणि मगच पहिल्या पानाकडे वळावे, अशी ह्या पुस्तकांची विशेष अपेक्षा आहे. सर्वसाधारणपणे, मूल बसून पुस्तक वाचण्याच्या वयाचे झाले, की आईबाबा त्याच्यासाठी पुस्तकखरेदी सुरू करतात. ही दोन पुस्तके मात्र अगदी रांगत्या बाळांनाही ‘वाचता’ यावीत म्हणूनच लिहिली गेली आहेत.

पुस्तकांची बांधणीही त्या दृष्टीने केलेली आहे. दोन्ही पुस्तके बोर्डबुक असल्याने पुस्तकाची पाने उलटण्याचे कौशल्य ज्यांना अजून साधायचे आहे असे चिमुकलेही पान सहज उलटू शकतात. पान फाटणे, दुमडणे, चुरगळणे अशा शययता ह्या पुस्तकांच्या बाबतीत संभवत नाहीत आणि पुस्तक मनसोक्त हाताळण्याचे सुखही मिळते.

‘हॅत्तेच्या!!’ आणि ‘किती काम केलं!’ ह्या दोन्ही पुस्तकांचा नायक आहे आरव. आणि आरवच्या विडातील आई, आजी आणि आजोबा ही इतर पात्रे. त्याचबरोबर आरव जिथे जाईल तिथे त्याच्याबरोबर लळत लोंबकळत जाणारे त्याचे निळू नावाचे इवलुले माकडुले. कधी ती दोघे छत्रीच्या तंबूत झोपतात, कधी आरव निळूला छत्रीच्या झाडाखाली गोष्ट वाचून दाखवतो, तर कधी आरव आईच्या कपाटातील रंगीबेरंगी विडात रमतो.

लहान मुलांच्या भावविडातल्या अगदी छोट्याछोट्या गोष्टी त्यांना आपलेसे वाटेल अशा पद्धतीने सांगणे हा माधुरीताईंचा हातखंडा आहे. त्याला पूरक अशी त्यांचीच चित्रे पुस्तकांच्या गोडव्यात भर घालतात. खिडकीत बसलेली चिऊताई, आकाशात उडणारे पक्षी, जमिनीवर पडलेले आरवचे डमरू असे बारिकसारिक तपशील ही माधुरीताईंच्या चित्रांची खासियतच आहे. चित्रवाचन करून पुस्तक वाचणार्‍या बाळांना वाचनाची गोडी लावण्यासाठी म्हणून ह्या पुस्तकांकडे बघता येईल.

ज्योत्स्ना प्रकाशनाची माधुरी पुरंदरेंची इतर पुस्तके लहानग्यांच्या वाचनविडात महत्त्वाचे स्थान पटकावून उभी आहेत; त्या शिडीची अगदी पहिली – दुसरी पायरी म्हणून ह्या पुस्तकांकडे बघता येईल खास!

पालकनीती प्रतिनिधी