बहुमानार्थी बहुवचन

प्रश्न : प्रत्येक भाषेचे स्वत:चे संकेत भाषांतर करताना गमती निर्माण करतात. संस्कृतातून मराठीसारख्या अनेक भाषांत आलेला संकेत म्हणजे आदरणीय व्यक्तीला बहुवचन वापरणे. हा संकेत मनात इतका ठसलेला आहे की दुसर्‍या भाषेतही अशाच पद्धतीने लेखन केले जाऊ शकते. इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत पत्रलेखन करताना अनेक विद्यार्थी आपल्या वडिलांबद्दलचे They gave me permission for the trip असे लिहितात, म्हणून मी त्यांना रागावले. पण मराठी व इंग्रजी कवींची तुलना मराठीत करताना माझी अडचण झाली. मी डन, शेक्सपीअर वगैरेंना ‘तो’ म्हणू शकते, पण केशवसुत, तुकाराम इत्यादींना तो म्हणणे मला अवघड वाटते आणि शेक्सपिअरबद्दल तितकाच आदर असूनही त्याला ‘ते’ शेक्सपिअर म्हणणे मला विचित्र वाटते. मी काय करावे? उत्तर सोपे आहे. एक कुठली तरी संबोधनाची रीत दोन्ही भाषांतरांच्या कवींसाठी वापरणे उचित ठरेल. ज्ञानेश्वर, तुकाराम अशा कवींना एकेरी उल्लेखण्यापेक्षा मिल, स्पेन्सर, शेक्सपिअर, कार्लाइल अशांचा बहुमानार्थी बहुवचनी उल्लेख करणे न्याय्य होईल. पण तरीही हा संकेत माझ्या लेखनात आणि वाचकांच्या वाचनात सहजासहजी रुळेल का?

सुप्रिया सहस्रबुद्धे 

उत्तर : मोरो केशव दामले यांच्या ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ (1911) या ग्रंथात याची चर्चा आहे. (छेदक 124, 125, 287, 575 पहावेत. दामले ‘बहुमानार्थी’ आणि ‘आदरार्थी’ या दोन्ही पारिभाषिक संज्ञा वापरतात.) दामल्यांच्या चर्चेचा विस्तार करून पुढील व्यवस्था मांडता येईल: 

(1) एकाच व्यक्तीविषयी बहुवचनाचा उपयोग बहुमानार्थी असतो. पण म्हणून एकवचनाचा उपयोग अनादरसूचक असतो असे नाही. उदाहरणार्थ, आदर आणि आत्यंतिक जवळीक एकत्र असल्यास बहुमानार्थ मागे पडतो: देवा रे, माझी कुळस्वामिनी, माझी आई (पण : माझ्या नवर्‍याच्या आई), माझी ज्ञानेश्वरमाऊली. 

(2) बहुमानार्थी बहुवचनाचा प्रयोग करायचा तर बोलणार्‍याच्या मनात निर्देशित व्यक्ती बहुमानास पात्र पाहिजे, (सामान्यत:) तिच्याविषयी आदर पाहिजे आणि ती स्थलकालदृष्ट्या आपल्या कक्षेतली वाटली पाहिजे. उदाहरणार्थ, ते दादोबा, पण तो पाणिनी किंवा चॉम्स्की (सर्वच व्याकरणकार आदरणीय वाटूनही), भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, पण अमेरिकेचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष (दोघेही बहुमानास पात्र वाटूनही). 

(3) याहून वेगळा प्रयोग दिसला तर त्याची कारण पुढीलपैकी असू शकतात. 

(क) बहुमानास पात्र व्यक्तीबद्दल अनादर दाखवायचा आहे – विशेषत: शिव्याशाप देताना वा हेटाळणी करताना. 

(ख) बोलणार्‍याला निर्दिष्ट व्यक्ती स्थळदृष्ट्या परकी वाटते. 

(ग) बोलणार्‍याला निर्दिष्ट व्यक्ती कालदृष्ट्या इतिहासजमा वाटते. 

(घ) आदर असणे, बहुमान दाखवणे त्या त्या संदर्भात गैरलागू ठरतात. उदाहरणार्थ, तटस्थ चर्चेत: भारताचा राष्ट्रपती सामान्यत: आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतो. तुकारामाचे सामाजिक आवाहन रामदासाच्या सामाजिक आवाहनापेक्षा भिन्न आहे. 

(4) बहुमानार्थी बहुवचनाचा अनपेक्षित ठिकाणी प्रयोग झाला तर तो बहुधा उपरोधपूर्ण असतो. उदाहरणार्थ, आमचे चिरंजीव शाहणे पडले! (‘माझा मुलगा मूर्ख आहे’ ऐवजी.) गिळा एकदा आणि शाळेला चालते व्हा. 

(5) काही संबोधने नित्यश: किंवा सामान्यत: बहुमानार्थी बहुवचनी प्रयोगात वापरतात : त्याचा बाप, त्याची आई, पण त्याचे वडील, त्याच्या मातु:श्री; माझा दीर, माझी नणंद, पण माझे भावजी, माझ्या वन्सं, इंग्लंडची राणी, पण इंग्लंडच्या राणीसाहेब; तो बाळ, बाळू, पण ते बाळासाहेब, बाळाजीपंत; तुकारामाला, पण तुकोबांना, तुकाराममहाराजांना.

थोडक्यात सांगायचे तर, जिवंत प्रवाही भाषेतील व्यवस्था नेहमीच सोप्या, ठोक नियमात बसत नाही. परस्परविरोधी सांस्कृतिक प्रवाहांना तिला तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, इंग्लिशभाषकांनी व्यक्तिप्रतिष्ठा जपण्यासाठी thou ऐवजी you कायम केल्याला चारशे वर्षे होत आली. पण परिणामी व्यक्तिनिर्देश अधिक गुंतागुंतीचा झाला. Mr. John Fergusson, Sir John Fergusson, Mr. Fergusson, Sir John (Sir Fergusson नव्हे), John (Mr. John नव्हे), Fergie, Jack, Johnny इतक्या पर्यायांमधून निवड करावी लागते. (पत्नीच्या तोंडी ची. Mr. Fergusson गेल्या शतकात चालत असे, आज मात्र My husband, John असे काही येते.)

दुसरी गोष्ट म्हणजे हे नियम तारतम्याने लावायचे असतात. या तारतम्यभावामागे एक जीवनदृष्टी असते. उदाहरणार्थ, संस्थानी-इनामदारी माहोलात आई मुलाला तुम्ही बाळासाहेब किंवा ते बाळासाहेब संबोधीत असते. उत्तर भारतीय प्रतिष्ठाकांक्षी 

मध्यमवर्गीय मंडळीत आई मुलाला 

‘आप जाइये’ (फार तर : तुम जाओ), 

‘इनकी आदत है’ इत्यादी प्रकारे संबोधीत असते. मराठीभाषक प्रतिष्ठाकांक्षी मध्यमवर्गीय मंडळीत प्रारंभिक कुटुंबात सर्वच सदस्य एकमेकांशी किंवा एकमेकांबद्दल एकवचनात बोलत असतात.

(भाषा आणि जीवन, उन्हाळा 1998.)