बहुसांस्कृतिक वर्ग – शिक्षणातील संगीत वैशाली गेडाम

‘लिमरा श्रेयाच्या संगतीने प्रगती सर्वांची’
‘मुलांना सूर आवडतात’
माझं छोटंसं 120 घरांचं गाव. माझं गाव म्हणजे माझ्या शाळेचं गाव. गावाचं
नावच मुळी कंसात गोंडगुडा. म्हणजे मूळ गाव धोंडाअर्जुनी आणि कंसात गोंडगुडा
लिहावं लागतं. अर्थातच, नावावरून लक्षात येईल, की इथे गोंड लोक राहतात. या
गोंड लोकांच्या वस्तीत एक कुटुंब आहे परधान संस्कृतीचं आणि एक कुटुंब मुस्लीम
संस्कृतीचं. गोंड आणि परधान संस्कृतीत फारसा फरक नाही. दोन्ही संस्कृती
आदिवासीच. दोघांचे देवही सारखेच. मात्र परधान कुटुंबाची भाषा मराठी आहे.
एरवी हे वाक्य मी, ‘एक कुटुंब परधान जमातीचं आणि एक कुटुंब मुस्लीम धर्माचं’
असं लिहिलं असतं. पण अलीकडेच मी डॉ. माधुरी दीक्षित यांचा पालकनीतीमध्ये
(ऑक्टोबर – नोव्हेंबर जोडअंक 2022) आलेला ‘बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं
नातं’ हा लेख वाचला आणि नकळत माझ्या हातून जमात, धर्म हे शब्द
उमटण्याऐवजी ‘संस्कृती’ हा शब्द उमटला आणि माझं हृदय हसलंसुद्धा.
आजकाल मला हे जाणवू लागलं होतं, की वर्गात काहीतरी अद्भुत घडतंय. वर्गाला
सूर, लय, ताल सापडतोय. भिन्न संस्कृतीतील या दोन घरांमुळे तिसर्‍या
संस्कृतीतली मुलं अधिक समृद्ध होतायत. या तिसर्‍या संस्कृतीमुळे ह्या दोन
भिन्न संस्कृतीतली मुलं आधीच समृद्ध झालेली होती. गोंड लोकांची गोंडी भाषा,
त्यांची नृत्यं, गीतं यांनी आधीच शिकून घेतलेली होती. तीन भिन्न भाषा बोलणारी
ही कुटुंबं एकमेकांशी गोंडीतच संवाद साधतात. कारण दोन कुटुंबं सोडली, तर बाकी
पूर्ण गाव गोंडीभाषक. शाळेत सगळी मुलं एकमेकांशी गोंडी भाषेत बोलतात. मी या
शाळेत बदलून आले तेव्हा शाळेतली सगळी मुलं गोंडीभाषक होती. या दोन भिन्न
संस्कृतीतली मुलं अजून शाळेत दाखल व्हायची होती. तेव्हा मराठी भाषा थोडीफार
जमणार्‍या मुलांकडून मी हळूहळू गोंडी भाषा समजून घेऊ लागले आणि वापरू
लागले. मराठी व्यवस्थित समजणारी मुलं तेव्हा नव्हतीच. पहिली-दुसरीतल्या

मुलांना शिकवायला मला जमतच नसे. माझी भाषा त्यांना न समजल्यामुळे ती
माझ्याकडे लक्षच देईनात. वर्गात बसेनात. मला मुलांना जबरदस्तीनं किंवा धाकानं
वर्गात बसवून ठेवता येत नाही. त्यामुळे ही मुलं मुक्तच असायची. मी माझ्या
परीनं प्रयत्न करायचे. यामुळे एक मात्र झालं. मुलं भाषेनं जवळ आली नाहीत, तरी
मनानं माझ्या जवळ आली. दुसर्‍या वर्षी मराठी बोलणार्‍या घरातलं एक मूल
शाळेत दाखल झालं, तिसर्‍या वर्षी दख्खनी-हिंदी बोलणार्‍या घरातलं एक, चौथ्या
वर्षी याच घरातलं आणखी एक मूल दाखल झालं आणि मग आमचा वर्ग रंगीत
आणि सुमधुर झाल्याचं मला जाणवलं. एव्हाना मलाही गोंडी भाषेचा वापर ठीकठाक
करता येऊ लागला. ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी गोंडीचा, मुस्लीम
संस्कृतीसाठी हिंदीचा वापर आपसूक होऊ लागला. मराठी तर या मुलांच्या
शिक्षणाची माध्यमभाषा आहेच. त्यामुळे या भाषेचा माझ्याकडून मोठ्या प्रमाणावर
वापर होणारच. पण सोबतच गोंडी आणि हिंदीच्या वापरामुळे वर्ग समृद्ध होऊ
लागला. पहिली-दुसरीची मुलं वर्गात बसू लागली. आधीच्या मुलांपेक्षा या मुलांना
मराठी बर्‍यापैकी समजू लागलं. माझ्या गोंडी भाषेच्या वापरानं गोंडी संस्कृतीची
मुलं सुखावत असली, तरी शैक्षणिक जीवनात त्यांना मराठीचं महत्त्व समजलं,
जाणवलं असावं, किंवा आपल्याला मराठी नीट बोलता यायला हवं असं वाटलं
असावं; मुलांची माझ्याकडे मागणी अशी, ‘‘ताई, तू आमाले मराटी शिकव आमी तुले
गोंडी शिकवतो.’’ आमच्या वर्गात हा तोंडी करार झाला. मुलं जाणीवपूर्वक मराठी
भाषा वापरून पाहू लागली. मी हिंदीभाषक लिमरा आणि मिजानला कोणतीही गोष्ट
समजावून देण्यासाठी हिंदी भाषा वापरू लागले. मराठीभाषक श्रेयासाठी मराठी आणि
गोंडी मुलांना वैयक्तिक समजावून देण्यासाठी गोंडी भाषा. सार्वत्रिक वापरासाठी
मराठी. अर्थात, गोंडी भाषेतून मला अगदी जुजबी, साध्या-सोप्या गोष्टी समजावून
देता येऊ शकतात. जरा कठीण गोष्टी, संकल्पना समजावून देण्यासाठी श्रेया लिमरा
माझ्या मदतीला येतात. मी मराठीत दिलेलं स्पष्टीकरण या दोघी गोंडीत इतर
मुलांना सांगतात. यामुळे मुलं मराठी, गोंडी, हिंदी या तीन भाषा रोज वापरू
लागलीत. माझ्याशी बोलताना मला समजावं म्हणून गोंडी मुलांच्या एकाच वाक्यात

तीन भाषांतले शब्द येतात. ते मला फार गोड वाटतं. दुसर्‍याला समजावं म्हणून ते
करत असलेली धडपड जाणवते.
श्रेयाच्या मराठी शब्दसमृद्धीमुळे आणि लिमरा, मिजानच्या हिंदी शब्दसंपत्तीमुळे
गोंडी मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ होतेय. एखादा शब्द गोंडी मुलांना समजावून देणं
मला जड जात असल्यास मी आधी या तिघांना सांगते. मग हे गोंडी भाषेतून इतर
मुलांना समजावून सांगतात.
लिमरा मिजानमुळे बाकीच्या मुलांना बिर्याणी समजली. चिकनबिर्याणी,
मटनबिर्याणी, व्हेजबिर्याणी हे पदार्थ माहीत झाले आणि कुडूक हा गोंडी पदार्थ
लिमरा मिजानला माहीत झाला. इदेचा चाँद आणि शिरखुर्मा मराठी आणि गोंडी
मुलांना माहीत झालाय; तर दिवाळीतील घुसाडी नृत्य हिंदी आणि मराठी मुलांना
माहीत झालंय. शाळेतील सर्व मुलांना एकमेकांची संस्कृती माहीत होतेय तसतसे
मुलांच्या हृदयात तरंग उमटतायत. वर्ग संगीतमय होतोय असं जाणवतंय. ‘माझी
भाषा’ वर्गात वापरली जातेय ह्यात मुलांना सन्मान वाटतो. ती स्वतःबाबत विचार
करायला लागतात. मी अधिकाधिक कसा / कशी समृद्ध होईन यासाठी प्रयत्न
करताना दिसतात.
खरं तर आमचं हे एक छोटंसं गाव. सगळी मुलं सोबत राहतात, सोबत खेळतात.
काहीच अडचण नाही. तशी मोठ्या गावातली किंवा शहरातली जवळजवळची, एका
कॉलनीतली, अपार्टमेन्टमधली मुलं मिळून खेळताना, सोबत राहताना दिसतात.
मुलांच्या मनात दुसरी कुणी व्यक्ती जोपर्यंत काही उलटसुलट भरवत नाही, तोपर्यंत
ती एकमेकांशी अगदी निखळ, निरागस आणि मैत्रीपूर्ण वागतात. संस्कृतींमधला
फरक त्यांना दिसत असतो आणि उत्सुकतेपोटी तो जाणून घेण्याचा, हे अंतर कमी
करण्याचा ती प्रयत्नही करतात. मला आठवतं, आठव्या वर्गात असताना इदेच्या
दिवशी माझ्या मुलानं डोळ्यात काजळ घातलं. मी त्याच्याकडे विस्मयानं बघितलं.
तो म्हणाला, ‘‘मी मित्राच्या घरी इदेच्या दावतला चाललोय.’’ मला कौतुक वाटलं
होतं. मुलं अशी एकमेकांच्या संस्कृतीत रंगून जाऊ इच्छितात. मात्र हाच फरक
घरातली आणि समाजातली वडीलधारी माणसं विद्वेषाच्या, उच्चनीचपणाच्या,
श्रेष्ठकनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून मुलांसमोर मांडतात. तिथून सुरुवात होते भेदभाव,

द्वेष, नकारात्मकता रुजायला. त्यामुळे ही बहुसांस्कृतिकता मुलांसमोर जाणीवपूर्वक
येऊ देणं, त्यावर त्यांचा त्यांना विचार करू देणं, त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवणं
हे शाळेचं कर्तव्य ठरतं. ह्यातून दुसर्‍या संस्कृतीबद्दल आपोआपच आदर वाटू
लागतो. माझी शाळा तर अगदी छोटी आहे. मोठ्या शाळांमधून किती अपार संधी
प्राप्त होतील बहुसांस्कृतिकता रुजवण्यासाठी!
भारतीय संस्कृती ही नानाविध भाषा, खानपान, वेशभूषा, सणउत्सव, आस्था यांनी
नटलेली आहे. हीच आपली शक्ती आहे. मात्र अलीकडे देशात असहिष्णू वृत्ती जोर
धरताना दिसत आहे. भारतात शांती सुव्यवस्था जोपासायची आणि वाढायची असेल,
तर ही विविधता, ह्या भिन्न भिन्न संस्कृती, सहिष्णुता आणि बंधुभाव ह्यांची
शाळांतून जपणूक व्हायला हवी. लहानपणी मुलं अगदी सहजपणे एकमेकांना
स्वीकारतात. मात्र वर्गातली बहुसांस्कृतिकता लक्षात न घेता शाळा एकसुरी शिक्षण
देत राहतात आणि ह्यातून मुलांच्या मनात कप्पे निर्माण होतात. मुलांच्या घरची
संस्कृती जोवर वर्गात, शाळेत येत नाही, तिच्या खाणाखुणा उमटत नाहीत, ती
जगल्या-बोलल्या जात नाही तोवर मुलाची शिक्षणाशी नाळ जुळत नाही. प्रत्येक
मुलाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या घरच्या संस्कृतीला अनुसरून घडत असतं. शाळा
मुलांची संस्कृती नाकारते, तेव्हा मुलांचं व्यक्तिमत्त्वही नाकारलं जातं हे शाळेनं
लक्षात घ्यायला हवं. आणि जिथे व्यक्तिमत्त्वच नाकारलं जातं, तिथे त्या शिक्षणाशी
सूर कसे जुळणार? नुसतं लिहिता-वाचता, गणितं करता येणं, पाठांतर करता येणं
आणि परीक्षेचा पेपर सोडवता येणं म्हणजे शिक्षण नाही हे आपण लक्षात घ्यायला
हवं.
शाळांनी ठरवायचंय – मुलं जीवनात सुरेलपण अनुभवतील की बेसूरपणा.
पालकांनीदेखील ठरवायचंय – एकांगी, एकच एक संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या
शाळेत मी माझ्या मुलांना घालावं, की बहुसांस्कृतिकता जोपासणार्‍या शाळेत!
निर्णय आपल्याच हातात आहे.
वैशाली गेडाम
gedam.vai@gmail.com

लेखक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) येथील जिल्हा परिषदेच्या
प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शिकवताना त्या सातत्याने नवनवीन प्रयोग करत
असतात.