प्लूटो

मुलांना वाचायला कुठलं सकस साहित्य द्यावं ह्याचा मुलांच्या वयोगटानुसार विचार करायला लागतो. सहसा कुठल्याही घरात डोकावलं, तर कपाटात कमी-अधिक प्रमाणात मराठी-इंग्रजी पुस्तकं बघायला मिळतात. मुलांची भाषिक तसेच सांस्कृतिक जाण वाढवायची असेल, तर त्यांना इतर भाषांतील साहित्याचाही परिचय करून द्यायला हवा. त्या दृष्टीनं ‘इकतारा’ प्रकाशनाच्या ‘प्लूटो’ ह्या हिंदी द्वैमासिकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 

अगदी लहान, म्हणजे आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असलेला पुस्तकांच्या जगातला हा सर्वात छोटा ग्रह! लहान मुलांसाठी म्हणून उपलब्ध असलेली बहुतेक पुस्तकं मुलांना उपदेश करायला उत्सुक असलेली दिसतात. प्लूटोचं वेगळेपण इथूनच सुरू होतं. 

कथा-कविता, चुटके, पत्र अशा विविध माध्यमांतून ‘प्लूटो’ लहानग्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जीवनाची रसरशीत ओळख करून देतं. संपूर्ण विश्वाची झलक दाखवून, सर्वसमावेशक जगाचं स्वप्न उभं करतं. प्रेम, समजूतदारपणा, मोकळेपणा व्यक्त करणारी जिवंत भाषा आणि त्याला असलेली रंगीबेरंगी चित्रांची जोड हे प्लूटोचं वैशिष्ट्य आहे. अजून पुरेसं वाचायला न येणार्‍या मुलांच्या भावविश्वात ही चित्रं फार महत्त्वाची भूमिका बजावतात. लहान मुलांची कल्पनाशक्ती, समज आणि तर्कबुद्धी ह्यावर विश्वास टाकत त्यांच्यासमोर छोटीछोटी आव्हानं ठेवली जातात. 

प्लूटोमध्ये भाषा विलक्षण पद्धतीनं भेटते…

बादल छाते हैं

मगर बिकने बाजार कहा आते हैं 

(प्लूटो ऑगस्ट-सप्टेंबर 2020)

किंवा

द के नीचे झूल रही थी 

दुम में एक और दुम 

पूंछ के प में सबने देखा 

पलट गई थी तुम      

(प्लूटो ऑगस्ट-सप्टेंबर 2020)

आणि हे तर्कबुद्धी वापरायला लावणारं मजेशीर उदाहरण- 

अध्यापिका- मैंने तुमको लाइनमें सबसे पीछे खड़े होने को कहा था ।

छात्रा- मैडम मैं  वहाँ गई थी पर राशिद वहाँ पहले से खड़ा था ।

ह्या वयातल्या मुलांसमोर वाचायला शिकण्याचं आव्हान असतं. अशा वेळी पालकांना मुलांबरोबर बसून वाचन करता येईल. ‘प्लूटो’मधल्या गोष्टी, गमतीजमती वाचणं, वाचून दाखवणं, त्या अनुषंगानं होणार्‍या गप्पा, विचार ह्यातून वाचायला शिकणं हा मुलांसाठी एक आनंददायी अनुभव ठरू शकेल.