प्रतिसाद – एप्रिल २००२

‘‘16 मार्चचा अंक विचारांना खूप शिदोरी पुरवणारा. संवादकीय – अतिशय परखड, सुस्पष्ट व तरीही सुटसुटीत. सामील व्हा – महत्त्वाचा वेधक मुद्दा, सृजन आनंदला कृतीसाठी प्रेरक. सोयीस्कर मतैक्य – अस्थिर महत्त्वाच्या प्रश्नावर माहितीचे झोत – विचारांना चालना, जाणिवा विकसित करणारा. याला शिक्षण ऐसे  नाव – हृदयाला भिडून स्वत:च्या अकार्यक्षमतेबद्दल हादरवणारा. मुलांची भाषा – सुस्पष्ट मार्गदर्शक.

अथपासून इतिपर्यंत प्रेरक मजकूर वाचकांपर्यंत पोचवणे फार अवघड असते. हे आव्हान समर्थपणे पेलल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!’’

लीला पाटील, कोल्हापूर.

‘‘श्रीमती रेणू गावस्करांचे लेख (तीनही) वाचले. ‘पालकनीती’च्या सागार बैठकीत या विषयावर लिहायचे ठरले होते. रेणूताईंच त्याच्या खर्‍या अधिकारी. तीन लेख वाचल्यावर मला वाटते की या लेख मालिकेचा अनुभवकथनाबरोबर संस्थांचं स्वरूप, मुलांचे प्रश्न असा उद्देश आहे. त्याबरोबर यात जनसहभागास प्रेरित करत रहायला हवं. नुसतं रेणूताईंचं जाणं, काम करणं इथंच हे थांबता कामा नये. वाचकांनी काही करणं सुचवायला हवं. रेणूताईंची संवेदनशीलता हा नेहमीच माझ्या ईर्ष्येचा विषय असतो. त्यांचं, तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!’’

डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर.

‘‘पालकनीतीचा दिवाळी अंक (2001) अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर असल्याने माझ्या मुलीने प्रेरणाने, (वय वर्षे 14 जी कर्णबधिर आहे) वाचावा व समजून घ्यावा अशी माझी इच्छा होती. घरात येणारी मासिके ती आवर्जून बघते. प्रेरणा अंक चाळत असताना मी एकदम समोर आल्याने तिने तो आपल्याला आवडला नाही असा अविर्भाव करीत बाजूला टाकला. मी तिच्या हातात देऊन, ‘‘वाच, बघ, समजून घे,’’ असे सांगितले. थोड्या वेळाने ती अंक घेऊन आली व तिने तो माझ्याकडून व्यवस्थित समजून घेतला.

शनिवारी तिची शाळा सकाळची व आमची दुपारी असते. शनिवारी ती आपल्या दोन कर्णबधिर मैत्रिणींना अंक दाखविण्यासाठी घेऊन आली. शाळेत कार्यक्रम होता व तो संपल्याने आम्ही अनपेक्षितपणे लवकर घरी आलो. लॅच-कीचे कुलूप असल्याने त्या तिघींना आम्ही आलो हे समजले नाही. आम्हाला बघताच दोघी मैत्रिणी दचकल्या व अंक लपविण्याचा प्रयत्न करू लागल्या. आम्ही काहीच पाहिले नाही असे दाखवत आत गेलो. थोड्या वेळाने प्रेरणानेच मला ‘‘मैत्रिणींना समजून सांगायला मदत करशील का?’’ विचारले. मी त्याच संधीची वाट पाहात होते. त्यांनाही अंकातील त्यांच्यासाठीचा भाग समजून सांगितल्यावर प्रेरणा म्हणाली, ‘‘माझ्या शाळेतील कर्णबधिर युनिट मधल्या सर्व मैत्रिणींना हा अंक दाखविला पाहिजे.’’ कर्णबधिर प्रेरणाची ही ‘बोलकी’ प्रतिक्रिया माझ्या शब्दांपेक्षा खूपच काही सांगणारी आहे.’’

उज्ज्वला सहाणे, पुणे.