प्रतिसाद – ऑगस्ट २००२

सप्रेम नमस्कार,

‘पालकनीती’चा नवा अंक मिळाला. या अंकाच्या संपादनासाठी आणि त्याच्या अंतर्बाह्य मांडणीसाठी खास अभिनंदन. डॉ. केळकरांच्या यथोचित गौरवासाठी ‘पालकनीती’ने घेतलेले श्रम अंकाच्या संपादनात जाणवतात. तसे डॉ. केळकरांचे विचार एकूण मराठी समाजात असायला हवेत तितके परिचित नाहीत. पालकनीतीचा परिवार अधिक व्यापक असल्याने त्याचाही लाभ अधिक मराठी माणसांना होईल. आपला प्रत्येक अंकच काहीतरी महत्त्वाचे देत असतो. फक्त आळसाने दाद देणे राहून जाते. आपल्या कामात काही हातभार लावावा अशी मनापासून इच्छा आहे. आजवर ते जमलेले नाही याची खंत मात्र प्रत्येक अंक हाती घेतल्यावर होतच असते. आता निदान पत्र पाठवून माझा आनंद कळवित आहे. या अंकात ग्रंथरूपात न आलेले डॉ. केळकरांचे लेखन आपण दिलेत आणि त्यांच्या प्रकाशित आणि आगामी लेखनाची सूची दिल्याने त्यांचे माझ्या संग्रहात नसलेले एक पुस्तक – ‘कवितेचे अध्यापन’ याची माहितीही मिळाली. ते आता मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपला दिवाळी अंकही खासच होता.

सतीश काळसेकर