बालचित्ररंग

अमृताताईंनी सात-आठ वर्षे वेगवेगळ्या गावांमधे बालरंजन केंद्र चालवले. त्या सुट्टीत मुलांसाठी शिबिरंही घेतात. त्यांच्या अनुभवातून…

चित्रकला. चित्रं काढण्याचं कसब. आपण जे प्रत्यक्षात पाहातो त्याची चित्रं काढणं किंवा आपण जे प्रत्यक्षात पाहू इच्छितो त्याची चित्रं काढणं. मुलांची चित्रं म्हणजे चित्र काढणं कमी आणि कल्पनाविलास जास्त असतो. मुलं पेन्सिल हातात धरू लागली की रेघोट्या काढू लागतात. त्या रेघोट्यांमध्ये त्यांना चित्रं दिसत असतात. जशी चंद्रावरच्या डागांमध्ये (सत्यस्थिती माहीत असताना देखील) आपल्याला ससा-हरीण दिसतं तसंच. मुलं चित्रं कमी काढतात पण आपल्या चित्रांबद्दल भरभरून बोलायला त्यांना फार आवडतं. त्यांचं ते चित्रवर्णन ऐकून आपल्याला त्या रेघोट्यांमध्ये खरंच ती चित्रं दिसू लागतात.

माझा मुलगा अंबर लहान होता, तेव्हा खूप चळवळ्या, धडपड्या होता. फक्त चित्र काढताना – रंगवतानाच तो तासन्तास एका जागी बसू शकायचा. अगदी समाधीच लागायची म्हणा ना! एकदा माझ्या दिरांनी त्याला असं शांत बसून चित्र काढताना पाह्यलं. त्यांनी खूप उत्सुकतेने त्याची चित्रांची वही पाहिली. नंतर नंतर तर ते आले की अंबर ड्रॉईंगबुक घेऊन त्यांच्याजवळ येऊन बसायचा. चित्रकलेमुळे हे काका त्याचे अगदी दोस्तच बनले.

मुलांची चित्रकला म्हणजे मुलांचं रेषा – रंग या माध्यमाशी ओळख करून घेणं असतं. कधी कधी तर ते तेलकट खडू घेऊन नुसतं गिरगटून ठेवतात. त्यातूनच बालरंजन केंद्रातल्या मृणालला एकदा शोध लागला, ‘‘मावशी, सगळ्या खडूंनी एकदम रंगवलं ना की काळा रंग तयार होतो.’’

मुलं वेगवेगळ्या तऱ्हेने रंगांचा आनंद मिळवतात. एकदा टि.व्ही. वरच्या सी.आय.डी. कार्यक्रमात बोटांचे ठसे उठवताना पाह्यलं आणि झालं! अंबरने दादाची शाईची बाटली घेतली आणि कागदावर बोटांचे ठसे उठवून पाहू लागला. समाधान होईना तेव्हा नेलपॉलीश बोटांना लावून ठसे उमटवणं सुरू झालं. अगदी कपाटावर देखील. मग मात्र लक्ष गेल्यावर हस्तक्षेप करणं भागच पडलं.

असे सगळे उद्योग सहसा मुलं करतात ती एकटी असतात तेव्हा. कारण आईबाबांकडून उपदेश आणि ओरडा मिळायची खात्री असते. पण आई-बाबा जेव्हा मुलांबरोबर ठसेकाम, घडीकाम, ओरीगामी, इ. गोष्टी करतात. तेव्हा मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि पालकांची उपस्थिती त्यांना हवीशी वाटते. त्यांच्या मदतीने आपण जास्त छान काहीतरी करू शकू असा विश्वास वाटतो आणि मुलांचे उपद्व्याप कमी होतात.

मुलांना फक्त कागदावरच चित्र काढायला आवडतं असं नाही. फळा हेही त्यांचं आवडतं माध्यम असतं. फळ्यावर, भिंतीवर ते मोठमोठी चित्रं काढू शकतात. मातीत काडीनं चित्र काढणं हीसुद्धा आवडती गोष्ट असते. एकदा शिबिरात अमेयनं अंगणात भला मोठा आणि सुरेख हत्ती काढला. त्याचा त्याला इतका आनंद झाला होता. ‘‘मावशी, मी छोटा हत्ती नेहमी काढतो, पण इतकाऽ मोठा हत्ती मी काढू शकेन असं मला वाटलंच नव्हतं.’’

मुलांच्या मनःस्थितीचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रात पडतं. एकदा केंद्रातल्या चार वर्षाच्या निनादने कागदभर काळ्या खडूने उभ्या उभ्या रेषा काढून ठेवल्या होत्या. त्याला दुसरा कागद दिला तरी परत तसंच. म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला, ‘‘मग ऽ, मुंबईला आत्याच्या घरातून मला असंच दिसलं. काळं काळं, ढग आणि पाऊस.’’ त्याच्या आईकडून त्याचा खुलासा झाला. वीकएंडसाठी ते मुंबईला गेले होते. आईबाबांनी निनादला नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेत न्यायचं वचन दिलं होतं. पण अतिवृष्टीमुळे ते कसेबसे मुंबईत पोचले फक्त. बांद्रयाच्या ११ व्या मजल्याच्या खिडकीतून त्याला फक्त पाऊसधाराच पाह्यला मिळाल्या, म्हणून तो हिरमुसला. मनातलं ते चित्र असं कागदावर उतरलं होतं.

काही वेळा मुलांना शाळेत फारच ढोबळ चित्रकला शिकवली जाते. एखादं चित्र टीचर बोर्डवर काढून देणार आणि तेच चित्र होमवर्क आणि क्लासवर्क असं दोन वेळा काढायचं. अंबरला एकदा शाळेत मोर काढायला सांगितला होता. त्याला मी चार/पाच प्रकारे मोर काढून दाखवला आणि सांगितलं, ‘‘तुला येईल, सोपा वाटेल असा मोर काढ.’’ तर म्हणाला, ‘‘नाही आई, टीचरने अस्साच काढायला सांगितला आहे. नाहीतर टीचर रागावेल.’’ दोन दिवसांनी मात्र मी घरी आले तर घनदाट जंगलात मुक्तपणे वावरणारा एक रंगीत, सुंदर मोर घराच्या फळ्यावर माझी वाट पाहात होता.

ते पाहिलं आणि वाटलं या छोट्यांना आपण थोडा मदतीचा हात आणि भरपूर स्वातंत्र्य द्यायला हवं. मग पाहायला मिळते त्यांची बहरलेली सूक्ष्म क्षमता. मुलांची वाढ – मानसिक, बौद्धिक, आपण त्यांच्या चित्रांतून अनुभवू शकतो.

शाळेमध्ये चित्रकला शिकवताना – निसर्गचित्र, स्थिरचित्र असं शिकवण्याच्या नादात मुलांची originality मारली जाते. त्यापेक्षा अक्षरातून, अंकातून, आकारातून (चौकोन-त्रिकोण) चित्रे शिकवली आणि विचारांना चालना दिली तर अभिव्यक्तीचं हे प्रभावी माध्यम सगळीच लहान मुलं फार झटकन आत्मसात करतील असं नाही वाटत?

अमृता लिमये